अनिल चव्हाण -
दंगल नव्हे, हल्ले!
दिनांक सहा व सात जून रोजी कोल्हापुरात मुस्लिमांच्या विरोधात धार्मिक हिंसाचाराचा प्रयत्न झाला. तोडफोड, मालमत्तेचे नुकसान, दगडफेक असे त्याचे स्वरूप होते! या हल्ल्यांना काही जणांनी दंगल असे संबोधले. दंगल करण्यासाठी दोन बाजू असाव्या लागतात. एका जमावाने लाठ्या काठ्या सळ्या आणि दगड विटा घेऊन हल्ला केला असेल तर त्याला दंगल म्हणता येत नाही. हल्ल्यांना मुस्लिमानी प्रत्यत्तर न दिल्यामुळे दंगलीचे स्वरूप येऊ शकले नाही. या संदर्भातील माझी काही निरीक्षणे….
हल्ल्याचे कारण
दोन तरुणांनी व्हॉट्सअप ग्रुपवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवला आणि मेसेज व्हायरल केला. लगेच शहरात तीन ठिकाणी दगडफेक झाली. आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू केली. पण हिंदुत्ववादी संघटनांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आले. इथेही आक्षेपार्ह मजकूर दाखवून एका तरुणाला ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले; मात्र जमावाने लक्ष्मीपुरी बाजारपेठेत दगडफेक केली. फळांच्या गाड्यांचे नुकसान केले. एका प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. तीन-चार जणांना मारहाण केली. मुस्लीम बोर्डिंगवर दगडफेक केली.
मुस्लीम बोर्डिंग
मुस्लीम बोर्डिंगची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. स्वतः महाराज संस्थेचे अध्यक्ष झाले. आजही मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्षपद सध्याच्या छत्रपती शाहू महाराजांकडे आहे. या बोर्डिंगमध्ये सर्व धर्माच्या युवकांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याची सोय सध्या करण्यात आली आहे. दगडफेक झाली तेव्हा सर्व धर्माचे युवक बोर्डिंगमध्ये अभ्यास करत होते.
सिद्धार्थनगर कमानी जवळील मटण दुकानावर दगड फेकण्यात आले. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार; देशात भाजपचे सरकार; तरीही हिंदुत्ववाद्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय, तर सामान्य लोकांच्या प्रश्नांचे काय होत असेल?
हिंदुत्ववादी संघटनांनी दिनांक सात जून रोजी बंदची हाक दिली आणि कोल्हापूरकरांनी दुकाने बंद ठेवणे हिताचे मानले.
बंदचा दिवस
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांचे हजार दीड हजार कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात जमा झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जमाव गटागटांनी विखुरला. शहराच्या विविध भागात घुसला. पोलिसांनी बेदम लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला. हल्लेखोरांनी दगडफेक सुरू केली.
आर्थिक नुकसान
हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने इंटरनेट सुविधा बंद केली. शासकीय कामकाज, खाजगी कॉर्पोरेट कार्यालये, बँकिंग, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन व्यवहार, शेअर मार्केट, व्यापार, व्यवसाय, फोन पे पेटीएम, गुगल पे असे सर्व बंद पडले. लाखोंची उलाढाल थांबली. पंधरा हजार कर्मचारी बसून राहिले. आयटी क्षेत्राचे दहा कोटींचे नुकसान झाले. हल्लेखोरानी मुस्लिमांची घरे, टपर्या, हातगाड्या, रिक्षा, टू व्हीलर, चिकन, मटणाची दुकाने यावर हल्ले केले. आणि कोट्यवधींच्या संपत्तीची नासधूस केली. तोडफोडीत ३० रिक्षा, १० कार, ४० दुकाने, १८ दुचाकी, चिकनच्या दोन गाड्या, चहाची एक गाडी, फळांच्या आठ गाड्या यांचे नुकसान झाले. हातावर पोट असणार्यांचे रोजी रोटीचे साधन हल्लेखोरांनी हिरावून घेतले. पण हे कष्टकरी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहताना दिसत होते. आपले काम हाच त्यांचा धर्म असतो याची प्रत्यंतर आले.
शालेय सुट्ट्यांचा हंगाम संपत येत असताना पर्यटकांचा ओघ कोल्हापुरात सुरू होता. बहुतांशी पर्यटक कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुणे, मुंबई मराठवाडा इकडून आले होते. यात नवदाम्पत्येही होती. पण दगडफेक, पोलिसांची धावपळ, बंद होणारी दुकाने यामुळे पर्यटकांनी शीर सलामत तो दर्शन पचास म्हणत बाहेरचा रस्ता धरला. पर्यटन स्थळ म्हणून कोल्हापूरचा विकास होत असताना असे दहशतीचे, दंगलीचे वातावरण असणे योग्य होईल?
