राजकुमार तांगडे - 9763879284
मराठवाड्यातील एका छोट्या खेड्यातून शेतकरी, वारकरी कुटुंबातून घडलेला अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक. सुरुवातीला हुंडाबळीच्या समस्येवरील ‘बहीण माझी प्रीतीची’ नंतर ‘काय दिले स्वातंत्र्याने?’ हे शेतकर्याच्या आत्महत्येवरील नाटक, प्राथमिक शिक्षणातील दुरवस्था मांडणारी ‘पिंटी’ एकांकिका, वीज समस्येवरील ‘आकडा’, ग्रामीण राजकारणावरील ‘हितशत्रू’, शेतकर्याच्या आंदोलनावरील ‘चक्का जाम’, मानवी स्वभावावर भाष्य करणारी ‘स्वर्गारोहण’ या एकांकिका गाजल्या व मकरंद साठे, अतुल पेठे यांच्यासमवेत नाट्यरूपांतर केलेले ‘दलपतसिंग येती गावा’ आणि त्यानंतर आलेल्या ‘शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने राजकुमार तांगडे हे नाव सर्वपरिचित झाले. ‘म्हादू’, ‘क्षितिज’, ‘नागरिक’ या चित्रपटात अभिनय, ‘चिवटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन.
प्रश्न :- राजकुमार आपल्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रथम परिचय केव्हा झाला?
राजकुमार : मी ग्रामीण भागातला. जालना जिल्ह्यातील समर्थांचं जांब हे माझं गाव. ग्रामीण भागामध्ये विचारांचे माध्यम म्हणजे मंदिर. अशी जी धार्मिक स्थळे असतात, तिथून विचार सांगितले जातात. त्यामुळे संतांचे विचार मंदिर संस्कृतीच्या माध्यमातून ऐकायला मिळायचे; पण खर्या अर्थाने जे समाजसुधारक आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्या विचारांची ओळख व्हायची म्हटलं, तर ती शाळेच्या माध्यमातूनच व्हायची; पण या थोर समाजसेवक आणि विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेबांचा एक अपवाद आहे. बाबासाहेबांचा विचार हा शाळेच्या बाहेर पण माहीत होत होता; म्हणजे गावामध्ये जो आंबेडकरी समाज होता, तो भीमजयंती धूमधडाक्यात साजरी करायचा. भीमभजनाचे कार्यक्रम सातत्याने गावात व्हायचे. वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे आणि ते गावात ऐकायला मिळायचे. यातून बाबासाहेबांचा विचार कळायचा. भीमजयंतीला आलेल्या वक्त्यांच्या विचारांतून बाबासाहेबांचा विचार कळायचा. हलकीशी कानावर पडलेली ती विचारधारा; खासकरून आमच्या शाळेमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, त्यामध्ये प्रभाकर नावाचा माझ्यापेक्षा सीनिअर असलेला उत्तम गायक आणि वादक होता. तो बाबासाहेबांचे गाणे म्हणायचा – ‘आई माझ्या अभ्यासाची का तुलाच काळजी नाही? बाबा माझ्या शिक्षणाची का तुम्हाला काळजी नाही?’ यातून शिक्षणाचे महत्त्व तो सांगायचा; तसेच एक सखाराम नावाचा मुलगा उत्तम बासरीवादक होता. त्याच्या गाण्यातून भीमविचार कळायचा. मी या दोघांचाही खूप मोठा फॅन होतो. मला हे दोघेही खूप आवडायचे आणि मला असे वाटायचे की, जे माझे आवडते बाबासाहेब आहेत, ते त्यांचेसुद्धा आवडते आहेत; म्हणजे हे काहीतरी मोठेच असणार आहेत; अन्यथा इतर कोणीही बाबासाहेबांवर फारसे शाळेत बोलायचे नाही किंवा बाबासाहेबांचे गाणे म्हणायचे नाही. त्यामुळे खरी सुरुवात ज्यांना मी जवळून न्याहाळायचो, जवळून बघायचो, ज्यांची मला नक्कल करायला आवडायची, अशा या दोन हुशार मुलांचे आदर्श बाबासाहेब होते. आपल्या आदर्शाचे आदर्श यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर्श असतोच. अशा प्रकारे हलकीशी एक किनार शालेय जीवनातच जोडलेली होती.
