क्रूर धर्मांधाची बळी : हायपेशिया

प्रा. प. रा. आर्डे -

हायपेशिया एकेकाळी ज्ञान-विज्ञानाचे प्रख्यात विद्यापीठ. अलेक्झांड्रियामध्ये तत्त्वज्ञान आणि गणित विषयाची लोकप्रिय शिक्षिका, एक बुद्धिप्रामाण्यवादी स्त्री. ख्रिश्चन धार्मिक अतिरेक्यांनी तिला क्रूरपणे ठार केले. जगाच्या इतिहासात सर्वांत क्रूर धर्मांध कृती; पूर्वी कधीही न झालेली आणि भविष्यातही होणार नाही, अशी. ख्रिस्ती धर्मांधांनी तिला चेटकीण समजून मारले. खरंच हायपेशिया कोण होती? चेटकीण की तत्त्वज्ञ? काळी जादू करणारी की विवेकी शिक्षिका? सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी घडलेली हायपेशियाची ही रक्तरंजित कहाणी.

अलेक्झांड्रिया. प्रख्यात सम्राट ‘अलेक्झांडर द ग्रेट’ याने ज्ञानवंतांना आपापल्या क्षेत्रांत विद्येची उपासना करण्यासाठी वसवलेले इजिप्तमधील हे शहर. रोमन सत्तेच्या पूर्वभागात ते वसले होते. आसपासच्या विविध प्रदेशांतून ज्ञानासाठी उत्सुक असलेले लोक अलेक्झांड्रियाच्या विद्यापीठात येत असत. तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, कला अशा विद्याशाखांतील नामवंत येथे शिक्षक होते. या शिक्षकांपैकीच एक म्हणजे ‘हायपेशिया ऑफ अलेक्झांड्रिया.’

हायपेशियाच्या जन्माची निश्चित वेळ उपलब्ध नाही. तिचा जन्म इ. स. 350 ते 370 च्या दरम्यान झाला असावा. तिच्या वडिलांचे नाव थिऑन ऑफ अलेक्झांड्रिया. तिच्या आईची माहिती उपलब्ध नाही. थिऑन हे ‘निओप्लेटॉनिझम’ या ग्रीक विचारधारेच्या स्कूलचे प्रमुख होते. सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांची बुद्धिवादी विचारपरंपरा अखंडित राहावी, यासाठी प्रयत्न करणारा तो तत्त्वज्ञ होता. प्लेटोचे विचार स्पष्ट करणे आणि त्या विचारात भर घालणे, यासाठी ‘निओप्लेटॉनिझम’चा प्रसार चालू होता. याचबरोबर थिऑन त्या काळचा एक महान गणिती म्हणूनही प्रसिद्ध होता. युक्लीडच्या एश्रशाशपीीं या भूमितीच्या ग्रंथाचे थिऑनने नव्याने संपादन केले. सातशे वर्षांपूर्वीच्या या ग्रंथातील अनेक चुका त्याने सुधारल्या. कित्येक शतकं गणिताचे अभ्यासक उपयोग करीत.

हायपेशिया ही थिऑनची कन्या. थिऑनने तिला मुलग्याप्रमाणे वाढवले. वडिलांप्रमाणेच तिने ‘निओप्लेटॉनिझम’मध्ये प्रावीण्य संपादन केले. इ. स. 400 च्या उत्तरार्धात अलेक्झांड्रियामध्ये ‘निओप्लेटॉनिझम’च्या दोन मुख्य विचारधारा शिकवल्या जात होत्या. यापैकी ‘प्लॉटिनस’च्या विचारधारेवर आधारित स्कूलचे हायपेशिया आणि तिचे वडील पुरस्कर्ते होते. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानात तिने प्रावीण्य मिळवले. या तत्त्वज्ञानाची एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून ती अलेक्झांड्रियात प्रसिद्ध झाली. तत्त्वज्ञानाबरोबरच गणित आणि विज्ञान या विषयांत देखील तिने प्रावीण्य मिळवले. इतिहासकारांच्या मते, तिच्या काळातील अलेक्झांड्रियामधील ती एक श्रेष्ठ शिक्षिका होती. खरं तर त्या कालात स्त्रियांना अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याचे स्वातंत्र्य नव्हते; पण हायपेशिया याला अपवाद होती. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तिला आपल्या अंगभूत गुणांचा विकास करता आला. अलेक्झांड्रिया शहरामधून ठिकठिकाणी ती जाहीर व्याख्याने देत असे. तिचे विचार ऐकण्यासाठी अलेक्झांड्रिया आणि लांबलांबून विद्यार्थी येत. तत्त्वज्ञानामुळे आत्मसंयमी बनलेल्या आणि उन्नत मनाच्या हायपेशियाला जनसमुदायासमोर व्यक्त होण्यास भीती वाटत नव्हती. भौतिक आणि शारीरिक सुखापेक्षा आत्मोन्नतीचे तत्त्वज्ञान आत्मसात केलेली हायपेशिया ही शेवटपर्यंत कुमारिकाच राहिली. तिच्या असामान्य सद्गुणी व्यक्तिमत्त्वाचे लोक चाहते होते.

