राहुल विद्या माने -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी स्मारक पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वरुण ग्रोव्हर यांचे ‘जिज्ञासा में जीवन’ या विषयावरील व्याख्यान झाले. त्याचे शब्दांकन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी देत आहोत.
आजकाल देशात पत्रकार टी.व्ही.वर कॉमेडी करत आहेत, तेव्हा मला वाटलं की कॉमेडियनला इथं येऊन काही गोष्टींची चर्चा केली पाहिजे. माझ्या काही उद्गारांनी काही जण दुखावले जाऊ शकतात. त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी आधीच क्षमा मागतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या पद्धतीने विवेकी रस्त्याने जाऊन काम करत आहे त्याला सलाम! तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने परिस्थिती बदलत आहे. तुम्ही जर या जगात ‘नरेंद्र’ म्हणून आलात तर दाभोलकर बना. दाभोलकर यांना आपण वैज्ञानिक चेतना, तर्कनिष्ठ विचारांसाठी ओळखतो आणि त्यासाठीच आपण त्यांना ओळखतो. “विज्ञान हे अंधश्रद्धेपेक्षा श्रेष्ठ आहे असं कुणी कसं काय म्हणू शकतं”, असं त्यांना मारायला आलेल्या लोकांना समजले तेव्हा ते खूप निराश झाले. खरंतर कोणत्याही समाजासाठी हे विधान करणे ही काही खूप क्रांतिकारी गोष्ट नाही. पण या गोष्टीचा वारंवार उल्लेख केल्यामुळे त्यांची हत्या झाली. त्यांना मारायला आलेल्या लोकांना असं वाटत होतं की, विज्ञान ही खूप तुच्छ गोष्ट आहे. बंदुकीच्या गोळीच्या दारूचा नवव्या शतकामध्ये शोध लागला आणि बंदुकीचा शोध बाराव्या शतकात लागला. गोळी मारण्यासाठी आणखी इतर वैज्ञानिक तत्त्वांची गरज असते. Projectile motion, Kinetics, Thermodynamics, Mining Engineering, Foundary या सर्वांची समज पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या मेंदूतील रासायनिक घटकांची सरमिसळ होऊन तुम्हाला राग येईल हे वैज्ञानिक पद्धतीने कुणीतरी घडवून आणते. जेव्हा एखाद्या वैज्ञानिक महात्म्याची हत्या होते, तेव्हा त्यांना मारायला आलेले लोक खिशात एवढे सगळे विज्ञान घेऊन फिरत असतात आणि त्यांना फक्त एवढेच सांगायचे असते की ‘विज्ञानाला काहीच अर्थ नाही.’ तर डॉ. दाभोलकर यांनी जे बलिदान दिले त्यातून हेच सिद्ध झाले की खरेच ‘विज्ञानापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही.’
गोळी मारल्याने विचार मरत तर नाहीतच, याशिवाय ते आणखी प्रखर होतात हे हत्या करणार्यांना आजपर्यंत समजले नाही. त्यामुळे लोक परत परत त्यांच्या विचारांकडे जातात. त्यामुळे बंदुकीची गोळी त्यांच्या विचारांना पुसून टाकणारे हत्यार नाही, तर त्यांच्या विचारांना कायमचे एक निशाणी देणारी ठरते. ज्या पद्धतीने डॉ. दाभोलकर यांचे जीवन आपण पाहतो त्यामध्ये मानवी संस्कृतीमधील श्रद्धा आणि विज्ञान यामध्ये जो वैचारिक संघर्षाचे प्रतिबिंब आपण पाहतो. श्रद्धा पसरवणारे लोक एका मार्केटिंग कंपनीसारखे काम करतात जे एखाद्या स्कीमच्या आधारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. यामध्ये कंपनीच्या किंवा मार्केटिंगमध्ये सर्वोच्च उंचीवर असणार्या लोकांना प्रचंड फायदा होतो आणि खालच्या लोकांचे प्रचंड शोषण होते.