ग्रामीण भागामध्ये माझ्या वर्गामध्ये जी मुलं होती, ती अठरापगड जाती-धर्माची होती. वर्गामध्ये कधी जातिभेद जाणवायचा नाही. तसाही माणूस स्वत: कधी भेदभाव करत नाही; पण नंतर तुम्हाला सांगितले जाते की, ‘हे आपले नाहीत, ते त्यांचे आहेत,’ ‘हे असे आहे, ते तसे आहे,’ असे संस्कार होतात; पण सुरुवातीलाच तो विचार मला आपला वाटायचा. नंतर मधला काही कालखंड गेला आणि खर्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांचा जो परिचय झाला, तो चळवळीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांची भाषणं-व्याख्यानं ऐकल्यानंतर आणि खासकरून ‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ आणि तो जो काही कालखंड आहे, पाच-सहा वर्षे अगोदरचा, त्यामध्ये खर्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांचा जवळून परिचय झाला.
प्रश्न : डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि भोवतालची परिस्थिती यामध्ये सुसंगतता कशी साधली किंवा कशी शोधली?
राजकुमार तांगडे :- खरं तर ग्रामीण भागामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची जास्त गरज होती. कारण गावाकडे एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याचे नाव व जातीसह असते. जाती-जातींमध्ये विभागलेला समाज हा गावाकडे असतो. प्रत्येकामध्ये एक दरी असते. नाही म्हटले तरी प्रत्येकामध्ये ती अदृश्य दरी दिसतेच; खासकरून राजकारणी लोकं खूप खुबीने आणि राजकारणाच्या पद्धतीनं वापर करून घेतात. गावाकडची जी जातीयता होती, ती जरा त्रासदायकच वाटायची;. पण गावपातळीवर मी जेव्हा शेतकरी संघटनेमध्ये काम करायला लागलो, त्यावेळी मी नेहमी एक म्हणयचो की, मागासवर्गीयांचाही कापूस पाच हजारानेच घेतला जातो, ब्राह्मणचाही कापूस पाच हजारानेच घेतला जातो आणि कुणबी-मराठा यांचाही कापूस पाच हजारानेच घेतला जातो; म्हणजेच कष्ट आणि भुकेची जातीमध्ये वर्गवारी करता येत नाही. हा एक धागा त्या सगळ्यांना जोडण्यासाठी मला वापरता आला. बाबासाहेबांचे विचार हे काही फक्त आंबेडकरी समाजासाठी नाहीत, तर ते आपल्या सगळ्यांसाठी आहेत. बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली, बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले, हे काही एका गटासाठी, एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी दिलेले नाही, तर सबंध भारतीयांसाठी दिलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये महिला-स्त्री-पुरुष या सगळ्यांना एका धाग्यामध्ये समतेच्या पातळीमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्नच नाही, तर एका धाग्यामध्ये समतेच्या तत्त्वांमध्ये बांधलेले आहे. हे लोकांना सांगणे खूप गरजेचे असते आणि ते सांगण्याचाही प्रयत्न आम्ही, आमच्यातील काही मित्रमंडळी किंवा इतर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो; म्हणजे बाबासाहेब हे देशाचे आहेत, हे सर्व समाजाचे आहेत, हे जगाचे आहेत, ते विश्ववंदनीय आहेत… बाबासाहेबांचे विचार हे आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाणारे आहेत, मानवतेला पुढे घेऊन जाणारे आहेत. समता-बंधुता या गोष्टींची शिकवण बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ती आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत…याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही कायम आमच्या विविध नाट्यकलाकृतींतून केला आहे. त्यामुळे सोबतच्या व भोवतालच्या लोकांना बाबासाहेब समजून सांगणे आणि आम्ही ते अंगीकारणे थोडंसं सोपं गेलं.
प्रश्न :- ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ ही संहिता कशी साकारत गेली?
