डॉ. चित्रा दाभोलकर -
किशोर वय किंवा पौगंडावस्था म्हणजे बालपणातून तारुण्यात पदार्पण करताना लागणारा संक्रमणाचा काळ. या काळात कित्येक शारीरिक, मानसिक आणि मनोसामाजिक बदलांना सामोरे जावे लागते. हा काळ खूप ऊर्जेचा असतो. तसेच या काळात विशेष शारीरिक बदल घडून येतात, कौशल्ये विकसित होतात आणि खूप नवनवे अनुभवही येतात. बदलती सामाजिक मूल्ये, विभक्त कुटुंबपद्धती, कुटुंबातील मुलांमधील कमी संख्या (एक किंवा दोन) आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे, मुलांच्या एकूण मानसिकतेबद्दल पालकांमध्ये असणारे अज्ञान यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये भयाची भावना निर्माण होते. त्यामुळे अनेक मुले या वयात आत्महत्या करताना दिसतात. त्याचप्रमाणे या वयात वाढत असलेली हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता, नकारात्मक विचार, आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक समस्या आढळून येतात. यावर उपाय म्हणजे शालेय; तसेच अनौपचारिक शिक्षणात जीवनकौशल्यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. प्रस्तुत लेखात भावनांचे समायोजन आणि ताणतणावांचे समायोजन या दोन जीवनकौशल्यांची माहिती दिली आहे.
स्वत:च्या; तसेच दुसर्या माणसाच्या भावना जाणून घेणे, त्यांचा वागणुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन गरजेप्रमाणे भावनांचे व्यवस्थापन करणे म्हणजे भावनांचे समायोजन कौशल्य होय. ताणतणावांचे समायोजन म्हणजे ताण-तणावाच्या कारणांचा शोध आणि त्यांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ताण कसा कमी करता येईल, यावर कार्यवाही करणे म्हणजे ताणतणावांचे समायोजन कौशल्य होय. वैद्यकीय किंवा जैविकसंदर्भात ताण हा शारीरिक, मानसिक किंवा भावनिक घटक असतो, ज्यामुळे शारीरिक किंवा मानसिक तणाव निर्माण होतो. तणाव बाह्य (पर्यावरण, मानसिक किंवा सामाजिक परिस्थितीमधून) किंवा अंतर्गत (आजार किंवा वैद्यकीय प्रक्रियेद्वारे) असू शकतात.
तणाव म्हणजे काय, तर ज्या बदलामुळे शारीरिक, मानसिक किंवा भावनिक ताण येतो, त्या स्थितीला तणाव असे म्हणतात. चांगला ताण आपल्याला मदत करू शकतो, तर वाईट ताण आपल्यावर दुष्परिणाम करू शकतो. ताणाचे शरीरावर काय परिणाम होतात, हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. एखादे कार्य करीत असताना अनेक समस्या उद्भवतात व दडपण येते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सामान्यपणे मुले तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली, तर त्याचे पर्यवसान शारीरिक; तसेच मानसिक स्वरुपाच्या अनेक समस्यांमध्ये होते, म्हणून ताणतणावाची यशस्वीपणे हाताळणी करण्याकरिता शिक्षणाची आवश्यकता आहे. अतिरिक्त ताण आला तर स्मरणशक्ती कमी होते, काही लक्षात राहत नाही, कुठल्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही, निर्णय घेता येत नाहीत, नकारात्मक वृत्ती उफाळून येते, सारखी काळजी किंवा चिंता वाटू लागते, विचारमग्नता वाढते, चिडचिड होत, आपल्यालाच अस्थिर-चंचल असं वाटू लागतं, एकटे वाटायला लागतं, रडावंसं वाटतं, आपण दु:खी होतो, भूक कमी लागते, कधी अंग दुखतं, अपचन व्हायला लागतं, छातीत दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, अंगावर पुरळ येते; म्हणजे ताण आला की शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.