विज्ञान व गणितातील कामगिरी

टॉलेमी या खगोलवैज्ञानिकाने पृथ्वीकेंद्री सिद्धांताचे समर्थन केले होते. पृथ्वीभोवती ग्रह आणि सूर्य; तसेच तारे फिरतात, याला पुरावा देणारा अल्माजेस्ट ‘Almagest’ हा ग्रंथ त्याने लिहिला होता. हायपेशियाने या ग्रंथाची नवीन आवृत्ती संपादित करून प्रसिद्ध केली. सूर्याच्या भ्रमणाचे गणिती स्पष्टीकरण करताना टॉलेमीने वापरलेल्या पद्धतीत हायपेशियाने सुधारणा केल्या. गणिती आकडेमोडीसाठी Astronomical table नावाची पद्धत हायपेशियाने वापरली.

इ. स. 250 मध्ये डायफँटस (Diophantes) या गणितज्ज्ञाने ‘अरिथमेटिका’ हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये शंभर गणिती कूटप्रश्न बीजगणिताच्या आधारे सोडवणे शक्य आहे, अशी सूचना होती. हायपेशियाने या ग्रंथातील गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धती तपासल्या; शिवाय त्यात आणखी नव्या प्रश्नांची भर घातली.

भूमितीमध्ये ‘कोनविक सेक्शन्स’ या आकृत्यांचा अभ्यास येतो. ‘पॅराबोला’, ‘हायपरबोला’ आणि ‘इलिप्स’ या त्या आकृत्या आहेत. या विषयात हायपेशियाने प्रभुत्व संपादन केले. आर्किमीडिज या वैज्ञानिकाने वर्तुळ आणि गोल यांच्या गुणधर्माबद्दल जे संशोधन केले होते, त्यावरील पुस्तकाची नवी आवृत्ती हायपेशियाने संपादित केली. गणिताच्या अभ्यासात आर्किमीडिज तल्लीन होऊन जात असे. वाळूमध्ये वर्तुळाचे गुणधर्म तपासण्यात तो तल्लीन झाला होता. शत्रुसैन्याने त्याचे शहर जिंकले. एक रोमन सैनिक त्याच्या जवळ आला. त्याची सावली वर्तुळावर पडली. ‘मला का व्यत्यय आणतोस,’ अशा अर्थानं त्यानं सैनिकाकडे पाहिलं आणि ‘त्या’ चिडलेल्या उन्मत्त सैनिकाने त्याचे मुंडके उडवले. उन्मत्त राजसत्ता आणि क्रूर धर्मसत्ता यांनी अशा अनेक ज्ञानवंतांचे जीव घेतलेत. हायपेशियासुद्धा याच प्रवृत्तीची बळी ठरली.

तारे आणि ग्रह यांच्या स्थितीवरून तारीख आणि वेळ निश्चित करण्यासाठी एक साधन वापरले जाते. त्याचे नाव आहे ‘अ‍ॅस्ट्रोलेब.’ या उपकरणाची माहिती हायपेशियाच्या वडिलांना होती. ही माहिती अभ्यासून असे ‘अ‍ॅस्ट्रोलेब’ कसे बनवावे, याचे प्रशिक्षण हायपेशिया आपल्या विद्यार्थ्यांना देत असे. द्रवाची घनता मोजण्यासाठी वापरला जाणारा ‘हायड्रोमीटर’ हायपेशियाने बनवला होता. अशा तर्‍हेनं तत्त्वज्ञान, विज्ञान आणि गणित या विषयात पारंगत असलेली हायपेशिया अलेक्झांड्रिया विद्यापीठात लोकप्रिय झाली होती. शारीरिक सुखलालसा आणि लैंगिकता, संपत्तीची हाव, या गोष्टींपासून दूर राहून प्लेटोच्या विचारसरणीनुसार भौतिक जगाच्या पलिकडे असलेलं एकतत्त्व जे हृदय भौतिक जगाचे मूळ कारण आहे, ते गणिताच्या सहाय्याने शोधून आपला आत्मविकास करण्याचा तिचा छंद होता. या छंदात शिक्षक बनून ती इतरांनाही ज्ञानाचे धडे देत असे. लॉजिक म्हणजे तर्क म्हणजेच रिझन (Reason) यावर आधारित बुद्धिप्रामाण्यवादी अशा विदुषीची हत्या का झाली? याला कारण घडले राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा ज्ञानवंतांकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन.

हायपेशियाच्या काळात अलेक्झांड्रियावर रोमन सत्ता होती. रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे या धर्माचा जोरदार प्रसार करण्याची मोहीम रोमन साम्राज्यात सुरू झाली. सगळं जग ख्रिस्तमय करण्याची जणू त्यांना घाईच झाली होती. अलेक्झांड्रियामध्ये ख्रिस्ती, ज्यू आणि पेगन असे तीन गट निर्माण झाले होते. ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यात संघर्ष होताच; याशिवाय ख्रिश्चन, ‘पेगन’ लोकांचा तिरस्कार करीत. ‘पेगन’ म्हणजे बहुदेववादी, निसर्गपूजक लोक. यात देव न मानणार्‍या ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी लोकांचाही समावेश केला जाई. रोमन साम्राज्याच्या ग्रामीण भागातील लोक पशू, पक्षी, प्राणी यांच्यामध्येही देवत्व मानीत. याचबरोबर ते मूर्तिपूजाही करीत. या सगळ्यांना येशूचे अनुयायी बनवण्याची ख्रिश्चन धर्मप्रसारकांना घाई झाली होती. याचबरोबर ख्रिश्चन धर्माची देवत्वाची कल्पना न मानणार्‍या बुद्धिप्रामाण्यवादी ग्रीक विचारसरणीचे अनुयायी यांनाही ‘पेगन’ म्हणून संबोधले जाई. बुद्धिप्रामाण्यवादी हायपेशिया ही ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या मते ‘पेगन’च होती. ख्रिस्ती धर्मप्रसारक ‘पेगन’ लोकांना रानटी आणि गावंढळ मानीत. आपल्या धर्माच्या अहंकाराचा त्यांना माज चढलेला होता. या पार्श्वभूमीवर अलेक्झांड्रियामध्ये या शहराचा रोमन गव्हर्नर आणि तेथे नेमणूक झालेले धर्मप्रसारक बिशप यांच्यात संघर्ष सुरू झालेला होता. या संघर्षाला धार्मिक सहिष्णू असलेली हायपेशिया बळी पडली. खरं तर हायपेशिया ही प्रचलित कोणत्याही धर्मावर श्रद्धा नसलेली म्हणजेच निधर्मी होती, तरीपण ती ख्रिश्चनांबद्दल सहिष्णू होती. सायनेशियस हा ख्रिश्चन तिच्या प्रमुख विद्यार्थ्यांपैकी एक. सायनेशियस पुढे लिबियाचा बिशप झाला. तो हायपेशियाबद्दल अनेक पत्रांतून आदर व्यक्त करीत असे आणि तिचा सल्लाही घेत असे. एका पत्रात त्याने हायपेशियाची ‘प्रगाढ तत्त्वज्ञानी’ म्हणून स्तुती केली आहे. हायपेशियाने समर्थन केलेल्या, भावनांवर प्रभुत्व मिळवण्याच्या सामर्थ्याचा सायनेशियसने वारसा जपला. हायपेशियाच्या गुणांमुळेच त्या काळच्या विचारवंतांत आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींमध्ये तिचा नैतिक दबदबा होता. राजकीय क्षेत्रातील लोक एखाद्या कूटप्रश्नाबाबत तिचा सल्ला घेत असत. ती पण लोकांना प्रामाणिकपणे मार्गदर्शन करी. अप्रत्यक्षपणे राजकारणातील तिच्या वावरामुळे तिचा घात झाला.

इ. स. 382 ते 412 या काळात थिओफिलस हा अलेक्झांड्रिया बिशप होता. थिओफिलस हायपेशियाचा चाहता होता. त्याने हायपेशियाला सहानुभूतीपुर्वक वागवले. तो ख्रिश्चन असला तरी हायपेशियाबाबत सहिष्णू होता. इ. स. 412 मध्ये थिओफिलसचे अचानक निधन झाले. त्याला त्याचा पुतण्या सिरील (Cyril) यास आपला वारस म्हणून पुढे आणायचा होता; पण टिमॉथी (Timothy) हा सिरीलचा प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिला. त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. त्यात सिरीलची सरशी झाली. सिरील हा सूडबुद्धीने वागणारा होता. त्याने टिमॉथीच्या बाजूच्या लोकांना शिक्षा देण्यास सुरुवात केली. टिमॉथीच्या ताब्यात असलेलं चर्च त्यानं बंद करून टाकलं आणि तेथील संपत्तीवर टाच आणली. या प्रकारामुळे हायपेशियाच्या संपर्कातील लोक सिरीलवर नाराज झाले असण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे सायनेशियसने हायपेशियाला लिहिलेल्या एका पत्रात सिरील हा अनअनुभवी आणि चुकीच्या दिशेने जाणारा बिशप आहे, अशी टीका केली होती.

इतिहासातील नोंदीनुसार इ. स. 414 मध्ये ज्यू आणि ख्रिश्चन यांच्यात संघर्ष सुरू झाला. सिरीलने अलेक्झांड्रियामधील ज्यू प्रार्थनास्थळावर बंदी घातली. ज्यू लोकांची संपत्ती जप्त करण्याची मोहीम सुरू केली. अनेक ज्यूंना त्याने शहराबाहेर हाकलून दिले, रक्तपात सुरू झाला. या काळात ऑर्स्टेस (Orestes) हा अलेक्झांड्रियाचा रोमन गव्हर्नर होता. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, तरी तो परधर्मियाबद्दल तुलनेने सहिष्णू होता. तो हायपेशियाचा मित्र होता. त्याला सिरीलची ज्यू आणि ‘पेगन’ लोकांवरील अन्यायी कृत्ये आवडली नाहीत. या संदर्भात ऑर्स्टेसने रोमन बादशहाला नाराजीचे पत्र लिहिले. याने संतप्त झालेल्या सिरीलच्या अनुयायांनी ऑर्स्टेसवर हल्ला केला. यात प्रमुख होता अमोनियस हा मंक. प्रतिक्रिया म्हणून ज्या मंकने ऑर्स्टेसवर हल्ला केला, त्याला पकडून ऑर्स्टेसच्या लोकांनी त्याचा छळ केला. त्यात अमोनियस मृत्यू पावला. सिरीलने त्याला ‘हुतात्मा’ म्हणून घोषित केले. सिरीलच्या या धर्मांध कृतीने विवेकी ख्रिश्चन समुदायात नाराजी पसरली. वास्तवात अमोनियसने दंगल घडवून गव्हर्नरचा खून करण्याचा प्रयत्न केला असताना त्याला हुतात्मा कसे म्हणता येईल? अमोनियस हा श्रद्धेतून हुतात्मा झाला नाही. आपल्याच धर्मातील उच्चपदस्थाला मारणे म्हणजे धर्मकृत्य नव्हे, ही तर धर्मांधता होईल. अलेक्झांड्रियामधील अनेक महत्त्वाच्या ख्रिश्चन लोकांनी सिरीलला हे प्रकरण ताबडतोब मिटविण्याची सूचना केली; पण सिरील आणि ऑर्स्टेस यांच्यातील संघर्ष चालूच राहिला. या संघर्षात ऑर्स्टेसने वारंवार हायपेशियाचा सल्ला घेतला. कारण ती विविध धर्मियांत आदरणीय व लोकप्रिय होती. हायपेशियाला धर्मसंघर्ष मान्य नव्हता. विविध धर्मियांत शांतता नांदावी, म्हणून योग्य समुपदेशन करणारी विवेकी अशी हायपेशिया ज्यांना धार्मिक सलोखा नको आहे, अशा सिरील व त्याच्या अनुयायात अप्रिय ठरली. सिरीलने हायपेशियाला दोषी ठरवण्यासाठीची गुप्त मोहीम चालू ठेवली. ‘ऑर्स्टेसने सिरीलशी तडजोड करू नये, अशी चाल हायपेशिया खेळत आहे,’ अशा तर्‍हेच्या अफवा ख्रिश्चन समुदायांत पसरवल्या गेल्या. ख्रिश्चनांचे मत तिच्याबाबत कलुषित करण्यात सिरीलला यश येऊ लागले. ‘जादूटोणा करून ऑर्स्टेसला ख्रिश्चन विचारसरणीपासून दूर करण्याचा हायपेशिया प्रयत्न करीत आहे,’ अशाही अफवा पसरविल्या गेल्या. एवढंच नव्हे, तर हायपेशिया चेटकीण आहे, असाही अपप्रचार येशू ख्रिस्ताच्या तथाकथित ‘दयाळू’ धर्ममार्तंडांनी केला. आपलाच धर्म श्रेष्ठ, त्याचे अनुयायी इतरांनी व्हावे, यासाठी रोमन काळात ख्रिस्ती धर्माने साम, दाम, दंड भेदाचा क्रूरपणे अवलंब केला. या क्रूर कर्मात बळी पडली ज्ञानवंत तत्त्वज्ञ हायपेशिया.

