डॉ. छाया पोवार -
इंदुमती राणीसाहेब या छत्रपती शाहू महाराजांच्या सूनबाई. राजर्षीचे व्दितीय पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या त्या पत्नी. महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षणसंस्था, कोल्हापूर या संस्थेच्या संस्थापक म्हणून त्यांनी स्त्रीशिक्षणविषयक भरीव कामगिरी केली आहे. अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषदेचे सहावे अधिवेशन इ. स. 1949 साली नाशिक येथे पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान इंदुमती राणींनी भूषविले. अखिल भारतीय मराठा महिला परिषदेचे सातवे अधिवेशन कोल्हापूर येथे भरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरातील अनेक संस्थांच्या अध्यक्षपदी होत्या. रेडक्रॉस सोसायटीचे कार्य त्यांनी अनेक वर्षे केले. शिक्षण क्षेत्रासोबतच सार्वजनिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
इंदुमती राणीसाहेब यांचा जन्म 6 डिसेंबर, 1906 रोजी महागाव येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे मूळ नाव जमुना. त्यांचे वडील श्री. शंकरराव जगताप हे सासवड येथील इनामदार होते. त्या बालपणापासूनच चुणचुणीत आणि बुध्दिमान होत्या. 6 जून, 1917 मध्ये त्यांचा विवाह प्रिन्स शिवाजी यांच्या बरोबर मोठ्या थाटाने संपन्न झाला आणि इंदुमती राणीसाहेब म्हणून त्या शाहू महाराजांच्या कुटुंबात दाखल झाल्या. नवीन सून सुशील, देखणी. तेव्हा सासरच्या मंडळीत त्याचे खूपच कौतुक झाले. अशा कौतुकात एक वर्ष उलटले. पण अचानक शिकारी घोडा उलटून प्रिन्स शिवाजी महाराजांचे अपघाती निधन झाले आणि घर, संसार या सार्याची गोडी कळण्यापूर्वीच त्या विधवा झाल्या.
शाहू महाराजांना फार मोठा धक्का बसला. एकीकडे, पुत्रशोक आणि दुसरीकडे सुनेच्या आयुष्याची काळजी त्यांना बेचैन करू लागली. शाहू महाराजांनी पुरोगामी विचारांची अंमलबजावणी स्वत:च्या घरातूनच केली. त्यांनी सुनेला शिक्षण देऊन स्वयंनिर्भर बनवण्याचे ठरविले. सोनतळीच्या बंगल्यावर इंदुमतींच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. तेथे रोज सकाळी अकरा ते पाच या शाळेच्या वेळेनुसार पाच शिक्षक येऊन शिकवत. इंदुमतीदेवींना एकटे वाटू नये म्हणून आणखी चार मुलींच्या शिक्षणाची सोयही तेथे केली. इंदुमतीदेवींना वाघाचा एक बछडा पाळायला आणून दिला होता. तो सदैव त्यांचे बरोबर असे. सोनतळीवर राहून त्यांना घोड्याची रपेट, शिकार करणे, मोटार चालवणे सारे शिकविले. मॅट्रिक झाल्यानंतर इंदुमतीदेवींनी डॉक्टर बनावे, अशी महाराजांची इच्छा होती. दिल्ली येथील मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांशी, ‘ही तुमच्या कॉलेजची भावी विद्यार्थिनी,’ अशी ओळखही त्यांनी करून दिली होती. अर्विन बंगल्याचे ‘इंदुमती हॉल’ असे नामकरण करून तेथे इंदुमतीदेवींच्या वास्तव्याची व्यवस्था केली होती. इंदुमतीदेवींनी जुन्या रुढींमध्ये खितपत न पडता पडद्यातून बाहेर पडून आपली प्रगती करून घ्यावी. वैद्यकीय शिक्षण घ्यावे. दु:खी, पीडित लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी झटावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. पण 1922 मध्ये शाहू महाराज अचानक निघून गेले. त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांना सोडून द्यावे लागले. मात्र आपल्या दु:खाला आवर घालून त्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसल्या व उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्या. पुढे मात्र उत्तमोत्तम ग्रंथ गोळा करून वाचन, मनन यामध्ये त्यांनी आपले मन रमवले. वेळोवेळी मौलिक