नरेंद्र लांजेवार - 9422180451
11 ऑक्टोबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अनावृत्त पत्र राष्ट्रसंतांशी संवाद… “वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना सतरंगी सलाम..!
आमच्या साने गुरुजींनी ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे॥’ अशी प्रार्थना रचली. या प्रार्थनेवरून आठवलं, आता काही जण ठखरा तो एकच धर्म देशांमध्ये वसावा’, असा आग्रह धरत आहेत. ‘एक भाषा, एक ओळख आणि एकच धर्म’ अशी चळवळ सध्या काहीजण मोठ्या प्रमाणावर चालवत असताना संत तुकडोजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व यांची आठवण आज मोठ्या प्रमाणावर होते आहे, म्हणून हा पत्रप्रपंच…
संत तुकडोजी महाराज आपण म्हणाला होता, ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे॥’
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, ही ‘एकेश्वरवादा’ची आळवणी आपण समस्त भारतीयांना केली.. आणि ‘सबके लिए खुला है मंदिर यह हमारा…’ असं म्हणून ‘आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी-विदेशीयों को, खुला मंदिर यह हमारा…’ असा अतिशय पोटतिडकीने तुम्ही कृतिशील संदेश दिला.
आपण विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून ‘एकेश्वरवादा’चा पुरस्कार करणारे संत होता. धर्मातील अनावश्यक कर्मकांडांची चिकित्सा करून त्याची व्यावहारिक उपयुक्तता लक्षात घेण्याची दृष्टी तुम्ही समाजाला दिली आणि अनावश्यक बाबींचा स्पष्टपणे विरोध केला. खंजिरी भजनाच्या माध्यमातून मानवतावादी विचारांचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला, म्हणून इंग्रज सरकारचा कारावासही भोगला. अखिल भारतीय पातळीवर तुम्ही साधू संघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या गावोगावी शाखोपशाखा स्थापन करून तुम्ही शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. तुमच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही तुमचे प्रबोधनाचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवीत आहेत.
देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन आपण मोठ्या प्रमाणावर केले. आपण आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. आधुनिक व प्राचीन विचार, परंपरा यांचा सुंदर समन्वय तुमच्या साहित्यात झाला आहे. तुम्ही मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आपल्या साहित्यात ग्रामोन्नती, महिलोन्नती, व्यसनमुक्ती, जीवनशिक्षण या सर्वांमधून स्वावलंबनाचा संदेश मिळतो. राष्ट्रपती भवनात झालेले तुमचे खंजिरी भजन ऐकून आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आपणास ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले. आपल्या भाषणांतून, कीर्तनांतून, अभंगगायनातून, लेखणी आणि वाणीतून आपणच खर्या अर्थाने ‘राष्ट्रसंत’ असल्याचे जनतेने मान्य केले. प्रत्यक्ष सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल उंचावणारा संत म्हणून संपूर्ण देशाने आपल्याला वंदन केले. देशासोबतच विविध विदेशांमध्ये जाऊनसुद्धा आपण भारतीय धर्म व एकेश्वरवादाची मांडणी केली.
आपण समाजप्रबोधनामध्ये महत्त्वाचा अग्रक्रम अंधश्रद्धा निर्मूलन आणि ग्रामस्वच्छतेला दिला, यातूनच ‘ग्रामगीता’ साकारली गेली.
बालपणी जेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकत होतो, त्या वेळेस चौथी-पाचवीच्या पुस्तकात एक कविता होती – ‘या झोपडीत माझ्या…’ आम्हाला वाटायचे की, कोणीतरी आपल्या गरिबीचं ऐश्वर्यरुपी वर्णन किती छान केले आहे. उंची महालातील श्रीमंतांना लाजतोय, असे सुख-समाधान आणि शांती गरिबांच्या झोपडीत असते, म्हणून हा खादीधारी, साधा संत आम्हाला आमचा वाटू लागला.
विदर्भ ही तशीही अनेक संतांची जन्मभूमी, समाजसुधारकांची खाण आहे. महात्मा गांधींना विदर्भ एवढा भावला की, त्यांनी आपली कर्मभूमी वर्ध्याजवळ ‘सेवाग्राम’ला केली. त्याच्या शेजारी अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा…याच अमरावती जिल्ह्यातील तुम्ही कृतिशील संत तुकडोजी महाराज.
