-
२० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर चार प्रमुख उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २० ऑगस्टच्या या उपक्रमांबाबत आपापल्या शाखेच्या वतीने त्या उपक्रमांचे नियोजन करावे असे संघटनेने सर्व शाखांना आवाहन केले होते. हे उपक्रम पुढीलप्रमाणे होते –
१) ‘शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा विचार घरोघरी’ अभियान (डॉ. दाभोलकरांच्या नव्या १५ पुस्तकांचा लोकार्पण सोहळा)
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून त्यांचा विचार संपवावा म्हणून करण्यात आला’, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. पण आपण कार्यकर्ते डॉक्टरांचा विचार संपवू देणार नाही. त्यासाठी आपल्याला ‘नरेंद्र दाभोलकर यांचा विचार घरोघरी’ हे अभियानांतर्गत डॉ. दाभोलकरांच्या विचारांच्या १५ पुस्तिका आपल्याला घरोघरी पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्व शाखांनी यावर्षी आयोजित करावा. आपल्या गावातील मान्यवर व्यक्तींच्या/कार्यकर्त्यांच्या हस्ते आपल्या मिटींग मध्ये लोकार्पण करावे किंवा त्याचा स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. त्यामध्ये या १५ पुस्तकांविषयी आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलावे. या दिवशी किमान आपल्या शाखेकडून पुस्तकांचे १० संच विक्री होतील याचे नियोजन करावे.
२) वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करणे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आपण या विषयावर शाळा, कॉलेजेस मध्ये व्याख्यान, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आयोजित कराव्यात.
३) पोलीस स्टेशनला निवेदन
प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणेबाबत पोलीस महासंचालकांनी नुकतेच एक पत्र काढले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी म्हणून आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला, जिल्हा पोलीसप्रमुखांना शाखेतील ८-१० कार्यकर्त्यांनी जाऊन निवेदन द्यावे.
४) खासदारांना निवेदन
देशभरात जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून आपल्या जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देणे. मागील महिन्यात भारताच्या संसदेमध्ये महाराष्ट्रासारखा जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून चर्चा झाली. त्यानिमित्ताने आपल्या भागातील खासदारांना हा कायदा व्हावा म्हणून आपण संसदेत मागणी करावी, पंतप्रधानांना पत्र लिहावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आपण प्रत्यक्ष खासदारांची भेट घेऊन द्यावे.
तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यामध्ये सीबीआयने हायकोर्टामध्ये तातडीने अपील दाखल करावे अशी केंद्र सरकारकडे मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांचेकडे द्यावे असेही आवाहन संघटनेकडून करण्यात आले होते.
त्यानुसार राज्यातील अनेक शाखांनी संघटनेच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत हे सर्व उपक्रम २० ऑगस्टला पार पाडलेच, पण त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे मॉर्निंग वॉक, अभिवादन सभा, प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम २० ऑगस्टला राज्यभर करत डॉ. दाभोलकरांच्या स्मृती जागवत त्यांच्या विचारांचा जागर केला. त्या ठिकठिकाणच्या कार्यक्रमांचे वार्तांकन अंनिवाच्या वाचकांसाठी…
इस्लामपूर (सांगली)
‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मालिकेतील आज प्रकाशित झालेल्या १५ पुस्तकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घरोघरी पोहोचेल. – सरोजमाई पाटील
नरेंद्र दाभोलकर लिखित १५ पुस्तकांच्या लोकार्पण समारंभात प्रमुख पाहुण्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष मा. सरोजमाई पाटील म्हणाल्या, “समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा दिला. जादूटोणाविरोधी कायदा करण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. आज दाभोलकर आपल्यात नसले तरी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. दाभोलकरांचे विचार घरोघरी या मालिकेतील आज प्रकाशित झालेल्या १५ पुस्तकाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घरोघरी पोहोचेल असा विश्वास मला वाटतो.
इस्लामपूर शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने यांचेही या प्रसंगी भाषण झाले. सांगली जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष दीपक कोठावळे, इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष ढगे, प्रा. सचिन गरुड, डॉ. राजेश दांडगे, घनश्याम कांबळे व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. शशिकांत बामणे, संतोष खडसे, संदेश जिरगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. चंद्रकांत भारसकळे यांनी आभार मानले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर यांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली.
इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांची भेट घेऊन केली.
या वेळी अंनिसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक कोठावळे, इस्लामपूर शाखा अध्यक्ष प्राचार्य सुभाष ढगे, कॉ. धनाजी गुरव, इस्लामपूर शाखा कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने, सचिव राजेश दांडगे, प्रा. सचिन गरुड, संतोष खडसे, चंद्रकांत भारसकळे, शशिकांत बामणे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली
डॉ. दाभोलकरांची ही पंधरा पुस्तके महिलांच्या पायातील अंध रूढीच्या बेड्या तोडायला मदत करतील – नीलम माणगावे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण अजूनही आपला समाज अंधश्रद्धेच्या बेड्या तोडायला तयार नाही. आजही बहुतांश महिला या कर्मकांडात गुंतल्या गेल्या आहेत. आज प्रकाशित झालेली डॉ. दाभोलकरांची ही पंधरा पुस्तके महिलांच्या पायातील अंध रूढीच्या बेड्या तोडायला मदत करतील. दाभोलकरांची ही पुस्तके म्हणजे ज्ञानाच्या खिडक्या आहेत. ही पुस्तके आपल्याला विज्ञान मार्ग दाखवतील असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका नीलम माणगावे यांनी केले.
त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १५ पुस्तिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
लेखिका नीलम माणगावे, डॉ. शैलबाला पाटील, नामदेव माळी आणि विद्यार्थिनींच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तकांचे लोकार्पण राजमती कन्या महाविद्यालय विश्रामबाग, सांगली येथे सकाळी दहा वाजता पार पडले.
अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला आहे असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांचा विचार संपवू न देण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘नरेंद्र दाभोलकरांचा विचार घरोघरी’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत डॉ. दाभोलकरांच्या या १५ पुस्तिकांची निर्मिती केली आहे. डॉ. दाभोलकरांच्या या पुस्तिकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत त्यांच्या दीड लाख प्रती संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित झाल्या आहेत.
साहित्यिक आणि माजी शिक्षणाधिकारी नामदेव माळी म्हणाले की, आपण सर्व जण प्राणी म्हणून जन्माला येतो, पण आपल्याला जर माणूस बनायचे असेल तर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची पुस्तके वाचणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी अंधश्रद्धेच्या बेड्यांना गजरे न समजता त्या तोडण्यासाठी निर्भय बनले पाहिजे. मला लेखक म्हणून घडवण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध वैद्यक डॉ. शैलबाला पाटील म्हणाल्या की, आजकाल बाळ जन्मताच त्याच्या जन्मकुंडली सोबत त्याचा ‘घातवार’ ही काढला जातो. या घातवाराला कोणतीही शुभ कामे केली जात नाहीत. अशा नव्या अंधश्रद्धा पुढे येत आहेत. या नव्या अंधश्रद्धा झुगारण्याचे बळ डॉ. दाभोलकरांची ही पुस्तके आपणांस देतील. डॉ. शैलबाला यांनी मुलींना असे आवाहन केले की, इंटरनेटचा वापर रील बघण्यासाठी न करता, आपले ज्ञान वाढवण्यासाठी करा. इंटरनेटच्या माध्यमातून ज्या अंधश्रद्धा आपल्या माथी मारल्या जात आहेत त्यापासून दूर रहा.
प्राचार्य व्ही. बी. चौगुले यांनी स्वागत केले, राहुल थोरात यांनी प्रास्ताविक, आशा धनाले यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. सविता अकोळे यांनी आभार मानले. महाविद्यालयाच्या ‘विवेक वाहिनी’ विभागाने संयोजन केले.
या कार्यक्रमास डॉ. लताताई देशपांडे, डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे, धनश्री साळुंखे, विशाखा पाटील, गीता ठाकर, त्रिशला शहा, अमित ठाकर यांचेसह राजमती कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत पोलीस अधीक्षकांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविले आहे. पोलीस महासंचालकांच्या या परिपत्रकानुसार सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावेत अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद बोडखे यांची भेट घेऊन केली. य अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, फारुख गवंडी, जगदीश काबरे, सुनील भिंगे, नानासोा पिसे, आशा धनाले, त्रिशला शहा उपस्थित होते.
पुणे – विठ्ठल रामजी शिंदे पूल
सीबीआयने तातडीने अपील दाखल करणे आवश्यक –मुक्ता दाभोलकर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट रोजी एकत्र जमून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “साधारणपणे १०० दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने त्यांच्या मारेकर्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निर्दोष मुक्तता झालेल्या तीन आरोपींच्या विरोधात दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. मात्र सीबीआयने अजून अपील दाखल केलेले नसून, त्यांनी तातडीने अपील दाखल करणे आवश्यक आहे.” या प्रसंगी मिलिंद देशमुख व हमीद दाभोलकर यांनी असे सांगितले की, डॉ. दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी खासदारांना निवेदन देणार आहेत व राष्ट्रव्यापी जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करणार आहेत. हाथरसमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कृती कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तसेच पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी पोलीस स्टेशनला आज निवेदन देत आहेत.
या प्रसंगी नंदिनी जाधव, प्रवीण देशमुख, अण्णा कडलासकर, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, गणेश चिंचोले व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरुड – लातूर
व्याख्यान व चमत्कार सादरीकरण
मुरुड पोलीस स्टेशन येथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापनेबाबत पोलीस उपनिरीक्षक श्री. अशोक ऊजगरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मुरुड शाखेचे रवींद्र शेषाबाई तुकाराम सरवदे, जनार्धन वैजिनाथ गिरे, रमेश माने हे उपस्थित होते.
त्याआधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनी विविध उपक्रम घेण्यात आले. सकाळी जि. प. कन्या शाळा कोंड, जि. प. प्रा. शा. कोंड येथे रक्षाबंधनानंतर विविध चमत्कारांचे सादरीकरण रमेश माने यांनी केले. दुपारच्या सत्रात महात्मा फुले विद्यालय, कोंड येथे व्याख्यान व चमत्कार सादरीकरण केले. त्या वेळेस त्यांनी अंनिसचे काम व अंनिसची पंचसूत्री व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान याची माहिती व्याख्यानात दिली. त्यानंतर चमत्कार सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे रमेश माने यांनी दिली. श्री. देशमुख यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी तिन्ही शाळेतील मिळून ७०० विद्यार्थी व ३५ शिक्षक उपस्थित होते.
वर्धा
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते डॉ.दाभोलकरांच्या पुस्तिकांचे प्रकाशन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन म्हणून २० ऑगस्ट २०२४ रोजी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने १५ पुस्तकांचा संच तयार करण्यात आला आहे. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम वर्धा जिल्हा महाराष्ट्र अंनिसने आयोजित केला. वर्धा सोशल फोरमचे तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष जोत्स्ना वासनिक, वर्धा तालुकाध्यक्ष प्रियदर्शना भेले, प्रीती गोटे, युवा विभाग प्रमुख राहुल खंडाळकर, वर्धा तालुका उपाध्यक्ष अनिल भोंगाडे, दशरथ गवळी, गणेश महाकाळकर, दिनेश भेले इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा
विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार व कोषाध्यक्ष म.सा.प., पुणे यांच्या हस्ते पुस्तिका प्रकाशन
महाराष्ट्र अंनिस सातारा जिल्हा आयोजित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या १५ पुस्तिकांच्या संचाचा प्रकाशन कार्यक्रम मा. विनोद कुलकर्णी (ज्येष्ठ पत्रकार व कोषाध्यक्ष म. सा. प., पुणे) यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे (सहसचिव, रयत शिक्षण संस्था) यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या वेळी मा. विनोद कुलकर्णी म्हणाले, “डॉक्टरांचा खून होऊन ११ वर्षे झाली. विचार संपवण्यासाठी त्यांचा खून केला, पण आज आपण ११ वा स्मृतिदिन करत आहोत, म्हणजे विचार संपलेले नाहीत! देशातील एकमेव सातारा नगरपालिका आहे जी समाजासाठी काम करणार्यांना डॉ. दाभोलकरांच्या नावाने पुरस्कार देते.”
डॉ. प्रसन्न दाभोलकर म्हणाले, “विवेक म्हणजे योग्य अयोग्य समजून घेणं. सावित्रीबाई फुले सांगतात, बुद्धी आणि ज्ञान यांची जोपासना करत नाही, तो माणूस नाही.”
प्राचार्य प्रा. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले, “सातारा जिल्ह्याचा प्रबोधनाचा वारसा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील तथा डॉ. दाभोलकरांपर्यंत देशाला दिशादर्शक आहे. त्याची जाण ठेवून युवा पिढीने हा विचार प्रचार आणि आचरण करणे गरजेचे आहे.”
उदय चव्हाण यांनी प्रास्ताविक, प्रा. मंडपे यांनी पुस्तक परिचय करून दिला. आबासाहेब उमप यांनी आभार मानले.
या वेळी प्रशांत पोतदार, वंदना माने, डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, हौसेराव धुमाळ, जयप्रकाश जाधव, दत्ता जाधव, शशिकांत सुतार, विजय पवार, रुपाली भोसले, योगिनी मगर, दशरथ रणदिवे हे अंनिस कार्यकर्ते व शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थिनी उपस्थित होते.
उल्हासनगर/अंबरनाथ (ठाणे)
पोलीस स्टेशनला निवेदन
पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असावा या उद्देशाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन (अंबरनाथ पूर्व), अंबरनाथ पोलीस स्टेशन (अंबरनाथ बदलापूर रोड, अंबरनाथ पश्चिम) तसेच उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यांत डॉ. शाम जाधव, अॅड. बबन सोनावणे, अशोक वानखेडे, बबन नागले, राजेंद्र कोळी, किशन वराडे, बबन सोनावणे व श्रीमती किरण जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आले व त्याच ठिकाणी दाभोलकरांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर शहीद दुलिचंद कॉलेज उल्हासनगर १ या ठिकाणी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रद्धा व अंधश्रद्धा, बुवाबाजी या विषयांवर विवेचन झाल्यानंतर मनोविकार तज्ज्ञ डॉ. भादलीकर यांचे मन, मनाचे आजार या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन लाभले. कॉलेजच्या वतीने डॉ. भादलीकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य इंगळे हे होते. प्रमुख पाहुणे वसयानी सर होते. उल्हासनगर शाखेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार मानण्यात आले. अंनिसचे ठाणे जिल्हाध्यक्ष डी. जे. वाघमारे उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बबन नागले सर यांनी केले.
बेलापूर, नेरूळ (नवी मुंबई)
अभिवादन सभेत डॉ.दाभोलकरांच्या विवेकी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर व नेरुळ शाखेच्या वतीने दिनांक २० ऑगस्ट रोजी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त कॉ. बी. टी. रणदिवे ग्रंथालय, आग्रोळी गाव बेलापूर येथे अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रकाशित केलेल्या डॉ. दाभोलकर लिखित १५ पुस्तिकांच्या संचाचे लोकार्पण मुंबई महानगरपालिकेच्या ‘नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ युनियन’च्या जनरल सेक्रेटरी त्रिशिला कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगतात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा वारसा व कार्य पुढे घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. राजीव देशपांडे, भास्कर पवार, रमेश साळुंखे, संजय उबाळे, रेखा देशपांडे, त्रिशिला कांबळे, अॅड. खरगे इत्यादी मान्यवरांनी डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले. विजय खरात यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि अखेर ‘हम होंगे कामयाब’ हे स्फूर्तिगीत घेत, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या,’ ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’ या घोषणा देत अभिवादन सभेचा समारोप करण्यात आला. सदर अभिवादन सभेला बेलापूर, नेरुळ, उलवे, खारघर, पनवेल येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
उपायुक्त कार्यालयात व वाशी येथील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अंनिसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
तासगाव (सांगली)
निर्भय मॉर्निंग वॉक, पोलिसांना निवेदन, महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन दिन
तासगाव पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्यात यावा या मागणीसाठी तासगाव अंनिसकडून मा. पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले, या वेळी या कायद्याची अंमलबजावणी करताना येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३’ कायद्याच्या अनुसूची आणि अंमलबजावणी यासाठी पोलीस प्रशिक्षण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावर मा. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी लवकरच या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
त्याचबरोबर तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व समविचारी पक्ष संघटना यांच्या वतीने दिवसभरात वेगवेगळे उपक्रम करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या खुनाच्या खटल्यातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहे. ज्या तरुण मुलांना दाभोलकर कोण होते, हे नीटसे माहीत नव्हते अशा मुलांना गुन्हेगारी कृत्य करायला लावणारे मुख्य सूत्रधार पकडले जावेत यासाठी प्रतीकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते सकाळी फिरायला गेल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. ‘तुम्ही माणूस मारू शकता, विचार मारू शकत नाही,’ हा संदेश देत निर्भयपणे सकाळी फिरायला बाहेर पडत तुम्ही शरीराने दाभोलकर मारले तर आम्ही विचाराने दाभोलकरांचे विचार पेरत राहू हा संदेश देत तासगावचे कार्यकर्ते सलग अकरा वर्षे अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करत आहेत. यावर्षी सुद्धा हे आंदोलन करण्यात आले.
२० ऑगस्ट हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाविद्यालयीन मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विक्रांत पाटील यांच्या व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले. तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अर्थसचिवपदी निवड झालेल्या प्रा. मिलिंद हुजरे सर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘डॉ. दाभोलकर विचार घरोघरी’ या अभियानांतर्गत १५ पुस्तिका माफक दरात उपलब्ध करून देताना, पुस्तकाच्या संचांचे प्रकाशन प्रा. मिलिंद हुजरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकांची ओळख अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी करून दिली. रोज नवनवीन डे साजरे होत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस मुलांना कळायला हवा म्हणून या दिवशी आपल्या महाविद्यालयात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मत अमर खोत यांनी मांडले.
स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमात प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. वासुदेव गुरव, भाई दिगंबर कांबळे, भाई अर्जुन थोरात, भाई पांडुरंग जाधव, भाई समीर कोळी, माजी अध्यक्ष सरपंच परिषद प्रदीप माने, मा. दत्तात्रय बामणे, डॉ. सतीश पवार, विशाल खाडे सर, माने सर, नूतन परीट, बागवडे मॅडम, ऋतुजा खोत, दत्तात्रय सपकाळ, अमर खोत तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
परभणी
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यामध्ये सीबीआयने हायकोर्टामध्ये तातडीने अपील दाखल करावे. जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणीच्या वतीने मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यामध्ये सीबीआयने हायकोर्टामध्ये तातडीने अपील दाखल करावे अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना अंनिसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेड
डॉ. दाभोलकरांचा वारसा पुढे चालविणे हे आपले कर्तव्य –डॉ. दिलीप चव्हाण
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावा यासाठी अंनिस नांदेडच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सारिका जावळीकर शिंदे, रवी देशमाने, इंजि. शंकरराव खरात, भगवान चंद्रे, दत्ता तुमवाड व सम्राट हटकर हे उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड व विल्स कोचिंग क्लासेस, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ या थीम अंतर्गत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित पंधरा पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर हे पेशाने डॉक्टर होते. चांगला चालणारा आपला दवाखाना बंद करून पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करू लागले. लोकांना शहाणं करू लागले. यासाठी त्यांनी मोठं संघटन उभं केलं. त्यांचं हे काम शोषण व्यवस्था आहे, तशी कायम राहावी असा विचार करणार्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येणार होत, अशा लोकांकडून त्यांचा खून करण्यात आला. माणूस मारला जातो, परंतु त्याचे विचार मारता येत नाहीत. त्यांच्यानंतरही त्यांनी सुरू केलेले काम जोमाने चालूच आहे. दाभोलकरांचा वारसा पुढे चालवणे हे आपले कर्तव्य आहे.” अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य सम्राट हटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. अजय गव्हाणे होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. विकास वाठोरे, प्रा. साईकिरण सलगरे, प्रा. महेश टेकाळे, अंनिस नांदेडचे कार्याध्यक्ष भगवान चंद्रे, सचिव रवी देशमाने, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह उषा गैनवाड, मानस मित्र विभाग कार्यवाह डॉ. सारिका शिंदे, विविध उपक्रम कार्यवाह कपिल वाठोरे यांचे सहकार्य लाभले.
भोकर (नांदेड)
पोलीस निरीक्षकांना निवेदन
भोकर तालुका अंनिसतर्फे पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ ठेवणेबाबत निवेदन पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड यांना सादर करण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष एल. ए. हिरे, सचिव दिलिप पोतरे, ज्येष्ठ पत्रकार बी. आर. पांचाळ, शिवाजी गायकवाड, उतम कसबे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नायगाव (नांदेड)
अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यासंबंधी निवेदन
अंनिस शाखा नायगावच्या वतीने पोलीस स्टेशन नायगाव येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष ह. स. खंडगावकर, प्रधान सचिव भा. ग. मोरे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर गड्डमवार आणि वैज्ञानिक जाणिवा सा. रा. जाधव उपस्थित होते.
सफाळे (पालघर)
पतसंस्थेच्या वार्षिक सभेच्या शेवटी डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकसंचाचा प्रकाशन सोहळा
सफाळे परिसर पतसंस्थेच्या वार्षिक सभेच्या शेवटी डॉ. दाभोलकरांच्या पुस्तकसंचाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील व ज्येष्ठ स्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास पोसम यांचे हस्ते पार पडला. शेकडो लोकांसमोर झालेल्या कार्यक्रमानंतर दहा पुस्तकांच्या संचांची विक्री जागेवरच झाली!
कोल्हापूर
निर्भय मॉर्निंग वॉक
सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून २० ऑगस्ट २०१३ रोजी केला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी या दिवशी विविध उपक्रम केले जातात! त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि समविचारी संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथील उभा मारुती चौकातून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. आठ वाजता मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली व तो उभा मारुती चौक – बिनखांबी गणेश मंदिर – सत्यशोधक दासराम चौक – साकोली कॉर्नर या मार्गाने पुन्हा उभा मारुती चौकामध्ये आला व तेथे समारोप केला गेला.
या मॉर्निंग वॉकमध्ये विलासराव पवार, अनिल चव्हाण, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, कॉ. चंद्रकांत यादव, प्रा. छाया पोवार, रवी चव्हाण, अॅड. अजित चव्हाण, शशांक चव्हाण इ. अंनिसचे व इतर समविचारी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पेण (रायगड)
शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
दि. २० ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून पाळला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि लोकांनी विवेकनिष्ठ व्हावे असा त्यामागे हेतू असतो. त्यानिमित्ताने, या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (शाखा पेण) तर्फे पेण तालुक्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘ख्वाडा,’ ‘बबन’ अशा अनेक हिट सिनेमाचे गीतकार, संवाद लेखक आणि अभिनेते प्रा. डॉ. विनायक पवार सर उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित पंधरा पुस्तकांचां संच प्रकाशित करण्यात आला. तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतून निबंधासाठी १२३, चित्रकलेसाठी ३५ आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी ३७ अशा १९५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी –
प्रथम क्रमांक : लक्षिता प्रभाकर पाटील, द्वितीय क्रमांक : श्रावणी शिंदे, तृतीय क्रमांक : सेजल मनोज पाटील.
चित्रकला स्पर्धेतील विजेते विद्यार्थी –
प्रथम क्रमांक : रिद्धी अजित ठाकूर, द्वितीय क्रमांक : रिद्धी सुनील मनोहर, तृतीय क्रमांक : चैतन्य मंगेश म्हात्रे
निबंध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी –
प्रथम क्रमांक : कार्तिकी विकास पाटील, द्वितीय क्रमांक: समिधा दीपक ठाकूर, तृतीय क्रमांक: आयुष धर्मेंद्र पाटील
या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके आणि शालोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आली. नितीन निकम, नंदकिशोर परब आणि सतीश पोरे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलं. सावनी गोडबोले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर जगदीश डंगर यांनी सूत्रसंचालन केले. संदेश गायकवाड यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांसह भूषण भोईर, प्रा. डॉ. अलंम शेख, एन. जे. पाटील, समितीचे अध्यक्ष नितीन निकम यांनी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप केले.
अंबाजोगाई (बीड)
निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून खुनाच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्याचे प्रशासनाला आवाहन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी ११ वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणात प्रत्यक्ष गोळी चालवणार्या आरोपींना शिक्षा झाली. परंतु खुनाचे षड्यंत्र रचणार्या, मदत करणार्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच पडद्यामागील मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करण्यात यंत्रणेने टाळाटाळ केली आहे, असा अभिप्राय मा. न्यायालयाने दिलेल्या निकालात नोंदवला आहे. याबाबत अंबाजोगाई शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या कार्यकर्त्यांकडून लोकशाही मार्गाने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ फेरीच्या माध्यमातून विवेकीपणाने व संवैधानिक मार्गाने आक्रोश व्यक्त करण्यात आला. निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून खुनाच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले. अंबाजोगाई व परिसरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना व चळवळीचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला, सर्वांनी शांततापूर्ण पद्धतीने यात सहभाग नोंदवला.
अंनिस व पुरोगामी संघटनांच्यावतीने तहसीलदार दीप्ती रिटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनातील सूत्रधार शोधा व त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा राष्ट्रीय पातळीवर करा, महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा, या मागण्यांचा समावेश आहे. या प्रसंगी प्रा. तानाजी चव्हाण, डॉ. गजेंद्र शिखरे, आदम पठाण, मारुती सावंत, मारुती शिरतोडे, रावसाहेब गोंदील, प्रा. रवींद्र येवले, नंदकुमार हत्तीकर, दीपक घाडगे, मंगेश जाधव, हिंदुराव पाटील, जयवंत मोहिते, व्ही. वाय. पाटील उपस्थित होते.
बारामती (पुणे)
मूक रॅलीचे आयोजन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बारामती शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त भिगवण चौक, इंदापूर चौक, गुणवडी चौकातून गांधी चौकामार्गे, पुन्हा भिगवण चौकापर्यंत हातात फलक घेऊन मूक रॅली काढण्यात आली. या वेळी शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्मारकानजीक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष रंगनाथ नेवसे, उपाध्यक्ष कृष्णा पगारे, कार्याथ्यक्ष विपुल पाटील, सचिव तुकाराम कांबळे, डॉ. ज्ञानदेव सरवदे, दादासाहेब कोळी, अप्पा हिंगसे उपस्थित होते.
गोंदिया
जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गोंदिया तर्फे गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ची स्थापना आणि दक्षता अधिकारी नियुक्ती बाबत मा. पोलीस अधीक्षक, मा. पोलीस उपअधीक्षक (गोंदिया), मा. पोलीस निरीक्षक गोंदिया शहर यांना निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा शाखेचे आयु. विनोद बनसोड (प्रधान सचिव), आयु. अनिल गोंडाने (कार्याध्यक्ष), आयु. अतुल सतदेवे (उपाध्यक्ष), डॉ. मनोजकुमार बनसोड, आयु. राजू रहांगडाले हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पलूस (सांगली)
दाभोलकरांच्या विचाराचा प्रसार हीच त्यांना आदरांजली– व्ही. वाय. पाटील
समाज बदलाच्या कार्यात सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान मोठे असते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर सत्यशोधक विज्ञाननिष्ठ विवेकी समाज घडवण्याचे काम निरपेक्षपणे, चिकाटीने केले. त्यांचे हे कार्य अंनिसचे कार्यकर्ते जोमाने पुढे नेत आहेत. खरे तर डॉ. दाभोलकरांच्या विचाराचा प्रसार करणे हीच त्यांना आदरांजली आहे, असे प्रतिपादन अंनिसचे जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. पाटील यांनी केले. नागराळे येथील ग्रामविकास वाचनालय व व्ही. वाय. पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व पलूस तालुका अंनिस शाखेने आयोजित ‘दाभोलकरांमुळे आम्ही घडलो’ या लेखसंग्रहाच्या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. उपस्थितांनी डॉ. दाभोलकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या प्रसंगी पोपटराव पाटील, बबन पाटील, पांडुरंग हजारे, राजेंद्र खराडे, पोपट रामचंद्र पाटील, गणपती विलास पाटील, दीपक पाटील, महमद सैदापुरे, बडे भैया, श्रीतेज पाटील, उत्तम हजारे, राहुल पाटील, बजरंग पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश राजाराम पाटील यांनी समारोप केला.
अहमदपूर (जि. लातूर)
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ वा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा
डॉ. दाभोलकर यांचा वारसा त्यांचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने पुढे घेऊन जात आहेत. यामध्ये सामान्य जनता व अज्ञानी लोकांचं खूप मोठं शोषण होत आहे. डॉक्टरांच्या हत्येनंतर झालेल्या कायद्यामुळे महाराष्ट्रामधील अनेक बुवाबाजी करणार्यांना कायद्याची चपराक बसलेली दिसून येत आहे, असे प्रतिपादन अहमदपूर अंनिस शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत बनसोडे यांनी केले.
या वेळी मेघराज गायकवाड, शेषेराव ससाणे, ईमरोज पटवेकर, मोहिब खदरी, भागवत येनगे, मोहमद नाझीम, शेख आयज, चंद्रशेखर भालेराव, प्रा. मारोती पाटील, डॉ. केशव मुंडे, राजद्रे कळसे, महेबूब शेख, शेख जीलनी, प्रा. शंकर गाडगे, संदीप गायकवाड, इलाही बागवान इत्यादी विविध सामाजिक चळवळींचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण (ठाणे)
सर्वधर्मीय मान्यवरांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांचे प्रकाशन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध कुठल्याही एका जाती, धर्माला नसून त्या जातीतील अनिष्ट रूढी, परंपरांच्या माध्यमातून होणार्या शोषणाला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील विविध विषयांच्या पुस्तिका प्रकाशनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस नोवेल साळवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याण मधील चर्चचे फादर सायमन डिसोजा आणि कल्याणच्या वक्फ बोर्डाचे सदस्य मेहमूद शेख यांच्या हस्ते या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
विविध धर्मांच्या लोकांनी एकत्र येत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या या पुस्तिकांचं प्रकाशन करणे, या कृतीने डॉ. दाभोलकरांच्या विचारांची व्याप्ती किती मोठी आहे याची प्रचिती येते, अशा भावना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त श्री. गणेश चिंचोले यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ एका जाती-धर्माच्या अनिष्ट रूढी, प्रथांना विरोध करत नाही तर सर्वच धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथांना विरोध करण्यासाठी त्या-त्या धर्मातील मान्यवरांना आपल्या समितीसोबत जोडून घेत प्रबोधनाच्या मार्गानेच परिवर्तन घडवित असते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या याच विचारांच्या मार्गाने आम्ही कार्य करीत आहोत, असे मत ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. डी. जे. वाघमारे यांनी व्यक्त केले
२० तारखेला सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विविध शाळांमध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनावर विद्यार्थ्यांकरता कार्यक्रम घेण्यात आल्याचे ठाणे जिल्हा सचिव अश्विनीताई माने यांनी सांगितले. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. डी. जे. वाघमारे व ठाणे जिल्हा सचिव अश्विनीताई माने यांच्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस श्री. कल्याणजी घेटे साहेब यांची कल्याण एसीपी कार्यालयामध्ये जाऊन भेट घेण्यात आली व त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ‘जादूटोणाविरोधी कक्ष’ निर्माण करण्यात यावा, याविषयीचे निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी तत्काळ तसा निर्देश त्यांच्या अंतर्गत असणार्या सर्व पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना केल्या. तसेच ‘शहीद नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या उपक्रमांतर्गत प्रकाशित करण्यात आले. निवृत्तीनंतर मलाही तुमच्या कार्यात सहभागी करून घ्या, अशी विनंती घेटे साहेबांनी केली. तेव्हा कृतीने आणि विचाराने तुम्ही आमच्या सोबत आहात हीच आमच्यासाठी मोठी बाब असल्याची भावना ठाणे जिल्हाध्यक्ष डी. जे. वाघमारे यांनी या वेळी व्यक्त केली.
डोंबिवली (ठाणे)
रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन
डोंबिवली येथील रामनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक श्री. अच्युत मुपडे साहेब यांच्या हस्ते ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या उपक्रमांतर्गत पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सदर पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी श्री. अच्युत मुपडे यांनी जादूटोणाविरोधी संदर्भातील कल्याण-डोंबिवलीमधील कुठलीही केस ही तेच हाताळत असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच जादूटोणाविरोधी कायद्याची प्रचार यात्रा रामनगर पोलीस स्टेशनला आली असताना आपल्या सर्वांची भेट झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी डोंबिवलीतील राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातील सर्वच उपक्रमांमध्ये तन-मन-धनाने सहभागी होणारे, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करणारे श्री. रोहित सामंत व श्री. सुशील सावंत बंधू आवर्जून उपस्थित होते.
नागपूर
“शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकी विचारांचा लढा चालूच राहील.” – प्रा. संध्या राजूरकर.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मुख्य सूत्रधार जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत विवेकी विचाराचा लढा चालू राहील, असे विचार दै. ‘बहुजन सौरभ’च्या निवासी संपादिका प्रा. संध्या राजूरकर यांनी व्यक्त केले. त्या महा. अंनिसच्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ अभिवादन समापन समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नागपुरातील सर्व शाखांच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. हे मॉर्निंग वॉक सकाळी ८.३० वा. संविधान चौकातून सुरू होऊन जुना मॉरिस कॉलेजच्या समोरून झिरो माईलमार्गे संविधान चौकात विसर्जित होऊन त्या ठिकाणी अभिवादन सभेत रुपांतरीत करण्यात आले.
राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला दै. ‘बहुजन सौरभ’ च्या संपादिका प्रा. संध्या राजूरकर व गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रा. का. सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी प्रास्ताविक केले व निर्भय मॉर्निंग वॉकचा उद्देश व कारण विशद केले. या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, “बुद्धापासून संत तुकाराम महाराजापर्यंत संतांचा वारसा लाभलेल्या देशात नंतरच्या काळात अंधश्रद्धा हळूहळू फोफावत गेली. कालांतराने दोन विचार प्रवाह वाहू लागले. या प्रसंगी माणुसकीसाठी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.” कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी कार्यक्रमाचे संचालन, तर जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. सुनील भगत यांनी आभार मानले.
तसेच ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापनेसाठी जिल्हा पोलिस उपायुक्त मॅडम असावती दोरजे नागपूर शहर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, सचिव डॉ. सुनील भगत, कार्याध्यक्ष देवानंद बडगे, देवयानी भगत, मंगला गाणार व इंदू उमरे इ. ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उपायुक्त मॅडम यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये लवकरच ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ उघडण्यात येतील, असे आश्वासन दिले.
ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ लवकरच स्थापन करणार – मा. राजूरकर मॅडम
‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्यासंबंधी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने माननीय राजूरकर मॅडम पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले. मा. राजूरकर मॅडम पोलीस निरीक्षक यांना आयु. सी. एम. मेश्राम अध्यक्ष महा. अंनिस शाखा ब्रह्मपुरी यांनी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा व जादूटोणावरील उपाय यावर थोडक्यात माहिती दिली. निवेदन देताना आयु. आर. जे. रामटेके उपाध्यक्ष महा. अंनिस, आयु. बावरे सर, आयु. मेश्राम साहेब उपस्थित होते.
कराड (सातारा)
१५ पुस्तिकांच्या संचाचा लोकार्पण समारंभ आणि कराड शहर पोलीस स्टेशनला निवेदन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कराड तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या साहित्याच्या १५ पुस्तिकांच्या संचाचा ‘लोकार्पण समारंभ’ कराड शहर पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. के. एन. पाटील यांनी उपस्थितांना योग्य आणि अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आजच्या काळातली विशेष गरज त्यांनी अधोरेखित केली. ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये लवकरात लवकर सुरू करू, याचीही ग्वाही पाहुण्याने सर्वांना दिली. इथून पुढे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कराड शहर पोलीस स्टेशन एकमेकांच्या सहकार्याने कराडमध्ये काम केले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाकरिता पोलीस इन्स्पेक्टर श्री. काळे सर, आरटीओ अधिकारी श्री. कणसे सर, कराड शहर पोलीस स्टेशनच्या सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कराडचे सर्वश्री बाळ देवधर, धनंजय जोशी, मधुकर शिंदे, चंद्रशेखर नकाते, एस. ए. मोमीन, सुधीर कुंभार, प्रसाद पावसकर, चंदूकाका जाधव, प्रफुल्ल ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
पारशिवनी (जि. नागपूर)
पारशिवनी पोलीस स्टेशनला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करणेबाबत निवेदन
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्मृतिदिनाप्रीत्यर्थ मा. उपविभागीय पो. अधिकारी रामटेक यांच्या अध्यक्षतेखाली मा. थोरात, पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन पारशीवनी ठाण्यात एक सभा घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पारशिवनीतर्फे पारशिवनी पोलीस स्टेशनला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करणेबाबत निवेदन देण्यात आले.
कार्याध्यक्ष मा. मोहन लोहकरे, डॉ. इरफान, ज्येष्ठ पत्रकार गोपाल कडू, कापसे, पनवेलकर पुनाराम गजभिये, अडकणेजी, पोलिस पाटील व संघटक गजभिये मॅडम आणि पारशिवनी येथील ज्येष्ठ नागरिक विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. थोरात यांनी येत्या दोन दिवसांत ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. रामदास सोमकुंवर अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा पारशिवनीच्या वतीने सर्व मान्यवरांनी या कामी सहकार्य केले. रामदासजी सोमकुंवर (अध्यक्ष-महा. अंनिस शाखा पारशिवनी) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.
अरोली (नागपूर)
पोलीस स्टेशनला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ लवकरच स्थापन करणार
अरोली, (जि. नागपूर) येथील पोलीस स्टेशनला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करण्यासंबंधी शाखेच्या वतीने मा. राऊत, पोलीस निरीक्षक अरोली यांना निवेदन देण्यात आले. मा. राऊत यांना आयु. सैलेश गिरपुंजे (अध्यक्ष) महा. अंनिस शाखा यांनी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा व जादूटोणावरील उपाय यावर थोडक्यात माहिती दिली.
निवेदन देताना आयु. सैलेश गिरपुंजे (अध्यक्ष) महा. अंनिस, आयु. विनोद रावते, आयु. शंकर वैद्य, आयु. नरेश वकालकर, आयु. अंकूर बोरकर, आयु. प्रफुल डहाके उपस्थित होते.
मुंबई
नामवंत मानसतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांचे ‘श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र’ या विषयावर व्याख्यान व संच प्रकाशन
महाराष्ट्र अंनिस मुंबई जिल्हा आणि ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त २० ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणाल गोरे कला दालनात ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नामवंत मानसतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांचे ‘श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानसशास्त्र’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या उपक्रमांतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. आशिष देशपांडे यांच्या हस्ते झाले. मुंबई अंनिसचे कार्यवाह नितांत पेडणेकर यांनी या पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. केशव गोरे स्मारक ट्रस्टचे भूषण ठाकूर अध्यक्षस्थानी होते. अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या व्याख्यानात विषयाची मांडणी करताना डॉ. आशिष देशपांडे यांनी धर्म आणि मानसशास्त्र उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. माणसाच्या सामूहिक जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणजे धर्म होय. या धर्माचे तत्त्वज्ञान स्पष्ट करताना धर्म म्हणजे नेमकं काय, धर्माला नियमांची गरज का भासली असावी, मानसशास्त्राने धर्माचा विचार का करावा याचे विवेचन करताना डॉ. आशिष देशपांडे यांनी देव, धर्म आणि समाजाची विचारधारा यांचा एक ऐतिहासिक दृष्टिकोन मांडला. त्याबरोबरच आपले विचार स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीमधील धर्म, धर्माचरण आणि प्रतीकं वेगवेगळ्या राजवटीमध्ये कशी व्यक्त होत गेली ते समर्पक अशा स्लाईड्स दाखवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मनाची घडी माणसाच्या सत्ताकारणात आणि समाजकारणात कशी बसली, धर्माच्या अनुषंगाने ‘पावित्र्य’ या गोष्टीची ओढ कशी निर्माण झाली, पावित्र्य जपण्याचा किंवा जोपासण्याचा प्रयत्न कसा झाला, या पवित्रकरणाची ताकद आणि अपवित्रकरणाचा मनस्ताप काय होतो, या याबद्दलही सविस्तर विवेचन केले. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपल्यावर ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या सार्वजनिक संकल्पाचे वाचन सई सावंत यांनी केले. कार्यकर्ते दीपक कसबे यांनी पुस्तक विक्री सांभाळली. प्रा. ज्योती मालंडकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अमित फोंडकर यांनी अध्यक्षांची व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सई सावंत यांनी चलत्चित्रण आणि आभारप्रदर्शन ही जबाबदारी सांभाळली. सभागृह व्यवस्थेची सर्व जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभदा निखार्गे यांनी पार पाडली.
