प्रा. डॉ. निनाद शहा -
उत्क्रांती दरम्यान मानव जीवनात अनेक दंतकथा, पौराणिक कथा, अंधश्रद्धा वगैरेंची निर्मिती झाली. सुरुवातीस त्यामध्ये विविध गोष्टींचे अज्ञान, आकलन, बाल्यावस्थेत असणारी तार्किकता इत्यादी कारणे होती. त्यामुळे आंधळा विश्वास हा जगातील सर्वच संस्कृतीचा भाग बनल्याचे दिसते. पण जसजशी बुद्धिमत्ता, विचारशक्ती विकसित होत गेली व वैज्ञानिक दृष्टिकोन वर्धिष्णू होत चालला तसतशी ही अंधश्रद्धा कमी व्हायला हवी होती. पण ह्या अंधश्रद्धांचा लोकांवर फार मोठा पगडा असल्याने त्या फारशा कमी होताना दिसत नाहीत. बर्याच अंधश्रद्धांत आर्थिक स्वार्थ असल्याने त्या मुद्दाम पसरविल्या जातात. अंधश्रद्धाळू सारासार विचारशक्ती हरवून बसले असल्याने त्यांना ते बळी पडतात. अंधश्रद्धेत शकून- अपशकुनांचा फार मोठा बोलबाला असतो. यात गमतीचा भाग असा की, वेगवेगळ्या समाजात, जातीत, देश – प्रदेशात, परंपरांत त्याचा अर्थ वेगवेगळा लावला जाताना दिसतो. याशिवाय काही अंधश्रद्धा या वैयक्तिक असतात. म्हणजे, एखाद्याला अशी एखादी श्रद्धा चांगल्या शकुनाची वाटते तर दुसर्याला तीच अपशकुनी वाटते.
माणसाने या अंधश्रद्धांत अनेक प्राण्यांना अडकविले आहे आणि यात सर्वांत सामान्य प्राणी म्हणजे पक्षी होय. पक्ष्यांचे उंच आकाशात उडणे हा आदिमानवाचा निश्चितच कुतुहलाचा, आश्चर्याचा आणि गूढ असा भाग असल्याने, देवाचे दूत, प्रतिनिधी किंवा प्रसंगी परमेश्वराचा अवतारच म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाई.
त्यामुळे पक्ष्यांविषयी अनेक विलक्षण मिथकांची (myth), काल्पनिक गोष्टीची निर्मिती झाली ज्यात जीवन, मृत्यू, नशीब, प्रेम इत्यादी भावना निगडित असतात. देवाकडून पक्षी शकून-अपशकुन, आशा असे संदेश घेऊन येतात अशी पकी धारणा त्यात असे.
जगातील अनेक संस्कृतीमध्ये पक्षी केंद्रित अंधश्रद्धा आढळतात. आजही, प्रगत वैज्ञानिक युगातही, त्या बर्याच प्रमाणात प्रचलित आहेत. घुबड, पिंगळा, टिटवी, निळकंठ, धनेश, कावळा, चकोर, भारद्वाज, सुतार इत्यादी अनेक पक्ष्यांविषयी विविध अंधश्रद्धा आढळतात.