ग्रंथ प्रकाशनास मदत केली. विविध प्रकारचे ज्ञानकोश, रामायण-महाभारतादी महाकाव्ये, खंडकाव्ये, निरनिराळे धर्मग्रंथ, प्रवासवर्णने, प्राणिजगत, शिकारीजगत, कथा-कादंबर्या, काव्य, नाटके, तांत्रिक शिक्षणावरील व व्यवहारोपयोगी ज्ञान देणार्या इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषेतील ग्रंथांनी त्यांच्या ग्रंथभांडाराची विविध दालने सजविली होती. त्यांचा ग्रंथसंग्रह निवडक व मौलिक होता. माता आपल्या अपत्याची जशी काळजी घेते, तशी काळजी इंदुमतीदेवी आपल्या ग्रंथांची घेत असत. प्रत्येक पुस्तकाला चांगलेसे कव्हर घातलेले असे. त्या स्वत: पुस्तक अतिशय व्यवस्थितपणे हाताळीत. इंदुमतीदेवींना नाट्यसंगीताची फार गोडी होती. त्यांच्याकडे कितीतरी मौल्यवान ध्वनिमुद्रिका होत्या. वैयक्तिक आयुष्य कलासमृध्द रीतीने घालवीत असताना इंदुमतीदेवींनी सार्वजनिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. स्त्रीशिक्षण हे त्यांचे आवडते कार्यक्षेत्र राहिले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची अधिवेशने वेळोवेळी महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यात भरविली जात असत. मराठा शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाने निरनिराळ्या जिल्ह्यात शैक्षणिक कार्य चालू झाले. 1936 साली महाड येथे म. शि. प. चे 23 वे अधिवेशन भरले. यावेळी आजपर्यंत मराठा समाजाने स्त्रीशिक्षणाची अक्षम्य उपेक्षा केली आहे. यासाठी लहानशी का होईना मराठा महिला परिषद लवकरच भरविण्यात यावी, परिषदेने मराठा मुलींकरिता एक वसतिगृह पुणे येथे स्थापन करावे, असा ठराव करण्यात आला. त्यास अनुसरून म. शि. प.चे 24 वे अधिवेशन पुणे येथे 28 व 29 मे 1938 मध्ये झाले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचा एक स्वतंत्र विभाग म्हणून अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषद, पुणे येथे भरविण्यात आली (मराठा शिक्षण परिषद अहवाल – 1938). 1948 मे महिन्यात नाशिक येथे मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन भरले होते आणि याला जोडूनच अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषदेचे सहावे अधिवेशन नाशिक येथे भरले होते. या परिषदेच्या अध्यक्षा म्हणून इंदुमती राणीसाहेब उपस्थित होत्या. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा त्यांना लाभलेला. परिषदेच्या अधिवेशनात अध्यक्ष या नात्याने बोलताना त्यांनी स्त्रीशिक्षणाची आवश्यकता आणि ते साध्य करण्याच्या मार्गातील विविध अडथळे यांचा नेमका परामर्ष घेतला. नाशिकची महिला परिषद गाजली. साहजिकच परिषदेला जमलेल्या स्त्री-कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा जोम आला. आजवर त्यांना कार्याची निश्चित दिशा सापडत नव्हती. ती कार्यदिशा त्यांना सापडली. नाशिकच्या शांताबाई दौंडकर, अहमदनगरच्या हिराबाई भापकर, अमरावतीच्या विमलाबाई देशमुख, पुण्याच्या मालतीबाई शिरोळे आणि आनंदीबाई शिर्के व मुंबईच्या असईकर आदी महिला परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी उत्साहाच्या भरात पाच-सहा हजार रुपयांचा निधीही जमा केला होता. पण कार्याला मूर्तरूप कसे द्यावे, हे त्यांना समजले नव्हते. परिषदेला येणे व तेथे समाजसेवेबद्दल बोलणे आणि परिषद संपताच आपापल्या गावी परतणे. आता यापेक्षा क्रियाशीलतेचे एखादे तरी पाऊल पडावे, अशी इच्छा या महिला कार्यकर्त्यांत निर्माण झाली होती. साहजिकच परिषदेला जमलेल्या स्त्रियांनी पुढच्या उपक्रमांचे नेतृत्वही राणीसाहेबांनाच बहाल केले. पुढील सातवे अधिवेशन कोल्हापूर येथेच भरविण्याचे ठरवले.