सोलापूर
निर्भय मॉर्निंग वॉक : पुस्तक लोकार्पण सोहळा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. २० ऑगस्ट मंगळवार २०२४ रोजी चार हुतात्मा स्मारक, सोलापूर येथे डॉ. दाभोलकर यांच्या १५ पुस्तकांचा लोकार्पण सोहळा व नंतर ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला.
प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखक सर्फराज अहमद यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या एकूण पंधरा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा चार पुतळा येथे सकाळी साडेसहा वाजता पार पडला. त्यानंतर सात वाजता चार हुतात्मा स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डफरीन चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशनजवळ या मार्गे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात आला. सदर कार्यक्रमास सर्वसामान्य नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर येथे दुपारी चार वाजता ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा करण्यात आला, त्यात डॉ. अस्मिता बालगावकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी काही प्रात्यक्षिकांसह प्रयोग करून चमत्कार सादरीकरण करण्यात आले. ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी बुवा बाजी व त्यामागील विज्ञान मुलांना समजावून सांगितले.
अशा पद्धतीने विविध उपक्रम राबवून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर, अध्यक्ष प्रा. शंकर खलसोडे, सचिव लालनाथ चव्हाण यांच्यासह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, लता ढेरे, निशा भोसले, उषा शहा, अंजली नानल, शकुंतला सूर्यवंशी, संजीवनी देशपांडे, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, सुरेश व्यवहारे, छाया मोरे, ब्रह्मानंद धडके, व्ही. डी. गायकवाड, आर. डी. गायकवाड, केदारीनाथ सुरवसे, प्रसाद अतनूरकर, प्रकाश कनकी, निनाद शहा, अॅड. बेसकर, दत्ता चव्हाण, पूजा चव्हाण, विनीत जाधव इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे शहर
शब्दशः घरोघरी पुस्तिकासंचाचे वितरण
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ सदरातील पुस्तकांचा प्रकाशन तथा लोकार्पण कार्यक्रम चालवला. शब्दशः घरोघरी असे याचे स्वरूप करता येईल का? या विचाराने समाजातील विविध स्तरातील व्यक्तींना त्यांची भेट घेत असताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची ओळख करून दिली आणि पुस्तिकासंच वितरण केले. वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणारी वाचनीय अशी पुस्तिकामाला संग्रही ठेवण्याचा आग्रह केला. या उपक्रमांतर्गत डॉक्टरांच्या कार्याची थोडीशी ओळख असलेले लोक काही समोरून भेटले, नवीन ओळखी झालेले लोक, सोसायटीतील कर्मचारी, अधिकारी, तसेच घरी आलेले पोस्टमन, गृहसंकुलातील शेजारी सदस्य आणि बाहेर इतर कामानिमित्त भेटणार्या व्यक्ती, तसेच नवीन पिढीतील माध्यमिक वर्गातील विद्यार्थी असा सर्व वयोगटातील लोकांशी संवाद साधत सदर उपक्रम चालविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच भेटलेल्या लोकांशी अधिक संवाद साधण्यासाठी, कार्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना पाक्षिक बैठकीचे निमंत्रण दिले आणि लवकरच नवीन लोकांसाठी एक शिबिर घ्यावे, असेही शाखेने ठरवले आहे.
निंबोणी (मंगळवेढा)
रक्तदान शिबीर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मंगळवेढा, एम. डी. स्पोर्टस्, निंबोणी व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, निंबोणी व समस्त ग्रामस्थ निंबोणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून निंबोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यांत ७५ जणांनी सहभाग नोंदवला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून हा ‘विचाराला विचाराने उत्तर न देता, आम्ही माणूस मारून विचार संपवू’, असे सांगण्याचा प्रयत्न होता. परंतु या घटनेने खचून न जाता अंनिसचे कार्यकर्ते दुप्पट वेगाने कामाला लागले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा व समाजातील अनिष्ट अंधश्रद्धा कमी व्हाव्यात यासाठी दाभोलकरांची चळवळ अखंडपणे कार्य करत राहील, असे मत निंबोणी गावचे सरपंच बिरुदेव घोगरे यांनी मांडले. कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प अंनिस कार्यकर्त्यांनी केला. डॉ. दाभोलकरांच्या भ्याड हत्येला अकरा वर्षे पूर्ण झाली. मात्र मुख्य सूत्रधार सापडत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात आणि देशात विचारवंतांचे बळी असेच पडत राहणार का? असा सवाल या वेळी कार्यकर्त्यांनी केला.
दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस स्मृतिदिन, शहीद दिन व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वेळी एम. डी. स्पोर्टस्, निंबोणी, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे सर्व पदाधिकारी, अंनिस कार्यकर्ते व निंबोणी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. रेवनील ब्लड सेंटर, सांगोला यांनी मोलाचे सहकार्य केले.
श्रीरामपूर
श्रीरामपूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेची स्थापना अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांचे प्रमुख उपस्थितीत तर मुख्याध्यापक सुनील साळवे सर यांचे अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेचे डी. डी. काचोळे विद्यालय, श्रीरामपूर येथे स्थापन करण्यात आली. साहेबराव रक्टे, सविता साळुंके, निर्मला लांडगे, गणेश थोरात, अमोल सोनवणे, शोभा शेंडगे, अमोल नलावडे, प्रवीणकुमार साळवे, पोपटराव शेळके, सुभाष बोधक यांच्या उपस्थितीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तकांच्या संचाचे लोकार्पण करण्यात आले.
जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आणि कार्यपद्धती’ याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील साळवे सर यांनी उपस्थितांचे स्वागत व मनोगत व्यक्त केले. या वेळी श्रीरामपूर शाखेच्या वतीने कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षण वर्ग व सोशल मीडिया विभागाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरले. नूतन कार्यकारिणी सदस्यांचे समवेत श्रीरामपूर शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करणेविषयीचे निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर यांचे हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १५ पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
वसई (जि. पालघर)
दि. २० ऑगस्ट डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या अभियानांतर्गत १५ पुस्तिकांचा संचाचे प्रकाशन विद्यावर्धिनी वर्तक कॉलेज, वसई येथे प्रा. अरविंद उबाळे, अतुल आल्मेडा (सिनियर वकील, मुंबई उच्च न्यायालय), फादर मायकेल, जार्ज रोड्रिंक्स, प्रा. गोतपगार, जॉन परेरा, राष्ट्र सेवा दलाच्या जयश्री सामंत, संविधान बचाव अभियानाचे दत्ता धुळे, प्रकाश कांबळे, अल्ताफ मोहमद, अंनिस वसई शाखेचे संदेश घोलप, अंकुश मोरे व अंजना देवकाते, ‘लोकसत्ता’चे पत्रकार सुहास बिर्हाडे या मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
त्यापूर्वी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून डॉ. दाभोलकरांना आदरांजली वाहिली. प्रा. उबाळे सर म्हणाले की, ‘दाभोलकरांची हत्या झाली म्हणून त्याचे विचार संपले नाहीत. ते जोमाने आपण सर्व मिळून देशात पुढे घेऊन जात आहे. वरील १५ पुस्तकांचा संच शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये येथे भेट देऊन विवेकवादी विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू या.’ फादर मायकेलजी म्हणाले, “श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये पुसटशी रेषा आहे. त्यामुळे मी दोलायमान होतो. मी ‘करणी’ नावाने ३ अंकी नाटक लिहिले आहे. त्या माध्यमातून मी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.’ डॉ. दाभोलकर खून खटल्यात मदत करणारे सिनियर वकील अतुल आल्मेडा म्हणाले, ‘माणसाला जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे, पण तो धर्म देवाने निर्माण केला आहे म्हणून श्रेष्ठ असे मानू नका. सर्व धर्मांत असलेले विविध भेद, अंधश्रद्धा मिटवून विवेकवादी विचाराने वागावे. विवेकवादी धर्म हा मानवतावादी धर्म ठरवू शकतो, असे मत मांडले. ‘निर्भय मंच’चे जॉन परेरा म्हणाले, ‘चमत्कारातून अंधश्रद्धा दाखविली जाते. कुठलाही धर्म अंधश्रद्धांपासून अलिप्त नाही. कार्ल मार्क्स यांनी धर्म ही अफूची गोळी आहे, तर विवेकवादी विचार समाजात होणे गरजेचं आहे, हेच विचार डॉ. दाभोलकर पुढे नेत होते. आज दाभोलकर आपल्यात नसले तरी आपण सर्व मिळून त्यांचे विचार तळागाळातील समाजापुढे नेऊ या.’ असे आवाहन केले. प्रकाशन कार्यक्रमाच्या शेवटी अंनिस पालघर जिल्हा कार्याध्यक्ष संदेश घोलप यांनी मागील वर्षी डॉ. दाभोलकरांची १२ पुस्तके सर्व महाराष्ट्रात शाळा, कॉलेजमध्ये कार्यकर्त्यांनी भेट म्हणून दिली. यावर्षी ‘डॉ. दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या अभियानांतर्गत १५ पुस्तिकांचा संच ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर ६० पुस्तके तळागाळातील विद्यार्थी, महिलांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला आहे. डॉ. दाभोलकरांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. तसेच डॉ. दाभोलकरांचे शिल्प चित्र, प्रदर्शन वसई तालुक्यातील शाळा, महाविद्यालये येत्या काही महिन्यांत दाखविण्याचा मानस आहे, असे सांगितले.
वरील पुस्तके प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ अंबाडी पोलीस ठाणे, वसई रोड येथे सुरू करावा यासाठी अंनिस वसई शाखा, संविधान बचाव अभियानाचे कार्यकर्ते मिळून निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. तसेच मागील आठवड्यात मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयामध्ये पोलीस प्रशिक्षण देण्याबाबत निवेदन मा. पोलीस आयुक्तांना देण्यात आले. तसेच त्यांच्या प्रशिक्षण विभागाकडून प्रशिक्षण घेण्याबाबत फोनवर मला विचारणा झाली आहे.
भोर (जि. पुणे)
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा भोरतर्फे दिनांक ५ ऑगस्ट ते दिनांक १९ ऑगस्ट या कालावधीत भोर तालुक्यातील विविध शाळांमध्ये भोर शाखेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून, भोर शाखेतर्फे तालुक्यातील विविध शाळांना विज्ञान कृतिपुस्तिकांचे व शालोपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर, गर्ल्स हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, भोर या शाळांमध्ये घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुःसूत्री, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील फरक, जादूटोणाविरोधी कायदा इत्यादी गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेस १०० कृतिपुस्तिका याप्रमाणे ३०० कृतिपुस्तकांचे व प्रत्येक शाळेस १५० याप्रमाणे ४५० वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असणार्या गर्ल्स हायस्कूलमधील दहा विद्यार्थिनींना डॉ. अरुण बुरांडे यांच्याकडून शालेय गणवेश देण्यात आले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून भोर एज्युकेशन सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांना देखील शालोपयोगी १५० वह्यांचे वाटप करण्यात आले.
जत (जि. सांगली)
जत पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धेच्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी होणेबाबत कक्ष सुरू करण्याबाबत निवेदन पोलीस निरीक्षक जत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम नदाफ, युवा कार्यवाह विक्रम ढोणे, मेटकरी सर, तालुकाध्यक्ष श्रद्धा सनमडीकर, साबळे मॅडम, अण्णासाहेब हर्गे उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसच्या छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले. एमजीएमच्या आईनस्टाईन सभागृहात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व निकोप जीवनशैली’ या विषयावर विद्यार्थ्यांसोबत गप्पा व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. विठ्ठल सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, आशुतोष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंनिस शहराध्यक्ष डॉ. श्याम महाजन, कार्याध्यक्ष व्यंकट भोसले व लक्ष्मण जांभळीकर यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. शंकर बोर्डे यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. मधुकर पाटील, डॉ. मारोती गायकवाड आदींची या वेळी उपस्थिती होती.
बेळगाव
अभिवादन सभा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मराठी विद्यानिकेतन येथील शिक्षक श्री. इंद्रजीत मोरे यांनी ‘परिवर्तनाची चळवळ’ या विषयावर व्याख्यान दिले. श्री. जे. पी. अगसीमनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. सागर मर्दा यांनी सूत्रसंचालन व प्रा. अशोक अलगुंडी यांनी आभार मानले. या वेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे माजी सचिव श्री. सुभाष होळकर, कम्युनिस्ट नेते माजी महापौर नागेश सातेरी, अंनिस कार्याध्यक्ष श्री. शंकर चौगुले आदी उपस्थित होते.
जालना
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज – आयुष नोपाणी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विधायक कृतिशील अभिवादन म्हणून जालना जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या उपक्रमांतर्गत आज दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या हस्ते १५ पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावयासाठी मा. अप्पर पोलीस अधीक्षक यांना पत्र देण्यात आले, यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे मा. जिल्हाधिकार्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले असून यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून खटल्यातील पुराव्याअभावी सुटलेल्या तीन जणांविरोधात हायकोर्टामध्ये सीबीआय मार्फत याचिका दाखल करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारने सीबीआयला द्यावे यासाठी मा. जिल्हाधिकारी जालना यांना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांचेकडे निवेदन देण्यात आले.
जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शंकर बोर्डे, संजय हेरकर, मनोहर सरोदे, संतोष मोरे, एकनाथ राऊत, गौतम भालेराव, सुरेखा अचलखांब, अॅड. सुभाष कांबळे, सुभाष पारे यांची उपस्थिती होती.
रहिमतपूर (सातारा)
अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तत्काळ स्थापन करण्याचे आश्वासन
२० ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये चालू करावा या संदर्भाचे निवेदन रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे साहेब यांना देण्यात आले. कांडगे साहेब यांनी हा कक्ष आपण तत्काळ चालू करू आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हवे ते सहकार्य करू, असे सांगितले. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूरचे मधुकर माने, प्रवीण माने, शंकर कणसे, शिवाजी शिंदे, मोहसीन शेख आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होते.