डॉ. सुनिल भगत -
एका सामान्य, परांपरागत चालीरीती पाळणार्या अंधश्रद्धाळू ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले, आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात निरक्षर लोकांना शिक्षण देणे, साक्षर करणे आणि शैक्षणिक प्रबोधन करण्यासाठी संघटक म्हणून कार्यरत असलेले, रोजगार हमीवरच्या कामगारांसाठी आंदोलन करून तुरुंगवास भोगणारे रामभाऊ डोंगरे पुढे लष्करात गेले. तेथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. काश्मीरमधला दहशतवाद अनुभवला, त्याच्याशी मुकाबला केला. कारगील युद्धात भाग घेतला आणि लष्करातील सेवानिवृत्तीनंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनानंतर सनातन्यांच्या दहशतवादी आव्हानाला तोंड देण्याच्या इर्षेने अंनिसचे काम करू लागले. अंनिसच्या कामात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. अनेक मोहिमा, यात्रा यांचे आयोजन लष्करी शिस्तीत करत अंनिसची संघटना संपूर्ण विदर्भात पोहोचविण्याचे काम ते धडाडीने करत आहेत. त्यांची मुलाखत नागपूर जिल्हा शाखा प्रधान सचिव व स्तंभ लेखक डॉ. सुनिल भगत यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य असलेल्या रामभाऊंना मी त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले,
रामभाऊ ः माझा जन्म मुसेवाडी, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर येथे २ ऑगस्ट १९६५ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. घरची गरिबी. लहान भाऊ आणि दोन लहान बहिणी असा मोठा परिवार. माझे वडील कपूरचंद डोंगरे आणि आई लक्ष्मीबाई डोंगरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असत. त्यामुळे माझे लहानपण पूर्ण हलाखीच्या परिस्थितीत गेले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुसेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर रामटेक येथे बारावी पर्यंतचे शिक्षण. बारावीनंतर इतर खाजगी नोकर्या केल्या व १९९० मध्ये लष्कराच्या नोकरीमध्ये रुजू झालो आणि नंतर पुढे मिलिटरीत नोकरी करता करता पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. माझे आई-वडील व नातेवाईक हे परपंरागत हिंदू वा तत्सम पूजा-अर्चा, धार्मिक परंपरा, कर्मकांड पाळत असत. व्यतिगतरित्या महादेवाला जाणे, स्थानिक श्रद्धा व अंधश्रद्धा पाळणे हे कालानुरूप सुरू होते. माझा लहान भाऊ कैलाश याचे जावळ सात वर्षे काढलेलेच नव्हते. कारण पंचमढीच्या महादेवाला तसा नवस बोलला गेला होता. त्यामुळे त्याचे केस वाढलेले होते, सात वर्षांनंतर महादेव पंचमढी येथे ते जावळ रीतीरिवाजानुसार काढण्यात आले. माझे मोठे वडील शंकराचे भत होते. दर शिवरात्रीला गावातील लोकांना ते जेवण देत असत. त्यात सर्व कुटुंब आस्थेने सहभागी होत असे. मी त्यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांआधी हे गावजेवण बंद केले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास झाला. माझ्या मामीच्या अंगात देवी येत असे. घट मांडणे, नवरात्र आणि इतर हिंदू सण मोठ्या आस्थेने पाळले जात असत. त्यात नवरात्रामध्ये घराच्या बाजूला माझ्या मित्राच्या अंगात देवी आणि त्याच्या भावाच्या अंगात पीर येत असे. अशी एकूण माझ्या कुटुंबाची अंधश्रद्धाळू पार्श्वभूमी होती, तर आजूबाजूलाही तसेच वातावरण होते. मोहल्ल्यामध्ये गणेश चतुर्थीला दहा दिवस धुमधडाक्यात गणपती बसवला जात असे. गणपतीची आरती व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात असत. शाळेमध्ये सरस्वती पूजन, आरती केली जात असे. त्या संपूर्ण काळात बौद्ध विचारांची कोणतीच जाण मला आलेली नव्हती.

मग असे अंधश्रद्धाळू कौटुंबिक, सामाजिक वातावरण असूनही तुम्ही कसे काय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांकडे वळला?
