डॉ. हमीद दाभोलकर -
आपल्या धर्माचे/जातीचे/वर्णाचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा भावनिक कट्टरपंथीय मने घडवणार्या लोकांचा मुळातला हेतू असतो. बहुतांश वेळा यामधील तरुण–तरुणी निम्नस्तरांमधून येतात; पण युरोप आणि अमेरिकेत उच्चशिक्षित तरुण–तरुणी देखील या प्रक्रियेला बळी पडलेल्या दिसून येतात.
आपल्या आजूबाजूची प्रत्येक परिस्थिती ही काळ्या किंवा पांढर्या अशा दोनच रंगांत पाहण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाते. कुठल्याही घटनेचे सूक्ष्म पदर अजिबात लक्षात घेऊ दिले जात नाहीत. आपले ते सर्व चांगले आणि दुसर्याचे ते सर्व वाईट अशी ही विभागणी असते.
धर्म, जात, वंश, पंथ यांच्या नावावर लोकांची मने अधिकाधिक कट्टरपंथी बनवली जात असलेल्या कालखंडात आपण सगळे जगत आहोत, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेसारख्या देशात गोर्या रंगाची त्वचा असणे हे काळ्या रंगाची त्वचा असण्यापेक्षा किती महत्त्वाचे आहे, यावरती टोकाची मतभिन्नता निर्माण झालेली आपल्याला दिसते. ब्रिटनसारखा देश याच मानसिकतेमधून ‘युरोपियन युनियन’च्या एका भव्य म्हणाव्या अशा सामुदायिक निर्णयप्रक्रियेमधून बाहेर पडतो. मध्य-पूर्वेतील देशांमध्ये इस्लामच्या नावावर धार्मिक कट्टरपंथीय विचारधारा अधिकाधिक प्रबळ होताना दिसते आणि भारतासारख्या देशात देखील हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणारा पक्ष सत्तेमध्ये राहून याच स्वरुपाची विचारधारा पुढे रेटताना दिसतो.
या सगळ्या घटनांमध्ये आपापल्या समूहाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ‘मी मोठा की तू मोठा’ ही लढाई टोकदार केली जाते. त्याचबरोबर आपले सर्व पाठीराखे हे आपल्या विचारधारेचे अधिक कट्टर समर्थक कसे बनतील, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव हा देखील भावनिक कट्टरपंथीय मने घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला गेलेला आपल्याला दिसत आहे.
जसे मानवी मन अधिक विचारी आणि चिंतनशील बनावे, म्हणून मानवी स्वभावाच्या अभ्यासाचा वापर करून काही निष्कर्ष काढले जातात, तसेच मानवी मन आणि स्वभाव अधिक कट्टरपंथीय बनवण्यासाठी देखील अगदी पद्धतशीर प्रकारे प्रयत्न केले जाताना दिसत आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी याच पद्धतीने माणसे हेरून, त्यांना कट्टरपंथीय बनवण्याची प्रक्रिया अगदी पद्धतशीरपणे राबवली गेली. आज या चारही खुनांच्या मध्ये आरोपपत्र दाखल झाले असल्याने ही प्रक्रिया कशी घडवली जाते, याविषयी अनेक गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात.
जसे एखादी मोठी कंपनी आपल्या कामासाठी नियोजनबद्ध प्रक्रिया राबवून आवश्यक क्षमता असलेले लोक भरती करते, त्याच प्रमाणे ही प्रक्रिया राबवली जाते.
आपली जात /धर्म/वर्ण /वर्ग यांच्याविषयी अभिमान वाटणारा एक मोठा वर्ग हा कायमच समाजात असतो. स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा आपली जात/धर्म/वर्ण/वर्ग यांच्या मोठेपणाच्या कल्पनांच्या माध्यमातून ‘स्व’च्या मोठ्या असण्याच्या कल्पना कुरवाळत बसणे हे त्या वर्गातील लोकांना सोयीचे वाटत असते. भावनिक कट्टरपंथीय निर्माण करण्याचे मनसुबे बाळगणारे लोक हे प्रामुख्याने या समूहांमधून आपले काम करण्यासाठी लोक निवडतात.
