कोरोनावर होमिओपॅथी उपचार शक्य आहे का?

डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर - 9422286133

नुकत्याच दि. 15 एप्रिल 2020 च्या वृत्तपत्रांत भारताच्या आयुष (Ayush) मंत्रालयाकडून असे फर्मान काढण्यात आले की, होमिओपॅथीतील ‘आर्सेनिक अल्बम 30’ हे औषध कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून घेता येईल. या सल्ल्यानंतर देशांतील अनेक वृत्तपत्रांतून असे वृत्त प्रकाशित केले गेले की, होमिओपॅथीत कोरोनावर उपाय आहेत! पण वास्तवात हे विधान खरे नाही. कसे ते थोडक्यात बघूया

होमिओपॅथी ही उपचार पद्धती काय आहे?

ही एक पूरक किंवा वैकल्पिक चिकित्सा पद्धती आहे. 1790 साली साधारण 200 वर्षांपूर्वी जर्मनीतील डॉ. सॅम्युअल हॅनिमन नावाच्या डॉक्टरने असा सिद्धांत मांडला की, जसे विषाने विष मारता येते किंवा काट्याने काटा काढता येतो, तसे विशिष्ट लक्षणांना कारणीभूत पदार्थ देखील ती लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतो. दुसरी बाब म्हणजे हे औषध ग्लुकोज किंवा पाण्यात टाकून जितके जास्तीत जास्त पातळ करण्यात येईल, तितकी त्याची गुणवत्ता वाढत जाईल. शेवटी अशी वेळ येते त्या औषधात मूळ औषधाचा एखादाच कण शिल्लक राहतो किंवा एकही कण शिल्लक राहत नाही.

असे औषध नक्की काम करते काय? होमिओपॅथी खरोखर उपयोगी आहे काय?

आज जगभरात असे सिद्ध झाले आहे की, होमिओपॅथीच्या गोळ्या किंवा सिरपमध्ये कोणतेही औषध नगण्य किंवा अजिबात नसल्यामुळे होमिओपॅथीच्या ‘प्लॅसिबो’च्या परिणामापेक्षा कोणत्याही आजारावर जास्त परिणाम होत नाही. ‘प्लॅसिबो’ म्हणजे एक औषध, ज्यात औषधाचा कोणताही भाग नसतो, पण दिसावयास त्याचे रंगरूप मूळ औषधाची गोळी, सायरप किंवा इंजेक्शनसारखेच असते; परंतु केवळ त्या व्यक्तीला औषधोपचार समजून घेण्यास भाग पाडले जाते. अनेक मनोकायिक किंवा आपोआप बरे होणारे आजार ‘प्लॅसिबो’ने बरे होऊ शकतात.

आज जगभरात होमिओपॅथीच्या वापरावर कडक टीका केली जात आहे.

प्रख्यात वैज्ञानिकांची मते आणि त्यांनी केलेल्या अभ्यासांचा मजकूर खाली दिला आहे.

सायन्स 9 फेबु्रवारी 2018, बहुतेक वैज्ञानिक संस्था, होमिओपॅथीला पाठिंबा देण्यासाठी कोणताही कठोर, विश्वासास पात्र वैज्ञानिक अभ्यास अस्तित्वात नसल्याचे म्हणतात. समलोचक म्हणतात की, होमिओपॅथिक उपायांमध्ये कोणतेही सक्रिय रेणु नसतात.

लॅन्सेट ब्रिटीश जर्नल : होमिओपॅथीचे क्लिनिकल इफेक्ट हे ‘प्लॅसिबो’चे परिणाम आहेत. ‘ऑस्टे्रलियाचा एक प्रमुख अभ्यासक पुन्हा होमिओपॅथीच्या निरनिराळ्या 1800 प्रकरणांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञ असे जाहीर करतो की, ‘होमिओपॅथी अजिबात उपयोगाची नाही.’

इंग्लंडमधील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या ‘सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’च्या कमिटीचा 2010 सालचा रिपोर्ट – होमिओपॅथीचे उपाय प्लॅसिबो (डमी ट्रिटमेंट) पेक्षा चांगले काम करत नाहीत.