अखिल भारतीय मराठा महिला परिषदेचे सातवे अधिवेशन मे 1953 मध्ये कोल्हापुरात भरले. बडोद्याच्या महाराणी शांतादेवी गायकवाड या महिला परिषदेच्या अध्यक्ष होत्या. इंदुमती राणीसाहेब, अक्कलकोटच्या राणीसाहेब, सावंतवाडीच्या राणीसाहेब, जहागिरदार, सरदार वगैरेंच्या ललना परिषदेस आवर्जून उपस्थित होत्या. स्त्रीशिक्षणाच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी एका व्यासपीठावर निरनिराळ्या स्तरातले स्त्री-प्रतिनिधी एकत्रित आले होते. शिक्षणाच्याद्वारा स्त्रियांची मने भोळसर रुढी-समजुतींमधून मुक्त होण्याची आवश्यकता इंदुमतीदेवींनी या परिषदेत आग्रहाने मांडली. मुलींच्या शिक्षणाच्या प्रश्नाचा ऊहापोह करताना त्या म्हणाल्या –
“ही परिषद शैक्षणिक असल्यामुळे येथे मुलींच्या शिक्षणाचा विचार करणे जरूर आहे. तुम्ही मुलांना व पुरुषांना शिक्षण द्याल; पण जोपर्यंत स्त्रीकडे दुर्लक्ष होईल, तोपर्यंत चालू परिस्थिती बरीचशी आहे तशीच राहील. पुरुषाचे शिक्षण हे एका व्यक्तीचे शिक्षण असते, असे म्हणतात ते सत्य आहे. मुलांच्या शिक्षणावर जितके आपण लक्ष देतो, त्याहून मुलींच्या शिक्षणावर अधिक लक्ष एकवटणे हे महत्त्वाचे आहे. हे ओळखून स्त्री-शिक्षणप्रसाराचे काम जोमाने सुरू केले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे ज्या योगे त्यांची मने भोळसट धार्मिक समजूतीतून मुक्त होतील, असे शिक्षण द्यावयास पाहिजे.” (कृ. गो. सूर्यवंशी पृ.118)
ही सातवी अखिल भारतीय मराठा महिला परिषद अनेक दृष्टीने संस्मरणीय ठरली. फक्त स्त्रियांसाठी एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे ठरले. तसेच परिषदेला आलेल्या निवडक स्त्री-पुरुषांची एक अनौपचारिक बैठक भरविण्यात आली. त्यामध्ये मुलींच्या शिक्षणक्रमात भावी गृहिणींना योग्य असा गृहशिक्षणाचा अंतर्भाव असावा, यावर विचारविनिमय झाला. अशा तर्हेचे शिक्षण देणार्या संस्था दिल्ली व बडोदा येथे आहेत. कोल्हापूर येथे अशा तर्हेची शिक्षणसंस्था काढण्याचे निश्चित करण्यात आले. ती जबाबदारी इंदुमतीदेवींनी स्वीकारली.
कोणतीही संस्था स्थापन करावयाची झाल्यास अगोदर तिचे कार्यकर्तेतयार व्हावे लागतात. हे सूत्र ध्यानात घेऊन 4 एप्रिल 1954 रोजी ‘ललिता विहार’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘ललिता विहार’च्या उद्घाटनास आनंदीबाई शिर्के यांना बोलवण्यात आले; तसेच शांताबाई दौंडकर व सौ. असईकर आदी मुंबईच्या भगिनी आल्या होत्या. घरच्या वातावरणातून सामाजिक वातावरणात स्त्रियांना आणण्याचा हा प्रयत्न होता. स्त्रियांचे संघटन करणे, सामाजिक प्रश्नांविषयी त्यांची समज आणि आस्था वाढविणे; तसेच शिक्षणाविषयीचे त्यांचे गैरसमज दूर करणे, ही ‘ललिता विहार’ या संस्थेची उद्दिष्टे होती. ‘ललिता विहार’मध्ये विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जात. कोणतीही शिक्षणसंस्था काढावयाची तर दोन बाबींची गरज उभी राहते – पैसा आणि जागा. पैशांच्या प्रश्नाची सोडवणूक शांतादेवी गायकवाड यांच्या औदार्याने आणि अखिल भारतीय महिला शिक्षण परिषदेने जमविलेल्या निधीने काही अंशी भरून काढली. जागेचा प्रश्न महाराणी विजयमाला छत्रपती यांनी जुन्या राजवाड्यातील काही भाग देऊन सोडविला.