‘हिंदू खतरे में’ किंवा ‘मुसलमान खतरे में’ अशा स्वरुपाचा आपला समुदाय हा अन्यायाचा कसा बळी आहे, हा संदेश अशा लोकांना सहज आपलासा वाटू शकतो. त्यामधून एका बाजूला स्वत:च्या गटाविषयी टोकाची आत्मीयता आणि विरोधी गटाविषयी राग आणि द्वेष या भावना निर्माण होऊ लागतात. या भावनांना बळ मिळेल अशा स्वरुपाचे संदेश हे परत-परत वरील वर्गाला दिले जातात.
स्वकर्तृत्वावरती फारसा विश्वास नसणे, समाजातील मान्यताप्राप्त निकषांनुसार यशस्वी होण्याची शक्यता नसणे, यामधून स्वत:विषयी कमीपणाची भावना निर्माण झालेला एक वर्ग समाजात असतो. या वर्गातील युवक-युवतींना वरील प्रक्रियेमधून जाताना अचानक त्यांचे स्वत:चे महत्त्व वाढल्यासारखे वाटायला लागते. आयुष्याला एक उद्दिष्ट मिळाल्यासारखे वाटायला लागते आणि आपण वापरले जात आहोत, हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
अमर्याद सत्ता आणि मोठेपण यांचे मानवी मनाला कायमच आकर्षण असते. आपल्याला रास्त मार्गाने ते मिळणार नसले तर आपण ते हिसकावून घ्यायला हवे, अशी भावना हळूहळू या समूहात रुजवली जाते. ‘भारत विश्वगुरू बनणार आहे’, ‘मेकिंग अमेरिका बिग अगेन’ अशा स्वरुपाच्या घोषणा त्याला खतपाणी घालतात.
आपल्या धर्माचे/जातीचे/वर्णाचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा भावनिक कट्टरपंथीय मने घडवणार्या लोकांचा मुळातला हेतू असतो. बहुतांश वेळा यामधील तरुण-तरुणी निम्नस्तरांमधून येतात; पण युरोप आणि अमेरिकेत उच्चशिक्षित तरुण-तरुणी देखील या प्रक्रियेला बळी पडलेल्या दिसून येतात.
आपल्या आजूबाजूची प्रत्येक परिस्थिती ही काळ्या किंवा पांढर्या अशा दोनच रंगांत पाहण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाते. कुठल्याही घटनेचे सूक्ष्म पदर अजिबात लक्षात घेऊ दिले जात नाहीत. आपले ते सर्व चांगले आणि दुसर्याचे ते सर्व वाईट अशी ही विभागणी असते. एकदा सगळ्या गोष्टी काळे किंवा पांढरे अशा दोनच रंगांमध्ये बघायची सवय लागली की त्याला पुढे गुन्हेगारी कृत्याची जोड देणे, हे तुलनेने सोपे होते.
या प्रवाहात आलेल्या व्यक्तीकडून आपल्या धर्माचे/पंथाचे /जातीचे काम म्हणून छोटा-मोठा गुन्हा करवून घेतला जातो आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे सामान्य जीवन जगण्याचे मार्ग हळूहळू अवघड होऊ लागतात. गुन्हेगारी टोळ्या किंवा दहशतवादी गटांनी अनेक वर्षे या स्वरुपाच्या पद्धती वापरत आणलेल्या आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहातील संस्था-संघटना देखील या पद्धती वापरू लागल्याने निर्माण होणारी परिस्थिती अधिक आव्हानात्मक होऊ लागली आहे. आपल्या आजूबाजूला असलेली कोणीही व्यक्ती या प्रक्रिया राबवणार्या लोकांच्या संपर्कात येऊ शकते आणि त्यामध्ये ओढली पण जाऊ शकते, हा त्यामधील मोठा धोका आहे. ‘…गोली मारो सालोंको’ अशा स्वरुपाच्या घोषणा सहज दिल्या जातात. अशा प्रकारच्या हिंसेचे समर्थन एकदा बोलण्यात होऊ लागले की ते कृतीत उतरणे, हे केवळ एक पुढचे पाऊल राहते.