जगातील ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया या सर्व देशांतील केलेल्या अभ्यासानुसार होमिओपॅथीच्या मूल्यांकनानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी होमिओपॅथी निरुपयोगी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील कायदा होमिओपॅथीच्या बाटल्यांवर ‘हे औषध (रोगांवर) बिनकामाचे आहे.’ असे लेबल लावणे कायद्यानुसार आवश्यक आहे. त्याचबरोबर ‘हे औषध उपयोगी आहे’ असे कायदेशीर दाव्यात मांडावयाचे असेल, तर या गोष्टींच्या सिद्धतेकरिता उत्पादकांना त्याबाबतचा शास्त्रीय पुरावा उपलब्ध करून द्यावा लागेल; अन्यथा त्यांचा दावा मान्य केला जाणार नाही!

इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या छकड NHS (National Health Scheme) नुसार होमिओपॅथीची औषधी (पूर्वीसारखी सवलतीच्या दरांत) उपलब्ध होणार नाहीत. कारण ‘होमिओपॅथीच्या वापरास समर्थन देण्याचे कोणतेही स्पष्ट किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत.’

1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे आव्हान

अमेरिकेतील प्रख्यात जादूगार आणि शंकेखोर व्यक्ती जेम्स रँडी यांच्या ‘जेम्स रँडी एज्युकेशनल ट्रस्ट’तर्फे कोणाही व्यक्तीने होमिओपॅथी हे शास्त्र असून ते निरनिराळ्या रोगांवर उपयोगी आहे, असे शास्त्रीय निकषांवर सिद्ध केल्यास त्या व्यक्तीला 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

भारतातील – (नव्हे, तर जगातील) कोणाही व्यक्तीने हे आव्हान स्वीकारावे आणि होमिओपॅथी हे कोरोनावरच नाही, तर इतर कोणत्याही आजारावर काम करते, हे सिद्ध करावे आणि हे बक्षीस मिळवावे!

होमिओपॅथीबद्दल वर लिहिलेले हे सत्य आपल्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातील आधिकार्‍यांना माहीत नाही काय?

भारतात व्यवसाय करणार्‍या होमिओपॅथीच्या हजारो डॉक्टरांची समस्या

होमिओपॅथीबद्दल वर सांगितलेली परिस्थिती असेल, तर ती प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांबद्दल काय? हे एक सत्य आहे की, आजच्या परिस्थितीत भारतात अनेक पदवीधर होमिओपॅथिक डॉक्टर (आणि आयुर्वेदिक, युनानी डॉक्टर) रुग्णांसाठी अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरत आहेत.

होमिओपॅथीची औषधे कोणत्याही रोगासाठी काम करत नाहीत, ही वस्तुस्थिती संपूर्ण जगाने मान्य केली आहे. म्हणूनच कदाचित भारत सरकारने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी मेडिसीन आणि फार्माकॉलॉजी शिकविण्यासाठी नुकताच एक छोटा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याचे नाव आहे. “CCMP’ “Certificate Course in Modern Pharmacology’ जेणेकरून या प्रमाणपत्रानंतर ते आपल्या रुग्णांना अधिकृतपणे अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहून देऊ शकतील.

होमिओपॅथीच्या जगभरच्या सत्य परिस्थितीचे अवलोकन केल्यास आता भारत सरकारने आणखी एका मुद्द्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. भारतातील सर्व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस बंद करून अशा विद्यार्थ्यांना फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनॉकॉलॉजी, मेडिसीन (मॉडर्न) याबरोबर होमिओपॅथी न शिकविता CCMP सारख्या कोर्समध्ये शिकवला जाणारा “Modern Pharmacology’ हा विषय शिकवावा.

या नवीन कोर्सला काहीतरी नवीन नाव द्यावे लागेल. कारण आता त्याला होमिओपॅथिक कॉलेज आणि Bachaler of Homeopathic Medicine BHMC म्हणता येणार नाही. कदाचित बॅचलर किंवा डिप्लोमा ऑफ कम्युनिटी मेडिसीन किंवा अशा प्रकारचे संयुक्तिक नाव द्यावे लागेल. अर्थात, याला IMA (Indian Medical Association) चा फार मोठा विरोध असेल, त्याला दूर करावे लागेल.

भारत सरकार या सर्व गोष्टींचा विचार करेल. त्याचबरोबर कोरोनावर होमिओपॅथिक मेडिसीन सुचवणार नाही, अशी नम्र विनंती.

(लेखक हे ग्रामीण सर्जन संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ]