आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करून मुंबईत भानामती

मुक्ता दाभोलकर -

भानामतीने त्रासलेल्या व्यक्ती जेव्हा सगळे उपाय करून थकतात, तेव्हा त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येतात. या प्रकरणात देखील असेच घडले. या प्रकरणाचे वेगळेपण म्हणजे ही भानामती ‘हाय-टेक’ होती.

महानगरातील एका टोलेजंग इमारतीत एक उच्च-मध्यमवर्गीय कुटुंब कोरोनामुळे बंदिस्त आयुष्य जगत होते. विज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेले राजन हे सरकारी नोकरीत उच्चपदस्थ आहेत. त्यांची पत्नी कोमल या एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहेत. त्यांचा 16-17 वर्षांचा मुलगा रोहित, शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली साधारण सत्तर वर्षे वय असलेली राजन यांची आई सुमती हे सर्वजण त्या फ्लॅटमध्ये नेहमीप्रमाणे राहतात. त्यांच्याकडे एक देखणा कुत्रा देखील आहे. कोमलचा भाऊ सिंगापूरला असतो. टाळेबंदी सुरू होण्याच्या थोडेच दिवस आधी कोमलचे आई-वडील सिंगापूरला जाऊन आले होते. त्यानंतर ते काही दिवसांसाठी कोमलकडे आलेले असताना टाळेबंदी जाहीर झाल्याने कोमल व राजन यांनी त्यांना तेथेच ठेवून घेतले. टाळेबंदी सुरू झाल्यानंतर तीन महिने त्या घरात हे सहाजण एकत्र राहत होते. राजन आणि कोमलला काहीवेळा नोकरीच्या ठिकाणी जावे लागे, काही दिवस ते घरून काम करत. बाकी चौघेजण पूर्णवेळ घरीच असत.

राजन आणि कोमलचा प्रेमविवाह होता. त्यांच्या कुटुंबांची जात आणि भाषा वेगवेगळी होती. आम्हाला राजनचा फोन आला, तेव्हा ते अत्यंत हतबल झालेले होते. त्यांच्या घरात; प्रामुख्याने त्यांच्या सासर्‍यांच्याबाबत अतर्क्य घटना घडत होत्या.

मागील महिनाभरात घडलेल्या घटना राजन यांनी आम्हाला सांगितल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत – कोमल यांचे आई-वडील त्यांच्याकडे राहायला आल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी या आजोबांना मोबाईल कंपनीकडून फोन आला की, ‘तुमचे नेट रात्रभर चालू राहिल्याने तुम्हाला 3500 रुपये बिल आलेले आहे.’ बिल कमी करून घेण्यासाठी आजोबा दहा-बारा वेळा त्या कंपनी प्रतिनिधीबरोबर बोलले. त्यानंतर प्रतिनिधीने त्यांना संगितले की, ‘तुमचे नाव अनिल आहे, तर हे बिल सुनील यांचे असून ते चुकून तुम्हाला पाठवण्यात आले आहे. तुम्ही माझी तक्रार कंपनीकडे करू नका. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुनील यांच्याशी बोलून घ्या,’ असे म्हणून कंपनी प्रतिनिधीने आजोबांना सुनील यांचा नंबर पाठवला. आजोबांनी सुनील यांना फोन केला व त्यानंतर तो विषय संपला. त्यानंतर आठ दिवसांनी आजोबांना सुनील यांच्या नंबरवरून संदेश येऊ लागले. ‘माझा मुलगा सिंगापूर पोलीसमध्ये आहे, तो तुमच्या मुलाची तक्रार करेल.’ आजोबांनी या संदेशांकडे दुर्लक्ष केले. परंतु हळूहळू संदेश वाढत गेले. ‘मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नाही, तर तुमच्या स्वतःच्या घरी येऊन भेटणार आहे. मी तुम्हाला बघून घेईन!’ आजोबांकडे त्यांच्या मुलाने दिलेला ‘आय फोन’ व स्मार्ट फोन नसलेला एक साधा फोन असे दोन फोन आहेत. ‘आय फोन’वर संदेश यायचे, काही सेकंद दिसायचे आणि लगेच नाहीसे व्हायचे. रोहित दुपारी आजोबांना ‘साई’ नावाची मालिका टीव्हीवर लावून द्यायचा. घरात स्मार्ट टीव्ही आहे; परंतु डोंगल न घेतल्याने तो ‘वाय-फाय’ला जोडता येत नाही. ‘क्रोम कास्ट’ने रोहित ही सीरियल आजोबांना लावून द्यायचा. काही दिवसांनंतर सीरियल मध्येच बंद होऊ लागली व त्यांच्याच घरातील फोटो टीव्हीवर झळकू लागले. हळूहळू तेच फोटो मॉर्फ होऊन टीव्हीवर येऊ लागले. जसे की, आजोबांच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे आहेत, त्यांच्या डोक्याला वायर गुंडाळलेली आहे, घरातल्या सुरीने आजोबांचा खून होतोय. सगळ्यांना वाटले की, तो जो कोणी आहे त्याने आजोबांचा मोबाईल ‘हॅक’ केला आहे आणि त्यातून तो टीव्ही वापरून हे सगळे करत आहे. कोमल आणि राजन यांनी आजोबांचे सीमकार्ड काढून ठेवले आणि त्यांचे दोन्ही मोबाईल फॉर्मेट करून घेतले.