आपल्या घराघरांत प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिले जात नाही. जे वयाने मोठे असतात त्यांचेच बरोबर असते असा ग्रह पसरवला जातो. शिक्षण कुठले करावे, करियरचा रस्ता कोणता पकडावा आणि लग्न कधी व कुणाशी करावे, आपण लैंगिक संबंध कसे ठेवावेत, मुले किती व कधी व्हावीत याबद्दलचे आपले सर्व निर्णय वयाने वरिष्ठ लोक आपल्यासाठी घेत असतात. एक प्रकारच्या conformism चे आपण सगळे गुलाम झालो आहोत. जणू काही उत्क्रांतीमध्ये आपल्या जैविक गुणसूत्रांमध्ये केवळ conformism साठी बदल केला गेला आहे. म्हणून conformism चे जे इंजेक्शन आपल्याला दिले गेले आहे त्यामुळे सुद्धा तर्कनिष्ठ विचारांना धोका पोहोचतो. श्रद्धा आणि विज्ञान यांच्या संघर्षाबद्दल आपण समाजशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र यांच्या साहाय्याने अधिक सखोलपणे समजून घेऊ शकतो.
माझ्या भाषणाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात माझ्यावर लहानपणापासून काय संस्कार झाले याबद्दल मी बोलेन. दुसर्या भागात श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील परस्पर संवादाबद्दल आणि तिसर्या भागात कलाकाराची काय जबाबदारी असू शकते याबद्दल मी बोलेन.
सर्वसाधारण भारतीय कुटुंबाप्रमाणे माझा जन्मसुद्धा एका श्रद्धाळू कुटुंबात झाला. लहानपणापासून तुमच्या मनावर हे बिंबवले जाते की, मंदिरात किंवा देवाजवळ आल्यावर आपल्याला शांत वाटते वगैरे. तुम्ही कोणतेही वाईट काम करता तेव्हा देवाची भीती दाखवली जाते आणि चांगल्या कामासाठी देव प्रसन्न होण्याचा दाखला दिला जातो. सहा-सात वर्षे वयापासून पौराणिक कथा कळत गेल्या. लहानपणी देव कसा असतो, हे समजून घेताना मला गांधी आणि ओशो हेच देव वाटायचे. नंतर मी बर्म्युडा ट्रँगल, इजिप्तच्या पिरॅमिड मधील ‘ममी’, परग्रहावरील जीव या सर्व रहस्यांबद्दल गोष्टी वाचायला सुरुवात केली. मी १५ वर्षांचा असताना २१ सप्टेंबर १९९५ रोजी गणेश मूर्ती देशभरात दूध पीत आहेत, ही अफवा देशभर पसरली. त्या वेळी मला असे अनुभव आले की, आपल्या श्रद्धांना घट्ट करणारे विज्ञान लोकांना हवे असते; पण एखाद्या घटनेतील वैज्ञानिक सत्य उघड करणारे सत्य लोकांना नको असते. त्या वेळी मला रात्री दूरदर्शनवर रात्रीच्या कार्यक्रमात हे कळले की हा चमत्कार नाही तर capillary action आणि surface tension या वैज्ञानिक तत्त्वांमुळे होते. आज जर हे झालं तर आजच्या प्रसारमाध्यमांनी त्याला खूप मसाला लावून रंगवून सांगितलं असतं. त्या घटनेपासून माझ्या मनात असा विचार आला की विज्ञानाकडे प्रत्येक समस्येचे उत्तर असते आणि तर्कनिष्ठ विचार त्यासाठी कामाला येतात.
कुतूहलाने विचारलेले प्रश्न आपल्याला खूप दूरवर घेऊन जाऊ शकतात. जर एका लहान मुलाने विचारले की “थंडीमध्ये ऊन का छान वाटते आणि उन्हाळ्यात का छान नाही वाटत?”, तर त्यातून आपण अनेक गोष्टींबद्दल चर्चा करू शकतो. पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण कसे होते, त्यासाठी centripetal आणि centrifugal बल कसे काम करते, तसेच गुरुत्वीय बल काय असते, बिग बँग स्फोटातून जे वस्तुमान तयार होते या सर्व संकल्पनांपर्यंत तुम्ही सोप्या, छोट्या प्रश्नांतून पोचू शकता. लहानपणापासून मी वाचलेले चंदामामा, पराग, बालहंस वगैरे मासिकांच्या वाचनातून माझी समज विकसित होत गेली. या मासिकांतून कोणत्याही रहस्यकथांना न जोडता वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या समजावून सांगितल्या जातात.