राजकुमार तांगडे :- खरं तर ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक नसून ती एक चळवळ आहे, असे लोकही म्हणतात आणि आम्हालाही तेच वाटते. ते काही एखाद्या लेखकाला सुचले, त्याने लिहिले, कोणाला बसवायला दिले आणि ते नाटक बसवले. तिकीट खिडकीवर ते कोणाच्या तरी नावाने चाललं, असं नाही. ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांमुळेच शक्य झालेलं आहे. ही संकल्पना संभाजी भगतांची होती. लोकशाहीर संभाजी भगतांना शिवाजी जलसा करायचा होता आणि आम्हालाही छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी करायचं होतं. कारण ग्रामीण भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अलिकडे, वीस-पंचवीस वर्षांमध्ये अतिशय संवेदनशील करून ठेवलेले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे-एका जातीचे-एका धर्माचे किंवा एका गटाचे किंवा एका राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या घराण्याचे नव्हते, तर ते सगळे आपल्या सर्वांचे होते, हे लोकांना सांगणे खूप गरजेचे होते आणि हा विचार आम्हाला जनमानसामध्ये घेऊन जायचा होता. तोच विचार संभाजी भगतांनाही सांगायचा होता. त्यामुळे आमची कुठेतरी नाळ जुळली. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरील जी पुस्तके आहेत, ती वाचनात आली. ती मुद्दामहून वाचली. ती एकट्यानंच नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून वाचली; म्हणजे हे असे एक नाटक आहे की, ज्याची लेखणी हातात घेण्याअगोदरच त्याचा ग्रुप तयार होता. हे एवढे-एवढे लोक यात काम करणारे आणि मग त्यांच्यासाठी पात्रे लिहिली. शिवाजी महाराजांचे चरित्र सांगायचे नव्हते, तर ‘शिवविचार’ त्यामध्ये सांगायचा होता. त्यामुळे हे पारंपरिक नाटकांपेक्षा वेगळेच होते. ही समूहाने तयार केलेली कलाकृती होती. आम्हाला जवळपास ज्या सगळ्या चर्चा-वाचन करून साधारण दीड वर्षं लागलं; अगदी नंदू माधवांनी ज्यावेळी दिग्दर्शनाला सुरुवात केली, त्या वेळेसही काही सीन्स हे चार-चार, पाच-पाच वेळा ड्रॉप झाले; पण आम्ही कलावंत, दिग्दर्शक, लेखक, कल्पनाकार हे सगळे सोबत असल्यामुळे एखादे कार्य हातात घेतल्यामुळे काहीतरी काम करतोय, असा वेगळा ‘फील’ त्यामध्ये होता. हे नाटक जसे विटांवर विट चढवून घर बांधून पाहावं, तसं हे नाटक एक-एक दिवस करत हळूहळू-हळूहळू पूर्णत्वाकडे गेलेलं आहे.
प्रश्न :- नाटकाच्या नावात ‘भीमनगर’ असल्याने किंवा ‘शिवाजी’ हे नाव असल्याने नाटकाचे प्रयोग काही ठिकाणी बंद पाडण्यात आले का? नाटकाला विरोध करणार्यांना बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराज समजून देण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न केलेत का?
राजकुमार तांगडे :- हो, निश्चितच! नाटकाचे नाव ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला.’ मुळात काहींचा आक्षेप हा वेगवेगळ्या गोष्टींना होता. काहींना हे नाव सुरुवातीला विचित्र वाटायचे. आपल्याकडे सुरुवातीलाच एक अंदाज बांधण्याची पद्धत असते. त्यामुळे हे असं नाव आहे म्हणजे काहीतरी वादग्रस्त असणार, असंही त्यांच्या मनात यायचं; म्हणजे अतिसंवेदनशील. एकतर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का, असाही काहींचा प्रश्न असायचा; पण आम्ही आमच्या आईचाही एकेरी उल्लेख करतो. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आमचं दैवत, आईसारखं दैवत आहे. त्यामुळे ‘शिवाजी’ या नावावर ‘शिवाजी’ हेच नाव यावर आम्ही ठाम होतो.