त्यानंतर राजन यांनी सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार केली. आजोबांनी त्यांच्याच लॅपटॉपवर ती तक्रार टाईप केली आणि ई-मेल केली. तक्रार ‘सेंड’ केल्यानंतर लगेचच ती ‘सेंट फोल्ड’रमधून गायब झाली. लॅपटॉपमध्ये दुसरीकडे जिथे ती ‘सेव्ह’ केली होती, तेथून पण ती गायब झाली. दुसर्‍याच क्षणाला आजोबांच्याच ‘मेल आय डी’वरून आजोबांना मेसेज आला; त्यात असे लिहिले होते की, ‘तुम्हाला काय असे वाटते का, की मेलेल्या माणसाला पोलीस पकडू शकतात? तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप माझ्या ताब्यात आहे!’ त्यानंतर कुटुंबीयांना असे वाटले की, हा लॅपटॉप देखील ‘हॅक’ केलेला आहे. दुसर्‍या दिवशी पोलिसांसोबत अपॉईंटमेंट होती, म्हणून राजन डीसीपी कार्यालयात गेले. त्यांची चर्चा सुरू असताना घरून दोन-तीन फोन आले, म्हणून त्यांनी फोन घेतला, तेव्हा त्यांना समजले की, घरातील बंद टीव्ही अचानक सुरू होऊन संदेश आला होता की, ‘त्यादिवशी तुमच्या कुत्र्यामुळे तुम्ही वाचलात. आज अमावस्या आहे. त्यामुळे कुत्र्याला पण मी ‘बायपास’ करू शकतो. आज रात्री मी येणार आणि तुम्हाला मारणार.’ पोलिसांना पण नवल वाटलं. ते म्हणाले, ‘आम्हाला पण हे बघावं लागेल.’

कुटुंबीयांनी आजोबांचा लॅपटॉप बंद केला. आजोबांच्या मुलाचे म्हणणे होते की, ‘आय फोन’ ‘हॅक’ होत नाही त्यामुळे सीम काढून ‘आय फोन’ सुरू ठेवला होता. टीव्हीचे ‘क्रोम कास्ट’ उपकरण काढून ठेवले होते. दुपारी आजोबा राजन यांच्या लॅपटॉपवर ‘साई’ ही मालिका बघत होते, तेव्हा त्यांच्या ‘आय फोन’वर एक संदेश आला आणि एक फोटो ‘स्क्रीन सेव्हर’ म्हणून ‘सेव्ह’ झाला. सिंगापूरहून येताना आजोबांनी व्हील चेअर घेतली होती. जो माणूस ती ढकलत होता, त्यांचा आणि आजोबांचा तो ‘सेल्फी’ होता. सोबतचा संदेश असा होता की, ‘तुम्हाला भेटल्यानंतर दोन दिवसांनी माझा मृत्यू झाला आहे. माझ्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. त्यामुळे दोन दिवसांनी मी तुम्हाला मारणार आहे.’ राजन हे या फोटोचा ‘स्क्रीन शॉट’ घेऊ शकले. बाकी टीव्हीवर येणारे सगळे संदेश आणि चित्रे हे फोटो काढण्याआधी ‘डिलिट’ व्हायची. नंतर त्यांनी लॅपटॉप पण फॉर्मेट करायला दिला. आजोबांच्या एक विश्वासातले भटजी होते. कुटुंबीयांनी त्यांना दुसर्‍या गावाहून बोलावले. त्यांनी घरात होम केला. ‘ही भानामती आहे. आपण काही कडक उपाय करायला नकोत. कारण त्याचा त्रास होईल, आपण पूजा करून हे हळूहळू घालवू, हे आठवडाभरात कमी होईल,’ असे त्यांनी संगितले. राजन त्यांना सासू-सासर्‍यांच्या घरी देखील घेऊन गेले; पण तेथे काही बाधा नाही, असे भटजींनी सांगितले. त्यानंतर ‘बाहेरचे’ बघण्यासाठी कुटुंबीय अजून दोन ठिकाणी जाऊन विभूती घेऊन आले. एका गुरूंनी सांगितलेल्या विशिष्ट चित्राचे स्टीकर्स त्यांनी प्रत्येक खोलीत लावले.

रोहित ‘भगवद्गीता’ वाचतो; आजोबांनी झोपताना ते पुस्तक त्यांचे संरक्षण व्हावे, या इच्छेने जवळ ठेवले होते. दुसर्‍या दिवशी आजोबा व आजी या दोघांच्या डोक्यावर अंड्याचा बलक असावा, असे काहीतरी पडले, कुकरची शिट्टी घरंगळत आली आणि रोहितच्या अंगावर पडली. आजोबांच्या साध्या फोनवर संदेश आला की ‘भगवद्गीते’ची जागा बदललीत म्हणून मी काल तुम्हाला, तुमच्या बायकोला व नातवाला प्रसाद दिला आहे.’ लगेच तो संदेश पुसला गेला. हे संदेश कोणत्या नंबरवरून यायचे ते कळायचे नाही. सर्व ‘सेल्फ जनरेटेड’ मेसेज असायचे.

एके दिवशी घरातून बाहेर पडताना राजन आजोबांना म्हणाले की, ‘इथे तुम्हाला भीती वाटत असेल तर आपण काही दिवस तुमच्या घरी जाऊन राहू.’ त्यानंतर दोन तासांनी राजन यांना घरून फोन आला की, त्यांच्या टीव्हीवरती होम थिएटरचा जो ‘व्हूपर’ आहे, त्यातून आवाज येत आहे. या ‘व्हूपर’ला विजेची जोडणी अजून करायची होती, तरी तो आपोआप सुरू झाला आणि त्यातून कोणीतरी बोलू लागले की, ‘मी तुमची वाट बघतोय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी या, तिथे आल्यानंतर मी तुम्हाला मारेन!’ वस्तू पडणे सुरूच होते. त्यानंतर आठवडाभर आजोबा सांगू लागले की, रात्री त्यांची उशी कोणीतरी वर करतंय. एका रात्री त्यांच्या तोंडावर पाणी पडलं. ‘एसी’तून पाणी पडत असेल, असा विचार करून राजनने ‘एसी’ बंद केला व त्यांना दुसर्‍यास बाजूला तोंड करून झोपवले, तरीदेखील परत त्यांच्य अंगावर पाणी पडले. आजींच्या डोळ्यांत पाणी जाऊन त्यांचे डोळे लाल झाले. हळूहळू पेन ड्राईव्ह, लिंबू, मिरची अशा घरातील वस्तू त्यांच्या अंगावर पडायला लागल्या.

