मुक्त प्रश्नांचा तास – भुते असतात का?

डॉ. प्रसन्न दाभोलकर -

“सर, भूत असतं का?” सर वर्गात आल्याबरोबर कल्पेशने प्रश्न केला.

“हो सर, खरंच भूत असतं.” काही मुले म्हणाली.

“नसतं! ती अंधश्रद्धा आहे.” दुसरी काही मुले तावातावाने बोलू लागली.

वर्ग शांत करीत सरांनी विचारले, “कल्पेश, हा प्रश्न तुझ्या मनात कसा निर्माण झाला?”

कल्पेश सांगू लागला, “गेल्या आठवड्यात आम्ही कोकणातील माझ्या गावी गेलो होतो. गावाबाहेर वेताळाचं देऊळ आहे. तिथं रात्री चपलांचा आवाज ऐकू येतो. वाटेत एक झाड आहे, त्याच्यावर मुंजा आहे असं म्हणतात. गावातील पडक्या विहिरीत एका बाईनं जीव दिला होता. ती हडळ होऊन तिथं राहते. गावाकडच्या माझ्या मित्रांनी मला सगळं सांगितलं.”

“पण तुला काय वाटतं?” सरांनी कल्पेशला विचारले.

“सर, मला थोडं थोडं खरं वाटतं.” भाबडेपणाने कल्पेश बोलला.

“वर्गातील इतर मुला-मुलींचं काय मत आहे?” सरांनी वर्गाकडे बघत प्रश्न केला.

भुतं हा आमच्या वर्गातील अनेक मुलांच्या आवडीचा विषय होता. ती भुतांच्या गोष्टी रंगवून, रंगवून सांगायची. पण कोणी उभं राहून सांगायला तयार होईना.

शेवटी सरच म्हणाले, “भूत या विषयावर तुम्हाला जे काही माहीत आहे, जे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत ते मोकळेपणाने मांडा. कोणी कोणाला हसायचे कारण नाही.”

“भुताचे पाय उलटे असतात.” “अमावस्येला स्मशानात भुतं दिसतात.” “माणसाची इच्छा अपुरी राहिली तर त्याचं भूत होतं.” “ओली बाळंतीण मेली तर ती हडळ होते.” “भुतं माणसाला झपाटतात.” “मांत्रिकाला भुतं वश असतात.” “भूत लागलं तर चाबकानं फोडून काढतात.” ऐकलेल्या अनेक गोष्टी मुलांच्या तोंडून बाहेर येऊ लागल्या.

किंचित हसत देशमुख सर म्हणाले, “अरे वा! भुताबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे. सांगा, तुमच्यापैकी कोणी भूत बघितलं आहे?”

सगळी मुलं एकमेकांकडे बघू लागली. कुणाचाच हात वर येईना. सर म्हणाले, “मी पण भूत बघितलं नाही.”

यावरही सारे गप्पच. मग सर बोलू लागले, “भुताखेतांच्या गोष्टी सांगीवांगीच्याच जास्त असतात. मी भूत बघितलं आहे, या माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो असं सांगणारा कोणी माणूस अजून मला मिळालेला नाही. समजा, ‘एका गावच्या स्मशानात अमावास्येच्या रात्री भुतं दिसतात’, असं कोणी म्हणालं तर ते आपण कसं तपासून बघू?”

“प्रत्यक्ष जाऊन बघून. म्हणजे सगळे मिळून.” किंचित वात्रट दिनेश म्हणाला.

“बरोबर. पण गावची माणसं म्हणाली की जास्त माणसं जमली की भुतं येत नाहीत. तर काय करायचं?”

“सर, आपण रात्री स्मशानात कॅमेरे लावून व्हिडिओ शूटिंग घेऊ शकतो. त्यात भुतं दिसतील.”

“सर भुतांचे फोटो इंटरनेटवर आहेत.” शांत ऋत्विक म्हणाला.

“चांगला मुद्दा मांडलास,” सर बोलू लागले. “इंटरनेटवर किंवा काही पुस्तकांमध्ये असे फोटो मिळतात. परंतु फोटो एडिटिंग करून आपल्याला कसलेही फोटो बनवता येतात, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे अशा ठिकाणी परत जाऊन आपल्याला खात्री करून घ्यावी लागते. परत फोटो काढायला गेलेल्या माणसांना असे फोटो मिळत नाहीत.”

“पण सर भुतं झपाटतं त्याचं काय? आमच्या मोलकरणीच्या मुलीला भूत लागलं होतं. ती शाळेत जायला लागली की ते भूत येऊन तिला त्रास द्यायचं. ती बडबडायला लागायची, बेशुद्ध पडायची. म्हणजे भूत असणार ना?” गार्गीने विचारले.

शांतपणे सरांनी विचारले, “मला सांगा, कोण मेल्यावर भूत होतं?”

“इच्छा अपुरी राहिलेला माणूस मेला की त्याचं भूत होतं.” सामुदायिक उत्तर आले.

“मग पुढं काय होतं?” सरांनी परत विचारलं.

“ते भूत एखाद्याला झपाटतं. मग त्याच्या तोंडातून भूत बोलू लागतं. ते ‘मला अमुक द्या, तमुक द्या’ असं मागतं. त्याचं मागणं पूर्ण केलं की ते निघून जातं. नाहीतर त्रास देत राहतं.” सगळ्यांच्या बोलण्यातून उत्तर तयार झाले.