आता लोकांचा दुसरा प्रश्न असायचा की, शिवाजी महाराज भीमनगरमध्ये कशाला? म्हणजे शिवाजी महाराज आणि भीमनगर हे एकत्र कसं काय असू शकते? शिवाजी महाराज; जे मागासवर्गीयांचे नव्हतेच, असंच त्यांना म्हणायचं किंवा नामांतर प्रकरणात अत्याचार करण्यासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरलेल्याचा लोकांना जास्त त्रास व्हायचा, असंही म्हणा हवं तर. म्हणून त्यांचा विरोध असायचा; पण आमचं स्पष्ट मत असायचं की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे अठरापगड जातीचे होते. वाड्या-वस्त्यांवर राहायचे, डोंगर-दर्यात राहायचे. ते काही महानगरात राहत नव्हते. दिवसभर शेती करायची, आठवणीने चार महिने शेती करायची, नंतर लढाईला जायचे. असे ते ‘शेतकरी मावळे’ होते. आज जर शिवाजी महाराज असते तर शिवाजी महाराजांचे मावळे हे काही मध्य वस्तीत किंवा इतर कुठल्याही अशा मोठ्या कॉलनीत राहिलेले नसते, तर भीमनगर झोपडपट्टी, इंदिरा नगर, कडीकोपरे, वाड्या-वस्त्या अशाच ठिकाणी राहिले असते. आमचं दुसरंही असं स्पष्टीकरण होतं की, खरा बंडखोरीचा विचार जर कुठं असेल तर तो भीमनगरमध्ये आहे, जो बाबासाहेबांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील जे मावळे होते, तेही बंडखोरच होते. त्यांना स्वत:चे स्वराज्य निर्माण करायचे होते. बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, ते सुद्धा स्वराज्य म्हणजे लोकशाहीचेच पाईक आहेत, म्हणून त्यांच्याकडे बंडखोरी आहे. शिवाजी महाराज आज असते तर जे मावळे आहेत, त्यांचे जे सैनिक आहेत, ते भीमनगरमध्येच राहिले असते. ते कुठल्याही मध्य वस्तीत किंवा बंगल्यामध्ये राहिलेले नसते. कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच वाडे-खुडे, महाल हे पाडून सर्वांना सामान्यांच्या पातळीवर राहायला शिकवले होते. मग असे जे वेगवेगळे विरोध होते हे असायचे. काही निवेदने देऊन विरोध करायचे, काही मोर्चेकाढायचे, आंदोलन करायचे. मग आम्ही बर्याच ठिकाणी असं केलं की, या लोकांचे जे प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींना आम्ही विनंती करायचो की, तुमचा जो आक्षेप आहे, तो फक्त नाटक पाहिल्यानंतर आम्हाला सांगा. मग त्यांचे काही दोन-चार-पाच प्रतिनिधी बर्याचशा ठिकाणी आम्ही बोलवायचो, सन्मानाने त्यांना पुढच्या रांगेमध्ये जागा द्यायचो आणि त्यांनी नाटक पाहायला सुरुवात केली की, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायचं. परत आम्ही सांगण्याची गरज पडत नव्हती: पण ज्यांच्या मनामध्ये काहीतरी हेतू असतो, असे लोक आमचे नाटकच बघत नसत आणि आपला विरोध कायम ठेवायचे. त्यांना आम्ही काही गिनत नव्हतो. कारण आम्ही शेतकर्याची लेकरं. आम्ही नफा-तोट्याची तमा बाळगली असती, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार लोकांपर्यंत घेऊनच जाऊ शकलो नसतो; म्हणजे आम्हाला दोन-दोनदा-तीन-तीनदा पेरायची सवय आहे. आम्ही हरत नाही, तर विरोधाला आम्ही फारसे जुमानलो नाही; पण बहुतांश असे झाले, जे विरोध करायला आले, ते ‘आपले’ झाले; आणि अगदी ज्यांच्या पोटावरच यामुळे पाय पडत होता, त्यांचा विरोध मात्र कायमच राहिला. अर्थात, तो त्यांच्या अतिस्वार्थाचा भाग होता.
