एका संवेदनशील मनाचे विवेकी चिंतन

प्रभाकर नानावटी -

अवधूत परळकर यांचे ‘उभ्या पिकातलं ढोर’ हे पुस्तक वाचताना ते आपल्या मनातल्याच गोष्टी मांडत आहेत की काय, असे वाटू लागते. आपल्या अवतीभोवती जे काही चाललेले आहे, ते पाहत असताना मन उद्विग्न होत असते व आपल्याला प्रश्न पडू लागतात. या पुस्तकाच्या ‘ब्लर्ब’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे गरीब असू तर उद्याच्या भाकरीचं काय? श्रीमंत असू तर आपण कोण आहोत? कशाला आलो आहोत? सुख म्हणजे काय? वगैरे… यांसारख्या प्रश्नांना उत्तर शोधण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याला नेमक्या शब्दांत ते मांडता येत नाही. परंतु लेखकाच्या संवेदनशील मनाला पडलेल्या अनेक बर्‍या-वाईट गोष्टींचा आढावा ते या पुस्तकातून घेतात. पुरोगामित्वाची बदनामी, संकटकाळात दाखवत असलेली संवेदनविहीनता, अटळ वास्तवाचा स्वीकार करण्यास नकार, स्वमग्नता, परंपराप्रियता, घटनांचे चुकीचे अर्थ लावण्याचे प्रयत्न, सामाजिक दडपणाखाली वावर, लपवाछपवी, अपारदर्शकता, एकांगीपणाचा गर्व, भरल्यापोटी पर्यावरणावरील प्रेम, स्वेच्छा जीवन जगण्याची आस, जातपात, सहजीवन, मानवी सभ्यता, भाषा व प्रादेशिक अस्मितेचे प्रदर्शन, बुद्धिहीनता, अंधश्रद्ध रुढीकडील वाटचाल, उच्चपणाचा अट्टहास, स्मरणरंजन इत्यादी वेगवेगळ्या विषयांवरील त्यांनी लिहिलेले लेख या पुस्तकात असून विषयाची विविधताच आपल्याला पुस्तक वाचण्यास प्रेरित करते व वाचत असताना वाचक थक्क होऊन जातो.

पुस्तकातील एका लेखाचा मथळाच पूर्ण पुस्तकाचे शीर्षक असल्यामुळे पुस्तक उघडल्या-उघडल्या हे शीर्षक म्हणजे नेमके काय आहे, असा प्रश्न शहरी मनाला पडण्याची शक्यता असते व आपण तो संपूर्ण लेख वाचू लागतो. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे गुरा-ढोरांनी पिकात धुडगूस घालावा, तसे आपले विचार/अविचार धुडगूस घालत आहेत, याचा प्रत्यय भोवतीचं बिघडलेलं वातावरण बघितल्यावर येतं. ज्या प्रकारे शेतातील उभ्या पिकांची नासाडी गुरं-ढोरं करतात, त्याचप्रकारे भावनिक उद्रेक, बेशिस्त व बेलगाम स्वैराचार माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावू शकतात. कितीही नको म्हटले तरी अविचार मनाचा ताबा घेत सैरभैर भटकायला, तारतम्य सोडायला भाग पाडतात. खरे पाहता मन चांगले विचारही सुचवत असते. परंतु हेच मन अनेक वेळा भरकटत वाईट कृत्य करण्यास, हिंसाचार करण्यास उद्युक्त करू शकते. नीतिनियम, कायदेकानू, शिक्षण व संस्कार यांतून मानवी मनाला चांगले घडविण्याची धडपडसुद्धा मनाचा हा घोळ थांबवू शकत नाही, असे लेखकाला वाटते. भोंगळ परिवर्तनवाद्यांच्या, भोंगळ राजकीय नेत्यांच्या आणि भोंगळ बुवा-महाराजांच्या, ज्योतिषांच्या आपण नादी लागणे व यात काही गैर आहे, याची पुसटशीसुद्धा शंका न येणे हे मनाचेच खेळ आहेत, असे लेखक सुचवू इच्छितात.

या पुस्तकातील एकूण एक लेख वाचत असताना आपल्या मनात उमटलेल्या विचारांचेच सार असावे, असे वाटू लागते. आपल्या समाजासमोर कुणीतरी आरसपानी आरसा धरून आपण राहत असलेल्या समाजातील खाचाखोचांकडे, आपल्या वर्तनाकडे, आपल्या विचारआचारांकडे आपले लक्ष वेधत असलेले हे मुक्तचिंतन आहे. ज्या समाजात पुरोगामी ही एक शिवी होत आहे; काही कारणांमुळे एखादी इमारत कोसळून त्या खाली गाडलेल्यांना काढत असताना ते एक ‘टूरिस्ट स्पॉट’सारखा व तो प्रसंग एक ‘अनफॉर्गेटेबल इव्हेंट’सारखा साजरा केला जात आहे, सर्व प्रेषित प्रभावविहीन होत आहेत, स्वतःवरच फुले उधळण्यात स्वतःचा उदो-उदो करून घेण्यात धन्यता मानली जात आहे, स्वतःचं घोडं दामटवलं जात आहे, एकमेकांच्या उरावर बसल्याशिवाय पुढे सरकता येत नाही, अशी स्थिती आहे. भूतकाळात रमल्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, असे समजले जात आहे. स्वांतसुखाय, ध्येयशून्य, विचारशून्य, नीतिशून्य आणि भोगवादी समाजविन्मुख जीवनशैलीची ओढ आहे. आर्थिक निर्देशांकालाच विकासाची मोजपट्टी समजले जात आहे. हा समाज आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक अराजकात सापडलेला आहे, याचे कुणालाच काही वाटेनासे झाले आहे. विरोधी पक्षनेते, पत्रकार, चळवळवाले इत्यादींच्या तथाकथित ‘कांगाव्या’कडे दुर्लक्ष केले जात आहे. पोषाखावरून, रंगरुपावरून माणसांची पारख केली जात आहे (व तशी ओळख व्हावी म्हणून पोषाखही बदलले जात आहेत!). कपडे माणसासाठी की माणूस कपड्यांसाठी, हे कळेनासे झाले आहे. प्रांत, भाषा, जातपात, धर्म-पंथ, व्यवसाय इत्यादीवरून माणसांना जोखले जात आहे. आपल्या आधुनिकतेला झाकण्यासाठी परंपरेचा मुखवटा चढवला जात आहे. मूलभूत शहाणपणावर सामाजिक दडपण लादले जात आहे. लिहिणे-बोलणे यात मोकळेपणा नसून आपल्या ऐकण्या-बोलण्यातही मर्यादा पडत आहेत. जात, पोटजात यांना अनाठायी महत्त्व दिले जात आहे. वृथा अभिमानात व द्वेषभावनेतच जीवनानंद सामावला आहे, अशी समजूत करून दिली जात आहे. मनात नसतानाही बळेबळे जुळवून घेणे, नमते घेणे हा जीवनाचा मंत्र होत आहे. वास्तवाशी प्रतारणा करत आपल्या मनाला सुखावणारी, उत्साहित करणारी विधानं करत त्यांनाच वास्तव म्हणून कवटाळण्याची वृत्ती वाढत आहे. व्यवहारातील पारदर्शकता लोप झाली आहे. वैचारिक लपवाछपवींना ऊत आला आहे. सभा-संमेलनात उपस्थित असलेल्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे भाषणं केली जात आहेत, आरती ओवाळल्या जात आहेत. पर्यावरणाची चुकीची व्याख्या केली जात आहे. सर्वांगीण विकासाच्या (फक्त) गप्पा मारल्या जात आहेत. मनाजोगं आयुष्य जगणं कठीण होत आहे…. असे एक ना दोन, समाजातील अशा अनेक परस्परविसंगतीवर लेखक बोट ठेवत आहेत.

