संतराम कराड - 7038359767
21सप्टेंबर 1995 : मु. पो. अंबाजोगाई
जून 1991 पासून ‘अंनिस’ शाखा अंबाजोगाईचे कार्य सुरू होते. 1 जून 1992 पासून शाखा विधिवत सुरू झाली. सुरुवातीला उपाध्यक्ष, सचिव व कार्याध्यक्ष अशा पदांवर काम करीत राहिलो. कार्याध्यक्ष पदावर काम करीत असताना 21 सप्टेंबर 1995 रोजी सकाळी 10 वाजता कार्यवाह प्रकाश वेदपाठक माझ्या घरी आले. त्यांनी सांगितले की, अंबाजोगाईच्या चौबारा गल्लीत गणपतीला दूध पाजण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे. आपणाला तिथे जावे लागेल.
थोडासा विचार करून आम्ही ठिकाणाकडे जाण्यास निघालो. मनात विचार आला की, काही अघटित घडले, तर पोलीस स्टेशनला अगोदरच कळवावे. म्हणून प्रथम पोलीस स्टेशन गाठले. ड्यूटीवर पोलीस उपनिरीक्षक एस. ए. निकम होते. त्यांनी तत्परता दाखवून बरोबर हेडकॉन्स्टेबल एच. वाय. मुंजाल यांना घेऊन आमच्यासह घटनास्थळाकडे निघाले. चौबारा गल्लीत गोंधळ चालू होता. मंदिरात गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी नंबर लागावा म्हणून धक्काधक्की चालू होती. पोलिसांनी प्रथम लोकांना रांगेत उभे केले. पोलीस अधिकार्यांना मी विनंती केली की, ‘स्वत: मंदिरात जाऊन गणपतीच्या मूर्तीला दूध पाजून पाहा, काय घडते ते जनतेला सांगा.’ पोलीस निरीक्षक निकम यांनी प्रत्यक्ष अनुभव जनतेला सांगितला, ‘मूर्ती दूध पित नाही. ते दूध गणपतीच्या अंगावरून खाली वाहत चालले आहे. अफवेवर विश्वास न ठेवता दूध घरी वापरावे, ही विनंती.’ आणखी तीन-चार ज्येष्ठ पुरुष व महिलांना प्रत्यक्ष अनुभव घेऊन लोकांना समजावून सांगायला लावले. त्यांच्यामधील ज्येष्ठ नागरिकांनी काय घडत आहे, हे प्रत्यक्ष समजावून सांगितले. तेव्हा रांगेमध्ये उभे असलेल्या एका-एका नागरिकांनी घरचा रस्ता धरला.
स्वत: मी समजावून सांगताना प्रेरणा देणारे भक्त अस्वस्थ होऊ लागले, म्हणत होते, ‘तुम्ही नास्तिक आहात, तुमच्या हाताने मूर्ती दूध पिणार नाही.’ संधी साधून मी त्यांनाही पारावर बोलवीत होतो. ‘आपण पुण्यवान आहात, तर पाजून दाखवा मूर्तीला दूध?’ दबाव आणणार्या भक्तांपैकी कोणीही मूर्तीला दूध पाजण्यास पारावर आले नाही. त्यामुळे जनतेचा रांग सोडून जाण्याचा वेग वाढला.
सकाळी 11 ते 3 पर्यंत आम्ही सर्व कार्यकर्तेघटनास्थळी प्रबोधन करीत होतो. दुपारी तीननंतर मात्र मंदिराकडे कुणीही फिरकले नाही किंवा शहरातील इतर गणपती मंदिरांतही गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला नाही.
चौबारा गल्लीतील गणपती मंदिरापासून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळाले की, ही अफवा फक्त अंबाजोगाईपुरती मर्यादित नसून अफवेचा आगडोंब सर्व जगभर विषारी वायूप्रमाणे पसरला आहे.
‘गणपती दूध पित आहे,’ या अफवेचे वादळ जगभर विनाश घडवित असताना कोट्यवधी लोक दुधाचे वाटोळे करीत असता, अशा अवैज्ञानिक घटनेकडे लोक तटस्थेने बघत होते. ‘अंनिस’च्या चळवळीत काम करणार्या राज्यातील काही कार्यकर्त्यांनी मोजक्या ठिकाणी ताकदीने प्रतिकार केला आणि जनतेला वैज्ञानिक दृष्टिकोन समजावण्याचा तळमळीने प्रयत्न केला. गणपतीच्या दूध पिण्याची शास्त्रीय कारणे पटवून दिली. प्रतलावरील हवेचा दाब कसे कार्य करतो, हे सांगितले.
मानवाच्या बुद्धीची कीव करावी, अशी अशास्त्रीय घटना ‘गणपतीची मूर्ती दूध पिते’ ही अफवा. त्यामुळे भांबावलेले समाजमन लक्षात घेऊन अंबाजोगाई शाखेने कार्यक्रम घेतले. दरवर्षी 21 सप्टेंबर हा ‘चमत्कारविरोधी दिवस’ म्हणून विद्यार्थी व समाजात जाऊन शास्त्रीय प्रयोग करून साजरा केला जातो. शालेय स्तरावर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेतली गेली. नियम होता – ‘दुग्धप्राशन करणार्या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र.’ प्रथम क्रमांक 301 रुपये, द्वितीय क्रमांक 201 रुपये व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास 101 रुपये बक्षीस रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र, ‘अंनिस’ चळवळीचे एक पुस्तक सत्कारप्रसंगी 21 सप्टेंबर 1996 रोजी दिले होते. गणपतीची मूर्ती दूध पिऊ शकत नाही, तर त्यामागील शास्त्रीय कारणे आम्ही शाळा-कॉलेजमध्ये समजावून सांगितली. प्लास्टिक कोटेड फोटोला दूध पाजून सप्रयोग माहिती दिली. स्थानिक साहित्य संमेलने, मेळावे, बैठका, सभा, चर्चासत्रे घेऊन शहर व परिसरात प्रबोधन केले. समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली; पण अजूनही दृष्टी घेतली नाही, हे प्रतिगामी, सनातनी लोकांनी गणपती दूध पितो, अशी अफवा पसरवून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, एवढेच. विज्ञानाच्या निकषावर त्यांची भोंदूगिरी टिकू शकली नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा. घडणार्या घटनेमागील कार्यकारणभाव त्यांना समजावा, यासाठी अंबाजोगाई शाखा सतत प्रयत्नशील असते. शाखेचे तत्कालीन कार्यकर्ते, अध्यक्ष म. वि. काकडे, कार्याध्यक्ष संतराम कराड, कोषाध्यक्ष शेख ए. रझाक, सहकार्यवाह प्रकाश वेदपाठक, सदस्य रघुनाथ चौधरी, शेख चाँद, चंद्रकांत वेदपाठक, राजाराम वारकरी यांचे भरपूर सहकार्य लाभले. दै. ‘विवेकसिंधू’चे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी घटनेची सविस्तर बातमी देऊन चळवळीला मोलाचे सहकार्य केले.