१९८२ मध्ये आठवीत गेल्यानंतर जिल्हा परिषद शाळा सोडून एका खाजगी शाळेत शिकत असताना वर्गात मी प्रथम क्रमांक मिळवला. अगोदर प्रथम येणार्या मुलाचा नंबर घसरला व त्या मुलाच्या अंगात देवी आली. जी कित्येक वर्षांपासून येत असे आणि तो देवीच्या रुपात म्हणू लागला की, आज संध्याकाळी शाळेला आग लागेल व शाळा जळून भस्मसात होईल. मी जाम घाबरलो आणि शिक्षकांना ही बातमी दिली, ते म्हणाले, “जे काही होईल, ते आपण पाहून घेऊ” व दुसर्या दिवशी असे काहीच घडले नाही. या घटनेने माझ्या विचारांना चालना मिळाली. अशा शिव्याशापाने काही होत नाही यावर विश्वास बसला. त्यात मी तुकडोजी महाराज प्रेरित भजन मंडळामध्ये जायला लागलो होतो. त्या भजन मंडळात तुकडोजी महाराजांची भजने म्हटली जात, ती धार्मिक अंगानेच असत. पण पुढे पुढे जसा त्याचा भावार्थ समजू लागला तसा मी जास्त विचार करू लागलो. एका बाजूला हे चालू होते, तर दुसर्या बाजूला मी महाराष्ट्र राज्य शासन संचलित राष्ट्रीय प्रौढ शिक्षण संस्था रामटेक अंतर्गत वय १८ ते ३५ वर्षे पर्यंतच्या निरक्षर लोकांना शिक्षण देणे, साक्षर करणे आणि शैक्षणिक प्रबोधन करण्यासाठी संघटक म्हणून कार्यरत होतो तेथे काम करत असताना मी मार्गदर्शक म्हणूनही काम पहायचो. वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन लोकांना विविध योजना, महापुरुषांचे विचार सांगायचो आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचो. त्यातून माझा सर्वसामान्य लोकांशी संबंध येऊ लागला. मला लोकांचे प्रश्न कळू लागले.
ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न फारच महत्त्वाचा होता. मुसेवाडी येशील मजुरांना रोजगार नव्हता, तर गावातील लोक व्यसन, पत्ते याकडे वळले होते. तेव्हा महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजनेंतर्गत लोकांना वर्षातून ९० दिवस कामाची हमी दिली होती. तो धागा पकडत गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी आम्ही रामटेक तहसीलदाराची भेट घेतली, पण त्यांनी होकार देऊनसुद्धा काम देण्यास टाळाटाळ केली. असे दोन-तीन वेळा झाले. मग आम्ही रामटेक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आता पुढे मोर्चा काढल्यास अटक करण्यात येईल अशी धमकी देत होते. पण अशी काही कारवाई करीत नव्हते आणि आम्हाला वाटत होते की, हे काहीच कारवाई करीत नाही तर सूचना, परमिशन घेण्याची गरज नसेलच. त्यामुळे काम सुरू झाले नाही की आम्ही आठवड्यात एक मोर्चा काढत असू. तहसिलदाराचे म्हणणे होते, सरपंच सांगतो की, गावामध्येच शेतांचे भरपूर काम आहे, त्यामुळे गावात कामांची काहीही आवश्यकता नाही. त्यामुळे गावातील अल्प भूधारक शेतकरी शेतमजूर वर्गाने एकी निर्माण करून तहसील कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदाराने या योजनेंतर्गत शेतकर्यांना, मजुरांना खडी फोडण्याच्या कामाला लावले.
हे सगळे करत असताना आम्ही १५ ऑगस्ट १९८७ च्या रात्री साडेआठच्या सुमारास मजूर युनियनचा काळा झेंडा फडकावला. रोजगार हमी योजनेमुळे गावातल्या जमीनदारांना मजूर मिळत नव्हते. म्हणून गावातील सधन लोक मोठ्या प्रमाणात चिडून होते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की, या मजूर लोकांनी लाल झेंडा फडकावला. हे देशद्रोहाचे कृत्य आहे आणि यांना अटक केली पाहिजे. ते शासनाविरुद्ध आवाज उठवत आहेत. या तक्रारीमुळे मला आणि इतर पाच कार्यकर्ते मित्र यांना पोलिसांनी अटक केली. आमची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सेंट्रल जेलमध्ये पंधरा दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर जामिनावर सुटका झाली. पण आम्हाला जरी तुरुंगवास घडला असला तरी आमच्या आंदोलनाला यश मिळाले. आंदोलन केल्याने रोजगार हमी योजनेचे काम बहुतांश ९० दिवसांपर्यंत सुरू राहत असे. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शेतकरी शेतमजुरांसाठी गावकर्यांना संघटित करण्यासाठी वरील घटना प्रेरक ठरली. ही योजना त्यानंतर सात-आठ वर्षे सुरू राहिली व लोकांना काम, रोजगार मिळत राहिले.

ही सर्व आंदोलने चालू असताना तुम्ही १९९० साली लष्करात भरती झाला. त्या तुमच्या लष्करी कारकिर्दीबद्दल सांगा.
मी पहिल्यांदा ११८ इन्फट्री बटालियन प्रादेशिक सेना नागपूर येथे ग्रेनेडीयर म्हणून रुजू झालो. पुढे स्पेशल पोलिस ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर १९९२ मध्ये तीन महिने वेपन ट्रेनिंग सेंटर कॅडेर WT मध्ये शस्त्रांबाबत प्रशिक्षण घेतले आणि १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरला माझी बदली झाली. तेव्हा तेथे दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ह्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी युनिट श्रीनगर एरियात होती. तेथे तेव्हा Quick reaction team Road (तत्काळ प्रतिक्रिया दस्ता), रोड ओपनिंग पार्टी, पोस्ट ड्यूटी, डे-नाईट पहारा देणे, रोडवर जाऊन स्फोटक पदार्थांचा शोध घेणे व त्यानंतर लष्कराच्या वाहनांना सुरक्षितता प्रदान करणे व इतर तत्सम कामे करावी लागत असत. त्यानंतर १९९७ मध्ये युनिट एज्युकेशन इन्स्ट्रक्टरचा कोर्स आर्मी एज्युकेशन कोर पंचमडी (एम.पी.) येथे पूर्ण केला आणि ‘सर्टिफिकेट इन टीचिंग’ हे प्रमाणपत्र मला मिळाले. मग मी युनिटमधील दहावी अनुत्तीर्ण सैनिकांना प्रशिक्षण देऊ लागलो.
१९९८ मध्ये जम्मू-काश्मीर राज्यात अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शासनामार्फत माझ्या ११८ इन्फंट्री बटालियन, नागपूरचे तत्कालीन म. रा. बांधकाम विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. फील्डचा आपला टर्न पूर्ण करून ११८ इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना नागपूर येथे आली असता एका महिन्याने आम्हाला एका शीख युनिट करिता एक्स्ट्रा फोर्स म्हणून दिल्लीला पाठविण्यात आले. त्यानंतर दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीवरून श्रीनगरला Advance party म्हणून श्रीनगर येथील प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. एक महिन्याचे प्रशिक्षण केल्यानंतर अनंतनाग येथे हायगाऊंडवर खालून येणार्या पलटणीला प्रशिक्षण देण्यासाठी इन्स्ट्रक्टर म्हणून आम्ही सर्व जण सज्ज होतो.
त्या वेळेस एके रात्री पोस्ट ड्यूटी देत असताना दहशतवादी कारवाया आमचे साथी मिलिंद मानवटकर यांना आढळल्या. त्यांनी इशारा दिला. सर्व पोष्ट जाग्या झाल्या आणि पोष्ट कमांडर म्हणून मी जिथे दहशतवादी कारवाई दिसत होती, तिथे फायरिंग करण्याचे आदेश दिले व फायरिंग करण्यात आली. त्यामुळे हालचाली थांबल्या. सकाळी दहशतवाद्यांचे मोजे, टॉर्च वगैरे त्या ठिकाणी आम्हाला सापडले.

तुमचा सुप्रसिद्ध कारगील युद्धातही सहभाग होता, त्याबद्दल काही सांगा.
३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ असे ६० दिवस कारगील युद्ध सुरू होते. त्या वेळेस आमचे युनिट श्रीनगर येथे होते. तेथे कारगील युद्ध सुरू झाले आहे असे कळले. तेव्हा तत्काळ आमचे सर्व युनिट खालून श्रीनगर हाय ग्राउंडला येऊ लागले होते. आमच्या कंपनीला बम १, बम २, बम ३ आणि बम ४ येथे नियुत करण्यात आले. याच ठिकाणावरून आम्ही कारगील युद्धाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. माझा लष्कराच्या ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय अशा लष्करी कारवायांमध्ये सहभाग होता. तसेच मी सियाचीन या अत्यंत दुर्गम बर्फाच्छादित उंच ठिकाणीही सेवा बजावली आहे.