कुटुंबीय खूपच अस्वस्थ झालेले होते. त्यामुळे ‘कोव्हिड’काळ असून देखील आम्ही तातडीने त्यांच्या घरी भेट द्यायचे ठरवले. भानामतीची प्रकरणे हाताळण्याच्या ‘महाराष्ट्र अंनिस’च्या पद्धतीप्रमाणे भानामती घडत असलेल्या ठिकाणी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे संवाद साधणे आवश्यक होते. अनिश पटवर्धन, वंदना शिंदे व मी असे आम्ही तिघेजण दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. सुरुवातीला 15-20 मिनिटे आम्ही सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या. राजन यांच्या आईने डॉ. दाभोलकरांची ‘यू ट्यूब’वरील भाषणे ऐकली होती. त्यांना ‘अंनिस’चे विचार पटतात, हे त्यांनी संगितले. ‘अंनिस’च्या हस्तक्षेपानंतर भानामतीचा प्रकार नक्की थांबतो, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी निश्चिंत असावे, असा आम्ही त्यांना दिलासा दिला. आम्ही तिघांनी मिळून भानामतीची पंधरा प्रकरणे हाताळली होती. त्यामुळे भानामती कोण करते, हे आपल्याला समजते व आपण तो प्रकार थांबवू शकतो, असा आम्हाला विश्वास होता. घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मुलाखतींचे सत्र सुरू झाले. मुलाखतीची पहिली फेरी झाल्यानंतर आम्ही तिघांनी स्वतंत्रपणे एका खोलीत जाऊन आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल चर्चा केली. राजनची आई, कोमलची आई, राजन आणि कोमल यांच्याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही, याबद्दल आमचे एकमत झाले. राजनवर आमचा संशय नव्हता. कारण त्यांनी स्वतः पाठपुरावा करून आम्हाला घरी बोलावून घेतले होते व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बर्‍याचदा ते घराबाहेर असताना भानामतीचे प्रकार घडलेले होते. राजन यांच्या आईबद्दल संशय न घेण्याचे महत्त्वाचे कारण देखील हेच होते की, भानामतीचा प्रकार घडत असे, तेव्हा बहुतेक वेळा त्या त्यांच्या खोलीत होत्या. कोमल यांच्या आईबद्दल आम्हाला संशय वाटला नाही. कारण त्यांच्याकडे ‘स्मार्ट फोन’ नव्हता व त्यांचे मोबाईलबद्दलचे ज्ञान अगदी जुजबी होते. कोमल यांच्याबद्दल असलेला संशय देखील दूर झाला. कारण बहुतेक वेळा भानामती घडली, तेव्हा त्या घरी असल्या तरी भानामतीच्या प्रत्येक घटनेच्या वेळी त्या भानामती घडलेल्या ठिकाणी नव्हत्या. या कुटुंबाशी संवाद साधेेपर्यंत आमच्या मनात एक अशी शंका होती की, कोमलचे आई-वडील येथे राहत आहेत, हे राजनना आवडत नाही, असे आहे का? त्यांनी त्यांच्या घरी परत जावे, असा राजन यांनी तगादा लावला आहे का? भानामतीतून संदेश देणारा तथाकथित आत्मा कोमलच्या आई-वडिलांनी त्यांच्या घरी जाऊ नये; तेथे गेल्यास त्यांना धोका आहे, असे सांगत असे. आई-वडिलांना त्यांच्या घरी जावे लागू नये, म्हणून कोमल हे करत असतील का? परंतु कुटुंबीयांना भेटून असे लक्षात आले की, कोमलचा घरातील वावर अत्यंत मोकळा आणि आत्मविश्वासपूर्ण होता. या मुलाखतींमधून असे लक्षात आले की, राजन आणि कोमल यांच्यामध्ये कोमलचे आई- वडील तेथे राहत असण्यावरून कोणताही तणाव नव्हता. कोमलच्या आई-वडिलांना जावयाच्या स्वभावाबद्दल मनापासून कौतुक होते. आजोबांना त्यांच्या मागे लागलेल्या आत्म्याची खूप भीती वाटत असे. त्यामुळे अनेक रात्री कोमल आणि राजन त्यांना मध्ये घेऊन झोपत असत. कोमलशी बोलताना त्यांनी एका पत्राचा ‘स्क्रीन शॉट’ दाखवला. मानवी हस्ताक्षरात, इंग्रजी भाषेत ते पत्र लिहिले होते. आत्म्याने (!) त्यात आजोबांसाठीचा संदेश लिहून ते पत्र आजोबांच्या उशीवर ठेवले होते. त्यात लिहिले होते की ‘मी तुझा मित्र आत्मा आहे, तर तुला आता घाबरायची गरज नाही.’

आजोबा आणि रोहित या दोनच व्यक्ती अशा होत्या की, ज्या भानामतीची प्रत्येक घटना घडली, तेव्हा तेथे हजर होत्या. आजोबांशी बोलताना त्यांना विचारले होते की, त्यांना कशाची चिंता वाटते का? तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की रोहितची एकाग्रता कमी पडतेय, याची त्यांना चिंता वाटते.