घुबड (Owl) – या पक्ष्याविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. घुबडाची शारीरिक वैशिष्ट्ये, त्याचा वावर, वसतिस्थान, आवाज, भय उत्पन्न करतात. सर्वसाधारणपणे मोठी झाडे असलेली स्मशाने, पडके वाडे अशा ठिकाणी ते राहतात. त्यांचे डोळे मानवाप्रमाणे पुढच्या बाजूस असून ते सामान्यतः पिवळेजर्द किंवा लालबुंद असतात. हे डोळे हलू शकत नाहीत, त्यामुळे आजूबाजूला व मागे पाहण्यासाठी त्याची मान २७० अंशातून गरकन् फिरू शकते. उडताना पिसांचा आवाज होत नसल्याने, एकदम तो समोर आलेला कळतही नाही. तर निशाचर असल्याने रात्रीचा अंधार चिरत जाणारा त्याचा आवाज ऐकला की अनेकांची गाळण उडते. अशा त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे घुबडाचे नाव काढले तरी लोक घाबरतात. अनेक अंधश्रद्धांची निर्मिती त्यामुळेच झाली आहे. पर्यावरणाचे आरोग्य आणि जैवविविधतेचे उत्कृष्ट जैवसूचक (Bioindicators) असलेल्या घुबडास निराधार मिथकात/अंधश्रद्धेत अडकवून अनादि काळापासून त्याची प्रतिष्ठा मलिन केली गेली आहे. आता त्याच्याविषयीच्या काही अंधश्रद्धा- घरावर बसलेले घुबड अशुभ असतं, यामुळे घरातील कुटुंबावर संकट येतं, प्रसंगी कोणाचा तरी मृत्यू होतो. वास्तविक, स्मशानातील मोठी झाडे व त्यांच्या ढोली यामध्ये सामान्यपणे घुबडे राहतात. अंत्यविधीच्या वेळी स्मशानात गेलेल्या लोकांना ती दिसू लागल्याने मृत्यू व घुबड असा गैरसंबंध जोडला गेला असावा. भारतात घुबडाकडे दुहेरी भूमिकेतून पाहिले जाते, ते अंधश्रद्धा व हिंदू धार्मिक श्रद्धांचा खोलवर रुजलेल्या ठशामुळे. म्हणजे घुबडास एका बाजूला त्याच्या रूप, आवाज इत्यादीमुळे अशुभ मानतात, तर दुसर्या बाजूला त्याचे दर्शन शुभ असल्याचा निर्वाळा धर्मशास्री देतात.
धर्मग्रंथानुसार, घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. एवढे बळकट अन् महत्त्वाचे सांस्कृतिक महत्त्व असले, तरी दिवाळीत धनलक्ष्मी पूजनाच्या वेळी घुबडांची प्रचंड प्रमाणात हत्या होते, कारण लक्ष्मीचे वाहन जर नसेल परत जायला तर लक्ष्मी आपल्या घरातच कायम राहील. अशा अंधश्रद्धांमुळे घुबडांची संख्या वेगाने कमी होत आहे. दिवाळीच्या वेळेस एक घुबड हजारपासून लाखापर्यंत विकले जाते.
काळ्या जादूमध्येही घुबडांच्या शरीरातील विविध अवयवांचा (डोळे, पंख, कवटी, यकृत, हृदय, रक्त, चोच, मांस, हाडे, अंडी) इत्यादींचा औषध म्हणून वापर केला जातो. तसेच पिसे आणि नखे तावीज म्हणून वापरतात, पण ह्या सर्व गैरसमजुती आहेत. कारण त्या सिद्ध झालेल्या नाहीत.
चांगली दृष्टी – आणखी एक अंधश्रद्धा म्हणजे घुबडाचे डोळे खाल्ल्याने (भारत), तर त्याचे अंडे खाल्ल्याने (इंग्लंड) मध्ये असे मानतात की, आपली दृष्टी तीक्ष्ण होते.
घुबड म्हणजे भूत किंवा पिशाच असावे अशी एक गैरसमजूत सर्वत्र आढळते. याचा उगम त्याचे माणसाप्रमाणे पुढे असणारे डोळे पाहून व सायंप्रकाश किंवा चंद्रप्रकाशात चेहरा इकडे तिकडे हलताना पाहून आणि भर्रकन उडून जात असल्याने पूर्वजांना ते भूत वाटले असणार आहे. घुबडाच्या बाबतीत शकून शास्त्रातील तर्हेवाईकपणा असा की प्रवासाला जाताना जर ते दिसलं तर शुभ व धनलाभही होतो, पण तेच जर आपल्या घरावर किंवा घरात आले तर मात्र हानिकारक असते हे वर पाहिलेच आहे. आपण घुबडाला दगड मारू नये. कारण, तो मारलेला दगड घेऊन नदीवर जाते अन् त्यास घासू लागते. जसजसे दगडाची झीज होईल तसतशी दगड मारणार्यांची प्रकृती क्षीण होत जाते व तो मरण पावतो ही दंतकथा तर लहानपणी प्रत्येकाने ऐकली असेल. अर्थात, ही अंधश्रद्धा जरी असली, तरी घुबडाला अभय देणारी आहे. म्हणून ती पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली आहे. उंदीर मारून तो खूप मोठ्या प्रमाणावर धान्य नासाडी टाळतो व किडे खाऊन कीड नियंत्रणही करीत असतो.
पिंगळा (Spotted owlet) –
ही घुबडाची छोटीशी प्रजाती. इतर घुबडांप्रमाणे अनेक गैरसमज, अंधश्रद्धा त्याच्याशी जोडल्या आहेत. पिंगळा संधिकाळात पहाटे (पिंगळावेळ) आपल्या खाद्याच्या शोधात असताना आवाज करीत काही इशारे करीत असतो. भविष्य सांगणार्या ज्योतिषाला ही इशार्याची भाषा समजते व त्या आधारे तो शकून-अपशकुन असे लोकांचे भविष्य सांगतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यात तथ्य नाही, ते केवळ उदरनिर्वाहाचे एक साधन आहे. पिंगळा ज्योतिषी ही भटकी जमात असून जातपंचायतीचे वर्चस्व आता काळाच्या ओघात कमी कमी होत चालले आहे.
निळकंठ (Indian roller) –
श्रीरामाला या पक्ष्याचे दर्शन झाले आणि त्यानंतर झालेल्या युद्धात रावणास त्याने मारले म्हणजे दुर्जनाचा अंत केला म्हणून दसर्याला याचे दर्शन शुभ मानतात. त्यामुळे काम संपन्न होते, सुख-समृद्धी येते अशी समजूत. पूर्वी जवळच्या रानावनात जाऊन निळकंठाचे दर्शन घेता येत असे, परंतु नंतर त्यांची संख्या नानाविध कारणांमुळे कमी होऊ लागली. त्यामुळे शिकारी लोक त्यांना पकडून आणून पिंजर्यात त्यांच्या पायांना तारा बांधून, पंख कातरून ठेवीत आणि दसर्या दिवशी पैसे घेऊन पक्ष्याचे दर्शन घडवू लागले. आंधळ्या विश्वासात आंधळे झालेल्या लोकांनी ही क्रूरता नीलकंठावर लादली.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा या राज्यांचा राज्यपक्षी असलेला निळकंठ अजूनही अंधश्रद्धेला बळी पडत आहे. दसरा संपल्यानंतर हे पक्षी विलक्षण ताणामुळे, थकव्यामुळे मरतात तर काहींना शिकारी मारून खातात.
धनेश (Hornbill)-
याच्याकडे पाहिले की आपणास प्रसन्न वाटते, धनलाभ होतो अशी भावना असलेला हा पक्षी शुभ मानला जातो. तो बीज प्रसार करणारा जंगलाचा शेतकरी मानला जातो. परंतु काही मारक अंधश्रद्धा व काही पर्यावरणीय समस्या यामुळे पक्षी नामशेष व्हायच्या मार्गावर आहे.
संधिवात (Arthritis) रोगावर धनेशचे तेल रामबाण औषध असल्याच्या गैरसमजातून त्याची हत्या होत असे.
धनेश आपल्या घरट्यात धन लपवून ठेवतो अशा समजुतीने त्याची घरटी/ ढोली फोडतात. तसेच त्याचे पीस व डोके घरात ठेवले तर घरात लक्ष्मी येते अशी लोकसमजूत आहे. याचे मांस खाल्ले तर प्रसूती होताना त्रास होत नाही, ती सुलभ होते अशी ईशान्य भारतातील आदिवासी महिलांची समजूत आहे. त्यामुळेही त्याच हत्या होत असे.
भारद्वाज (Great Coucal) –
हा पक्षी भारतीय संस्कृतीत शुभ मानला जातो, कारण त्याच्या दर्शनाने भाग्य उजळते. याची पार्श्वभूमी – श्रीकृष्णाच्या भेटीस सुदामा चालला त्या वेळेला त्याला भारद्वाजाचे दर्शन झाले आणि त्यामुळे त्याचं किती भाग्य उजळलं हे आपणास माहीतच आहे.
भारद्वाजाच्या गवतापासून बनलेल्या घरट्याबाबतीत एक अंधश्रद्धा अशी की, याच्या घरट्याच्या गवती काड्यात एक विशिष्ट गवत काडी असते, ती मिळवण्यासाठी त्याचे घरटे पाण्यात टाकतात. मग पाण्यात ती विशेष काडी सुट्टी होऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहते. या विशेष काडीच्या स्पर्शाने कोणताही कठीण धातू नष्ट होऊ शकतो आणि लोखंडी वस्तूला स्पर्श केला तर त्याचे सोने बनते अशी समजूत त्या वेळेला होती.
भारद्वाजाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग, फुफ्फुसाचे रोग बरे होतात अशी अंधश्रद्धा प्रचलित होती.