इ. स. 415 मध्ये मार्च महिन्यात ख्रिस्ती उत्सवकाळात पीटर या धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन जमावाने हायपेशिया घरी जात असताना तिच्यावर हल्ला केला. तिला पकडून जवळच्याच मंदिरात नेण्यात आले. तिला विवस्त्र करून डोळे काढण्यात आले. धारदार शिंपल्यांनी तिच्या शरीरावर घाव घालून शरीर छिन्न-विछिन्न करण्यात आले. तिच्या शरीराचे तुकडे रस्त्यावरून ओढत नेत शहराच्या बाहेर नेऊन जाळण्यात आले. ‘अतिदुष्ट व्यक्तींना शहराबाहेर जाळल्याने शहर पवित्र किंवा शुद्ध होते,’ अशी त्यावेळची अंधश्रद्धा होती. एका तत्त्वज्ञानी, धार्मिक सहिष्णू शिक्षिकेला जाळून अलेक्झांड्रियाचे शुद्धिकरण करणार्‍या ख्रिस्ती समुदायाला येशूने हीच शिकवण दिली होती? धार्मिक अत्याचाराच्या घटनांनी जगातील बहुतेक धर्म कलंकित झाले आहेत. धर्माच्या क्रूरतेची ही दुष्ट परंपरा अजूनही संपलेली नाही. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हिंदू सनातन्यांनी केलेली हत्या हे याचे ताजे उदाहरण.

पण थोर विचारवंताचे हौतात्म्य वाया जात नाही. हायपेशियाच्या मृत्यूमुळे संपूर्ण रोमन साम्राज्यात संतापाची लाट उसळली. ख्रिस्ती धर्माच्या अरेरावीला न जुमानता नव प्लेटोवादी आणि पेगनिझमचे विचार पुढे कित्येक शतके चालू राहिले. खगोल विज्ञान व गणितातही संशोधन सुरू राहिले. सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या विचाराचा प्रसार चालू राहिला. प्रबोधनकाळात हे विचार तत्त्वज्ञानात स्वीकारले गेले. आधुनिक काळातील तत्त्वज्ञ सॉक्रेटिसची नीतीविषयक संकल्पना महत्त्वपूर्ण मानतात. विचार मारले जात नाही, हेच खरे!

ख्रिश्चन धार्मिक अतिरेक्यांनी हायपेशियाला ठार केले; पण नंतर मध्ययुगात याच धर्मियांनी तिला ‘संत कॅथेरिल ऑफ अलेक्झांड्रिया’ म्हणून घोषित केले. छळ करायचा; प्रसंगी ठार करायचे, पण ज्यांना मारले त्यांचे विचार पुसले जात नाहीत, हे लक्षात आल्यावर त्याला संतपदावर बसवायचे, ही ढोंगी धर्मियांची चाल असते, याचा प्रत्यय हायपेशियाबाबतही आला. ज्ञानेश्वरांचा संन्याशाची मुले म्हणून छळ केला व नंतर त्यांना संतपदी बसवण्याचा प्रकार आपल्याकडील तथाकथित धर्ममार्तंडांनी केला, याची आठवण याप्रसंगी येते.

प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअरने हायपेशियाबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत – ‘Believer in the Laws of Rational Nature and Capacities of the human mind free of dogmas.’

वैचारिक हटवादीपणापासून मुक्त आणि निसर्गवादाची चाहती अशी ही विदुषी होती. तिच्या मृत्युबद्दल व्हॉल्टेअर लिहितो, ‘A bestial murder, perpetrated by Cyril’s tensured hounds, with Faratical gang at their heels.’ सिरीलच्या क्रूर लांडग्यांनी टोळी करून केलेली हायपेशियाची निर्दयी हत्या, प्रतिभावान हायपेशियाचा मूर्ख धर्मियांनी केलेला खून; पण या खुनाने हायपेशिया व तिचे तत्त्वज्ञान संपले नाही; उलट इतिहासकारांनी स्त्रीवादी चळवळीची व विचारस्वातंत्र्याची पुरस्कर्ती म्हणून तिचा गौरव केला. इतिहासात हायपेशीय अमर झाली; तिला मारणारे मात्र केव्हाच मेले. हायपेशीयाचा वैचारिक वारसा आपण पुढे नेऊ या.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]