यानंतर आम्ही घरातील सर्व सदस्यांची एकत्रित बैठक घेतली व त्यांना संगितले की, जगात अतींद्रिय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल आमची शंभर टक्के खात्री आहे. त्यामुळे हे जे काही घडतंय ते कोणीतरी माणूसच करत आहे आणि ती व्यक्ती या घरातीलच आहे, हे नक्की. आम्ही हे देखील सांगितले की, जे कोणी हे करत आहे, त्या व्यक्तीचा इतरांना त्रास देणे हा हेतू नसून, स्वतःच्या मनातील ताणाचा निचरा करणे, ही त्या व्यक्तीची गरज आहे. त्या व्यक्तीची घुसमट तिला व्यक्त करता येत नाही. त्यामुळे तिने हा मार्ग निवडला आहे. त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळाली पाहिजे. पुढे जाऊन हे देखील संगितले की, स्वतःमध्ये अतींद्रिय शक्ती असल्याचा आभास निर्माण करून दहशत माजवणे, हा जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा आहे आणि जे कोणी हे करत असेल, त्याने हे तात्काळ थांबवावे. यानंतर आम्ही चहा घेत असताना घरातील वेगवेगळ्या व्यक्तींनी स्वतंत्रपणे अगदी कमी वेळात आम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्यावरून स्पष्ट झालेले संपूर्ण चित्र पुढीलप्रमाणे –

रोहित अभ्यासात खूप हुशार होता. त्याने इंजिनिअर व्हावे व त्यानंतर ‘यूपीएससी’ करावे, असे त्याच्या वडिलांना वाटे. सगळ्या सोयी असूनही तो कष्ट करण्यात कमी पडतो, असे म्हणून ते अभ्यासासाठी रोहितच्या खूप मागे लागत. त्याला मार देखील पडे. वडिलांसमोर स्वतःचे एक रूप सादर करायचे आणि वडील नसताना स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचे, असे करून रोहित वडिलांच्या अपेक्षांच्या मार्‍यापासून स्वतःचा बचाव करत असे. वडिलांच्या अपेक्षांना तोंड देताना त्याची घुसमट होतेय, हे घरातील इतर लोकांच्या लक्षात येत होते. परंतु राजन त्यांच्या मतावर व वागण्यावर अडून होते. भानामती करणारी व्यक्ती साधारणपणे स्वतःच्या बाबतीत घटना घडताहेत, असे दाखवते; पण रोहितने आपल्या 85 वर्षांच्या आजोबांच्या माध्यमातून भानामती करायला सुरुवात केली. या भानामतीत वापरली गेलेली तांत्रिक कौशल्ये ही आजोबांना प्राप्त असणे शक्य नाही, असे आम्हाला वाटत होते; पण प्रत्येक घटना त्यांच्याच बाबतीत घडत होती, त्यामुळे मनात शंका होती. प्रत्येक घटना घडताना रोहितदेखील खोलीत होता, हे लक्षात आले आणि शंका फिटली. यानंतर राजन आणि कोमल यांच्याशी आमचे मनमोकळे बोलणे झाले. त्या सर्वांनी मिळून मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचे ठरवले. राजन यांच्या आईने त्या त्यांच्या गावी गेल्यावर ‘अंनिस’च्या कामाला जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना भानामतीची प्रकरणे सोडवता येतात, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही, यावर त्यांचा शंभर टक्के विश्वास असतो. इतर अनेकांना ‘अतींद्रिय शक्ती नाही, याची जवळपास खात्री असते; पण कदाचित असली तर काय सांगावे?’ असे देखील वाटत असते.

रोहित हे सगळं नेमकं कसं करायचा, हे आम्हाला माहीत नाही. एका मित्राचा मुलगा एकदा सांगत होता की, तो एका नातेवाईकांच्या घरी गेलेला असताना त्यांनी लग्नाची सीडी लावून सगळ्यांना बोअर करायला सुरुवात केल्यावर याने मोबाईल वापरून ती धडाधड ‘फॉरवर्ड’ करायला सुरुवात केली. काहीतरी गोंधळ होतोय म्हणून त्यांनी शेवटी ती सीडी बंद केली. मोठ्यांनी ‘पॉवर’ वापरली तर मुले ‘सुपरपॉवर’ वापरतात.