बार्शी येथे कोरोनादेवीची स्थापना

प्रा. डॉ. अशोक कदम - 9850012530

संपूर्ण जग कोरोना (कोविड-19) महामारीने ग्रासलेले आहे. जगातील अनेक देशांत या रोगावर अनेक वैज्ञानिक खात्रीशीर उपाय शोधत आहेत, प्रयोगशाळेत लसीची चाचपणी चालू आहे. अजूनसुद्धा त्यावर प्रभावी लस शोधण्यात यश आलेले नाही. तथापि, भारतात मात्र तथाकथित बुवा-बाबा आयुर्वेदाच्या नावाखाली ‘जालीम’ उपाय सांगत असताना आपण दररोज वाचत असतो व ऐकत असतो. काहींनी ‘काढा’ शोधला आहे, तर काहींनी ‘चूर्ण’ तयार केले आहे. तथापि, यावर काही जण देवाचा आधार घेऊन कोरोनाला पळविण्याचा आटापिटा करत आहेत. मात्र यावर खात्रीशीर औषध तयार नाही. यावर सर्वसामान्य; तसेच तथाकथित सुशिक्षित लोकसुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीत.

असाच प्रकार बार्शी (जि. सोलापूर) येथे ऑगस्ट महिन्यात घडला. बार्शी शहरालगत सोलापूर रोड येथे ब्रिटीशकालीन फ्री कन्टेनमेंट वस्ती आहे. तेथील पारधी वस्तीतील ताराबाई पवार, कमलाबाई पवार, सोमनाथ पवार आदी लोकांनी कोरोनादेवीची स्थापना केली. कमलाबाई पवार नावाच्या मध्यमवयीन स्त्रीच्या स्वप्नात कोरोनादेवी आली आणि तिने तिची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. तसे केल्यास कोरोना रोगाच्या संकटातून सर्वांची सुटका होेईल, असा सल्ला दिला. त्यानुसार संबंधित स्त्रीने घरासमोर तीन दगडे रचून कोरोनादेवीची स्थापना केली. काहींनी आपल्या घरातील देव्हार्‍यातच तिची स्थापना केली व त्यावर हळद-कुंकू, बुक्का, लिंबू आदी वस्तू ठेवून पूजा सुरू केली व बकर्‍या-कोंबड्याचा नैवेद्य द्यायला सुरुवात केली. याची कुणकुण एका स्थानिक न्यूज चॅनेलवाल्याला लागली आणि त्यानं पारधी समाजातील काही जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे ही बातमी सगळीकडे वार्‍यासारखी पसरली.

यावर कहर म्हणजे कोरोनादेवीने मास्क घालण्यास मनाई केली आहे. ‘फिजिकल डिस्टन्स’ या सर्व गोष्टी थोतांड आहेत, असे सांगावयास सुरुवात केली. कोरोनादेवीच्या कृपेमुळे पारधी समाजातील लोकांना कोरोना होत नाही; झाला तर बकर्‍याचा किंवा कोंबड्याचा बळी दिल्यास कोरोना बरा होतो, असे सांगितले. त्यामुळे बार्शी पोलीस स्टेशनने याची दखल घेतली व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188, 3 प्रमाणे (गुन्हा नं. 654/2020) गुन्हा नोंदवून दोन व्यक्तींना अटक केली.

ही घटना घडल्यानंतर बार्शी ‘अंनिस’ शाखेने तत्परता दाखवून या स्थानिक न्यूज चॅनेलवरून कोरोना महामारीसंदर्भात प्रबोधन/निवेदन केले. कोरोना आजारावर अजून लस निघालेली नसून, अशा अफवेवर विश्वास न ठेवता, मास्कचा वापर करावा, फिजिकल/सोशल डिस्टन्स ठेवावे व रोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असे आवाहन केले. त्यानंतर पारधी समाजामध्ये जाऊन स्थानिक पत्रकारांच्या सहकार्याने प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असता समाजातील पुढार्‍याने न येण्याची विनंती केली. आमच्या समाजातील लोकांना आपली चूक कळली असून, बाहेर पडताना लोक मास्क घालत आहेत. कोरोनादेवी काढून टाकण्यात आली आहे. तिथे कोणता बळी दिला जात नाही, असे सांगितले. तसेच वातावरण निवळल्यानंतर आपण येऊन प्रबोधन करा, असे सांगितले.

यावरून अंधश्रद्धेविरुद्धची लढाई किती कठीण आहे, याची प्रचिती येते.

बार्शी शहर पोलीस स्टेशन

गु. र. नं. 654/2020 भा. दं. वि. संहिता कलम 188, राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा कलम 52, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 3. प्रमाणे

1) फिर्यादी- पोलीस कॉन्स्टेबल 457 रविकांत चंद्रकांत लगदिवे, नेमणूक बार्शी शहर पोलीस ठाणे

2) आरोपी – (1) सोमनाथ परशुराम पवार वय 42 वर्षे, रा सोलापूर रोड बार्शी ता. बार्शी

(2) ताराबाई भगवंत पवार वय 52 वर्षे, रा. सोलापूर रोड, बार्शी ता. बार्शी

3) गु.घ.ता.वेळ ठिकाण- दिनांक 30/08/2020 ते दिनांक 02/09/2020 रोजी सकाळी 11-00 वा. पर्यंत

4) गु.द.ता.वेळ- दिनांक 02/09/2020 रोजी

हकिकत यातील आरोपीत मजकूर यांनी कोविडदेवी स्थापन केल्याचे सांगून लोकांना देवीला नैवेद्य वाहिल्यास मास्क वापरण्याची गरज नाही आम्ही इतके दिवस झाले देवीची पूजा करतो, म्हणून आम्हाला मास्क न वापरता; तसेच इतर कोणतीही काळजी न घेता आजपर्यंत काही झाले नाही. देवीची ओटी भरल्यास कोरोना रुग्ण देखील बरा होतो, अशी अफवा पसरवून कोरोना रोगाचा प्रसार होईल, असे कृत्य केल्याने त्यांनी भा. दं. वि. संहिता कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम 52. साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 3. प्रमाणे त्याचे विरुद्ध फिर्यादी यांनी समक्ष पोलीस ठाण्यास येऊन फिर्याद दिल्याने नमूदप्रमाणे गुन्हा दाखल

तपास पो.ना. 466 शेलार