राजपालसिंग आधारसिंग राजपूत - 9271505175
सरोवरातील पाण्याच्या रंग बदलल्याने परिसरातील नागरिकांत विविध अफवांचे पेव फुटलेले आहे. जगाचा अंत जवळ आला असून लवकरच जगबुडी होणार, भगवान विष्णूने लवणासुराचा वध केल्यावर सांडलेल्या रक्तामुळे पाण्याचा रंग लाल झाला, देवाचा प्रकोप झाला, अशा अनेक अफवांच्या चर्चा नागरिकांत ऐकू आल्या.
महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात लोणार गावी असलेले जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकावर बनलेले खार्या पाण्याचे जगातील एकमेव सरोवर आहे. सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी अवकाशातून एक उल्का आपल्या पृथ्वीवर प्रचंड वेगात आदळली आणि या आघातातून हे सरोवर तयार झाले आहे. 2010 मध्ये झालेल्या एका संशोधनात सरोवराचे वय हे जवळपास साडेपाच लाख वर्षांपेक्षा जास्त असल्याचं देखील आढळून आलेलं आहे. या सरोवराचा व्यास 1.2 किलोमीटर आणि परीघ 4.8 किलोमीटर असून याची खोली 150 मीटरपर्यंत आहे.
पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला भगवान विष्णूने याच ठिकाणी मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास ‘लोणार’ हे नाव मिळाले. लवण म्हणजे क्षार, मीठ. ‘क्षाराचा किंवा मिठाचा साठा म्हणजे लोणार.’ अशीही भाषाशास्त्रीय फोड ‘लोणार’ शब्दाची करता येईल. ब्रिटिश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ. स. 1823 मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्मपुराण व स्कंध पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांतही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा ‘बैरजतीर्थ’ असा केला जात असे. विविध राजवटींत बांधलेली अनेक मंदिरे सरोवराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत.
सरोवर परिसरातील मातीत चुंबकीय गुणधर्म आहेत. सरोवरातील पाणी खारट असून अत्याधिक क्षारयुक्त आहे. मात्र सरोवराच्या किनार्यावरच आश्चर्यकारकरित्या गोड्या पाण्याची एक विहीर आहे. आयआयटी, बॉम्बेद्वारे 2019 मध्ये झालेल्या संशोधनात सरोवरातील मातीत असलेली खनिजे आणि ‘अपोलो’ चांद्रयान मोहिमेत पृथ्वीवर आणलेले चंद्रावरील दगड यांच्यातील खनिजे यांच्यात कमालीचे साधर्म्य आढळून आलेले आहे. अशा या रहस्यमय सरोवराच्या गूढतेत नुकतीच अजून एक भर पडली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरोवरातील पाणी अचानक गुलाबी-लाल रंगाचे झाले. साधारणतः या सरोवरातील पाणी हे हिरव्या-निळ्या रंगाचे असते. मात्र अचानक पाण्याच्या बदललेल्या रंगाने सर्वच अचंबित झालेले आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये पाण्याच्या रंग बदलण्यावरून अनेक अफवा पसरल्या. मी उत्सुकतेपोटी सरोवरास भेट दिली आणि पाण्याचे रंग बदलण्यामागचे खरे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच पाण्याचा स्रोत नसलेल्या या सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने आणि सूर्यप्रकाशाने जलपातळी खूप खालावली होती. याचा परिणाम म्हणजे सरोवराच्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यासोबतच पाण्यात असलेल्या ‘हेलोबॅक्टेरिया’ आणि ‘ड्युनोलिला सलीना’ नावाच्या कवकाची देखील प्रचंड वाढ झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात स्त्रावलेल्या ‘कॅरोटेनॉईड’ रंगद्रव्यामुळे पाण्याला गुलाबी-लाल रंग प्राप्त झाल्याचा अंदाज अनेक अभ्यासकांचा आहे. श्रेलज्ञवेुप मुळे सरोवर परिसरात मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबला. यामुळे पाण्याच्या रंग बदलण्याच्या क्रियेत मदतच झाली असावी, असाही काहींचा कयास आहे. याही आधी सरोवरातील पाण्याचा रंग बदलल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र अचानक अत्यल्प कालावधीत एवढा गर्द गुलाबी-लाल रंग पहिल्यांदाच दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पृथ्वीच्या पाठीवर अनेक ठिकाणी सरोवरातील अथवा तळ्यातील पाण्याचा रंग बदलण्याच्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि घडतही असतात. आपल्या राजस्थानातील ‘सांभर’ सरोवरातील पाण्याचा रंग सुद्धा अशाच रीतीने बदलत असतो. अनेकवेळा या लाल रंगद्रव्य सोडणार्या कवकाला खाल्ल्याने रोहित (lockdown) पक्ष्यांच्या चोचीवर आणि पिसांवर सुद्धा लाल-गुलाबी छटा दिसून येतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास सरोवराच्या पाण्याचा रंग बदलण्यामागे केवळ जीवशास्त्रीय कारण आहे.