काही लाख वर्षांपूर्वी आपल्या गुणसूत्रांचा प्रवास एका पिढीपासून दुसर्या पिढीत होत असताना काही बदल झाले आणि त्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे झालो. हळूहळू आपण समाज घडवत गेलो. आपण जनावरे आणि प्राण्यांपासून शिकत गेलो. एकत्र राहून काम करत गेलो. आपण शेती करायला, जनावरे पाळायला शिकलो, प्रयोग करायला शिकलो, वसाहत बनवली. हळूहळू निसर्गाचे निरीक्षण आपण करत गेलो. मृत्यूबद्दल विचार करत गेलो. मृत्यूबद्दल काही कर्मकांड पाळत गेलो. पण इतर जनावरांपेक्षा आपण विचारी प्राणी असल्याने आपण या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत गेलो, त्यामुळे पडणार्या प्रश्नांची उत्तरे शोधात गेलो. आपल्याकडे प्रश्न अनेक होते आणि उत्तरे कमी होती. काही प्रश्नांच्या उत्तरासाठी आपण देवाची संकल्पना शोधून काढली. आपल्याकडे उत्तरे कमी असल्यामुळे आपला धर्म/देव संकल्पनेवर विश्वास वाढत गेला. मध्ययुगीन काळात बर्याचशा धार्मिक संस्थांनी (मशीद, मंदिर, चर्च) यांनी वैज्ञानिक संशोधनाला चालना करण्यासाठी मर्यादित निधी दिला. गॅलिलिओ, लिओनार्डो विंची, मायकेलेंजलो, कोलंबस ही यातील प्रमुख उदाहरणे आहेत. बरेचसे लोक पृथ्वी सपाट आहे का गोल आहे हे शोधण्यासाठी बाहेर निघाले. हळूहळू ज्या विज्ञानाला एक प्रकारे श्रद्धेने उभे केले, ते विज्ञान पुढे श्रद्धेपेक्षा मोठे झाले. त्यामुळे धार्मिक संस्थांनी अनेकांना वाळीत टाकले, मृत्युदंड दिला. पण मागच्या तीनशे-चारशे वर्षांत विज्ञानाने केलेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे एक प्रकारचा संघर्ष उभा राहिला आहे.
पण धर्मामध्ये एककेंद्रीय असा विरोधाभास आहे. सुशिक्षित आणि बरेच लोक म्हणतात की, आम्ही एका उच्च पातळीवरील शक्तीवर विश्वास ठेवतो. पण त्यातील गमतीची गोष्ट अशी की या उच्चशक्तीला जगातील रूढ अर्थाने नीरस वाटावे अशी कामे रोज करण्यासाठी कसा काय वेळ मिळतो? दुसरा विरोधाभास असा की जगातल्या सगळ्याच धर्मांचे लोक असं म्हणतात की, या पृथ्वीवरील आणि विश्वातील सर्व सजीव-निर्जीव गोष्टी त्यांच्या धर्माच्या देवाने बनवल्या आहेत. मग जर हे खरं असेल तर दुसर्या धर्माच्या लोकांचा आपण द्वेष का करतो? मग तुमचे म्हणणे असे आहे का की तुमच्या धर्माच्या लोकांचीच निर्मिती फक्त तुमच्या धर्माच्या देवाने केली आहे? मग दुसर्या धर्माच्या देवांनी सुद्धा त्यांच्या फक्त धर्माच्या लोकांना बनवले आहे का, असे हे कोडे मला पडते. मग देवांनी भौगोलिक प्रदेशानुसार आपले लोक वाटून घेतले आहेत का? हे काय चालले आहे? मी तुमच्या श्रद्धेचा आदर करतो. फक्त तुम्ही हे मान्य करा की, जगातील सर्वांची तुमच्या देवाने निर्मिती केली आहे आणि फक्त ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने देवापर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहेत. मग तुम्ही त्यांचा द्वेष का करता? तुम्ही त्या संदर्भात आलेल्या फेक न्यूजवर विश्वास का ठेवत आहात? प्रत्येक धर्म हे म्हणत आहे की त्यांचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. या विरोधाभासातून एक गोष्ट स्पष्ट होते. विविध धर्मांचे लोक असा दावा करतात की देवाने त्याच्या प्रतिमेत किंवा प्रतिबिंबाच्या आधारे त्याच्या भक्तांची निर्मिती केली आहे पण सत्य हे आहे की आपण देवाची निर्मिती आपल्या प्रतिमेत किंवा प्रतिबिंबित केली आहे. त्यामुळे कदाचित आपले देव आपल्यासारखे रागीट, गोंधळलेले किंवा उदार आपल्याला भासतात. त्यामुळे आपण धर्माचा प्रसार करत नसतो तर आपल्या श्रद्धेच्या ताकदीचा प्रसार करत असतो.
