सामाजिक चळवळींसाठी सोशल मीडिया अपरिहार्य!

सौरभ बागडे -

संजय आवटे (राज्य संपादक, दै.दिव्य मराठी)

मअंनिसच्या यूट्यूब चॅनेल व फेसबुक पेजचे लोकार्पण

गत दशकापासून सोशल मीडियाचा वापर खासकरून तरुणांमध्ये वाढत गेला आहे आणि त्या तंत्रज्ञानातही उत्तरोत्तर विकास होत गेला आहे. आज अभिव्यक्त होण्यासाठी, नित्याची कामे पार पाडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य बनला आहे आणि कोविड महामारीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष एकत्र येण्यावर बंधने आली, वृत्तपत्रांच्या वितरणावर बंधने आली, तेव्हा ही अपरिहार्यता अधिकच जाणवूही लागली आहे. मात्र सोशल मीडिया अपरिहार्य झाला असला व त्याचे वापरकर्तेवाढत असले तरी विकसनशील देशांमध्ये प्रत्येक दहा व्यक्तींमागे केवळ एकच व्यक्ती इंटरनेटची वापरकर्ती आहे. म्हणून अनेकदा विकसनशील देशांमध्ये; तसेच विकसित देशांमध्ये ‘इंटरनेट स्टार्व्हेशन’ हा मुद्दा चर्चिला जातो. अर्थात, हा मुद्दा इंटरनेटचे; पर्यायाने सोशल मीडियाचे महत्त्वच अधोरेखित करतो. खुद्द सुप्रीम कोर्टाने इंटरनेटचा अधिकार संविधानाच्या कलम 19(क) मध्ये येत असल्याचा निकाल देऊन या नव्या युगाच्या भाषेचे महत्त्व अधोरेखित केलं आहे; तर 2018 साली सोशल मीडियात जन्म पावलेली महिलांची ञ्च् चश ढेे मोहीम ही जागतिक स्तरावर प्रस्थापित माध्यमांत पान एकचा पानाचा विषय ठरली. यावरून सोशल मीडियाची वाढती ताकद लक्षात येऊ शकते. म्हणून व्यक्तींनी, सामाजिक संस्था, चळवळींनी ‘टेक्नोसॅव्ही’ होणं हे गरजेचे बनले आहे. ही गरज ओळखून ‘महा. अंनिस’ने गेल्या वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एक स्वतंत्र पोर्टलचे उद्घाटन केले होते. त्यात प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणारे अंक व झालेले अंक उपलब्ध करून दिले होते. या नवीन माध्यमांचा वापर करण्याच्या उपक्रमातील एक भाग म्हणून ‘नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहा’च्या निमित्ताने प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचे अनुभवजन्य ज्ञान असलेले पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते ‘महा. अंनिस’चे ‘फेसबुक पेज’ व ‘यू ट्यूब’ चॅनेलचं लोकार्पण आणि त्यांचं सामाजिक चळवळी व सोशल मीडिया याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.

इचलकरंजी शाखेच्या तरुण कार्यकर्त्या रूचिता पाटील आणि सहकार्‍यांनी शाहीर शंतनु कांबळे यांचे ‘तू समतेच्या वाटेनं यावं’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागत व प्रास्ताविक ‘महा. अंनिस’च्या राज्य सोशल मीडिया कक्षाचे सदस्य श्री. वाघेश साळुंखे यांनी केलं. ते प्रास्ताविकात म्हणाले, जसं ‘अंनिस’च्या वार्तापत्र चळवळीचे मुखपत्र आहे; तसेच हे ‘फेसबुक पेज’ आणि ‘यू ट्यूब चॅनेल’ ही चळवळीची डिजिटल मुखपत्रेच असतील, यांद्वारे प्रबोधनाचा आवाज तरुणवर्गापर्यंत अधिकाधिक पोचणे सोपे होईल. प्रमुख वक्ते संजय आवटे यांचा परिचय विभावरी नखाते या तरुण कार्यकर्तीने करून दिला. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संजय आवटे यांच्या हस्ते ‘महा. अंनिस’चे ‘फेसबुक पेज’ व ‘यू ट्यूब’ चॅनेलचे लोकार्पण झाले.

त्यानंतर ‘सोशल मीडिया आणि सामाजिक चळवळी’ याविषयावर संजय आवटे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. त्यांनी व्याख्यानाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन केली. ते म्हणाले, “डॉ. दाभोलकरांची हत्या करून त्यांचा विचार संपेल, ही सनातनी शक्तींची सर्वांत मोठी अंधश्रद्धा होती. दाभोलकरांच्या जाण्यानंतर समाजातील त्यांचा विचार कमी झाला नाही, तर उलट वाढलाच आहे. एक प्रकारे सनातनी शक्तींचा डाव त्यांच्यावर उलटला आहे. विचारांचे महत्त्व त्या विचारांच्या अनुयायांपेक्षा विरोधकांना अधिक जाणवते, म्हणून ते विचार मांडणार्‍याला विरोध करतात.” हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चिलीचे क्रांतिकारी कवी पाल्बो नेरूदांचे उदाहरण दिले.

‘सोशल मीडिया आणि त्याचे अर्थकारण’ यावर ते म्हणाले, “सोशल मीडिया हे पूर्णपणे भांडवली प्रारूप आहे. त्याची मालकी एकाच मार्क झुकेरबर्ग या व्यक्तीकडे आहे. सोशल मीडियाचे मूलतत्त्ववादी राजकारण आणि बेमूर्वतखोर धनदांडगे उद्योजकांचे गूळपीठ पाहायला मिळते. मात्र याचा अर्थ असा नाही की, हे नवे माध्यम वापरू नये; तर ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करावा. ज्या शिक्षणाच्या बळावर इथे जात-पितृव्यवस्था अस्तित्वात आली, त्याच शिक्षणाच्या बळावर ही व्यवस्था उलथवली देखील गेली, म्हणून सोशल मीडियाचा दुःस्वास करणे योग्य ठरणार नाही.”

“मार्क झुकेरबर्गचा उद्देश नफा कमावणं असला तरी सोशल मीडियामुळे माध्यमांचे अनायसे लोकशाहीकरण झाले आहे. जी गोष्ट मुख्य प्रवाहातील माध्यमांत येत नाही; आणि आली तरी त्यावर प्रत्येकाला त्या माध्यमांत व्यक्त होण्याचा अधिकार मिळतोच असे नाही. मात्र सोशल मीडियामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी नाकारलेल्या विषयावर चर्चा करता येते. हे एक प्रकारचे लोकशाहीकरणच आहे. मात्र सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. तिचा उपयोग अनेकदा दिशाभूल करण्यासाठीही केला जातो. म्हणून सोशल मीडिया वापरत असताना जमिनीवरील वास्तवाचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.”

शेवटी ते म्हणाले, “पोस्ट ट्रुथ’च्या जमान्यात सामाजिक चळवळींनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. या माध्यमाला ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’ असे म्हणून तुच्छवाद करू नये; तर हा मीडिया अधिकाधिक मानवता केंद्री बनवला पाहिजे.”

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार राहुल माने यांनी मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सुनील स्वामी यांनी पाडली. हा कार्यक्रम ‘झूम मीट’वर आयोजित करण्यात आला होता. तसेच याचे थेट प्रक्षेपण ‘यू ट्यूब’ चॅनेल व ‘फेसबुक पेज’वर चालू होते.

सौरभ बागडे, दापोली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे युट्यूब चॅनल

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फेसबुक पेज


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]