महिला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन इंदुमतीदेवींनी संस्था उभारण्याचा चंग बांधला. बडोद्याच्या महाराणी शांतादेवी गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार केला. बडोद्याला एक गृहशास्त्र शिक्षण संस्था होती. तिच्या कार्यपध्दतीबद्दल, अभ्यासाबद्दल माहिती घेतली. 19 एप्रिल, 1954 रोजी समारंभपूर्वक गृहशास्त्र शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि संस्थेचे नाव ठेवले – ‘महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्था.’
महाराणी शांतादेवी गृहशास्त्र शिक्षणसंस्था ही मूळ संस्था. या संस्थेच्यावतीने मुलींच्या शिक्षणाबाबत निरनिराळे उपक्रम हाती घ्यावयाचे. त्यानुसार जून 1955 रोजी महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय सुरू केले. एस.एस.सी. झालेल्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालय होते. तसेच कमी शिकलेल्या मुलींसाठी ‘औद्योगिक कलाभवन’ सुरू केले. या कलाभवनात शिवणकाम, भरतकाम इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जाते. जून 1955 पासून महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय सुरू केले. गृहशास्त्राचे मराठी माध्यमातून शिक्षण देणारे हे महाराष्ट्रातील पहिले विद्यालय आहे. 1961 मध्ये मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स व 1970 मध्ये मॉडेल हायस्कूलची निम्न माध्यमिक शाखा सुरू झाली. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक अध्यापिका विद्यामंदिर आणि एक माँटेसरी स्कूल अशा चार-पाच संस्था सुरू करण्यात आल्या. परगावच्या मुलींना व नोकरीनिमित्त येणार्या स्त्रियांना कोल्हापूरसारख्या शहरात एकटे राहावे लागते. ही गोष्ट विचारात घेऊन मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. या संस्थांचे काम व्यवस्थित चालू आहे. महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षणसंस्था ही कोल्हापुरातील स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालविलेली एक उत्कृष्ट संस्था आहे.
इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरातील अनेक संस्थांच्या अध्यक्षपदी होत्या. रेडक्रॉस सोसायटीचे कार्य त्यांनी अनेक वर्षेकेले. दुसर्या महायुध्दात रेडक्रॉसचे कार्य कोल्हापुरात चालू होते. जखमी सैनिकांना मदत पाठविणे चालू होते. त्याचे बरेचसे नेतृत्व इंदुमती राणीसाहेबांकडे होते. अशा उपयुक्त कार्यात दरमहा आपली मदत देऊन जरूर ते सहाय्य करण्यात त्या पुढाकार घेत.
राजाराम कॉलेजविषयी इंदुमतीराणींना विशेष जिव्हाळा वाटत असे. कॉलेजच्या नवीन इमारतीसाठी गावाबाहेर उत्तम जागा निवडण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला. सागर माळाची प्रशस्त जागा कॉलेजसाठी मिळविण्याच्या कामी राणीसाहेबांचे बहुमोल सहाय्य झाले. ही जागा रीतसर ताब्यात घेण्याचा समारंभही त्यांच्याच हस्ते झाला होता. बांधकाम सुरू झाल्यानंतर फिरण्याच्या निमित्ताने रोज सायंकाळी त्या सागर माळाला जात असत व काम पाहत असत. शिवाजी विद्यापीठ समितीचे कार्यालय राजाराम कॉलेजमध्ये स्थापन झाले, त्या वेळी या कार्याला आशीर्वाद व प्रोत्साहन देण्यासाठी इंदुमती राणीसाहेब उपस्थित होत्या. शिवाजी विद्यापीठाची वाढ होऊन त्याचा नावलौकिक व्हावा असेच राणीसाहेबांना वाटत असे.
माईसाहेब बावडेकरांनी स्थापन केलेल्या माँटेसरी असोसिएशन या संस्थेचे अध्यक्षपद इंदुमती राणींच्याकडे होते. मादाम मॉटेसरी कोल्हापुरास आल्या, तेव्हा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या आणि बालशिक्षणाबाबत चर्चा केली.
1961 अखेर दुसरा महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला. या महोत्सवाच्या उपाध्यक्ष इंदुमती राणीसाहेब होत्या. रत्नागिरी नगरपालिकेतर्फे उभारलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी इंदुमती राणीसाहेब रत्नागिरीस हजर राहिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये शाहू छत्रपतींच्या तैलचित्राचे अनावरण करण्यासाठी त्या सातार्यास उपस्थित राहिल्या. राजामाता जिजाबाई साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण इंदुमती राणीसाहेबांच्या हस्ते झाले, तेव्हा इंदुमती राणीसाहेबांना केवढी तरी धन्यता वाटली!