प्रश्न :- आपले लेखन, अभिव्यक्ती यामध्ये आंबेडकरी संवैधानिक विचार आपण कशा पद्धतीने मांडत आहात?
राजकुमार तांगडे :- समता-बंधुता-न्याय या सगळ्या गोष्टी एका चांगल्या लेखकाच्या लेखणीमध्ये येतात. खरा लेखक किंवा कलाकार तोच असतो, जो सर्वांना एका नजरेत पाहतो; म्हणजे समतेच्या पातळीवर, अशा अर्थाने. हा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक कलाकृती ही मानवाचे हित जोपासणारी असली पाहिजे. तुमचे व्यक्तिगत, तुमच्या गटा-तटाचे किंवा तुमच्या जातीचे हित जोपासणारी कलाकृती सर्वसमावेशक असूच शकत नाही. तुमची कलाकृती तेव्हाच सर्वसमावेशक होईल, जेव्हा ती कलाकृती सबंध मानवजातीच्या हिताचा विचार करते. आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये सर्व समाजघटकांचा नीटपणे विचार केलेला आहे आणि ते संस्कार आपल्यावर झालेले आहेत. अगदी वीस वर्षांपूर्वी मी लिहिलेलं ‘चक्का जाम’ नावाचं नाटक होतं. साधारण आपल्याकडे असा एक समज आहे की, अमुक-अमुक जातीचीच लोकं शेती करतात, दलित शेती करत नाहीत; पण माझ्या गावचे उदाहरण असे होते की, माझ्या गावामध्ये सगळ्याच जाती-धर्माचे लोक शेती करतात. तर माझ्या ‘त्या’ नाटकाचा नायक जो शेतकरी आहे, हा आंबेडकरी समाजाचा होता. हे जे मूल्य आहे, हे जोपासणं, जपणं हे तुमचं लेखक म्हणून, माणूस म्हणून आणि एक शोधक म्हणून तुमचं कर्तव्य असतं. तुम्हाला हे समाजाला सांगावं लागतं. तुम्ही समाजाला त्याची जाणीव करून द्यायची असते. मला असे वाटते की, शेतकर्याला कुठलीही जात नसते. जर एक एकर शेत पेरायचे असेल, तर दलित शेतकरी असो, त्यालाही एक किलोच बियाणे लागते, सवर्ण शेतकरी असला तरी त्याला एक किलोच बियाणे लागते. जर निसर्गाची अवकृपा झाली तर कुठल्याही जाती-धर्माच्या शेतकर्याला सारखाच फटका बसतो. तिथे सगळे एका पातळीवर येतात, हे सांगणं खूप गरजेचं आहे; म्हणजे दु:खाला, पोटाला जात नसते, हे सांगणं पण खूप गरजेचं आहे. माणूस इथून-तिथून एक आहे, हे सांगणं पण खूप गरजेचे आहे आणि आपण ते व्यक्त व्हायचं. कुणाच्याही दडपणाला बळी पडून आपण त्याच्यापासून दूर पळायचे नाही. भेदाभेद हा मोडून काढलाच पाहिजे. आपण व्यक्त झालं पाहिजे. बेधडकपणे व्यक्त व्हायचं आणि लेखकानं तरी हातचं राखून कधीही वागलं नाही पाहिजे. ज्याला कोणाला लिहायचे आहे, त्यानं एकतर पारदर्शक असले पाहिजे, त्याने ‘स्व’च्या प्रेमात असायला नको; आणि त्यानं व्यक्त झालं पाहिजे, त्यानं भीती बाळगता कामा नये. जर आपण भीती नाही बाळगली, ‘स्व’च्या प्रेमात नाही पडलो आणि माणूस हा जर केंद्रबिंदू ठेवला तर आपण खर्या अर्थाने संवैधानिक विचार नीटपणे आपल्या कलाकृतीमध्ये मांडू शकतो.
प्रश्न :- आज कलावंत–लेखकांनी आंबेडकरी विचारांची पेरणी केली पाहिजे, याची आवश्यकता आपणास वाटते का?
राजकुमार तांगडे :- आज सांप्रदायिक दहशतवाद ज्या पद्धतीने चाललेला आहे, त्याला जर सडेतोडपणे कुठले उत्तर असेल किंवा त्याच्यावरील रामबाण मात्रा कोणती असेल तर तो आहे आंबेडकरी विचार. समता-बंधुता-न्याय-शिक्षणाची कास धरणं, समाजाला जागृत करणं, साक्षर करणं, सुशिक्षित करणं, त्याला त्याचे हक्क-कर्तव्याची जाणून करून देणं, या सगळ्या गोष्टीची आज खर्या अर्थाने गरज आहे. कारण काही लोक ठरवून समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा जो स्वार्थ आहे, तो लोकांच्या लक्षात आणून द्यायचे काम आपल्याला करायचे आहे. आपल्याला फार काही करायची गरज नाही; फक्त दूध का दूध – पाणी का पाणी त्यांना सांगायचं. आता लेखक जर म्हटलं तर आपल्याला त्यांचे हेतूपण कळतात. आपल्याला त्यांचे हेतू लोकांपर्यंत पोचवता आले पाहिजेत. ते पोचवणं खूप गरजेची गोष्ट आहे; आणि हे फक्त आंबेडकरी विचारच करू शकतो. तिथे निर्भयता आहे, नीडरता आहे, तिथं क्रांतीची धमक आहे, तिथे अगोदर बदल घडलेला आहे. त्यामुळे अजूनही तो घडू शकतो. हे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करणं खूप गरजेची गोष्ट आहे, फार मशागत घेण्याची गरज नाही पडणार. कारण अगोदरच पेरणी झालेली आहे; फक्त त्याला आता जरासं खाली-वर करायचं असतं. आमच्या शेतकर्याच्या भाषेत खुरपणी करताना तण जरी नसलं तरी खुरप्यानं माती खाली-वर करावी लागते, म्हणजे खुरप्याचं पाणी आणि सोन्याची पाणी हे पिकाला खूप पोषक असतं. अगदी तसंच खूप पूर्वीचेच पेरणी झालेली आहे, फक्त आता नव्या पिढीला त्याची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. ते गुमराह झाले नाही पाहिजेत. त्यांच्यासाठी लेखक असो किंवा कलावंत, त्यांनी बोललं पाहिजे. त्यांनी बोलण्याची गरज आहे. ते जर बोलले तर लोक मनावर घेतात; खासकरून आपल्याला जे कावेबाज आहेत, त्यांचे कावे लोकांच्या नजरेस आणून देणं खूप गरजेचं आहे.
प्रश्न :- पुढील काही नवे संकल्प?
राजकुमार तांगडे :- अजून खूप काही काम करायचे आहे. खरं तर नवीन काम करायची गरज नाही. पूर्वीच्याच लोकांची एवढी कामं आहेत, ती जरी लोकांपर्यंत पोचली तरी लोक खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतील. थोरा-मोठ्यांचे विचार आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. वंचितांचा आवाज आपल्या लेखणीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही प्रोजेक्ट आहेत हातामध्ये. सध्याची कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर परत नव्याने बाहेर पडावं लागेल, काहीतरी करावे लागेल. नवे संकल्प तर आहेतच आणि या संकल्पपूर्तीसाठी आपल्या सर्वांची साथ कलावंताला हवी असते, ती सुद्धा मिळेल. कोरोनाच्या या महामारीवर आपण लवकरच विजय मिळवणार आहोत. नवे संकल्प-नव्या वाटा या आपल्याला नेहमीच चालायच्या असतात. नवे संकल्प नेहमीच करायचे असतात, निश्चितच चांगलं काहीतरी घेऊन; पण तेही समाजाच्या उपयोगाचं, जे समाजाला समृद्धीकडे घेऊन जाईल, असं काहीतरी नवं घेऊन येण्याचा प्रयत्न एक कलावंत म्हणून आम्ही निश्चित करणार आहोत.
राजकुमार तांगडे
संपर्क : 9763879284
मुलाखत आणि शब्दांकन : नरेंद्र लांजेवार
संपर्क : 9422180451