मंदिरातच चमत्काराचा भांडाफोड केला

प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे - 9969473702

21सप्टेंबर 1995 : मु. पो. डोंबिवली

21 सप्टेंबर 1995. दुपारची दोन ते अडीचची वेळ असेल. मी नुकताच कॉलेजहून ड्यूटी संपवून घरी आलो होतो. जेवण घेऊन थोडा वेळ विश्रांती घेत असताना अचानक आमच्या सोसायटीतील काही आठवी-नववीत शिकत असलेली चार-दोन मुलं धावतच टेरेसवरील माझ्या घरी आली व दरवाजावर टकटक आवाज करू लागली. सुशीलाने स्वयंपाकघरातील खिडकीतून बाहेर डोकावलं, तर मुलं फारच घाई-गडबडीत असल्यासारखी वाटली. सुशीलाने स्वयंपाकघरातून बाहेर येऊन दरवाजा उघडला, तसं मुलं म्हणाली, ‘मॅडम, सर कुठे आहेत?’ ‘अरे, पण काय घडलं ते तरी सांगा?’ सुशीलाने प्रतिप्रश्न केला. ही गडबड ऐकून मी हॉलमध्ये मुलांच्या समोर येऊन उभा राहिलो. मला पाहताच सर्व मुलांनी एकच गलका केला, ‘सर, तुम्ही तर म्हणता की, जगात चमत्कार घडत नाहीत. मग आज आता आपल्या डोंबिवलीत सर्वत्र गणपती दूध पीत आहे, हे कसं काय?’ तसा मी थोडा वेळ भांबावलो. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की बाहेर काय चाललंय ते! लगेच स्वतःला सावरीत मी म्हणालो, ‘असं शक्यच नाही.’ त्यावर मुलांनी म्हटलं, ‘चला सर, खाली जाऊन आपल्या मागच्या शंकराच्या मंदिरात खूप बायका गणपतीला दूध पाजत आहेत, हे तुम्हाला दाखवतो.’ काही मुलं तर आमच्या क्लासमधली होती. त्यामुळे ती अतिशय धीटपणे सर्व काही आम्हाला सांगत होती. मी लगेच पांढरी लुंगी व शर्ट परिधान करून एक मोठा हातरुमाल हातात घेऊन जिन्यावरून खाली उतरलो. मंदिराजवळ गेलो तर मंदिरापाशी खूपच गर्दी जमा झाली होती. मला बघताच ओळखीचे काही शेजारी जवळ आले आणि विचारू लागले, ‘सर, तुम्ही नेहमी सांगता जगात चमत्कार घडत नाही व आज हे कसे काय?’ मी थोडे धाडस करत भाविकांच्या गर्दीत मुलांसह घुसण्याचा प्रयत्न केला. आमच्या क्लासमधला एक विद्यार्थी जरा धाडस करून माझ्या पुढे आला, त्याने मंदिराचा दरवाजा मोकळा करून दिला आणि मला आत जाऊ दिले. ठाकूरवाडी भागातील ते मंदिर असल्यामुळे मी तसा थोडा परिचित होतोच. मी आत जाताच माझ्या खांद्यावर असलेल्या हातरुमालाच्या सहाय्याने मी गणपती ठेवलेला ओटा साफ केला आणि भाविकांना सांगितलं की, ‘दूध खूपच वाया जात आहे. तुम्ही जरा गडबड करू नका. रांगेने एका मागोमाग या.’ स्त्रिया शांत झाल्या. तोपर्यंत मी हातरुमालाने मूर्तीवरून घरंगळणारे दूध पुसून घेतले. दूधाने भरलेला हातरुमाल त्यांच्या समक्ष मी पिळून, खरे कारण त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांना समजावून सांगितलं की, ‘आता काही गणपती दूध पिणार नाही.’ तरीसुद्धा दोन-चार भाविकांनी दूध पाजण्याचा पुन्हा प्रयत्न केलाच. मी त्यांना चमचा स्थिर ठेवून दूध पाजायला सांगितले. त्यावेळी चमच्यातील दूध कमी होत नाही, हे काही भाविकांच्या तात्काळ लक्षात आले. मग कुणीतरी सांगितले की, ‘आता गणराया दूध पित नाही. आता आपण थांबले पाहिजे.’