मिसक्लार्क हॉस्टेलचा सुवर्णमहोत्सव, वैश्य बोर्डिंगच्या इमारतीचे उद्घाटन, शाहू बोर्डिंगमधील पी. बी. पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार-समारंभ, मेरी नसन स्कूलच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन इत्यादी वसतिगृहांच्या समारंभात त्यांनी आपुलकीने भाग घेतला होता. ही वसतिगृहे राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची प्रतीके. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यातील आघाडीचे शिलेदार, त्यांची प्रगती पाहणे इंदुमतीदेवींच्या दृष्टीने खरोखर आनंददायक होते. राजाराम हायस्कूल, राजमाता जिजाबाई हायस्कूल, निपाणीचे देवचंद शहा कॉलेज इत्यादी शाळा-कॉलेजांच्या स्नेहसंमेलनांच्या प्रमुख पाहुण्या म्हणून इंदुमतीदेवी हजर होत्या, ते वंचित वर्गात शिक्षणाचा विस्तार किती पसरलेला आहे, हे पाहण्यासाठीच.
करवीरला ग्रंथालय परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक वि. द. घाटे हे होते. इंदुमतीदेवी यांनी या ग्रंथालय परिषदेचे उद्घाटन केले. 1961 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जन्मशताब्दी भारतात सर्व ठिकाणी साजरी होत होती. कोल्हापुरात या कामी इंदुमती राणींनी पुढाकार घेतला.
ज्येष्ठ लेखिका आनंदीबाई शिर्के यांच्याशी एका सभेच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. सोंडूरच्या राणीसाहेबांनी परिचय करून देताना “या आनंदीबाई शिर्के,” असे सांगितले. त्यांना मध्येच थांबवत इंदुमतीराणी म्हणाल्या, “अहो एवढं कशाला सांगता? मला त्यांची माहिती आहे. त्यांच्या गोष्टी मी वाचल्या आहेत.” आणि त्यांच्या एक-दोन पुस्तकांची नावे त्यांनी सांगितली. पाश्चात्य वाङ्मयासोबतच समकालीन मराठी साहित्याचेही त्यांचे वाचन अद्ययावत होते. इंदुमतीदेवींना प्रसिध्दीचा सोस नव्हता. त्यांच्या संस्थेतील कार्यकर्त्या भगिनींनी त्यांची एकसष्टी साजरी करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला. मात्र सहकारी भगिनींच्या भावना लक्षात घेऊन घरगुती समारंभ करण्यास मान्यता दिली.
कोल्हापूर राजघराण्याच्या परंपरेनुसार त्यांच्या घरी कोणालाही भेटण्यास मज्जाव नसे. लहानापासून थोरापर्यंत सार्यांचे येणे- जाणे असे. सुशिक्षित व विद्वानांची जितकी कदर केली जाई, तितकीच एखाद्या साध्या-भोळ्या अशिक्षित शेतकर्यांचीही. इंदुमतीदेवी लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वांशी समानतेने वागत. अमेरिकन मिशनच्या कार्यकर्त्यापासून नीलगिरीच्या पर्वतराजीत राहणार्या तोडा आदिवासीपर्यंत निरनिराळ्या पातळीवरील माणसांशी त्यांचा संपर्क असे. मानवी समाजाच्या विविध स्तरातील माणसे इंदुमतीदेवींच्या गोतावळ्यात होती. राजघराण्यातील स्त्रीने शिक्षण घेणे, हे त्यावेळी एक दिव्यच होते. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण-मनन-चिंतन करून त्या-त्या विषयाचे सखोल ज्ञान त्यांनी संपादन केले होते. कोणत्याही विषयावर त्यातील अधिकारी व्यक्तीशी त्या चर्चा करू शकत. त्यांनी कला, शिक्षण, ज्ञान संपादन करून त्यातच समाधान मानले नाही, तर नवीन पिढीने त्याचा लाभ घ्यावा, अशी त्यांची नेहमी धडपड असे. 30 नोव्हेंबर 1971 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या तेजस्वी जीवनाच्या स्मृती विविध संस्थांमधून कायम आहेत.
संपर्क : 9850928612
संदर्भ : 1. स्मृतिसुगंध – महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्था कोल्हापूर-29 एप्रिल 1972.
2. कृ. गो. सूर्यवंशी- इंदुमती राणीसाहेब-लेखन वाचन भांडार पुणे-1976.