डॉ. हमीद दाभोलकर -
अकरा एप्रिलपासून महात्मा जोतिबा फुले यांचे जन्म द्विशताब्दी वर्ष चालू होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे जोतिबा फुले यांना समाज सुधारकांच्या ‘सत्यशोधक विद्यापीठाचे आद्यकुलगुरू’ असे म्हणत असत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर महाराष्ट्रात ‘फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ अशी एक घोषणा स्वयंस्फूर्तीने दिली गेली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंनिस हे कोणता वैचारिक वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत याचे मर्म पकडणारी ही घोषणा होती. जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी निमित्ताने जोतिबा फुले यांनी केलेले कार्य त्यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न करते म्हणजे नक्की काय करते, हे समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ‘बोलके सुधारक’ आणि ‘कर्ते सुधारक’ हा वाद मोठ्या प्रमाणात गाजला होता. या परंपरेचा विचार केला तर जोतिबा फुले ज्या कर्त्या सुधारकांच्या परंपरेचे अग्रणी होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसचे काम ही त्याच परंपरेचा भाग आहे. याचे असंख्य पुरावे आपल्याला अंनिसच्या गेल्या चाळीस वर्षांच्या वाटचालीत नक्की सापडतील. वैचारिक आणि कृती कार्यक्रम या दोन्ही पातळीवर ही साम्य स्थळे आपण समजून घेऊया.
धर्म नाकारण्याऐवजी धर्म सुधारणेची भूमिका :
जोतिबा फुले यांनी समाजसुधारणेसाठी धर्म पूर्णपणे नाकारण्याऐवजी धर्मसुधारणेची वाट चोखाळली होती. त्यांनी मांडलेली निर्मिकाची कल्पना आणि सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना या दोन्ही गोष्टी याच धर्मसुधारणेच्या विचारांना पुढे नेतात. त्यांनी निर्मिकाची कल्पना मान्य केली असली, तरी त्यांनी जगाचे नियंत्रण करणार्या शक्तींना मात्र पूर्णपणे नाकारले होते. त्यांच्या कल्पनेतला धर्म देखील हा कुठल्या धर्मग्रंथाच्या वरती अवलंबलेला नव्हता, तर तो सत्याच्या कसोटीवर टिकेल असाच होता. गांधीजींच्या नंतरच्या कालखंडात ‘सत्य हेच ईश्वर आहे’ या संकल्पनेशी जवळ जाणारी ही गोष्ट आहे. एकदा का धर्माच्या कल्पनेला सत्याचा निकष लावला की आपोआपच त्याची चिकित्सा सुरु होते. त्यांनी मूर्ती पूजेला विरोध केला होता. धर्माच्या नावावर चालणार्या सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध केला होता. त्यांनी मांडलेली धर्म कल्पना ही बुद्धिवादी, समता हे मूल्य मानणारी आणि मानवतावादी होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘अंनिस’च्या माध्यमातून मांडलेली देव आणि धर्माच्या विषयीची भूमिका ही देखील एका प्रकारे धर्मसुधारणेचीच आहे. या भूमिकेमध्ये भारतीय संविधानातील याच तत्त्वाचा आधार घेतला होता. या भूमिकेमध्ये संविधानाने दिलेले श्रद्धेचे स्वातंत्र्य मान्य करून त्याच बरोबर आपल्या श्रद्धा या मानवी जीवन उन्नत करणार्या असाव्यात आणि त्यांच्या आधारे कुणाचे शोषण केले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. भारतातील आणि जगभरातील निरिश्वरवादी चळवळीपेक्षा ही भूमिका वेगळी आहे.
जातविषयी भूमिका :
जात निर्मूलनासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी केलेल्या भूमिकेचा देखील ‘अंनिस’च्या जातविषयी भूमिकेवर प्रभाव आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘ब्राह्मण’ व्यक्ती म्हणून नव्हे, तर ‘ब्राह्मण्यवादा’(Brahmanism) विरुद्ध तीव्र संघर्ष केला. फुले यांनी ब्राह्मणी धर्मशास्त्रांवर टीका केली. कारण त्यांच्या मते या शास्त्रांनी शूद्र आणि अतिशूद्रांना गुलामगिरीत ठेवले होते. शोषक पुरोहित वर्ग यांना देखील त्यांनी पुरोहित वर्गाला ‘मध्यस्थ’ मानण्यास नकार दिला. ईश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची (पुरोहिताची) गरज नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. ब्राह्मण वर्गाने शिक्षणावर स्वतःची मक्तेदारी ठेवून बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असा त्यांचा स्पष्ट आरोप होता. ज्या टोकाच्या शोषणकर्त्या पेशवाईच्या पार्श्वभूमीवर जोतिबा फुले यांचे काम झाले, त्या पार्श्वभूमीवर अत्यंत रास्त म्हणावी अशीच ही भूमिका होती. या मधून त्यांच्यावरती ब्राम्हणविरोधी असल्याचा आरोप केला जातो, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांचे अनेक सहकारी ब्राम्हण होते. इतकेच काय ‘ख्रिस्त महम्मद मांग ब्राम्हणाशी धरावे पोटाशी ज्योती म्हणे’ हा जोतिबांचा अखंड याची साक्ष आहे, हे देखील विसरता कामा नये.