त्यानंतर मी डिसेंबर २००२ ते फेब्रुवारी २००३ दरम्यान सेक्शन कमांडर कोर्स, महूमध्ये पूर्ण केला. त्यासोबत इतरही प्रशिक्षण वर्ग केले, या सेवेत पुलगांव, खुनमु-श्रीनगर, कीगांव-बारामुल्ला येथे कामे केली व शेवटी श्रीनगर येथून सेवानिवृत्ती पत्करली.
सेवानिवृत्त झाल्यानंतर सिक्युरिटी सुपरवायजर म्हणून मी १ एप्रिल २०१० ते २० जुलै २०११ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी काम केले व त्यानंतर माजी सैनिक म्हणून जुलै २०११ मध्ये होशंगाबाद येथे शेंबरी हरीचंद येथे रेल्वेमध्ये २०१८ पर्यंत सेवा दिली व त्यानंतर नागपूरला बदली झाली. रेल्वेच्या डीआरएम ऑफिस नागपूरमध्ये ऑगस्ट २०२५ पर्यंत नोकरी करून सेवानिवृत्त झालो.

तुमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी केव्हा आणि कसा संबंध आला?
मुळात मला सामाजिक कामाची आवड सुरुवातीपासूनच होती. लष्करात जाण्याच्या आधी माझा संबंध कामगार चळवळीशी होताच. माझी सामाजिक कामाची आवड हेही एक कारण माझे लष्करात जाण्यामागे होते. पण लष्करात गेल्यावर बाहेरच्या जगाशी संपर्क तसा कमीच येतो. त्यामुळे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्या सामाजिक संस्थेशी जुळून काम करावे याच्या शोधात मी होतो. त्यासाठी चळवळीतील जुन्या-नव्या मित्रांना भेटत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. त्यांचे काम बघत होतो. त्या सगळ्या शोधात मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम महत्त्वाचे वाटले. समाजात बोकाळलेल्या अंधश्रद्धा दिसत होत्याच. त्या नष्ट केल्याशिवाय समाजासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव होत होती. हे एक आव्हानात्मक काम आहे आणि आपण ते केले पाहिजे असे मला वाटू लागले. नागपुरात जरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम होते, तरी ते आता ठप्प झाले होते, जुने कार्यकर्ते तितक्या तडफेने काम करत नव्हते. मग यात कोण काम करतात ते कसे करतात हे समजून घेण्याकरिता काही लोकांची भेट घेतली. या शोधात मग माझा चंद्रकांत श्रीखंडे, विजयाताई श्रीखंडे यांचेशी संपर्क झाला आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रापासून बरीच पुस्तके मला विकत दिली आणि मला त्या वेळी २० रुपये घेऊन समितीचा सभासद करून घेतले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची ओळख करून दिली. तेवढ्यात मला जुलै २०११ ला मध्य प्रदेश येथे नोकरी लागली. रेल्वेची नोकरी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे असल्याने नागपूरला शनिवार-रविवार दोन दिवस येणे असे. त्या वेळेस मग मी चंद्रकांत श्रीखंडे, विजयाताई श्रीखंडे आणि इतर कार्यकर्त्यांना भेटत असे. चर्चा करत असे, त्याच वेळेस मी डॉ. दाभोलकरांची पुस्तके वाचली. माझ्या नोकरीमुळे मी त्यांना भेटू जरी शकत नव्हतो, तरी चंद्रकांत श्रीखंडे, विजयाताई श्रीखंडे आणि इतर कार्यकर्त्यांकडून डॉ. दाभोलकरांबद्दल एकत होतो. त्यांच्याबद्दलची एक आदराची प्रतिमा माझ्या मनात तयार होत होती. तेवढ्यात २० ऑगस्ट २०१३ ला त्यांच्या खुनाची बातमी येऊन थडकली आणि मला प्रचंड धका बसला. पण त्या खुनानंतर मी चांगलाच अस्वस्थ झालो आणि जोमाने काम करण्याचा निश्चय केला. प्रत्येक मीटिंग असो, कार्यक्रम असो, सुट्टी घेऊन हजर राहू लागलो. जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आंदोलन करण्यात आले. यामध्ये मीदेखील सामील झालो आणि मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी पका जोडला गेलो.

त्यानंतर तुम्ही केवळ नागपुरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात अंनिसच्या कामाचा धडाका लावला. त्या बद्दल सांगा.
हो. त्यानंतर मी खूपच जोमाने कामाला लागलो. जेमिनी कडू, चंद्रकांत मेहेर, संजय शेंडे, चंद्रकांत श्रीखंडे, मधुकर दंदरे, डॉ. सुनील भगत, श्याम निकोसे, विजया श्रीखंडे याच्या उपस्थितीत आम्ही उत्तर नागपूर शाखेची स्थापना केली. त्या शाखेतर्फे तत्कालीन उत्तर आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या उपस्थितीत निंबुणाबाई तिरपुडे नर्सिंग स्कूल, कामठी रोड, नागपूर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्या शिबिराला १०० कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरातून आम्हाला जे कार्यकर्ते मिळाले त्यांच्या साहाय्याने आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त १ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्यव्यापी युवा संकल्प परिषद आयोजित केली. हा आमचा मोठा कार्यक्रम होता. या परिषदेत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील राष्ट्रीय-सेवा योजनेचे विद्यार्थी युवक-युवती सहभागी झाले. ५००-८०० तरुण युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी प्रामुख्याने ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे, ‘लोकमत’चे संपादक श्री. मेहत्रे उपस्थित होते. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. संजय शेंडे, चंद्रकांत श्रीखंडे, विजया श्रीखंडे, डॉ. सुनील भगत, देवयानी भगत आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी यासाठी बरेच परिश्रम घेत ही परिषद यशस्वी केली.
आमचा दुसरा मोठा आणि राज्यव्यापी कार्यक्रम म्हणजे राज्य महिला परिषद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित द्विदिवसीय राज्यस्तरीय महिला परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, कामठी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला १५० च्या आसपास उपस्थित महिला संपूर्ण राज्यातून आल्या होत्या. या वेळी विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्ये आणि इतर विषयांवर कार्यक्रम सादर करण्यात आले. या परिषदेसाठी मी, डॉ. सुनील भगत, चित्तरंजन चौरे, गौतम पाटील, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, देवयानी भगत, प्रा. पुष्पा घोडके, वर्षा सहारे, सुषमा शेवडे, मंगला गाणार, विजया ठाकरे, इंदू उमरे, शीला डोंगरे, चंदा मोटघरे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारणीची द्विदिवसीय बैठक आम्ही नागपूर येथे हिंगणा या ठिकाणी १२-१३ सप्टेंबर २०२३ रोजी घेतली. यानिमित्त राज्यातून १५०-२०० कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनाला मुता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर आणि इतर राज्यकारिणी सदस्य उपस्थित होते. नागपूर जिल्हा शाखेच्या डॉ. सुनील भगत, कल्पना लोखंडे, चित्तरंजन चौरे, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, देवयानी भगत, सविता मेंढे, वसंत मोहिले, विजया श्रीखंडे, सुषमा शेवडे, मंगला गाणार, इंदू उमरे आणि माझ्यासकट इतर कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले होते.

आमच्या उत्तर नागपूर शाखेचा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे स्मशान सहल. २० जून २०१६ ते कोरोनापर्यंत दरवर्षी नारा घाट ते वैशालीनगर घाट स्मशानभूमी येथे रात्री नऊ ते १ वाजेपर्यंत स्मशान सहल आयोजित करायचो. समाजातील भूत, पिशाच, मुंजा, हडळ आणि इतर अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा स्मशानाशी निगडित आहेत. त्या दूर करण्यासाठी ही सहल आम्ही आयोजित करत होतो. या स्मशानभूमीवर जवळपास १०० कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग असायचा. या सहलीसाठी मी, दीपक गजभिये, शिवकुमार फुले, पुष्पा बोंडे, संजय शेंडे, मधुकर धंदरे, चंद्रकांत श्रीखंडे, विजया श्रीखंडे, डॉ. सुनील भगत, देवयानी भगत, डॉ. सुशील मेश्राम खूप परिश्रम घ्यायचो. ही स्मशान सहल यानंतर दरवर्षी कोरोना काळापर्यंत सुरू होती. याच स्मशानभूमीवर अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी नेत्रदान, देहदान, रतदान करण्याचे आवाहन करणार्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
कोरोना काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि म्हणून कोरोना काळात पीडितांना बिस्कीट, तेल, साखर, तांदूळ, पाच किलो धान्य इत्यादी सामग्रीचा जवळपास १००० किट वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच कोरोना काळात राज्यस्तरीय ऑनलाईन नाट्य स्पर्धा नागपूर शाखेने आयोजित केली होती. यामध्ये राज्यातून बर्याच शाखांनी भाग घेतला होता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लवकर व्हावा, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांना ताबडतोब अटक करावी म्हणून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या २० तारखेला हिंसा के खिलाफ मानवता की ओर, निर्भय मॉर्निंग वॉक, धरणे आंदोलन याचे आयोजन करण्यात यायचे. सोबतच आमदार, खासदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन पत्र सादर केले जायचे. एक वर्षी आम्ही बाबाचा चमत्कार आणि मुलीवर बलात्कार हे पथनाट्यही घेतले होते. या सर्व आंदोलनांसाठी मी विशेष प्रयत्न करायचो.