केरळ भागामध्ये लोककथांतून असा विश्वास आहे की सर्व प्रकारचे रोग बरे करू शकणार्या मुळांचे (roots) ज्ञान भारद्वाजाला असते. भारद्वाजाच्या घनगंभीर ‘कुप कुप’ असा आवाजामुळे त्याचे आत्मा व शकुनाशी नाते जोडले जाते.
हळद्या (Golden oriole)-
या पक्ष्याचे मांस खाल्ल्याने कावीळ होत नाही, असा तद्दन खोटी समजून काही ठिकाणी आढळते व त्यामुळे त्याची हत्या होत असे.
माळढोक (Great Indian bustard)
अंधश्रद्धेमुळे याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली गेली. माळढोकचे मांस खाल्ले तर शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते, तर त्याचे अंडे उकडून खाल्ले तर बुद्धिमत्ता वाढते. या अंधश्रद्धेमुळे हा देखणा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सुतार पक्षी (Woodpecker)
जगातील अनेक संस्कृतीमध्ये अशी अंधश्रद्धा शतकानुशतके बाळगली आहे की, सुतार पक्ष्याने जर घरावर टकटक केली तर मृत्यूची वार्ता येऊ घातली आहे.
स्लाव भाषा बोलणार्या देशात म्हणजे रशिया, युक्रेन, बेलारूस, पोलंड, सर्बिया, क्रोएशिया, बोस्निया इत्यादी देशात अशी समजूत आहे की, सुतार पक्ष्याने छिद्र पाडलेले (drill) लाकूड इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी वापरले तर ते टिकत नाही व आग लागण्याची शक्यता असते अशी समजूत आहे.
टिटवी (Lapwing) –
टिटवीच्या संदर्भात एकाने लिहिलेला अनुभव मध्यंतरी वाचनात आला. एका गावातील एक म्हातारा बरेच दिवस आजारी होता. एका रात्री टिटवी त्याच्या घरावरून ओरडत गेली. त्याचा अर्थ, आता हा मृत्यू पावणार अशी समजूत असल्यामुळे लोक जमा होऊ लागले. परंतु दोन दिवस झाले तरी अपेक्षित वार्ता येईना. त्या वेळी लोक म्हणाले की, हा फार खट आहे, काही जात नाही आणि पुढे ती व्यक्ती पुढे दहा वर्षे जगली.
टिटवी जमिनीवरच उघड्यावर घरटं करते त्यात संरक्षणाविना अंडी घालते. या अंडी/पिल्ले यांच्या संरक्षणासाठी शत्रू (कोल्हा, कुत्रा इ.) आला तर टिटवी जिवाच्या आकांताने आवाज करीत शत्रूला भुलवीत दूर नेते. तो दूरवर जाईपर्यंत हे ओरडणे चालू असते. म्हणजे माणसाचा मृत्यू व्हावा म्हणून टिटवी ओरडत नाही.
दुसर्या एका अंधश्रद्धेत टिटवी परिसाने (एक काल्पनिक दगड) अंडी फोडून पिलांना बाहेर काढते, पण यात काही तथ्य नाही. कारण पिल्लांच्या चोचीवर उपजतच एक दात असतो. त्याने ते अंड्याचे कव्हर फोडून बाहेर येतात. टिटवी झाडावर राहू लागली की भूकंप येणार, अशी निखालस खोटी समजूत काही ठिकाणी आढळते. पण तिच्या पायाला तिन्ही बोटे पुढच्या बाजूलाच असल्याने तिला कधीच झाडावर, तारेवर बसता येत नाही.
याशिवाय समुद्र प्राशन, आकाश पडू नये म्हणून पाठीवर झोपून ते तोलणे अशा अनेक टिटवीच्या संदर्भात कल्पित कथा प्रचलित आहेत.
चकोर (Chukar partridge)-
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कशी अनुभवावी हे सांगताना चकोर पक्ष्याविषयीच्या लोक समजुतींचा चिकित्सा न करता वापर केला. ज्ञानेश्वरांनी लोकोत्तर कार्याच्या सिद्धतेसाठी ते सामान्यजनांना कळण्यासाठी ही लोककथेची मांडणी केलेली दिसते.
जैसे शारदियेचे चंद्रकळेमाजी अमृतकण कोवळे।
ते वेचिती मने मवाळे, चकोरतलगे।
तियापरी श्रोतां अनुभवावी ही कथा।
अति हळुवारपण चित्ता, आणूनिया
-(अध्याय १, ओवी ५६)
चकोर पक्षी केवळ चंद्रकिरणे प्राशन करून जगतो अशी कवी कल्पना किंवा समजूत. तो चंद्राकडे एकटक पाहतो व चंद्राच्या अग्निस्फुलिंगांना चंद्राचे तुकडे समजून खातो. खरे तर वैज्ञानिक सत्य असे की चकोर हा कीटकभक्षी पक्षी आहे. इतर कीटकांप्रमाणेच काजव्यासारखे प्रकाश निर्मिती करणारे (Bioluminescent) कीटकही तो खात असतो. त्यामुळे काजव्याचे चमकणे निखारे समजले गेले आहे. वास्तविक निखारे खाल्ले तर तोंड नकीच भाजणार. तेव्हा या समजुतीत काही अर्थ नाही.
आणखी एका अंधश्रद्धेत चकोरास विषदर्शनमृत्यूक म्हणतात कारण त्याच्यासमोर विषमिश्रित अन्न ठेवल्यास त्याचे डोळे आपोआपच लालबुंद होऊन त्याचा मृत्यू होतो, अशी आंधळी समजूत होती. म्हणून राजेलोक विषबाधा टाळण्यासाठी चकोर पक्षी पाळत असत.
चातक (Jacobin cuckoo) –
हा पक्षी फक्त पावसाचे थेंब चोचीत घेऊन पाणी पितो. इतर म्हणजे वाहते किंवा साठलेले पाणी तो पीत नाही. म्हणजेच तो पावसाचीच अधीरतेने वाट पाहतो. पण हे खरे नाही, ती एक कल्पना असावी. वास्तविक चातक काय, पण कोणीही पक्षी-प्राणी असा पाणी न पिता जिवंत राहू शकत नाही.
कावळा (Crow) –
कावळा शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या अंधश्रद्धेत आढळतो. कावळा घरावर बसून ओरडत असेल तर पाहुणे येणार असा शकुन; पण अनेक कावळे कर्कश आवाजात कोकलत असतील तर घरावर संकट येण्याची सूचना अशी अंधश्रद्धा. सकाळीच कावळा दिसणे अशुभ, कारण तो मृत्यूची सूचना देतो, पण कावळा खाद्य शोधण्यासाठी जमिनीवर चोच मारताना दिसला तर शुभ कारण तुम्हाला धनलाभ होणार अशी समजूत.
कावळा धूळस्नान म्हणजे धुळीत लोळत असेल तर पावसाची शक्यता असते अशी समजूत. कावळ्याची अंधश्रद्धा कुठपर्यंत जाते बघा. ग्रीसमध्ये लग्नाच्या समारंभात जर कावळा आला तर सदर जोडप्यांचा घटस्फोट होणार अशी समजूत.
टॉवर ऑफ लंडनचे कावळे – या टॉवरमध्ये कमीत कमी सहा कावळे बंदिस्त करून ठेवले आहेत ते जर टॉवर सोडून गेले तर इंग्लंड व ब्रिटनच्या राजेशाहीचा अंत होईल अशी समजूत. हे सहा कावळे व एक राखीव धरून सात कावळे असे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या पंखावरील उड्डाणपिसे वेळोवेळी कातरले जातात. म्हणजे बळेबळेच ही अंधश्रद्धा जोपासल्यासारखे दिसते – कावळा यम देवाचा संदेश वाहात असल्याने कावळा जोपर्यंत पिंडाला शिवत नाही तोपर्यंत आत्म्याला मोक्ष मिळत नाही अशा चमत्कारिक समजुतीवर आधारित अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेवर बर्याच ठिकाणी लिहिले गेले आहे. त्यामुळे इथे त्याचा ऊहापोह करीत नाही.
हंस (Swan)- नीरक्षीर विवेक –
हंस अन्न म्हणून कमळ दलातील पांढरा रस पाण्यात न मिसळू देता प्राशन करतो. वरवरच्या निरीक्षणामुळे हंस पाणी व दूध वेगळे करतात असा संकेत दृढ झाला असावा. हा संकेत पूर्णपणे खोटा आहे.
– प्रा. डॉ. निनाद शहा, सोलापूर.
भ्रमणभाष – ९४२२४५९९१५
(लेखक प्रसिद्ध पक्षी अभ्यासक आहेत.)