महात्मा फुलेंचे नाव घेणार्या अनेक संघटना या थेट किंवा आडून-अडून ब्राम्हण ब्राम्हणेतर हा वाद गेली अनेक दशके महाराष्ट्रात खेळत राहिल्या. महात्मा फुलेंच्या कामाचा गाभा हा सत्यशोधन, जाती निर्मूलन आणि समताधिष्ठित समाजाची स्थापना होता, हे त्या सोईस्कररित्या विसरून गेल्या. त्याचा एक खूप मोठा नाकारारार्थी परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीवर झाला आहे, हे नाकारता येऊ शकत नाही.
महाराष्ट्र अंनिसने मात्र या वादात न पडता आपल्या पातळीवर जात निर्मूलन, समताधिष्ठित समाज आणि सत्यशोधन हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवला. महाराष्ट्र अंनिसने ज्यांना सातत्याने विरोध केला ती बहुतांश सर्व कर्मकांडे ही ब्राम्हण्यामधून निर्माण झाली आहेत. जातपंचायत यांच्या विरोधात अंनिसने दिलेला लढा हा जातिअंतर्गत शोषणाच्या विरोधात होता. अंतरजातीय आणि अंतरधर्मीय लग्नांना पाठबळ देण्याची जी चळवळ अंनिसने चालवली, त्यासाठी संस्थात्मक आधार तयार केले, हे त्याच मोहिमेचा भाग आहे.
सत्यशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन :
जोतिबा फुले यांनी स्वत:ची सर्व मांडणी ज्या सत्यशोधानावर उभी केली होती, त्या सत्यशोधनाची सगळ्यात महत्त्वाची कार्यपद्धती ही वैज्ञानिक दृष्टिकोन ही आहे. या कार्यपद्धतीला समाजात बळ मिळावे, यासाठी अंनिसने सातत्याने काम केले. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, शिक्षकांची शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी सत्यशोध परीक्षा अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील.
संघटन आणि कृती कार्यक्रम :
केवळ वैचारिक प्रबोधन करण्यापुढे जाऊन कार्यकर्ते आणि समाज यांना छोटे-मोठे कृती कार्यक्रम देणे आणि आपण मांडत असलेल्या विचाराच्या अनुषंगाने सातत्याने कृतीशील राहणे, हा देखील या वारश्यामधलाच एक भाग. जादूटोणा विरोधी कायद्यासाठी केलेला संघर्ष, शनी शिंगणापूरचा लढा अशी या संघर्षाची रूपे आहेत. धार्मिक श्रद्धा न नाकारता त्यांना सकारात्मक रूप देण्याचे प्रयत्न म्हणून पर्यावरणपूरक गणेश उत्सव, फटाकेमुक्त दिवाळी, होळी लहान करा पोळी दान करा असे अनेक उपक्रम हे विधायक कृतीशील धर्म चिकित्सेचे कार्यक्रम देखील याच विचारधारेला धरून योजले गेले.
या कार्यक्रमांच्या सोबत विचार आणि उपक्रम यांच्या सोबत संघटना बांधणी हा देखील एक जोतिबांनी आपल्याला दिलेला वारसा आहे. सत्यशोधक समाज ही संघटना जोतिबा फुले यांनी आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी बांधली. अंनिसचे संघटन निर्माण होण्याची पूर्वसुरी आपल्याला त्यामध्ये नक्कीच दिसू शकते.
समन्वयवादी तरीही ठाम भूमिका
ठाम तरीही समन्वयवादी भूमिका हा देखील जोतिबा फुले यांच्याकडून आलेला अंनिसचा महत्त्वाचा वारसा आहे. ज्या-ज्या कालखंडात धर्माच्या नावावर केलेले शोषण आणि संघटीत धर्मकारण हे वाढते, तेव्हा तेव्हा जोतिबा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे महत्त्व पुन्हापुन्हा अधोरखित होत असते, पण सत्याच्या पाठीमागे संघटीतपणे उभे राहणे, ही मानवी इतिहासात सार्वकालिक राहिलेली गरज आहे.
कामाचा वारसा आपल्या प्रयत्नाने चालू असला तरी या विचाराच्या मारेकर्यांनी मात्र या कालखंडात मोठी प्रगती केली आहे. जोतिबा फुले यांना मारायला आलेले मारेकरी जेव्हा त्यांना ही व्यक्ती जोतिबा फुले आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांचे शिष्य झाले! डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्यांनी मात्र सत्तरीला आलेल्या नि:शस्त्र व्यक्तीवर गोळ्या झाडल्या.
जोतिबा फुले यांची जन्म द्विशताब्दी सुरू होताना महा. अंनिस कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी हा आपला समृद्ध वारसा समजून घेतला पाहिजे आणि तो निर्धाराने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे.
– डॉ. हमीद दाभोलकर