मग प्रश्न असा उरतो की, देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपण या परिस्थितीला कसे सामोरे जावे? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जन्माने कुठल्याही धर्म/जात/प्रांत यांचे असलो, तरी या देशाचे संविधान त्याच्या प्रत्येक नागरिकाला विधायक कृतिशील चिकित्सा करण्याचे जे स्वातंत्र्य देते, ते आपण मान्य केले पाहिजे. चिकित्सेच्या प्रत्येक प्रयत्नावर धर्मद्रोहाचा आरोप करणे आपण थांबवले पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून भावना दुखावण्याचा जो आजार आपल्या मनाला होऊ लागला आहे, त्यापासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.
दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे – स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या मनामध्ये धर्माची चिकित्सा करणारे प्रश्न निर्माण झाले तर त्याची मोकळेपणाने चर्चा करणे. बहुतांश वेळा आपण हे प्रश्न मनातच ठेवतो. कारण आपल्याला हे माहीत असते की, आपण हे प्रश्न विचारायला लागलो तर कदाचित त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. कदाचित ते सगळे मिळून आपल्या अंगावर येतील. त्याने आपण गप्प बसलो नाही तर आपल्याला दुसर्या धर्माचा हस्तक ठरवतील. यानंतर देखील आपण थांबलो नाही तर धमक्यांची पत्रे पाठवतील आणि याही नंतर आपण थांबलो नाही तर कदाचित आपला ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर’ देखील करतील, म्हणून अनेक गोष्टी खटकत असूनही आपण बोलायचे टाळतो; आणि बरोबर याचमुळे अंधाराच्या या रखवालदारांचे फावते. भले आपण सार्वजनिक व्यासपीठांवरून हे बोलू शकणार नाही; पण आपल्या कुटुंबात, मित्रमंडळींमध्ये, सहकार्यांबरोबरील चर्चेमध्ये आपण धर्माच्या नावावर अधर्म पसरविण्याच्या प्रयत्नांना प्रश्न विचारले पाहिजेत, सोशल मीडियावरील चर्चेमध्ये असे प्रश्न मांडले पाहिजेत. या समाजातील बहुतांश माणसे धार्मिक असली तरी सहिष्णू आणि चिकित्सा स्वीकारणारी आहेत, हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. या देशामधील धार्मिक कडवेपणाला रोखण्याचे काम याच समूहाने आजवर प्रामुख्याने केले आहे, हे आपण विसरता कामा नये.
यासंदर्भात शासनाची देखील भूमिका महत्त्वाची आहे. अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांचे सामाजिक स्वरूप लक्षात घेता ते हाताळताना यामध्ये सहभागी लोकांना भावनिक, सामाजिकशास्त्रांच्या आधुनिक अभ्यासाचा वापर केला गेला पाहिजे. अनेक प्रगत देशांमध्ये कट्टरपंथीय बनलेल्या तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगळे पुनर्वसन प्रकल्प राबवले जातात आधुनिक मानसशास्त्र आणि समाजशास्त्रीय पद्धतींचा वापर त्यामध्ये केला जातो. अशा गोष्टींचा देखील आपल्या येथे प्रयोग करणे आवश्यक आहे. मानवी मनातील मूलभूत चांगल्या आणि वाईट भावनांमधील ही लढाई असल्याने ती आपल्याला दीर्घकाळ लढायला लागणार आहे, याची आपण नोंद घ्यायला हवी.
Email : hamid.dabholkar@gmail.com