परळकर अतिशय प्रवाही शैलीत व उदाहरणं देत हे सर्व विषय वाचकांपर्यंत पोचवत आहेत. ‘पुरोगामी’ या विषयावर टिप्पणी करत असताना ‘पुरोगामी’ हा शब्द ज्या समाजात शिवी म्हणून वापरला जात आहे, त्या समाजाविषयी काय बोलावं, असा प्रश्न ते करतात. लेखकाच्या दृष्टीने ‘पुरोगामीपण ही फार मोठी कष्टप्रद गोष्ट नाही. त्यासाठी फार विद्वत्तेची गरज नाही. मानवी जीवन जगताना माणसानं माणसाप्रमाणे जगावं, मानवी मूल्यांचं पालन करावं, सतत चांगुलपणा, समाजहित, समता आणि न्यायाच्या बाजूनं उभं राहावं, ही साधी गोष्ट आहे. जितकी साधी तितकीच सोपी व नैसर्गिक,’ पुरोगामी माणूस मूलतः विवेकनिष्ठ असतो. ज्ञानसंपन्न नसला तरी ज्ञानग्रहणाकडे ओढ असते. पुरोगामी स्वतः हिंसक नसतो व हिंसेचे तो कधीच समर्थन करत नाही. त्याला युद्धं निषिद्ध असतात. त्याच्याकडून शारीरिक उपद्रव संभवत नाही. लेखकाच्या मते, पुरोगाम्यांचा उघड तिरस्काराची कारणं धार्मिक संस्कारात प्रामुख्याने आढळतात.

संकटग्रस्त परिस्थितीला एखाद्या ‘इव्हेंट’सारखं साजरा करणार्‍या आपल्या समाजाच्या कोत्या दृष्टिकोनाबद्दल लेखक ताशेरे ओढतात. दैनंदिन जगणंच असह्य होऊन बसलेली, राजकारणी आणि प्रशासकांच्या भ्रष्टाचारानं पिडलेली माणसं आज आर्थिक दुरवस्थेबरोबर सांस्कृतिक विपन्नावस्थाही अनुभवत आहेत. दुःखी माणसाचा सदरा घालून हिंडणारी, कशान्कशावर तरी नाराज असलेली ही माणसं सर्वत्र बघायला मिळतात. ही नाराजी अनागोंदी कारभाराबद्दल, व्यवहारातील घसरलेल्या नैतिक मूल्यांबद्दल, धर्माला आलेल्या सवंग उत्सवी रुपाबद्दल, अवैज्ञानिक विचार पद्धतीबद्दल, शिक्षण क्षेत्रातील बाजारूपणाबद्दल, बोकाळत चाललेल्या गुन्हेगारीबद्दल इत्यादी प्रकारच्या अनेक गोष्टींबद्दल असू शकते. नाराजीचा अथांग महासागरच चहूकडे पसरला आहे, असे लेखकाला वाटू लागते.

आपल्या कर्तृत्वाचे ढोल आपणच वाजवू नयेत, आपल्या गुणाचे पोवाडे आपणच गाऊ नयेत (आणि त्यासाठी दुसर्‍याचा अवकाश, वेळ व चांगुलपणा तर अजिबात वापरू नये) यावर लेखक भर देतात. अजून एका लेखात सखोल संशोधन, समाजनिरीक्षणाची आवड, नवं काही करण्याची आंच, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास अशा गोष्टी आऊटडेटेड होत आहेत की काय, याबद्दल लेखक खंत व्यक्त करत आहेत. तत्त्वनिष्ठ माणसंही तडजोड करतच जीवन जगत आहेत, याचं लेखकांना वाईट वाटतं. जातीयवाद, अंधश्रद्धा, कर्मकांडांचे स्तोम, असहिष्णुता यांना ऊत आला आहे, असे विधान करत असतानाच या गोष्टी आताच नव्हे, तर यापूर्वीही होत्या असे लेखक स्पष्ट करतात.

