नरेंद्र लांजेवार -
बालपुस्तकांची सृष्टी, देईल विज्ञानाची दृष्टी
‘महाराष्ट्र ‘अंनिस”चे बालसाहित्यात पदार्पण
बालवाचकांमध्ये विवेकीभान विकसित होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाल प्रकाशन विभागाने खास बालवाचकांसाठी प्रथमच काढलेल्या प्रा. प. रा. आर्डे यांचे ‘बज्याचे चित्तथरारक शोध’, नीलम माणगावे यांचे ‘बिल्लोरी कवडसे’, ‘…आणि माठ हसला’, हे दोन बालकथासंग्रह, कुमार मंडपे यांचे ‘भुताने लावली लाईट’, प्रा. चंद्रसेन टिळेकर यांचा ‘न्यूटन आणि कविता’ या कवितासंग्रह या पुस्तकांचे प्रकाशन शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विवेक जागर सप्ताहानिमित्त चित्रपट, नाट्य कलावंत आलोक राजवाडे यांच्या हस्ते 17 ऑगस्टला आभासी पध्दतीने करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भोपाळच्या ईकतारा प्रकाशन संस्थेचे मुख्य संचालक, बालसाहित्यिक सुशील शुक्ल हे उपस्थित होते.
सध्या कोविडच्या काळात एकूणच पुस्तकविक्री मंदावली आहे; त्यात मराठी पुस्तकांची विक्री तर खूपच मंदावलेली आहे, हे जरी वास्तव असले तरी 17 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एकाचवेळी प्रकाशित केलेल्या बालसाहित्याच्या पाच पुस्तकांची प्रत्येकी हजार प्रतींची अख्खी आवृत्ती ऑनलाइन प्रकाशन समारंभातच संपली. या प्रकाशन समारंभाची सुरुवात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करत वैष्णवी रींढे हिने सादर केलेल्या ‘आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो..वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो…’ या प्रेरणागीताने करण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बालसाहित्य प्रकाशित करण्याचा हा आगळावेगळा उपक्रम का सुरू केला, यामागची नेमकी भूमिका प्रा. प रा. आर्डे यांनी प्रास्ताविकातून मांडली. ते म्हणाले की, बालकांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी, जुन्या विचारांची जळमटे बाजूला सारून, नव्या विचारांची नवी कल्पना त्यांच्यात रूजावी म्हणून ‘महाराष्ट्र ‘अंनिस”ने बालसाहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांचा परिचय ‘महाराष्ट्र ‘अंनिस”चे विश्वस्त अरविंद पाखले यांनी करून दिल्यानंतर चित्रपट-नाट्य कलावंत आलोक राजवाडे यांच्या हस्ते पाचही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
भोपाळ येथील ईकतारा प्रकाशन संस्थेचे मुख्य संचालक तथा ‘साईकील’, ‘प्लुटो’ या बालमासिकाचे संपादक सुशील शुक्ल यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात ‘महाराष्ट्र ‘अंनिस”ने मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करून बालसाहित्य क्षेत्रात जे पदार्पण केले आहे, त्याबद्दल अभिनंदन करून लहान मुलांसाठी लेखन करणे फारच जबाबदारीचे काम असल्याचे सांगून मुलं आजूबाजूला बघून शिकत असतात. त्यांच्या साहित्यात ते जे बघतात, ते बाललेखकांना नेमकेपणाने देता आले पाहिजे. खरं सांगण्याची आणि खरं बोलण्याची ताकद फक्त आज बालकांमध्येच जिवंत आहे. आजच्या बालसाहित्यात जर मोठ्यांसाठी काही नसेल, तर अशा साहित्यात बालकांसाठीही काहीच नसते. वास्तव आणि कल्पनांचा सुंदर मिलाफ झाल्यावरच चांगले बालसाहित्य निर्माण होते, असे विचार याप्रसंगी त्यांनी मांडले.
बालसाहित्याची पाचही पुस्तके ज्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली, ते ‘भाडिपा’फेम, नाट्य-चित्रपट कलावंत आलोक राजवाडे यांनी बालपणापासून बालसाहित्याची चांगली पुस्तके, चांगली नाटके-चांगले चित्रपट बघितल्याने समाजाच्या आकलनासाठी चांगला फायदा झाला असे सांगून, “उद्याचा चांगला प्रेक्षक घडवायचा असेल तर आजच्या बालकांना आपण काय वाचायला देतो, तेही महत्त्वाचे आहे. नीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन एकत्र आणणारी पुस्तके आपण प्रकाशित केली, ती बालकांमध्ये नवा विचार व नवी कल्पना रूजवण्यासाठी नक्की महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत मांडून या बालसाहित्य प्रकल्पाबाबत ‘महाराष्ट्र ‘अंनिस”चे मनापासून आभार मानले. पाचही पुस्तकांच्या लेखकांनी आपआपली मनोगते थोडक्यात मांडल्यानंतर पुस्तकांना देखणी चित्रं रेखाटणारे पुण्याचे ओंकार मरकाळे यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाशित झालेल्या 460 रुपयांच्या या पाचही पुस्तकांवर प्रकाशनानिमित्ताने पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्रातील अरविंद ओक, गणेश चिंचोले, डॉ.शैलाताई दाभोलकर, रिद्धी संगीता कदम (पुणे), श्रीपाल ललवाणी, अमर कोठारी (बुलडाणा) इत्यादींनी काही आर्थिक मदत या प्रकाशनासाठी केल्यामुळे प्रकाशन समारंभात विशेष सवलत योजना याप्रसंगी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक पालक, शिक्षक व कार्यकर्त्यांनी चालू कार्यक्रमातच पाच हजार प्रतींची विक्रमी नोंदणी करून पहिली आवृत्ती प्रकाशन समारंभातच संपवून प्रकाशन क्षेत्रात एक नवा इतिहास निर्माण केला.
प्रा. प. रा. आर्डे, कुमार मंडपे, नरेंद्र लांजेवार, प्रमोदिनी मंडपे, नीलम माणगावे, अरविंद पाखले, अनिल चव्हाण, मिलिंद जोशी, मुक्ता दाभोलकर आणि राहुल थोरात यांच्या संपादकीय मंडळाने ही पाच देखणी पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रकाशन समारंभातच संपूर्ण आवृत्ती संपल्याबदल मुक्ता दाभोलकर यांनी वाचकांचे आभार मानले. या संपूर्ण प्रकाशन समारंभाचे साजेसे संचलन बुलडाण्याच्या मैत्री लांजेवार या बालिकेने केले. या प्रकाशन समारंभास अनेक बालसाहित्यिक, लेखक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– नरेंद्र लांजेवार, बुलडाणा