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमी निमित्त दीक्षा भूमी येथे स्वच्छता अभियान हा उपक्रम सातत्याने दरवर्षी राबवला जातो. सोबत परतीच्या दिवशी अल्पोपाहार वितरण आणि संगीताचा कार्यक्रम घेण्यात येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध जयंती महोत्सव निमित्त आयोजित चमत्कार प्रात्याक्षिक सादरीकरण, जन प्रबोधन यात्रा, जोडीदारांची विवेकी निवड, संविधान बांधिलकी महोत्सव, कवी संमेलन, प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान, आंतरराष्ट्रीय महिला दिन, प्रबोधनपर व्याख्याने असे कार्यक्रम नागपूर शाखा नियमितपणे घेत आहे.

नागपूर बाहेरही विदर्भात अंनिसचे काम वाढावे यासाठी तुम्ही ज्या विविध मोहिमा आखल्या, यात्रा काढल्या, शिबिरे घेतली त्याबद्दलही सांगा.
आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ३ एप्रिल २०१६ रोजी संविधान प्रबोधन यात्रा कार रॅली नागपूर जिल्ह्यातील विविध गावांमधून काढली. या वेळी विविध समविचारी, पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांनी सहभाग नोंदवला. नागपूर येथील इंदोरा इथून सुरु होऊन जिल्ह्यातील कोराडी, खापरखेडा, पारशिवनी, पेंच, आंबाझरी, महादुला कोलीतमारा या ठिकाणी कार रॅलीद्वारे सभा घेऊन संविधानाचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. ‘कोर्ट’ चित्रपट अभिनेता वीरा साथीदार, ‘जयंती’ चित्रपट दिग्दर्शक शैलेश नरवाडे, सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रकाश पाटणकर हे पाहुणे म्हणून या यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेत माझ्या बरोबरीने संजय शेंडे, मधुकर धंदरे, चंद्रकांत श्रीखंडे, विजया श्रीखंडे, डॉ. सुनील भगत, देवयानी भगत आणि इतर प्रमुख पदाधिकार्यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले. कार रॅलीमध्ये जवळजवळ ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवकुमार फुले, दीपक गजभिये, पुष्पा बोंदाडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शहीद स्मारक १० नं. पूल इंदोरा नागपूर येथून कामठी, कन्हान, मनसर, रामटेक येथे जनप्रबोधन यात्रा आयोजित केली होती. यामध्ये समविचारी संघटनांनी सहभाग घेतला.
नागपूर जिल्ह्यातील विविध गावे, मोहल्ला, गार्डन, चौक, वस्तीमध्ये संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत संविधानाचा प्रचार-प्रसार केला. यानिमित्त कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर, कामठी, कन्हान, खापरखेडा, रामटेक, पारशिवनी, उमरेड, कुही, मौदा, हिंगणा या ठिकाणी संविधान प्रबोधन कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते.
पूर्व विदर्भात नागपूरवरून जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. वर्धा, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मुल, गडचिरोली, ब्रह्मपुरी, नागभीड, गोंदिया, भंडारा, रामटेक आणि नागपूर येथे आठ दिवस घेण्यात आली होती. समारोपाला मुता दाभोलकर आणि समाजकल्याण आयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड व विजया श्रीखंडे, चित्तरंजन चौरे, देवानंद बडगे, विजयकांत पाणबुडे, डॉ. सुनील भगत, देवयानी भगत, विजया ठाकरे, अरुण भगत आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी, पोलीस, होमगार्ड, पोलीस पाटील आणि इतर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.
