लोकडाऊन काळातील अंनिसची प्रशिक्षण शिबिरे

सुनील स्वामी - 9881590050

24 जिल्हे, 260 तास, 130 सत्रे, 35 विषय, 75 वक्ते आणि सुमारे 2000 प्रशिक्षणार्थी यांनी संपन्न होताहेत..

गेल्या दोन महिन्यांत झालेली अंनिसची प्रशिक्षण शिबिरे किती असावीत? तब्बल 24 जिल्ह्यांची ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरे आपण या काळात पूर्ण करू शकलो आहोत. रोज दोन तास याप्रमाणे किमान पाच ते आठ दिवस चालणारी ही प्रशिक्षण शिबिरे आहेत. यातून एकूण जवळपास 260 तासांची 130 सत्रे झाली. अंनिसच्या सक्रिय कार्यकर्त्यांमधील 75 वक्त्यांनी वेगवेगळे 35 विषय हाताळले. यातून प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि काही महाराष्ट्राबाहेरील, देशाबाहेर अशा सुमारे 2000 लोकांनी या प्रशिक्षण शिबिरास हजेरी लावली. या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटावा, अशी स्थिती आहे.

‘कोविड-19’च्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले. हा कालावधी अनेक अर्थांनी जनसामान्यांचे जगणे बिकट करणारा ठरतो आहे. यातून कधी सुटका होणार आणि जनजीवन कधी पूर्ववत होणार, हे निश्चित सांगता येणार नाही. शेती, उद्योग, दळणवळण आणि व्यापार अशा सर्व पातळ्यांवर या परिस्थितीचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे सामाजिक पातळीवर काम करणार्‍या संस्था, संघटना आणि चळवळी यांच्यापुढील आव्हानेही वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सामाजिक बदलासाठी काम करणार्‍या सर्वांना आता पुढील काळात आपली उद्दिष्टे विस्तृत करावी लागतील, गरजेनुसार त्यातील विशिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, कामाची पद्धत आणि माध्यमे बदलावी लागतील. या बदलाला जे अनुकूल असतील, त्यांनाच पुढील आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे.

‘कोविड’च्या या संकटानंतर असहायता, अस्थिरता, अनिश्चितता, अगतिकता, असुरक्षितता, अज्ञान आणि यातून येणारी अस्वस्थता यामुळे साहजिकच अंधश्रद्धांना खतपाणी मिळेल. त्यावर आधारलेले शोषण अधिक विक्राळ स्वरूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्यासमोरील वाढती आव्हाने समजून घेत, स्वीकारत त्यानुसार बदल करण्याची तयारी ठेवून पुढील काळात दमदार पाऊल टाकण्यास सिद्ध होत आहे.

