-
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरामध्ये चुंबकत्व आले आणि शरीरावर वस्तू चिकटायला लागल्या, असा दावा करणारी चित्रफीत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होऊ लागली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांनीही कोणतीही शहानिशा न करता जणू काही हे काहीतरी गूढ आहे, अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करणे सुरू केले. गणपती दुग्धप्राशनाची अफवा सोशल मीडियाचे जाळे नसतानाही त्या वेळेस वेगाने पसरली होती. आता तर हे जाळे सर्वदूर पसरले असल्याने सार्या जगभर ही बातमी पसरली आणि नाशिकचे सोनार एकदम जगप्रसिद्ध झाले. पण डोके शाबूत असणार्यांनी हा काही शरीरात चुंबकत्व निर्माण होण्याचा किंवा कोणतीही गूढ, अमानवी शक्ती निर्माण होऊन झालेला चमत्कार वगैरे नाही; तसेच वस्तू शरीराला चिकटण्याचा आणि लस घेण्याचाही काहीही संबंध नाही, हे सप्रयोग सिद्ध करून दाखवल्यावर चमत्काराची हवा निघून गेली, तरी त्यावर नंतरही काही दिवस चर्चा सुरूच राहिली. याच अंकात आम्ही प्रा. आर्डे यांचा या सगळ्या प्रकरणामागचा वैज्ञानिक तपशील देणारा लेख देत आहोत.
पण ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानात इतकी प्रगती होऊनही सर्वसामान्य जनतेला एखाद्या चिल्लर घटनेला गूढ, अमानवी, दैवी, धार्मिक रूप देण्याची गरज का भासते, याचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत चमत्कारांना विशिष्ट अर्थ असतो. त्यामागे गूढ, दैवी, धार्मिक वलय असते. लहानपणापासून आपण चमत्कार होतात, ते करणार्याकडे दैवी, अमानवी शक्ती असते, ती आपल्याला संकटात, समस्यांत मदत करेल, या भवसागरातून तारून नेईल, अशा संस्कारांत वाढलेले असतो. ज्या पुराणकथा, दंतकथांनी आपले विश्व व्यापलेले असते, त्यात माणसाला प्रचंड दु:खी संकटांतून वाचवणार्या अनेक अतर्क्य गोष्टी करणारे ‘नायक’ असतात, ज्यांच्या भोवती दैवी, धार्मिक वलय असते. त्यामुळे जेव्हा सर्वसामान्य माणसाची भौतिक कोंडी असह्य बनते; विज्ञानाची साधने, सुविधा त्याच्या आवाक्याबाहेरची बनतात, तेव्हा त्याची दृष्टी मग अशा चमत्कारांकडे लागते आणि अशा चिल्लर घटनांना चमत्काराचे स्वरूप प्राप्त होते. मग ज्यांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ‘हितसंबंध’ अशा चमत्कारांच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतात, ते या आगीत तेलच ओततात.
असाच तेल ओतण्याचा प्रकार इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षापासून ज्योतिष अभ्यासक्रम सुरू करून केला आहे. ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्मविज्ञान आहे. ग्रह-गोल-तार्यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ म्हणतात आणि खगोलशास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह-गोल-तार्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे. तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’ने केली आहे.
2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी शासनाने देखील अशा स्वरुपाचा निर्णय घेतला होता. तो मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला होता. डॉ. जयंत नारळीकर यांच्यापासून अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. जगप्रसिद्ध जादूगार आणि अनेक चमत्कारांचा भांडाफोड करणारे जेम्स रॅन्डी यांनी, ज्योतिषांनी जगाच्या अंताविषयी केलेल्या 50 दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपणा सिद्ध केलेला आहे; तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेंकटरामन यांनीदेखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित होत असताना अशा स्वरुपाच्या अशास्त्रीय गोष्टींना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे; पण टाळ्या-थाळ्या वाजवणारे, दिवे पेटविणे, मंत्र-तंत्र, यज्ञयाग, गाय-गोमूत्र अशा अंधश्रद्धा वाढविणार्या मोहिमा आखणार्या आणि वाफारे घ्या, गरम पाणी, काढे प्या अशा उपायांचा प्रसार करणार्यांकडून काय अपेक्षा करणार? त्यामुळे ‘अंनिस’सारख्या विवेकवादी संघटनांनाच संपूर्ण वैज्ञानिक जगताला साथीला घेत समाजाच्या विज्ञानवादी मानसिकतेच्या मजबुतीसाठी संघर्ष करावा लागणार आहे.