हिंदुत्ववादी संघटनांचा दावा
राज्यात कुठेही धार्मिक दंगली घडल्या तरी कोल्हापूर गुण्यागोविंदाने राहत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून सलोख्याला तडा गेला. कडवी धार्मिकता, सोशल मीडियातून राष्ट्रपुरुषांचा अपमान आणि देवी-देवतांवरील केलेल्या टिप्पणी, याला कारणीभूत आहेत. कसबा बावडा येथे शिवजयंती वेळी झालेला वाद, विशाळगडावरील अतिक्रमणे, हुपरी-रेंदाळ -शिरोळ येथील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज, तसेच पन्हाळगडावरील तुरबतीचा मुद्दा, अशा सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने दोषींवर कारवाया केल्या नाहीत, त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष उफाळून आल्याचा संघटनांचा दावा आहे. (लोकमत १४ जून)
म्हणजे कार्यकर्ते त्यांचेच, सरकार त्यांचेच, पोलीस आणि गृहमंत्री त्यांचेच, आपसातील दिरंगाईमुळे असंतोष उफाळला तर दगडफेक मात्र मुस्लिमांवर. हा प्रकार काय आहे?
पोलीस कारवाई
हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान जमावाने दगडफेक करून दंगल माजवल्यानंतर, पोलिसांनी सुमारे ४०० संशयितांवर गुन्हे दाखल केले. छत्तीस जणांना अटक केली. विशेष म्हणजे बंदची हाक देणारे आणि दंगल घडवणार्या एकाचाही यात समावेश नाही. त्यामुळे खरे सूत्रधार नामानिराळेच राहिले असून दंगलीचे परिणाम काही हुल्लडबाज तरुण आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या संशयितांमध्ये सर्वच मुले बहुजनांची आहेत. हे १८ ते २५ वयोगटातील तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण बारावी ते पदवीपर्यंत झाले आहे. या तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे.
पुरोगाम्यांचा द्वेष
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर हे पुरोगामी शहर नसून ते हिंदुत्ववादी आहे हे ठसवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. अशा पोस्टही हल्लेखोर पसरवत होते.
मुस्लिमांची दुकाने त्यांच्या नावावरून ओळखली गेली, काही ठिकाणी हातगाड्या रंगावरून ओळखल्या गेल्या, तर एका गल्लीत हिंदू धर्मीयांच्या घरावर आधीच भगवे झेंडे लावून ठेवण्यात आले होते. बाकीच्या घरांवर दगडफेक करण्यात आली.
अनभिज्ञ प्रशासन
कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय सलोखा बिघडत चालल्याची जाणीव काही नेते व कार्यकर्त्यांना होत होती. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी एक-दोन महिन्यात कोल्हापुरात जातीय दंगल घडवली जाण्याची शक्यता वर्तवली होती. काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी पोलीसप्रमुख आणि जिल्हाधिकार्यांना यासंबंधी लेखी पत्र दिले होते.
काही संघटनांचे पदाधिकारी कोल्हापूर शहरालगतच्या खेड्यात बैठका घेत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही? सहा तारखेस मंगळवारी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची संख्या पाहता बुधवारी सात तारखेस संख्या वाढणार हे कळूनही त्यावर पोलीस खात्याने कोणता उपाय केला? प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या सलोखा बैठकीत मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी बोलावण्यात आले. व्यासपीठावरही बहुसंख्येने तेच बसले होते.
काही प्रतिक्रिया
दंगलीत नेमके लोक कोण होते? त्यांच्याकडे एवढे दगड, विटा. काचेच्या बाटल्यांचा साठा कसा होता? याची चौकशी व्हावी. प्रक्षोभक भाषणे करून जमावाला हिंसक बनवणार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारतीय लोक आंदोलनाने केली.
सामान्यांच्या प्रतिक्रिया
आमच्या गल्लीत घराच्या मागे काही मुस्लीम कुटुंबे राहतात. आमचे त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यापैकी एका घरी बोरिंग मारले आहे. नळाला पाणी येत नाही तेव्हा ते सगळ्या गल्लीला पाणी पुरवतात. लाख मराठा मोर्चातही गल्लीतल्या मुस्लिमांनी मोर्चेकर्यांना प्रेमाने पाण्याच्या बाटल्या पुरवल्यात. पण हल्लेखोर दगडफेक करू लागले तेव्हा आम्ही त्यांना अडवू शकलो नाही. त्यांच्या हातात दगड, लोखंडी सळ्या आणि लाठ्या होत्या. ते काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पोलीस गाडी आल्यावर मात्र ते पळून गेले, अशी प्रतिक्रिया उत्तरेश्वर पेठेतील एक नागरिक सतीश सावंत यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात बहुतेक नागरिकांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत.
जिल्हाधिकारी निवेदन
आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना लव्ह जिहाद बद्दल प्रश्न केला. कोल्हापूर जिल्ह्यात किती प्रकरणे घडली आहेत? याचे उत्तर “माहिती उपलब्ध नाही” असे मिळाले.
खोटे व्हिडिओ
आशिष शेलार यांनी न्यूज चॅनेलवर दाखवलेला एक व्हिडिओ बरेच दिवस व्हॉट्सअप वर फिरत होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण बीजेपीच्या ध्वजावर गाय कापत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्याबरोबर २०२३ साली घडलेली घटना, असे तिचे वर्णन करण्यात आले. पण इ टीव्ही ने त्या मागील सत्य जाहीर केले. हा व्हिडिओ कर्नाटकचा नसून २०२२ सालचा मणिपूरचा आणि बीजेपीचा आहे. अशा तर्हेचे खोटे व्हिडिओ फिरवून तरुणांची माथी भडकवण्यात आली.
शाहू महाराजांचे संस्कार
राजर्षी शाहू महाराज सत्तेवर आले त्या वेळी ब्रिटिशांच्या मदतीने हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू होते. १८९३ साली मुंबईत दंगा झाला. महाराज १८९४ साली गादीवर आले. त्यांनी सुरुवातीपासूनच रयतेच्या सर्व विभागांना सोबत घेण्याचे धोरण आखले. बहुजन समाजातील भास्करराव जाधव, केशवराव विचारे अशा गुणवान तरुणांना शासकीय नोकरीत सामावून घेतले. पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी सोनतळी कॅम्पजवळ त्यांची वसाहत उभारली. त्यांना संरक्षणाची काम दिले. दलितांना आपल्यासोबत घेऊन पंक्तीत बसवले. प्रत्येक जाती-धर्मासाठी २३ वसतिगृहे कोल्हापुरात उभारण्यात आली. सर्वांना उत्पन्नाची साधने जोडून दिली. वसतिगृहाचे प्रशासन त्या त्या जाती-धर्माच्या पुढार्यांच्या हाती दिले. अपवाद मुस्लीम बोर्डिंगचा. मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्षपद स्वतः महाराजांनी घेतले. शैक्षणिक कामासाठी त्यांनाही मुस्लीम देवस्थानांचे उत्पन्न नेमून दिले. राधानगरी गाव वसवले तेव्हा दोन मंदिरांबरोबर एक मशीद बांधली आणि प्रत्येकाला त्यांच्या धर्माच्या पद्धतीने उपासना करण्याची संधी दिली. मंदिर आणि मशिदीत फरक केला नाही. कोल्हापुरात गणेशोत्सव आणि मोहरम हिंदू-मुस्लीम एकत्र साजरे करतात. त्या काळी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण नव्हते. महाराजांनी अशा विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. स्वतः शंभर आंतरजातीय विवाह लावण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या हयातीत एक विवाह त्यांनी लावलेला आहे. त्यानंतर आजही कोल्हापुरात अनेक आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेली जोडपी सुखाने आणि आनंदाने जगत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि भारतीय महिला फेडरेशन यांच्यावतीने कोल्हापुरात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र काम करते. त्यांनीही असे अनेक विवाह लावलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत.
कोल्हापूर शाहूंचेच
कोल्हापूरमध्ये हिंदू, मुस्लीम, लिंगायत, ख्रिश्चन, पारशी इत्यादी धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आहे. ते तसेच टिकवण्याचा विडा पुरोगाम्यांनी उचलला आहे. मुस्लिमांनी सहनशीलता दाखवली हे पहिले पाऊल होते. आता सलोखा परिषदा घेऊन त्याला दुसर्या पावलांनी प्रतिसाद दिला जात आहे. कोल्हापूर हे शाहूंचेच राहणार हे नकी.
लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३
पानसरे आणि एनडी
कोल्हापुरातील पुरोगाम्यांनी या वेळी पानसरे आणि एनडी हवे होते असे म्हणत त्यांनी सामाजिक सलोख्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुस्लीम समाजाची भूमिका या वेळी फारच समंजस होती. हिंसाचाराला त्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हल्लेखोरांचे दंगल घडवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. कोल्हापूरच्या सर्वच जनतेने सुज्ञपणाची भूमिका घेतली.
सर्व पातळीवर प्रयत्न करूनही हल्लेखोरांना जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. राजर्षी शाहू महाराजांचे विचार कोल्हापुरात खोलवर रुजले असल्याचे या वेळी प्रत्यंतर आले.
–अनिल चव्हाण