विनायक सावळे - 9403259226
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या लॉकडाऊन काळामध्ये दि. 1 ते 9 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र अंनिस संघटनात्मक फलश्रुती लोकांपर्यंत पोचण्यासाठी ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली. त्यात ‘महाराष्ट्र अंनिस’ने गेल्या 31 वर्षाच्या कार्यकाळात मिळविलेल्या विशेष उपलब्धी समाजासमोर मांडण्याचा उद्देश ठरविण्यात आला आणि त्यानुसार विविध ‘इमेज’ बनवून त्या विविध समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोेचविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेला समाजाकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. विशेष म्हणजे या सर्व ‘इमेज’ हिंदी आणि इंग्रजीतूनही भाषांतरित करून देशभर नेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अनेक ठिकाणी फोन करून, मेसेज करून ‘इमेज’ मागवण्यात आल्या. त्या ‘इमेज’मधील आशयाचे कौतुक करण्यात आले. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्यांनी संघटनेची उपलब्धी ‘स्टेटस’ला ठेवत, फेसबुकला ‘पोस्ट’ करून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोेचवण्यात मदत केली आहे. संघटनेने 31 वर्षांत विचार, कृती, धोरण, दृष्टिकोन या अनेक क्षेत्रांत लक्षणीय काम केले आहे. त्या सगळ्या कामांची माहिती ‘इमेज’द्वारे लोकांपर्यंत पोचवण्यात आली आहे.
ऑनलाईन मोहिमेचा दुसरा टप्पा हा 10 ते 20 ऑगस्ट असा घेण्यात आला होता. या टप्प्यामध्ये शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू व संघटना म्हणून त्यांचे दृष्टिकोन समाजापुढे नेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे लेखक, संघटक, वक्ता, खेळाडू, आरोग्याचे भान जाणारा असे विविध पैलू ‘इमेज’द्वारे पुढे करण्यात आले. यानिमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समाजापुढे नेण्यात आपण यशस्वी झालो. या ‘इमेज’ला देखील लोकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. या मोहिमेला ‘विवेकावर आघात, वर्ष सात, कोणाचा हात?’ अशी ‘टॅगलाईन’ निश्चित करण्यात आली. अशा प्रकारे दि. 1 ते 9 ऑगस्ट हा पहिला टप्पा आणि दि. 10 ते 20 ऑगस्ट हा दुसरा टप्पा; या दोन टप्प्यांमध्ये आपण ऑनलाईन विचारप्रसाराची यशस्वी मोहीम राबवली. यात सहभागी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार! या ‘इमेज’ तयार करणेकामी कार्यकारी समिती सदस्य आणि कीर्तिवर्धन तायडे (नंदुरबार जिल्हा प्रधान सचिव) आणि सोशल मीडिया विभागाचे राज्य कार्यवाह, सहकार्यवाह यांचे योगदान लाभलेे. तसेच भाषांतरासाठी उत्तम जोगदंड (कल्याण) आणि परेश काठे (ठाणे) यांनी योगदान दिले.