बराच काळ श्रद्धेने समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. पण विशेषतः मागच्या तीनशे वर्षांत श्रद्धेची पिछेहाट झाली. त्यातून संस्थात्मक रूप असलेल्या अंधश्रद्धेला आणि कोणताही हुकूमशहाला सुद्धा राग येतो. त्यामुळे अंधश्रद्धा अधिक कमकुवत होत गेली. उत्क्रांती हा विज्ञानाचा आणि जीवनाचा एक नियम आहे. कोणत्याही गुणसूत्रांची पुनरावृत्ती तेव्हाच होते जेव्हा त्याला अनुकूल वातावरण मिळते. पण धर्माचे जे ठेकेदार आहेत ते पुढच्या पिढीमध्ये कमी बुद्धिमान म्हणून उत्क्रांत होत आहेत. अंधश्रद्धा पसरवणारे जे बाबा-बुवा आहेत ते दर दहा वर्षांनी अधिक मूर्ख असे जन्माला येतात. आजकाल बाबा-बुवांचा पेहराव आणि चेहर्यावरील भाव पाहिले तरी ते अधिकाधिक मूर्ख म्हणून कसे जन्मताहेत हे आपल्याला कळून येईल.
कोविड काळात जगभर community action, लसीचे संशोधन आणि सामाजिक अंतर, मास्कबद्दल जागरूकता होत होती. आपल्याकडे दर आठवड्याला एक नवीन उपाय शोधला जाऊ लागला. कोविड पळवण्यासाठी भाभीजी पापड खा म्हणून एका मंत्र्याने सांगितले! कुणी सांगितलं की चिखलामध्ये लोळा! गोव्यातील एका माणसाच्या स्वप्नामध्ये कोविडच्या लसीचा रासायनिक फॉर्म्युला कळला असा त्याने दावा केला. त्याने भारत सरकारला पत्र लिहिले आणि त्याच्या प्रतिसादात भारत सरकारच्या आयुष मंत्र्याने या नागरिकाची भेट घेतली. स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध होणार्या वस्तूंपासून कोविडवर काही तरी उपाय सुचवला ज्याला मंत्र्यांनी वैज्ञानिक प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी पाठवले. जगातील सर्व देशांनी वैज्ञानिक संशोधनाच्या साहाय्याने कोविडवर विजय मिळवला आणि आपण मात्र हास्यास्पद उपाय करण्यात व्यस्त होतो.
आता या काळात कलाकारांची भूमिका काय असली पाहिजे याबद्दल चर्चा करू या. गुणसूत्राचे काम काय आहे? गुणसूत्रात श्रद्धा किंवा विज्ञान संकेत रूपात नाही. त्यात मूलतः अस्तित्व टिकवणे आणि पुनरुत्पादन करणे हे मूळ गुण आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा काही गुण असतील त्याबद्दल संशोधन चालू आहे. सतत शोध घेणे ही विज्ञानाची खासियत आहे. श्रद्धा ही शंकेपासून उत्तरापर्यंतचा प्रवास मानला जातो. पण विज्ञानाचा प्रवास हा एका शंकेकडून आणखी मोठ्या शंकेकडे, प्रश्नाकडे चालू असतो. त्यामुळे आपणाला सहजपणे मिळणार्या उत्तराने आपले समाधान होते. आपण त्यात फार स्वतःचा मानसिक त्रास करून घेऊ इच्छित नाही. आपले गुणसूत्र असाही विचार करतात की आपल्या आसपास जे होत आहे त्यामुळे आपल्याला काही धोका तर नाही? आपल्याला सुरक्षित वाटण्यासाठी आपल्याला प्रश्नांची उत्तरे हवी असतात. दुसर्या बाजूला आपल्याला काही तरी गोष्टी सांगायला आवडतात. गोष्टींमधून आपल्याला संवाद साधायला आवडतात. त्यातून आपण माणूस म्हणून उत्क्रांत होत गेलो. पुराणात गोष्टी आल्या त्याचे हे मूळ असावे. आपल्या वाचन संस्कृतीने आपल्यावर प्रभाव टाकला. समाजाची-कळपाची गरज हीसुद्धा माणसांची जैविक गरज उत्क्रांतीमध्ये अधोरेखित झाली. शेवटी आपल्याला कोणत्यातरी संकल्पनेला शरण जाण्याची मानसिक गरज महत्त्वाची वाटते. त्यामुळे आपल्याला मानसिक शांती, एक आसरा मिळाल्याची भावना देते. ही भावना विज्ञान आपल्याला देते. आपण आजारी असलो तर औषधाच्या संकल्पनेला आपण शरण जातो, औषध घेतो आणि बरे होतो. अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. विज्ञानाने आपल्याला दररोजच्या जीवनात इतक्या गोष्टी दिल्या आहेत की त्यामुळे जीवन सरल होते. बर्याच वेळा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. दोन डोळ्यांमधून ज्या प्रतिमा मेंदूच्या पटलावर कोरल्या जातात त्यातून त्रिमितीय प्रतिमा पाहिल्याचा व त्याचा बोध झाल्याची जी जाणीव होते त्यामागे ही सरलता आणि उत्स्फूर्तता आहे. हे अद्भुत आणि कमालीचे सुंदर विज्ञान आहे. या नैसर्गिक प्रक्रियेसमोर आपण नतमस्तक आहोत.