ताण कमी करण्यासाठी आपल्यामध्ये ताण निर्माण करणार्या ज्या गोष्टी माहिती आहेत, त्या टाळणे गरजेचे असते (उदाहरणार्थ जागा, माणसे). ज्या परिस्थितीमुळे आपल्याला ताण येतो, ती परिस्थिती हे टाळणे महत्त्वाचे असते. तसेच नाही म्हणायला शिकणे सुध्दा गरजेचे असते. शक्यतो ताण निर्माण करणारी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक; परंतु ताण निर्माण करणारी परिस्थिती टाळता येत नसेल तर तिला सामोरे जाण्याचा शिकस्तीने प्रयत्न केला पाहिजे. काळजी करत न बसता, आपल्या भावनांचा कोंडमारा न करता परिस्थिती हाताळली पाहिजे. आपल्या चिंतेविषयी उघडपणे बोलायला शिकले पाहिजे. योग्य ती तडजोड करता आली पाहिजे आणि हे सगळं शिकून घेणे गरजेचे आहे, हे डोळसपणे करणे गरजेचे आहे. ताण निर्माण करणार्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपल्यात बदल केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे. अभ्यासामुळे ताण येत असेल तर थोडा काळ दुसरा विरंगुळा शोधला पाहिजे, ताण कमी करून परत अभ्यासाला मात्र लागलेच पाहिजे. ताण निर्माण करणारी काही कारणे आपण कमी करू शकत नाही, तेव्हा ती स्वीकारायला शिकले पाहिजे.
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
कुठल्याही परिस्थितीमधील चांगले शोधायची वृत्ती तयार केली पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत नवीन शिकण्याची संधी घेतली पाहिजे. कोणीच सर्वगुणसंपन्न नसतं, हे स्वीकारले पाहिजे. त्यामुळे आपल्याला सर्व आलं पाहिजे, हा अट्टाहास कमी केला पाहिजे. आपल्यातल्या कमतरता समजून घेतल्या पाहिजेत आणि निराश न होता त्यावर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे. ताण कधी येणार आहे, ते आधीच ओळखून (आत्मभान) त्यावर मात मिळवण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणे ही यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या मनाचं ऐकायलाही शिकले पाहिजे. नियमित व्यायाम, योग्य आहार, नियमित दैनंदिन व्यवहार, योग्य प्रमाणात झोप, भरपूर पाणी पिणे या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करणे ताण कमी करण्यासाठी आवश्यक ठरते.
ताणतणावांचे समायोजन हे एक शिकून घेण्याजोगे कौशल्य आहे. या कौशल्याची गरज काय, तर आपल्याला कशामुळे ताण येतो, हे ओळखून त्यावर न घाबरता उपाययोजना करता येते. स्वतःवरचा विश्वास वाढतो, स्वाभिमान विकसित होतो, तुमची जीवनशैली सुधारायला उपयुक्त ठरते.
आपल्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आपल्या रोजच्या व्यवहारात, वर्तणुकीत काय परिणाम होतो आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, याकरिता जे कौशल्य लागते, त्याला भावनांवर विजय मिळवण्याचे कौशल्य म्हणतात. विद्यार्थ्यांमध्ये भावना स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भावनांचे समायोजन कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. त्यामुळे ते तणावमुक्त, चिंतामुक्त शांत जीवन जगू शकतील, नाहीतर नकारात्मक वर्तणुकीकडे झुकतील. आपल्या मनातील भावनांचा निचरा होण्यासाठी आपण त्या भावना इतरांसमोर व्यक्त करण्यास शिकले पाहिजे. मनात बराच काळ कोंडून ठेवलेल्या भावनांचा एखाद्या वेळी एकदम उद्रेक होऊ शकतो. भावना, विचार आणि वर्तणुक एकमेकांवर अवलंबून असतात. आपण जो विचार करतो, त्याचा परिणाम आपल्या वर्तणुकीवर होत असतो, तसंच आपण जो विचार करतो आणि आपल्याला जे वाटतं (भावना) त्याच्यावरच आपली कृती अवलंबून असते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावनांचा परिणाम आपल्या विचारांवर आणि कृतीवर होत असतो. जशा आपल्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे, तसेच दुसर्याच्या भावना समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. भावनांवर विजय मिळवण्याचे कौशल्य म्हणजेच भावनांचे समायोजन. आपल्या आणि इतरांच्या भावना समजून घेऊन, तसेच त्यांचे परिणाम ओळखून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य. अप्रिय किंवा कटू भावना निर्माण करणार्या गोष्टींचा सामना करता आला पाहिजे आणि आपल्या भावना सकारात्मकरित्या व्यक्त करता यायला हव्यात.
ही जीवनकौशल्ये अंगी बाणवल्यामुळे वैचारिक क्षमता वाढते. आपण वेळ, आपल्याकडे असलेली साधनसामग्री, आपली शक्ती यांचा योग्य प्रकारे वापर करू शकतो; तसेच चांगले-वाईट समजून घेण्याची क्षमता वाढल्यामुळे अनेक कठीण प्रसंग टाळता येतात. संभाव्य धोकादायक परिस्थितीची अटकळ बांधून त्यावर मात मिळवण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो.