-
‘वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन
“वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा समानता, विवेक, मानवता असून, त्यात कर्मकांडाला स्थान नाही. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील विवेकवाद, विज्ञानवाद व निर्भयता ही मूल्ये वारकरी परंपरेशी परस्परपूरक आहेत”, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी कोल्हापूर येथे केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयावर लिहिलेल्या दहा पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. विलासराव पोवार अध्यक्षस्थानी होते. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कार्यक्रम झाला.
डॉ. लवटे म्हणाले, “संतांविषयी कमी जाणिवेतून लेखन झाले आहे. तेराव्या ते सतराव्या शतकात संतांनी महाराष्ट्राला भागवत भूमी बनवली. वारकरी परंपरेत कर्मकांडाला स्थान नसून, समानता हेच तिचे प्रमुख मूल्य आहे. पूर आले, महापूर आले, दुष्काळ पडले, भूकंप झाले, तरीही वारीत खंड पडला नाही. बाराव्या शतकापासून सुरू झालेली वारी आजही अखंडित सुरू आहे.”
“वारकर्यांचे पाच नियम व समानतेची शिकवण समाजाला दिशा देणारी आहे. त्या काळातील संत महिलांनी जे भोगले ते अभंगातून मांडले आहे.” डॉ. लवटे यांनी पंढरपुरात व्यतीत केलेले बालपण व तेथील मठातील आठवणींना उजाळा देत, महाराष्ट्रातून मठात राहायला येणार्या विधवा महिलांच्या जगण्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भारतीय महिलांवरील अन्यायही वारीच्या परंपरे इतकाच प्राचीन आहे.”
लेखक देवदत्त परूळेकर म्हणाले, “संत तुकाराम यांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या कार्याची सुरुवातही कोल्हापुरातून झाली. नंतर त्या देहूला गेल्या. आज महाराष्ट्राला संत कोण होते, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता आहे. संतांचा नेमका विचार समाजमनापर्यंत पोहोचविला पाहिजे. तसेच संत कोणाला म्हणावे, याची जाणीवही करून द्यायला हवी.”
कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी संत साहित्यातील विचार पेठा-पेठांत रुजविला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “आजची राजसत्ता धर्माधिष्ठित झाली आहे. राजसत्ता बहुजनांच्या हाती आणायची असेल तर संतांचे विचार समजून घ्यायला हवेत. संविधानाच्या संरक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी.”
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी “अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे देव आणि धर्माच्या बाबतीत तटस्थ आहे. तिचा देव आणि धर्माला विरोध नाही”, हे स्पष्ट केले.
कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना विद्यापीठ हायस्कूलमध्ये १९९२ साली झाली. आज सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सुरुवातही विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी करायचे याची आठवण करून देऊन, कोल्हापूर शाखेच्या फाउंडर मेंबरांचा सत्कार करण्याची विनंती पाहुण्यांना केली. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते पहिले अध्यक्ष बी. एम. पाटील, पहिले सचिव अनिल चव्हाण, शाम परीट, पी. एस. जाधव, रघुनाथ भोसले, एस. एस. कुंभार, कुसुम शिंदे, बी. डी. गोसावी यांचा सत्कार पुस्तके देऊन करण्यात आला. त्यानंतर इयत्ता तिसरीच्या पुस्तकात कविता समाविष्ट करण्यात आल्याबद्दल लेखक बाबूराव शिरसाठ, ‘लोकवाङ्मय’तर्फे पुस्तक प्रकाशित होत असलेल्या लेखिका तेजस्विनी देसाई, वार्तापत्रामध्ये लिखाण करणार्या छाया पोवार आणि वैशाली जंगम यांचेही सत्कार करण्यात आले.
माजी मुख्याध्यापक बी. डी. गोसावी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अॅड. अजित चव्हाण यांनी पुस्तक परिचय करून दिला. व्यवस्थापक संपादक राहुल थोरात यांनी दहा पुस्तकांचा सेट सवलतीच्या दरात देत असल्याचे सांगितले. त्याला श्रोत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. १०० च्या वर सेटची विक्री झाली, तर त्याच्या दुप्पट सेट नोंदवले गेले.
अध्यक्ष विलासराव पोवार यांनी आपल्या भाषणात अंधश्रद्धा वाढवणार्या चित्रपटांचे शूटिंग करताना झालेल्या घटना सांगून, अंधश्रद्धा वाढवणार्या चित्रपट आणि सिरियलला आळा घालण्याची मागणी केली.
कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मंगल परूळेकर, अमर जाधव, आनंद चौगुले, साधना देसाई, जयंत मिठारी, राजेंद्र खंद्रे, प्रभंजन चव्हाण, सुनंदा चव्हाण, योगतज्ज्ञ शोभा पाटील, अॅड. शशांक चव्हाण इत्यादींनी परिश्रम घेतले.
अनिल चव्हाण यांनी सूत्रसंचालन, तर रमेश वडणगेकर यांनी आभार मानले.