आम्ही, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुरुवातीपासून समाजसुधारकांचा फारसा सांगत आलो आहोत. आम्ही संत चळवळीच्या वारकरी संप्रदायाशी नातं जोडत आलो आहोत… संतांनी दिलेल्या मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार आम्ही करतो.
सर्व जनांमध्ये ईश्वर वसलेला आहे, याची तुम्हाला बालपणीच प्रचिती आली. भाषणे, भजन व कीर्तन या माध्यमातून राष्ट्रीय जागृतीचे महान कार्य तुम्ही केलेत. भारतीय समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा बंद करण्यासाठी फार कष्ट घेतले. पशुहत्याबंदी, व्यसनमुक्ती, अस्पृश्योध्दार, जातिनिर्मूलन, यात्रा शुध्दीकरण, कुटुंबनियोजन, ग्रामोद्योग, बालविवाह, हुंडाबळी, शिक्षणप्रसार आदी कार्यांसाठी तुम्ही नवी चालना देऊन लोकजागृती घडवून आणली. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हा उद्देश जनतेला दिला. 1935 मध्ये मोझरी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ग्रामीण भागाच्या कल्याणाची कीर्ती ऐकून महात्मा गांधींनी तुम्हाला ‘सेवाग्राम’ला बोलवले. तुमचे भजन व खंजिरी वादनाने महात्मा गांधी प्रभावित झाले आणि गांधींच्या सहवासात एक-दीड महिना राहून तुम्हाला सुद्धा देशस्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आहुती द्यावी वाटली. तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत गांधींच्या प्रेरणेने झोकून दिले. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत विदर्भातले गाव अन् गाव पिंजून काढले… आणि पुढे तुम्हाला इंग्रज सरकारने अटकही केली.
तुमच्या लेखणीतून ठायी-ठायी देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचे चिंतन प्रकट होत गेले. भारत हा खेड्यांचा देश आहे, तेव्हा खेड्याची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून महात्मा गांधींच्या विचाराने ग्रामोन्नती करण्याची मोहीम तुम्ही हाती घेतली. गावाचा विकास कसा साधावा, हे लोकांना समजून घेण्यासाठी तुम्ही ‘ग्रामगीता’ लिहिली. कृष्णाने अर्जुनाला ‘गीता’ सांगितली; पण तुम्ही ग्रामसमृद्धीसाठी जनतेला ‘ग्रामगीता’ सांगितली.
सर्वच सुधारणावादी संतांना सुरुवातीला विरोध झाला. तुमच्या कार्याला सुरुवातीला विरोध झाला; परंतु हळूहळू तुमच्या कार्यावरची निष्ठा पाहून व खर्या अर्थाने समाजाप्रती असणारी तुमची तळमळ पाहून लोक तुमच्या कार्याशी जोडले गेले आणि या देशाला खर्या अर्थाने बहुजनांचे नेमके दुःख माहीत असणारा बहुजन समाजातील एक ‘राष्ट्रसंत’ मिळाला. जगभरातील अनेक भाषांमध्ये आज तुमची लेखणी अनुवादित झाली आहे.”
काही दिवसांपूर्वीच बॉबी देवल यांची ‘आश्रम’ नावाची एक वेबसीरिज बघितली. आज सर्वच साधू-संतांचे आश्रम म्हणजे धर्माचा किस पडणारे कुटारखाने झाले आहेत; पण संत तुकडोजी महाराजांची आश्रमव्यवस्था अजूनही ‘ग्रामस्वराज्य’वर आधारित व व्यसनविरहित समाज निर्माण करणारी एक मोठी चळवळ राहिली आहे. डोक्यावर भगवी टोपी आणि मुखी ‘जय गुरुदेव’….सोबतीला खंजिरी आणि प्रबोधनपर भजनं… रोज सकाळ-सायंकाळ सामूहिक प्रार्थना… राष्ट्रीय बंधुत्वाची शिकवण देणारे गुरुदेवांचे सेवा मंडळ आपल्याला दिसते आहे – ‘हर देशमें तू, हर भेष मे तू….तेरे नाम अनेक तू एकही है!…’
आज परमेश्वराला ‘रिटायर करा’ऐवजी ‘एकेश्वर’ ईश्वराची संकल्पना समाजामध्ये गुण्यागोविंदाने नांदू द्या, हेच सांगण्याची खरी गरज आहे. राष्ट्रसंतांना त्यांच्या बावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त (11ऑक्टोबर 1968) विनम्र अभिवादन!
तुमच्या ‘ग्रामगीते’चा चाहता
नरेंद्र लांजेवार, बुलडाणा