‘अंनिस’तर्फे हेरवाडला केशवराव विचारे प्रेरणा पुरस्कार

-

विधवांना सन्मान, नव्या क्रांतीची बीजे सरोज पाटील

‘विधवा प्रथा बंदी’चा ऐतिहासिक निर्णय घेऊन हेरवाड ग्रामस्थांनी विधवांना सन्मान देण्याचे काम केले, ही नव्या क्रांतीची बीजे असल्याचे गौरवोद्गार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती सरोज पाटील यांनी काढले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हेरवाड ग्रामपंचायतीला सत्यशोधक केशवराव विचारे सामाजिक प्रेरणा पुरस्कार प्रदान करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शैलाताई दाभोलकर होत्या. विधवा प्रथा मुक्ती अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे, अभिनेते किरण माने, सरपंच सुरगोंडा पाटील उपस्थित होते.

श्रीमती पाटील म्हणाल्या, “स्वातंत्र्यपूर्व काळात पतिनिधनानंतर महिलेचे मुंडण केले जात होते. ह. ना. आपटे यांनी ही प्रथा बंद करण्यासाठी लिखाणातून चळवळ उभी केली. 23 मार्च 1890 मध्ये चळवळीला यश आले आणि ती प्रथा बंद झाली. त्यानंतर सती प्रथा बंद झाली, तरी विधवांचे हाल कायम होते. हेरवाड ग्रामस्थांनी या प्रथा बंद होण्यासाठी निर्णायक भूमिका घेतली.”

‘अंनिस’च्या शैलाताई दाभोलकर म्हणाल्या, “जग बदलले तरी विचार बदलले नव्हते. पुरोगामी विचारांवर प्रतिगामींचे वर्चस्व कायम होते. हेरवाड हे विचारांची श्रीमंती असणारे गाव असून, त्यांनी पुरोगामी विचार धारण करून विधवा प्रथा बंद करून या नव्या युगात विचारांची जोपासना केली आहे.”

सत्काराला उत्तर देताना सरपंच पाटील म्हणाले, “विधवा प्रथा बंदीचा ‘हेरवाड पॅटर्न’ देशभर, राज्यभर राबवला जात असल्याने याचा अभिमान आहे. सध्या मुलींच्या विवाहासाठी कुंडली पाहिली जात आहे. या कुंडली प्रथेमुळे अनेक मुली विवाहापासून वंचित राहून वय वाढत आहे. ही कुंडली प्रथाही बंद होणे गरजेचे आहे.”

मान्यवरांच्या हस्ते सरपंच सुरगोंडा पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मानपत्र व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्वागत बाबासाहेब नदाफ यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले.

ग्रामविकास अधिकारी श्रीमती पी. आर. कोळेकर, उपसरपंच विकास माळी, पोलीस पाटील रेखा जाधव, दामोदर सुतार, माजी सरपंच संगीता पाटील, शिवाजी माळी, डॉ. शंकर माने आदी उपस्थित होते. पिंटू हुक्किरे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट

काल दोन साधूबुवा एकमेकांची टाळकी फोडायला निघालेला व्हिडिओ बघितला. त्यांच्या वादाचा विषय होता, ‘हनुमानाची जन्मभुमी कुठली?’… परवा कुणीतरी एक साधू ‘आपल्या’ मंदिरात साईबाबांची मूर्ती का ठेवली, म्हणून पुजार्‍याला शिव्याशाप देताना बघितला.. त्याच्या आदल्या दिवशी तुरुंगातनं सुटून आलेल्या आरोपींना दुधाची आंंघोळ घालून मंत्र म्हणत शुद्ध-पवित्र करायचा कार्यक्रम बघितला.. रोज भवताली असला भलताच बिनडोकपणा बघून डोक्याला वात यायचा. आपण हजारो वर्षं मागं चाललोय का काय, असं वाटायचं. अशा वेळी ग्रामीण भागातल्या समाजाकडून एका बोगस-वाह्यात प्रथेला लाथ घालून, एखादं पुरोगामी पाऊल उचललं जातं, तेव्हा लै-लै-लै दिलासा मिळतो. परिवर्तनाच्या लढ्याला शंभर हत्तींचं बळ मिळतं!

…एखाद्या भगिनीच्या पतीच्या निधनानंतर तिचं कुंकू पुसणं, मंगळसूत्र तोडणं, बांगड्या फोडणं… नंतर आयुष्यभरासाठी तिच्या नटण्यावर बंधनं घालणं…हळदी-कुंकवासारख्या अनेक सणासमारंभात आणि वाढदिवसाच्या ओवाळणीपासून लग्नात हळद लावण्यापर्यंतच्या अनेक प्रथा-परंपरांत तिला दूर ठेवणं… अशा अनेक क्रूर कुप्रथा बंद करण्याचा ठराव हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींनी पास केला. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं दोन्ही ग्रामपंचायतींना एक लाखाचं बक्षीस देण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जाताना मन भरून आलं होतं.

…विशेष म्हणजे, फक्त ठरावच नाही, तर या नवीन छान पायंड्याला सुरुवात झालेली मी स्वत: पाहिली. पतिनिधनानंतर कुठलीही विटंबना न करता कुंकू लावून, मंगळसूत्र घालून मुला-बाळांसोबत आपला दिनक्रम सुरू ठेवणार्‍या धाडसी भगिनींचा माझ्या हस्ते सत्कार झाला. अगदी आठ दिवसांपूर्वी पतिनिधनाचा आघात झालेल्या भगिनीला कुप्रथा मोडल्याबद्दल सन्मानित करताना मला अश्रू आवरणं कठीण झालं. कालची माझी दोन्ही भाषणं ही ‘भाषणं’ नव्हती… मी माझ्या अनेक मावश्या, माम्या, आत्या, चुलत-मावस बहिणींशी गप्पा मारत होतो.. गप्पा खूप रंगल्या.. आम्ही खळखळून हसलो, अंतर्मुख झालो, नि:शब्द झालो, अनेक वेळा डोळ्यांच्या कडा हळूच पुसूनही घेतल्या..

खूप मोठ्या संख्येनं माताभगिनी जमल्या होत्या. स्त्रीची भयाण अवहेलना करणार्‍या या हिडीस प्रथेचा अंत होत असलेला आनंद प्रत्येकीच्या चेहर्‍यावर दिसत होता ! याहून वेगळा आणि अनोखा आनंद मला काही विशिष्ट व्यक्तींच्या चेहर्‍यावर दिसला… ते होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते! डॉ. नरेंद्र दाभोलकर विचाररूपानं अधिक बळकट होऊन जिवंत आहेत, या भावनेनं प्रत्येकजण भारावला होता… पुढील लढ्यासाठी ‘रिचार्ज’ होत होता !!! यात नरेंद्रकाकांबरोबर पहिल्या दिवसापासून चळवळीत असलेले काही कार्यकर्ते होते. शैलाकाकू आणि मुक्ताही होती…

‘नरेंद्रकाका, विवेकाचा आवाज बुलंद होतो आहे!’

किरण माने (सिनेअभिनेते, सातारा)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]