या लॉकडाऊनच्या काळात केवळ प्रशिक्षण शिबिरांचा आढावा घेतला, तरी एक आश्वासक स्थिती नजरेसमोर येते. लोकांना एकत्र जमवून करायचे सर्व उपक्रम थांबले आहेत, सर्व धावपळ थांबली आहे. सर्वजण आपापल्या घरी जणू स्थानबद्ध आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीत किंवा आणीबाणीच्या काळात अनेक नेते, कार्यकर्ते तुरुंगात असायचे; तेव्हा तुरुंग हेच त्यांच्या अभ्यासाचे, प्रशिक्षणाचे केंद्र बनायचे. नेते मार्गदर्शन करत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवरील चर्चा आणि चिंतनातून कार्यकर्त्यांची घडण होत असे. तुरुंगात जाण्याआधीचा कार्यकर्ता आणि तुरुंगात जाऊन आल्यानंतरचा कार्यकर्ता यात गुणात्मक मोठा फरक, मोठी वाढ झालेली असे. जणू तशीच स्थिती सध्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांची झाली आहे. कार्यकर्तेआपापल्या घरी अडकले असले, तरीही इंटरनेटच्या माध्यमातून ते परस्परांना ‘जॉइन’ होऊ शकतात. या तंत्राचा वापर करून ते स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचे आकलन आणि क्षमता वाढवत आहेत. एखादा-दुसरा कार्यकर्ता किंवा जिल्हा नव्हे, तर खूप व्यापक पातळीवर हे होताना दिसत आहे. त्यामुळे जे काम एरव्ही आपल्याकडून वर्षभरातही होणं शक्य नव्हते ते केवळ दोन-अडीच महिन्यात आपण करू शकलो आहोत. उदाहरणच द्यायचे, तर संघटना बांधणीची दोन-दोन दिवसांची प्रशिक्षण शिबिरे प्रत्यक्ष ज्या-त्या जिल्ह्यात जाऊन पूर्ण करण्यास अडीच वर्षे लागली. मात्र आता लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महिनाभरानं सुरू झालेली, म्हणजे केवळ गेल्या दोन महिन्यांत झालेली प्रशिक्षण शिबिरे किती असावीत? तब्बल 24 जिल्ह्यांची ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरे आपण या काळात पूर्ण करू शकलो आहोत. रोज दोन तास याप्रमाणे किमान पाच ते आठ दिवस चालणारी ही प्रशिक्षण शिबिरे आहेत. यातून एकूण जवळपास 260 तासांची 130 सत्रे झाली. ‘अंनिस’च्या सक्रिय कार्यकर्त्यांमधील 75 वक्त्यांनी वेगवेगळे 35 विषय हाताळले. यातून प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि काही महाराष्ट्राबाहेरील, देशाबाहेर अशा सुमारे 2000 लोकांनी या प्रशिक्षण शिबिरास हजेरी लावली. या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटावा, अशी स्थिती आहे. मे महिन्यात झालेल्या 15 जिल्ह्यांच्या प्रशिक्षण शिबिरांनंतर या जून महिन्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, लातूर, सातारा, सांगली, रत्नागिरी-मुंबई इत्यादी जिल्ह्यांची अशी प्रशिक्षण शिबिरे झाली. याशिवाय वर्धा, नांदेड, पनवेल, टिटवाळा, कोल्हापूर आदी जिल्हे किंवा शाखांनी त्यांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर काही सत्रे घेतली. ही उत्स्फूर्तता वाखाणण्याजोगी आहे. असा इतर जिल्ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टिकोन, बुवाबाजीची व्यापक वैचारिक भूमिका, ‘अंनिस’ची पंचसूत्री, दोन कायदे, मन-मनाचे आजार, संघटन अशा नेहमीच्या व महत्त्वाच्या विषयांबरोबरच ‘कोविड-19’चे आव्हान, पुरुषभान, अतींद्रिय शक्ती, परामानसशास्त्र, मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन, सोशल मीडिया व आपण, कार्यकर्ता म्हणून घडताना, युवमानस, लैंगिकता आणि युवा, मर्दानगी म्हणजे काय?, प्रेमात पडताना, युवासाठी अंधश्रद्धा निर्मूलन, आपत्ती व्यवस्थापन, भारतीय कसावर आधारित विवेकवाद, विवेकी व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक अभिव्यक्ती इत्यादी विविध जवळपास 35 विषय मांडले गेले. एक वेगळा प्रयोग होता.