प्रत्येक माणूस विज्ञान समजून घेऊ शकत नाही आणि त्या मर्यादेमुळे तो श्रद्धा-अंधश्रद्धेच्या वाटेला जातो. म्हणूनच कलाकारांना श्रद्धा आणि विज्ञान यांना एकत्र आणावे लागेल. एक कलाकार म्हणून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल अधिकाधिक चिंतन करावे लागेल. कारण कलाकारांची ताकद खूप मोठी असते. खूप लोक त्यांचे ऐकत असतात, त्यांचे अनेक बाबतीत अनुकरण करत असतात. कारण लोक तुम्हाला मानतात आणि एकाग्रतेने तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे विज्ञानाशी पूल बांधून जोडण्यासाठी कलाकारांनी लोकांना मदत करावी. कारण वैज्ञानिक क्षेत्र त्यांच्या अंतर्गत समस्यांत गुरफटलेले आहे. विज्ञानात एक प्रकारचा अहंकार पण आहे जो विज्ञानाच्या तांत्रिक भाषेत सुद्धा झळकतो. तरीसुद्धा विज्ञानाच्या बाजूने लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत विज्ञान पोचवायला विज्ञान संस्था कमी पडले आहेत. जगभरात विज्ञान लोकांपर्यंत न पोचू देण्यात बर्याच सत्तासंबंधांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे विज्ञान व श्रद्धा यांच्यात संवाद होत नाही, हे पण एक आव्हान आहे.
कलाकार अजून एक काम करू शकतो. प्रेम, करुणा, सहानुभूती ही खूप शक्तिशाली मूल्ये आहेत. तर्कनिष्ठ विचारांत जेवढी ताकद आहे तेवढीच करुणेत आहे. तुम्ही मंटो, काफ्का किंवा अमृता प्रीतम यांचे साहित्य वाचा. तुम्हाला हे कळून चुकेल. वेगवेगळ्या पद्धतीने जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करणारे कलाकार जे काम करतात ती करुणा आहे. ती एक मोठी शक्ती आहे. विज्ञान व श्रद्धा यांचे स्वतःचे तर्क असलेली एक विशिष्ट अशी बाजू आहे, पण कला एकप्रकारे निष्पक्ष आहे. कलाकार तटस्थ राहून हे सांगू शकतो. फक्त त्यात मानवता असावी. अल्बर्ट कामूच्या प्लेग कादंबरीत मानवतेचा हा मुद्दा प्रामुख्याने येतो. या कादंबरीत एक धर्मगुरू आणि डॉक्टर मधील संवाद हा मानवतेप्रति आपण सर्वांनी करायच्या कर्तव्यपर्यंत येऊन थांबतो.
शब्दांकन : राहुल विद्या माने
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते व साथी डॉ शंतनू अभ्यंकर यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर डॉ. हमीद, अण्णा कडलास्कर आणि रेश्मा कचरे यांनी डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करणारे गाणे सादर केले. नंतर राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटला विषयावर सविस्तर निवेदन केले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. भोर शाखेचे डॉ. अरुण बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद देशमुख यांनी वरुण ग्रोव्हर यांचे डॉ. दाभोलकर यांच्या साहित्यावरील हिंदीमध्ये अनुवादित पुस्तकांचा संच भेट देऊन स्वागत केले. अंनिस पुणे शाखेचे श्रीपाल ललवाणी यांनी सर्वांचे आभार मानले.