उड्डाण अभियान हे आमच्या नागपूर जिल्ह्याचे एक आगळे वेगळे अभियान आहे. जादूटोणा विरोधी कायदा गावातील लोकांना माहीत व्हावा, हा उद्देश घेऊन एक दिवस गावात उड्डाण अभियानांतर्गत अंधश्रद्धा निगडित विविध प्रश्न सोडवले जातात. एकदिवसीय कार्यक्रमात पूर्ण गावात किती प्रमाणात अंधश्रद्धा असतील याचा आढावा घेतला जातो आणि प्रश्नावलीच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन केले जाते. सायंकाळी चमत्काराचे सादरीकरण केले जाते. हा उपक्रम दरवर्षी वेगवेगळ्या गावांत राबवला जातो.

२०२४ च्या डिसेंबर महिन्यात वरुड येथे आयोजित न्यू इंग्लिश स्कूल, वरुड शताब्दी महोत्सव सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरतर्फे जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण व चमत्कार सादरीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी ३०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुनील भगत, डॉ. विकास होले, गौतम पाटील, शोभा पाटील, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, देवयानी भगत आणि इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास ५००० अंगणवाडी सेविकांना हे जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण व चमत्कार सादरीकरण प्रदान करण्यात आले. नागपूर जिल्हा अंतर्गत १३ तहसील कार्यालयात या पथकाने हे अभियान राबविले होते. डॉ. सुनील भगत, चित्तरंजन चौरे, गौतम पाटील, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, देवयानी भगत, सुषमा शेवडे, मंगला गाणार, विजया ठाकरे आणि इतर कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.
२०२५ च्या सुरुवातीला नागपूर येथील विविध आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कार सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दोन दिवसीय शिबिर १६-१७ ऑगस्ट २०२५ रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त पत्रकार श्री. बोरकर, रामभाऊ डोंगरे, डॉ. सुनील भगत, चंद्रशेखर मेश्राम, देवयानी भगत, प्रा. पुष्पा घोडके आणि इतर मान्यवर स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यानिमित्त सम्राट हटकर, डॉ. माने आणि डॉ. सुनील भगत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार, डॉ. विवेक जाखी, चंद्रशेखर भडंगे आणि श्री. बोरकर यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नागपूर येथे दक्षिण, पूर्व, पश्चिम शाखेची स्थापना करण्यात आली. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात पाच शाखा, गडचिरोली, वर्धा, सावनेर, रामटेक, काटोल, नरखेड, कळमेश्वर, भिवापूर, भंडारा, भद्रावती, खात, गोंदिया या ठिकाणी देखील शाखा स्थापन करण्यात आल्या.
हे सर्व कार्यक्रम, यात्रा, शिबिरे, मोहिमा, शाखा विस्तार यामुळे महाराष्ट्र अंनिसचे काम अतिशय कमी काळात विदर्भात विस्तारित आहे, हे सर्वांना कळावे म्हणूनच मी थोड्या तपशिलाने तुम्हाला सांगितले. त्यापासून स्फूर्ती घेऊन इतरही भागातील कार्यकर्ते कामाला लागतील. हे सर्व काम काही माझ्या एकट्याच्या बळावर झालेले नाही. त्यातील अनेकांची नावे वर आलेली आहेत. त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आजच्या कठीण परिस्थितीतही अंनिसचे काम निश्चितपणे पुढे नेत आहोत.

अंनिसच्या या सगळ्या वाटचालीत तुमच्या सर्व सहकार्यांचा, कार्यकर्त्यांचा वाटा खूप मोठा तर आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचाही आहेच. त्याबद्दल काही सांगा.
निश्चितच, त्यांच्या सहकार्याशिवाय मी हे काम करूच शकत नाही. माझी पत्नी शीला डोंगरे ही माझ्या खांद्याला खांदा लावून आज अंनिसच्या कामात सहभागी आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी ही अॅनेस्थेशियामध्ये एम. डी. आहे आणि जावई सायकिअॅट्रीमध्ये एम.डी. आहेत. मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. हे सर्वचजण मला साथ देत असल्याने मलाही काम करण्यासाठी खूपच हुरूप मिळतो.
संवादक : डॉ. सुनिल भगत
संपर्क : रामभाऊ डोंगरे, नागपूर
मो. ९४०४० ८४०३३