“आता यावर आपण प्रश्न विचारू या,” देशमुख सर म्हणाले. “ते भूत त्याच्या घरच्या माणसांना जाऊन त्याच्या इच्छा पूर्ण करायला का सांगत नाही? भूत त्यांच्या इच्छा पूर्ण करायला प्रेमळपणे का सांगत नाही? भूत त्रासच का देतं? आपण भुतासाठी दिलेल्या गोष्टी तिथेच राहतात, भूत कधीच त्या गोष्टी नेत नाही, असं का? मुख्य म्हणजे, भूत तर कुठेही जाऊ शकतं. मग त्याची इच्छा ते स्वतःच का पूर्ण करीत नाही?”

मुले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. आजवर असा विचार कोणी केलाच नव्हता.

“किंवा अशी कल्पना करून बघा,” सर पुढे म्हणाले. “दोन देशांमध्ये घनघोर युद्ध झाले. दोन्ही देशांच्या सैनिकांची आपला देश जिंकावा अशी तीव्र इच्छा होती. पण जय तर एकाच देशाचा होणार. मग दुसर्‍या देशाच्या मृत सैनिकांची ‘आपला देश जिंकावा’ ही इच्छा अपुरी राहणार. अशा सैनिकांची भुतं बनून ती दुसर्‍या देशाच्या सैनिकांना झपाटतात का? अशोक, तुला इतिहास आवडतो. कोणत्या देशाच्या इतिहासात असं काही तू वाचलं आहेस का?”

हसत हसत अशोक म्हणाला, “सर, अजिबात नाही. आपले शिवाजी महाराज तर मुद्दाम अंधार्‍या रात्री शत्रूवर हल्ला चढवायचे. त्यांच्या सैन्याला कधी कुठल्या भुतानं त्रास दिला नाही.”

“पण काही माणसांना भूत झपाटतं आणि मांत्रिकाकडं नेल्यावर ती बरी होतात, हे कसं?” करणची शंका तयार होतीच.

“यात देखील ऐकीव गोष्टी जास्त असतात,” सर समजावून सांगू लागले. “होतं असं की, आपल्या सर्वांच्या मनात लहानपणापासून भुताबद्दल भीती असते. काही कारणानं आपल्याला मानसिक ताण निर्माण झाला तर आपलं मन खचून जातं. अशा वेळी त्या माणसाला अचानक भुतानं मला झपाटलंय असं वाटू शकतं. त्याप्रमाणं तो वागू लागतो. पूर्वीच्या काळी आणि अजूनही काही खेड्यापाड्यात अशा माणसांना मानसिक आधार देण्याऐवजी त्यांना मांत्रिकाकडं नेलं जातं. काही काळ गेल्यामुळे, परिस्थिती बदलल्यामुळे, मांत्रिकाच्या भीतीमुळे अशा व्यक्तींमध्ये तात्पुरती सुधारणा होऊ शकते. परंतु मानसिक त्रास निर्माण व्हायचं मूळ कारण दूर झालं नाही तर असा त्रास वारंवार होत राहतो.”

“म्हणजे भुतं लागलेली माणसं मुद्दाम तसं करतात तर.” रागाने विक्रम म्हणाला.

सर हळुवारपणे म्हणाले, “अरे, मुद्दाम नाही करत. त्यांचं मानसिक संतुलन ढासळल्यामुळं ती तशी वागू लागतात. त्यांना आधाराची आणि नीट उपचार करण्याची गरज असते.”

“पण सर, भुतं नसतात असं विज्ञानानं सिद्ध केलं आहे ना?”

सर म्हणाले, “आपण ठामपणे असं सांगू शकतो की गेली काही शतके अनेक माणसांनी; त्यात भुतावर विश्वास ठेवणारी आणि न ठेवणारी अशी दोन्ही माणसे होती, भुतांच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना असा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. परंतु एखादी गोष्ट अस्तित्वात नाही, असे सिद्ध करणे कोणालाही शक्य नसते. अजूनपर्यंत सापडली नाही, नंतर सापडेल असा मुद्दा मारुतीच्या शेपटीसारखा कायम राहू शकतो.”

“मग त्यांचं म्हणणं आपण कसं खोडून काढायचं?” अनेक मुलांनी विचारले.

सर पुढे बोलू लागले, “अशा माणसांना आपण प्रेमानं समजावलं पाहिजे. तुमच्याबरोबर आम्ही येतो. आपण मिळून भुताचा शोध घेऊ असा धीर त्यांना दिला पाहिजे. भुताची भीती त्यांच्या मनातून जायला मदत केली पाहिजे. ‘भित्या पोटी ब्रह्मराक्षस’ ही म्हण तुम्हाला माहीत आहे. प्रत्येक गोष्ट तपासण्याची वैज्ञानिक वृत्ती आपण कायम ठेवली तर भुताची भीतीही नाहीशी होऊ शकते.”

शेवटी वर्गाच्या बाहेर पडताना देशमुख सर म्हणाले, “मी शाळेत असताना आमच्या सरांनी भुते नसतात हे दाखविण्यासाठी आम्हा काही मुलांना अमावास्येच्या रात्री स्मशानात फेरी मारायला नेले होते. तुमच्यापैकी कोणाला तसं करायचं असेल तर मे महिन्याच्या सुट्टीत तुमच्या पालकांसोबत आपण मिळून जाऊ.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]