निलम माणगावे -
‘आम्ही जांभळीकर…’ जांभळी गावातल्या खूप सार्या स्त्री-पुरुषांना स्वत:चाच अभिमान वाटत होता की, आपण ‘हे करू शकलो.’ ‘हे’ म्हणजे काय? तर… सगळं जग जेव्हा कोरोनाच्या विळख्यात सापडून हैराण झालं होतं, त्या दोन वर्षांच्या काळात जांभळी गावानं (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) मोठं सकारात्मक पाऊल उचलून त्यांनी माळरानावर लोकसहभागातून हजारो झाडांचे नंदनवन उभे केले.
‘आम्ही जांभळीकर’ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. माणगाव, हेरवाडच्या पावलावर पाऊल टाकून विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. पण त्याआधीच गावातील काही महिलांनी विधवा प्रथा संपविण्याचा विडा उचलला आहे. उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, सदस्य राधिका यादव यांचा सहभाग मोलाचा आहे. या महिलांनी यावर्षी वटपौर्णिमेनिमित्त विधवा महिलांच्या हस्ते वड लावण्याचा आणि वडाची पूजा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका कार्यक्रमाचे नियोजन केले. मला तिथे जायची संधी मिळाली. मी गेले.
वटपौर्णिमा… वडपूजा वगैरे न मानणारी मी, मनात प्रश्न आला… अशा कार्यक्रमाला जाणं कितपत बरोबर आहे? विधवांच्या हस्ते वटसावित्री साजरा करण्याचा निर्णय कितीही महत्त्वाचा असला, तरी वडाची पूजा करून वटसावित्रीच्या व्रताला… त्या परंपरेला प्रोत्साहन देणं कितपत बरोबर आहे? तरी मी गेले, ते एवढ्यासाठी की… मला पाहुणे म्हणून बोलावल्याने काही बोलता येईल, सांगता येईल, त्यांचं ऐकता येईल. विधवांना अशा पूजेचा मान दिल्याबद्दल कौतुक करून त्यांचे अभिनंदन करता येईल. विधवा सन्मानाला प्रोत्साहन देता येईल आणि मुख्य म्हणजे सर्वच महिलांसमोर सत्यवानाची सावित्री आणि जोतिबांची सावित्री यांची तुलना करून, कुणाच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला जायचे आहे, याचा मार्ग समोर ठेवता येईल. संविधानाने दिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या हक्कांविषयी बोलता-बोलता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तोच पती सात जन्मी मिळण्यातला फोलपणा सांगता येईल. नवर्याच्या आरोग्यासाठी वडपूजा नव्हे, तर त्याची व्यसनं सोडवायला हवीत. वड पुजण्यापेक्षा वड लावणे किती चांगले… वगैरे-वगैरे सांगता येईल म्हणून मी गेले. जयसिंगपूरच्या नगरसेविका अॅड. सोनाली मगदूमही आल्या होत्या. वडाचे रोप लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम छान झाला. स्त्रियांच्या मनात सावित्रीबाई फुले ठसविण्यात बर्यापैकी यश आल्याचं त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येत होतं. सगळ्या छान नटून-थटून आल्या होत्या. दृश्यात्मक विधवा कुणीच दिसत नव्हतं. बघायला छान वाटत होतं. काही महिला बोलल्या, काहींना बोलता येत नव्हतं. अश्रू अनावर झाल्याने शब्द फुटत नव्हते. एक वयोवृद्ध दृश्यात्मक विधवा आजी म्हणाल्या, ‘बरं झालं बघा, हे सगळं बघून लै आनंद वाटला. विधवा बायका नटल्याचं… कुंकू लावल्याचं… हातभर काकणं घाटल्याचं… नाकात नथ घाटल्याचं बघून चांगलं वाटलं. का न्हाई नटायचं विधवा बायकांनी?” त्यांनी विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा होता… ‘आपलं नटणं प्रथा-परंपरेनं, समाजानं हिसकावून घेतल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे… कॉम्रेड नारायण गायकवाड या ज्येष्ठांनी एक वही माझ्यासमोर उघडून दाखवली. त्यामध्ये काही पुरुषांची नावे होती. ते म्हणाले, “हे बघा मॅडम, गावातले हे 52 तरुण दारूडे आहेत. पैकी 12 मेले. बाकीचे त्याच रस्त्याने जाणार.” हाच मुद्दा घेऊन मी महिलांना विचारले, “त्यांच्या बायकांनीही हाच नवरा सात जन्मी मिळू दे म्हणून वड पुजायचा का?” एक बाई हसत म्हणाली, “व्हय! ह्यो त्याचा सातवा जन्म असू दे म्हणून वड पुजायचा.” सगळेच हसले. व्याख्यानबाजी न होता संवादातून विचारांचे आदान-प्रदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. वटपूजेची वाढलेली पुटं सैल पडत गेलेली जाणवली. यापेक्षा आणखी काय हवे?
लेखिका संपर्क – 94212 00421