काही आनंददायी अनुभव

या काळात ‘अंनिस’च्या लोकांनी शिकून घेतलेलं इंटरनेट, गूगल, झूम अ‍ॅप इत्यादीसंबंधीचे ज्ञान, त्यांचा प्रत्यक्ष केलेला वापर, ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचे विविध ठिकाणाहून केलेले संयोजन, त्यातील सुसूसत्रता, कार्यक्रमाच्या आधीची जाहिरात, त्याच्या सुंदर इमेजीस, नंतरची ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रसिद्धी, सहभागी प्रशिक्षणार्थींचा पाठपुरावा, त्यांचे ‘फीडबॅक’, त्यांना प्रमाणपत्र देण्याची कल्पना या सर्व गोष्टींत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी स्वतःला अनुकूल केलं, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यकाळात अपरिहार्य होणार आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्तेआता तयार झाले आहेत. या यासंबंधीचे एक उदाहरण अत्यंत बोलके, जिवंत, महत्त्वाचे म्हणून येथे देत आहे. ‘अंनिस’चे जळगाव जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे सर लॉकडाऊनमुळे सध्या पुण्यामध्ये त्यांच्या मुलाच्या घरी आहेत. जळगाव ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांचे वय 71 वर्षे आहे. विविध जिल्ह्यांची प्रशिक्षण शिबिरे होत असताना त्यांनी हे नवे तंत्र शिकत घेतलेला ‘ऑनलाईन प्रशिक्षणाचा सुखद अनुभव’ त्यांच्याच शब्दात पाहा..

ते म्हणतात, “ऑनलाईन राहणं, अपडेट राहणं ही काळाची गरज आहे… असं सगळेच म्हणत होते… मला प्रश्न पडला…खरंच का… आता आपल्याला ऑनलाईन राहावं लागेल??? मी ‘गुगल मीट’ शिकलो..ते आधी डाऊनलोड करावं लागतं..ते केलं…मग ‘म्युट’, ‘अनम्युट’ हे शब्द शिकलो व त्याचा उपयोग करू लागलो… कॅमेरा…ऑन ऑफ करणे, कॅमेर्‍यासमोर बोलणे…नंतर फेसबुकवर येणे…‘वेबिनार’ घेणे… या गोष्टी शिकलो..आता आपण प्रशिक्षण का घेऊ नये? पुण्याला असताना जळगावचे शिबिर!!..हा विचार समोर आला… उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव एनएसएस विभागप्रमुख डॉ. नन्नवरे यांना फोन केला… आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घ्यायचेय… त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला…एक ऑनलाईन अर्ज कुलगुरू साहेबांना पाठवला.. काही दिवसांनी त्यांची परवानगी आली…तयारीला लागलो… वक्ते, विषय, वेळ, तारखा यांचं नियोजन झाले… सर्व नियोजन करण्यासाठी अविनाशभाई आणि इतर राज्य पदाधिकार्‍यांबरोबर आमच्या दोन-तीन कॉन्फरन्स झाल्यात… ‘अंनिस’च्या कामाचा अनुभव आहेच; पण हे ऑनलाईन युवासंवाद…. मोबाईल, नेटवर्किंग, अजून काहीही अडचणींना तोंड द्यावे लागते…हे सर्व समजून घेण्यासाठी माझ्या मुलाची, सुनेची मदत झाली…पण बरंच काही शिकलो… ठीक चार वाजेला संवाद अभियान सुरू व्हायचे… आम्ही चार-पाच जण ‘गुगल मीट’वर राहावे. फेसबुकशी आमचा त्यावेळी काहीच संबंध नाही…बोलणारे मात्र ‘गुगल मीट’ व फेसबुक दोघांवर असायचे..हा तांत्रिक विभाग अर्थात अवधूत कांबळे सांभाळत असे… मला सुरुवातीला गंमतच वाटली..अवधूत सुरुवातीला ‘अंनिस’चे गीत लावत असे, आम्हाला ते दिसत नव्हते व ऐकू पण येत नव्हते… आम्ही न बोलता शांत बसणे…गडबड करायची नाही..नंतर अवधूत सांगायचा त्याने बोलायचे…

फेसबुक लाईव्ह’वर आमचे फोटो दिसायचे

या कार्यक्रमाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतला…

आता पुढची गंमत पाहूया..

