अवमान प्रकरण : कोर्टात काय घडले?

सौरभ बागडे -

१) २१ नोव्हें.२०२३ ला कोर्टाला पतंजलीने आपण पुन्हा दिशाभूल करण्यार्‍या जाहिराती करणार नाही आणि दुसर्‍या आरोग्य शास्त्राबद्दल चुकीची विधाने करणार नाही याची हमी दिली होती. त्याचवेळी कोर्टाने पुन्हा तुम्ही तुमच्या उत्पादनाबाबत खोटे दावे केलेत तर प्रत्येक संबंधित उत्पादनामागे १ कोटी रुपये दंड करू, अशी ताकीद दिली होती.

२) पतंजलीने सुप्रीम कोर्टाला दिलेली हमी पायदळी तुडवल्याने, कोर्टाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पतंजली आयुर्वेद आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान नोटीस बजावली. त्याचवेळेस केंद्रीय आयुष मंत्रालयाला कडक शब्दांत सुनावले-‘दिशाभूल करण्यार्‍या जाहिराती विरोधातील याचिका दाखल होऊन दोन वर्षे झाली आहेत. या काळात आयुष मंत्रालयाने काय केलं? संपूर्ण देशाची फसवणूक चालली आहे आणि तुम्ही डोळे मिटून राहिलात. ड्रग्ज आणि मॅजिक कायद्यांतर्गत हे प्रतिबंधित असताना तुम्ही दोन वर्षे गप्प बसलात.’

३) १९ मार्च २०२४ रोजी कोर्टाने अवमान याचिकेला उत्तर न दिल्याची नोंद करून बाबा रामदेव यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली.

४) २ एप्रिल २०२४ रोजी आचार्य बाळकृष्ण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहिरात करण्याचा दोष त्यांच्या जाहिरात विभागावर ढकलून कंपनीला कोर्टाच्या २१ नोव्हें. २०२३ रोजीच्या आदेशांची कल्पना नसल्याचं सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती कोहली म्हणाले, “असं स्पष्टीकरण ऐकण्याची आमची इच्छा नाही. तुमचा मिडीया विभाग स्वतंत्र बेट नाहीये की जो कोर्टात काय चालले आहे याबद्दल अनभिज्ञ असेल. हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही तुमची निष्काळजी (perfunctory) माफी स्वीकारू शकत नाही. तुम्ही कोर्टाच्या आदेशानंतर २४ तासांच्या आत प्रेस कॉन्फरन्स घेतलीत, हे तुम्ही कोर्टाच्या आदेशाबाबत अवगत आहात असं दाखवतं. २ महिन्यांनंतर तुम्ही जाहिरात केलीत त्यात तुम्हाला प्रमोटर म्हणून दाखवलं आहे, हे तुम्ही कसं स्पष्ट कराल?”

पतंजलीचे वकील विपीन संघी म्हणाले, “आमच्या कंपनीचा कमर्शियल हेतू नाहीये.” त्यावर न्यायमूर्ती कोहली म्हणाले, “तुम्ही कमर्शियल कंपनी आहात.”

रामदेव यांच्या बिनशर्त माफीवर न्या. अमानुल्ला म्हणाले, “ही माफीची भावना मनापासून आलेली नाही.”

५) अवमान प्रकरणावर कोर्टाने सुनावणी करण्यापूर्वीच रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी ९ एप्रिल रोजी पुन्हा बिनशर्त माफी मागितली.

रामदेव प्रतिज्ञापत्रात म्हणाले, “२२ नोव्हें. २०२३ रोजीच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल बिनशर्त माफी मागतो. झाल्या प्रकाराबद्दल मला वाईट वाटते. भविष्यात पुन्हा अशी चूक घडणार नाही.”

मात्र, कोर्टाने दोघांचे माफीनामे स्वीकारण्यास नकार दिला. रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोर्टात प्रत्यक्ष हजर राहता येऊ नये म्हणून परदेशात जाण्याचे कारण दिलं.

१० एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशात कोर्ट म्हणाले, ‘प्रतिज्ञापत्रावर सही करण्यात आली तेव्हा सदर विमानाची तिकिटे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे प्रतिवादी कोर्टात प्रत्यक्ष हजर टाळण्यासाठी हे करत आहे, असं दिसून येतं.’ कोर्ट पुढे म्हणालं, ‘या प्रकरणाचा सर्व इतिहास आणि प्रतिवादीचे वर्तन बघता आम्ही नवीन प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याबाबत साशंक आहोत.’

६) १६ एप्रिल २०२४ रोजी कोर्टाने प्रत्यक्ष रामदेव यांच्याशी हिंदीतून सवाल-जबाब केला. रामदेव यांचे वकील रोहतगी म्हणाले, “आम्हाला पश्चात्ताप झाला आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सार्वजनिकपणे माफी मागायला तयार आहोत.”

कोर्टाने २२ नोव्हें. २०२३ प्रेस कॉन्फरन्स आणि ४ डिसें. २०२३ च्या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली.

रामदेव कोर्टाला म्हणाले, “तुमचे बरोबर आहे, कोट्यवधी लोक माझ्याशी जोडलेले आहेत. यापुढे १००% जागरूक राहीन. पुन्हा असं घडणार नाही.” ते पुढे आयुर्वेदाचे समर्थन करू लागले. त्यावर कोर्ट म्हणाले, “आम्ही तुमच्या वर्तनाबाबत बोलत आहोत. कायदा सर्वांसाठी एक आहे.” त्याला उत्तर देताना रामदेव म्हणाले, “जे झालं ते जोशमध्ये झालं. पुढे असं नाही होणार.”

आचार्य बाळकृष्ण म्हणाले, “कायद्याने आमच्यावर न्याय केला पाहिजे.” त्यावर न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले, “तुम्ही दुसर्‍याकडे बोट नाही दाखवू शकत. प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही कारण देता. तुमच्या माफीत खोट आहे.” त्यावर रामदेव म्हणाले, “आम्ही कारण देत नाही आहोत. आम्ही माफी मागत आहोत.”

न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले, “कायदा सर्वांना समान आहे. न्यायाधीश राज्यघटनेनुसार चालतात, ज्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. कोर्टासमोर कोण आहे त्याची ते फिकीर करत नाहीत.”

७) २३ एप्रिल २०२४ रोजी पतंजली समूह, रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले की, ६७ वर्तमानपत्रांत माफी प्रकाशित केली आहे. दिशाभूल करणार्‍या जाहिरातींविषयी खेद व्यक्त करण्यासाठी रुपये दहा लाखांचा खर्च आला.

न्यायमूर्ती कोहली म्हणाले, “तुमच्या जाहिरातीच्या आकारा इतकाच तुमचा माफीनामा आहे का? पतंजलीच्या संपूर्ण पानाच्या जाहिरातीचा खर्च एवढाच होतो का? आम्हाला वर्तमानपत्रातील कात्रण बघायचे आहे. माफीचा आकार मोठा करून दाखवलेल्या प्रतीने आमचे समाधान होत नाही. आम्हाला माफीचा वर्तमानपत्रातील प्रत्यक्ष आकार पहायचा आहे. तुमची माफी सूक्ष्मदर्शकाखाली पहायला लागू नये.”

‘दै. लोकसत्ता’च्या २४ एप्रिल २०२४ च्या अंकातील माफी पाहिली तर आपल्याला रामदेव यांची चलाखी सहज लक्षात येईल. सर्वांत शेवटच्या पानावर उजव्या कोपर्‍यात एकदम छोट्या आकारात ही माफी आहे. याच्याउलट रामदेव यांच्या जाहिराती वृत्तपत्राचे पहिले संपूर्ण पान व्यापलेल्या असत.

अ‍ॅड. सौरभ बागडे, पुणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]