त्यातील काही समजदार नागरिकांनी मला सांगितले की, ‘आपण सर्व जवळच्या मंदिरांमध्ये जाऊन लोकांना समजावून सांगू या.’ म्हणून आम्ही मग ठाकूरवाडी, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली मोठागाव, देवीचा पाडा, रेतीबंदर रोड, शास्त्रीनगर, सम्राट चौक अशा जवळपास दहा ते बारा मंदिरांना भेटी दिल्या. सर्वच मंदिरांच्या समोर लांबलचक रांगा, कोलाहल, कमालीचा भक्तिभाव सगळ्यांच्या चेहर्‍यांवर अगदी ओसंडून वाहत होता. मी प्रत्येक वेळेला विनंती करून मंदिरात जायचो. माझ्याबरोबर सुजाण गावकरी होतेच. तेथे गेल्यावर दूधाने भरलेला चमचा मूर्तीला स्पर्श न करता स्थिर करून दूध पाजायला सांगायचो. ‘दूध पाजताना चमचा अजिबात तिरपा करायचा नाही,’ असे उपस्थितांना ठणकावून सांगायचो. त्यामुळे चमच्यातील दूध जसेच्या तसे राहायचे. या गोष्टीला थोडाफार विरोध होतच होता. काही ठिकाणी मला हाकलून देण्याचेही प्रयत्न होत होते; परंतु मला माघार घ्यायची नव्हती. जे होईल ते होईल, ते मी सोसायला तयार होतो. जिथे शक्य आहे, तिथे मी गर्दीवर ताबा मिळवत होतो. रांगेतील भाविकांना शांतपणे घरी जाण्याचा आग्रह करत होतो. मला त्यात काही प्रमाणात यश येत होते. कारण ठाकूरवाडीतील सुप्रसिद्ध डॉ. प्रमोद बेजकर हे देखील माझ्याबरोबर सामील झाले होते. त्यावेळी डॉ. बेजकर यांना आमच्या कॉलनीतील वस्तीमध्ये खूप मान्यता होती. ते सुप्रसिद्ध डॉक्टर असल्यामुळे त्यांचे म्हणणे देखील लोक मनावर घेत होते. त्यानुसार मी भाविकांना, ‘चमचा सरळ करा आणि मगच दूध पाजा,’ असे वारंवार आवाहन करून विनंती करत होतो. चमचा सरळ केला तर दूध कमी होत नव्हतं, हे मी सिद्ध करत होतो. बरे, मला त्या क्षणी या घटनेमागील खरे वैज्ञानिक कारण काय आहे, हे मात्र ठाऊक नव्हतं. परंतु यामध्ये काहीतरी लबाडी आहे, याची मला खात्री झाली होती. लोकांना पटवून देण्यात मी काही प्रमाणात यशस्वी होत होतो.

या सगळ्या घडामोडी चालू असताना, कधी नव्हे ते दूधवाले भैय्या अगदी गडबडीत सायकलला दोन-तीन कॅन लावून इकडून-तिकडे फिरत होते. मला त्याची गंमत करावीशी वाटली. मी त्याला सहजच विचारलं. ‘अरे भाई, क्या गडबड है?’ त्याने दिलेले उत्तर मात्र फारच मार्मिक होते. तो मला म्हणाला, ‘अरे क्या बोलू भाई? भगवान शिवजी की पूरी फॅमिली दूध पी रही है।’ या उत्तराने मी अवाक् झालो.

जाता-जाता रस्त्याजवळील मंदिराजवळ जाऊन मी पाहिले. पाजलेले दूध मूर्तीवरून खाली झिरपून मूर्तीच्या पायथ्याशी जमा झालेले होते. काही दूध देवळाच्या मागील बाजूस असलेल्या गटारीत जमा झाले होते. ही वस्तुस्थिती मी उपस्थितांच्या लक्षात आणून दिली. त्यातील काही जणांना ते पटले. खरोखरच गणपती दूध पित नाही, ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्यावर हळूहळू तेथील गर्दी ओसरू लागली आणि दिवसभर चाललेल्या या नाट्याचा अंक समाप्त झाला.

मी घरी गेलो, त्यावेळी सायंकाळचे सात वाजून गेले होते. टीव्हीवर बातम्यांचा ‘रतीब’ चालू होता. सर्वच चॅनलवर गणपतीच्या दुग्ध प्राशनाची तीच-तीच ‘ब्रेकिंग न्यूज’ पुनः-पुन्हा दाखवली जात होती. तितक्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्या वेळचे राज्य कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची प्रतिक्रिया चॅनलवर दाखवली जात होती. यासंदर्भात डॉ. दाभोलकरांनी त्या वेळी तीन गोष्टी सांगितल्या होत्या. त्या आजही मला चांगल्या आठवतात. ते असे म्हणाले होते – 1) दूध चमचातून कमी होत जाते, याचा अर्थ दूध मूर्ती पिते, असा होत नाही. त्यामुळे काही लोकांनी हा बनाव तयार करून ही अफवा नियोजनबध्द पद्धतीने पसरवली आहे. 2) दुसरे म्हणजे आपल्या राज्य घटनेनुसार, प्रत्येक भारतीयाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. कारण हा चमत्कार पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या तत्त्वाशी उघड-उघड विसंगत आहे. त्यासाठी शासनाने या सर्व गोष्टींचा शोध घेणे गरजेचे आहे. 3) असा चमत्कार कुठे कुणी व्यक्ती आमच्या समितीसमोर करून दाखवत असेल तर आम्ही तिला रोख रुपये पाच लाखांचे बक्षीस देऊ. (त्यावेळी समितीकडून चमत्काराचे आव्हान सिद्ध करणार्‍यांना पाच लाखांचे बक्षीस ठेवले होते.) त्यानंतर अगदी थोड्याच वेळात इतर टीव्ही चॅनलवरून काही शास्त्रज्ञ व पुरोगामी विचारवंतांच्या मुलाखती दाखविल्या जात होत्या. त्यामध्ये या घटनेचा शास्त्रीय उलगडा झाला होता. त्यामध्ये या घटनेमागील दोन कारणे स्पष्ट करण्यात आली होती. नंबर एक – केशाकर्षण क्रिया व नंबर दोन – पृष्ठीय ताण (दाब). विज्ञानाचा गळा घोटणार्‍या या घटनेपासून दरवर्षी ‘महाराष्ट्र अंनिस’ 21 सप्टेंबर हा दिवस ‘सत्यशोधन दिन’ म्हणून साजरी करते.

या सर्व घडामोडी चालू असताना देशाच्या राजधानीत; म्हणजे दिल्लीतील रिसर्च सेंटरच्या समोर असलेल्या एका हमरस्त्यावर डोळ्यात अंजन घालणारी एक घटना घडली होती.

रस्त्यावर आपले पादत्राणे दुरुस्तीचे दुकान मांडून बसलेल्या ‘आर्य’ नामक गृहस्थाने चक्क आपल्या ऐरणीला दुधाचा चमचा लावला. चमच्यातील दूध नाहीसे झाल्यावर धावत जाऊन त्याने समोरला रिसर्च सेंटरच्या संबंधित अधिकार्‍यांना हा वृत्तांत सांगितला. त्याची हकिकत ऐकून दिवसभर घडणार्‍या दुग्धप्राशन घटनेचे एक वैज्ञानिक सत्य समोर आले. ते म्हणजे दुधासारख्या द्रव पदार्थाच्या पृष्ठभागावर एखादी वस्तू टेकवली असता द्रव पदार्थाच्या पृष्ठभागावर ताण (टेन्शन इफेक्ट) निर्माण होऊन केशाकर्षण क्रियेच्या सहाय्याने तो द्रव पदार्थावर खेचला जातो. हेच कारण दिवसभर घडलेल्या घटनेमागे होते, याची खातरजमा झाली. अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्घांनी मानवी दुःख मुक्तीची चार ‘आर्यसत्ये’ सांगितली; तर 20 व्या शतकात दिल्लीच्या आधुनिक आर्याने विज्ञानाचे सत्य उलघडून दाखवण्याचे काम केले.

यावर्षी गणपतीच्या दुग्ध प्राशनाला 21 सप्टेंबर 2020 रोजी तब्बल 25 वर्षे होत आहेत. हा दिवस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘सत्यशोधन दिन’ किंवा ‘चमत्कारविरोधी दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहे. वैज्ञानिक प्रयोगाद्वारे विज्ञानाच्या ज्ञात नियमाला डावलून कोणताही चमत्कार घडत नसतो, तर चमत्कारांमागे मानवी हात, रासायनिक अभिक्रिया किंवा यांत्रिक करामत असते, याविषयीचे प्रबोधन ‘अंनिस’चे कार्यकर्ते महाराष्ट्रभर करीत असतात.