सहभागींना सर्टिफिकेट देणे… तेही ऑनलाईन! त्याला E -Certificate म्हणतात..विनायक सावळे आणि मी ‘फीडबॅक’ प्रश्नावली तयार केली. माझ्या मुलाकडून ऑनलाईन सर्टिफिकेट तयार केले….माझ्या सुनेकडून ‘गुगल फॉर्म’ बनवला… अभिप्राय प्रश्नावली व सहभागींच्या माहितीचा ‘गुगल फॉर्म’ बनवला…एक लिंक तयार झाली..ती सर्वांना पाठवण्यात आली…

आता- माझ्याकडे रोज अनेक जणांचे मेल येत आहेत..त्यात सहभागी नाव, मोबाईल नंबर, ई-मेल प्राप्त होत आहेत…

भविष्यात हेच युवा आपलं काम पुढं नेतील….

यासंबंधी कट्यारे सरांशी बोलताना ते म्हणाले, ‘एरव्ही हे काम करण्यासाठी खूप अडचणी आल्या असत्या. विद्यापीठात जा, अपॉइंटमेंट घ्या, वाट पाहत बसा, भेट होईलच असे नाही, एका भेटीत निर्णय होईल असे नाही, प्रस्ताव या टेबलवरून त्या टेबलवर जाणार तसे आपण त्यामागून फिरायचे, पत्र मिळाले की मग आयोजनाचा ताण, ठिकाण ठरावा, त्यांना पुन्हा भेटा, सहभागी होणार्‍यांना पत्र पाठवा, त्यांची वाट पाहत राहा, ‘रिसोर्स पर्सन’ येतील, त्यांची व्यवस्था करा, छपाई, टायपिंग, बातम्या… बाप रे! किती काम करायचो..या एका कामासाठी महिनाभरही लागायचा. आता हे सगळं घरबसल्या करून दाखवलं आणि खर्च किती? रुपये शून्य. खूप भारी वाटतंय. मी तरुण झालोय.’

हा एक अनुभवही खूप बोलका आहे. गेल्या महिन्याच्या अंकात प्रशिक्षण शिबिरांसंबंधी लिहिल्याप्रमाणे विचार केला, हिशोब केला तर प्रचंड शारीरिक श्रम आणि वेळ यासह किमान पंधरा ते सतारा लाख रुपयांची बचत आपण करून ही सर्व कामगिरी पार पाडली आहे. हे किती रोमांचकारी आहे!

सात दिवसांच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या तशा नवख्या व्यक्तीची – अविनाश पोवार या आपल्या एका तरुण कार्यकर्त्यांच्या वडिलांची – प्रतिक्रियाही अशीच बोलकी आहे. ते म्हणाले, ‘तुमचे काम अफाट आहे. मला वाटले नव्हते की, तुम्ही इतक्या व्यापक विषयांवर काम करता. यातील अनेक विषयांवर एवढ्या आयुष्यात कधीच काही विचारही केला नव्हता. थोडे आधी कळले असते तर खूप फायदा झाला असता. तुम्ही करता हे काम खूप गरजेचे आहे, हे मला पटले आहे. ते चालू राहिले पाहिजे. माझा मुलगा तुमच्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे.’

खरंच आहे, या प्रशिक्षण शिबिरांमधून ‘अंनिस’ची व्यापकता लक्षात येतेय. या शिबिरांमध्ये ….असे विषय हाताळले गेले. काही जिज्ञासू व्यक्ती एकाच नव्हे, तर विविध जिल्ह्यांच्या शिबिरांमध्ये स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून अनेक विषय समजून घेत होत्या. एका वेळी चार-चार जिल्ह्यांची प्रशिक्षण शिबिरेही सुरू होती, तेव्हा काही लोक सर्व ठिकाणी फिरून त्यांना आवश्यक वाटणार्‍या विषयाला ते उपस्थित राहायचे. त्यांची प्रतिक्रियाही अशीच समाधान आणि आनंद देणारी आहे.

काही जिज्ञासू महिला घरी काम करत असताना, अगदी किचनकट्ट्यावर मोबाईल ठेवून स्वयंपाक करत त्यांनी विषय समजून घेतले; ही किती महत्त्वाची गोष्ट आहे! कामामुळे उपस्थित राहत येत नाही किंवा काम आवरून गडबडीने कुठे उपस्थित राहा किंवा कार्यक्रम लवकर आवरून घरी जाऊन घराचे सर्व काम करा, आशा अडचणींमुळे महिला हजर राहू शक नव्हत्या. पण त्यावर मार्ग निघाला. महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. अर्थात, घरकाम केवळ महिलांचं नाही, हे पुरुषांनी स्वीकारणं गरजेचं आहे, हे सुद्धा जाणवलं. अनेक ठिकाणी सर्व कुटुंबं एकत्र या प्रशिक्षण शिबिरांना हजर होती, ही या शिबिरांच्या यशस्वितेमधील एक महत्त्वाची बाब आहे.

इचलकरंजी व कोरोची शाखेच्या कार्यकर्त्यांनी संगीताच्या साथीसह शाहीर एस. एस. शिंदे यांची गाणी आणि संविधानाचा अभंग, पोवाडा यांसह केलेला ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची सांस्कृतिक अभिव्यक्ती’ हा कार्यक्रम एक वेगळा प्रयोग होता. ‘सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या कार्यक्रमामुळे आनंददायक व मजा घेत या पद्धतीनेही संघटनेचे काम करता येते, हे लक्षात आले. आमच्याकडे संगीतकार आहेत. त्यांचा उपयोग करून आम्हाला असा कार्यक्रम बसवणं शक्य आहे आणि ते आम्ही लवकर करू,’ अशी प्रतिक्रिया गडचिरोलीहून ठाकरे सरांची आली. अशाच आशयाचे अन्य कार्यकर्त्यांचेही फोन आले. यामुळे हा केवळ गाण्याचा एक कार्यक्रम न राहता त्याला प्रशिक्षणाचे स्वरूप प्राप्त झाले, हे लक्षात येईल.

या प्रशिक्षण शिबिरांमध्ये वीसहून अधिक ठिकाणी ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर अत्यंत सुंदर मांडणी करणारे जळगावचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी म्हणतात, ‘लॉकडाऊनच्या या काळाचा खूप मोठा फायदा झाला. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हा शाखांशी संपर्क करता आला. सर्वच शाखांनी अतिशय उत्साहाने शिबिरे घेतली होती. अगदी गडचिरोली ते नवी मुंबईपर्यंत सर्वांशी संवाद सांधण्याची मला संधी मिळाली.’

मला एक गोष्ट विशेष जाणवली, ती म्हणजे कार्यक्रमाचे परफेक्ट नियोजन. प्रत्येक शिबिरासाठी एक जबाबदार व्यक्ती असे. आधी संपर्क साधणे, स्मरण देणे, लिंक वेळेवर पाठवणे, ऑनलाईन प्रणाली व्यवस्थित हाताळणे या गोष्टी जवळ-जवळ प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय होत्या. ‘अंनिस’ आता नवीन तंत्रज्ञानातही चांगली रुळतेय, ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक शिबिराची उपस्थितीही उल्लेखनीय होती. प्रत्येक ठिकाणी अनेक शंका व प्रश्न विचारले गेले. याचा अर्थ आपण सर्व विचार करीत असतो आणि खर्‍या अर्थाने विवेकी चळवळीत सामावले आहोत. या लॉकडाऊनच्या योगाने ‘मानसमित्र’ ही कल्पनाही अधिक परिणामकारकपणे या शिबिरांमुळे पोचवता आली. अशाच प्रकारे ‘मानसमित्र’चे प्रशिक्षण आपण भविष्यात लवकर घेऊ शकू, असे वाटते.’

या प्रशिक्षण शिबिरांमध्ये वक्त्याला आपल्या मांडणीमध्ये सोपेपणा आणता आला. मोबाईलद्वारे स्क्रीन ‘शेअर’ करता आल्यामुळे प्रोजेक्टर वगैरे साधनांची गरज भासली नाही. ‘नेट कनेक्टिव्हिटी’मुळे वक्त्याला काहीवेळा अडचणी आल्या; पण त्यावर मात करता आली. पुढेही याबद्दल वक्त्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना देऊन या अडचणी दूर करता येतील.

वक्त्यांबाबत, त्यांच्या मांडणीबाबत, सहभागी प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया, ‘फीडबॅक’ याबाबतचे अनुभव हे सुद्धा या शिबिरांचे वैशिष्ट्य ठरले आहे. काही जिल्ह्यांनी आपल्या प्रशिक्षण शिबिरांवेळी किंवा समारोप होताना सहभागी सर्वांना ‘गूगल’वर ‘फीडबॅक फॉर्म’ दिला. त्यामध्ये विषयमांडणीबद्दल उत्कृष्ट, उत्तम, चांगला, बरा आणि आवडले नाही असे पर्याय होते. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ‘ऑनलाईन’ होत्या आणि परस्पर त्यांचे विश्लेषण शेकडेवारीमध्ये उपलब्ध झाले. हे तर एकदम भारी होतं. एरव्ही ‘फीडबॅक’ घेतलाच तर तो वाचून त्याचे विश्लेषण करणं शक्य व्हायचं नाही. आता ते सहज शक्य झालं. याचा वक्त्याला खूप फायदा होतोय. त्याला त्याचं प्रोग्रेस कार्ड मिळतं. त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी, अधिक चांगले सादर होण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे. ही पद्धत आता सर्वत्र वापरली पाहिजे.

प्रशिक्षण झाले, पुढे काय?

प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवे म्हणजे ‘अंनिस’मध्ये आधी सक्रिय नसणारे लोक होते. त्यांनी विविध विषय समजून घेतल्यानंतर काम आवडले, ‘अंनिस’ला ‘जॉइन’ होऊ इच्छितो, असे सांगितले. आता त्यांच्या संपर्कात राहणं, त्यांना नवनवी माहिती देत राहणं, त्यांना जवळच्या शाखा, कार्यकर्तेयांच्याशी जोडून देणं, या सर्व गोष्टी होणं खूप महत्त्वाचे आहे. काही जिल्ह्यांनी त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढले, त्यांना साप्ताहिक/ पाक्षिक बैठकांना बोलावले, परिचय करून घेतला, आता ते सतत संपर्कात आहेत. पण हे सर्व ठिकाणी होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

संघटना बांधणीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेयांचे चांगले प्रशिक्षण सुरू करून संघटनात्मक स्थिती, शक्तिस्थळे, संधी, कमतरतांवर कशी मात करता येईल, सर्वांना कसे सामावून घ्यावे, अधिक सोपे; पण प्रभावी पद्धतीने काम करण्याच्या पद्धती अशा विषयांचे प्रशिक्षण प्रायोगिक पातळीवर धुळे-नंदुरबार जिल्ह्यांचे झाले, आता रायगड जिल्ह्याचे होईल. त्यानंतर ते सर्व जिल्ह्यांसाठी अवश्य करूयात.

या सर्व प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रधान सचिव सुशीला मुंडे आणि सरचिटणीस विनायक सावळे यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले आहे.

एकंदर, लॉकडाऊनच्या या कालावधीत संपन्न होत असलेली ही शिबिरे हा एक अत्यंत सुखद असा अनुभव आहे. चळवळ ही संघर्षात्मक असते; पण वैचारिक भरण-पोषणाशिवाय ती दुबळी, अशक्त आणि अपुरी असते. या शिबिरांनी सहभागी सर्वांना दीर्घकाळ पुरेल इतकी शिदोरी देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निश्चितच चांगला परिणाम जाणवून येईल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]