पर्यावरणाच्या बाबतीत उपयुक्तता हे मूल्य ठरवून निसर्गाकडे पाहण्यात चूक आहे, असे लेखकाला वाटते. पर्यावरणाबद्दल केवळ फुशारकी न मारता त्याची चिंता करताना पृथ्वीतलावरील सर्व जीवमात्रांबरोबर माणूसही येतो, याचे भान ठेवल्यास पर्यावरण की विकास, हे द्वंद्व संपून जाते; मग विकास हा मानवी पर्यावरणाचा एक भाग बनू शकतो.

चांगल्या तर्‍हेचे जीवन जगण्यासाठी आशा बाळगत असताना विपन्नावस्थेत जगणार्‍यांचेही भान ठेवायला हवे, असे लेखक सुचवितात. आर्थिक दारिद्य्र हे एका प्रकारचे अपंगत्व असल्यामुळे दारिद्य्ररेषेखालील आदिवासी, लहान शेतकरी, शेतमजूर, ऊसमजूर, बांधकाम कामगार इत्यादींकडे पैसा नाही म्हणून चांगले अन्न नाही, धड घरदार नाही, शिक्षण नाही आणि बौद्धिक विकासाच्या संधी नाहीत.

समाजातील जातीय भावना जुनी आहे आणि त्या अपप्रवृत्तीकडे डोळेझाक करण्याची सवयही तितकीच जुनी आहे, अशी जातपातीसंबंधी लेखक टिप्पणी करतात. खंबीर, कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्तीबरोबरच घट्ट जातीयवादी वृत्ती बाळगून बसलेल्या व्यक्तीसुद्धा या समाजात वावरत असतात. कधी त्या कष्टकरी वा आपले सहकारी किंवा आपल्या वरिष्ठांच्या भूमिकेत भेटत असतात. ही अवस्था अशीच बिनबोभाट चालली असून जातीय उतरंडी व त्यावर आधारलेली मानसिकता नष्ट होत आहे, असे म्हणणारे स्वतःला फसवून घेत आहेत, असे लेखकाला वाटते. एकूण, जात ही मानसिकता उराशी कवटाळून जो समाज जगत आहे, तो विसावं शतक ओलांडून एकविसाव्या शतकात आला आहे, असे का मानायचे, हा प्रश्न लेखकाच्या समोर आहे. त्याचप्रमाणे विभूतिपूजेचा शाप या समाजाला लागलेला आहे. या विभूतिपूजेऐवजी विचारांच्या पूजेचं वरदान मिळालं असतं तर आजचं पूर्ण वातावरण वेगळं असतं, अशी खंत लेखक व्यक्त करतात.

राष्ट्राच्या उभारणीत, त्याच्या विकासकामात विपुल नैसर्गिक संपत्ती व ही संपत्ती देशाच्या विकासाकरिता उपयोगात कशी आणायची, याचे ज्ञान व तंत्र व हे तंत्र जाणणारे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंते, व्यवस्थापक, प्रशासक, अर्थतज्ज्ञ, उद्योजक इत्यादींच्याइतकेच इतर मनुष्यबळाचासुद्धा -अंगमेहनतीची कामं करणारे मजूर, यंत्र कामगार, बांधकाम मजूर, खाण कामगार, माथाडी कामगार, सफाई कामगार, ट्रकचालक, वीज कामगार इत्यादी – तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणापासून वंचित झालेले हे मजूर अर्थार्जनासाठी ही कामं करत असतात. त्यामुळे त्यांना बुद्धिहीन वा निर्बुद्ध म्हणून हिणवू नये, असी अपेक्षा लेखक एका लेखात व्यक्त करतात. सर्वच क्षेत्रात कुशल-अर्ध कुशल-अकुशल अशी विभागणी असते. त्यातही प्रतिष्ठित-अप्रतिष्ठित अशी कामाची विभागणी असते. नाईलाज म्हणून माणसं सफाई कामगार, कुरिअर बॉय, ऊस तोडणी मजूर व इतर अशा प्रकारची शारीरिक श्रमाची कामं पत्करत असतात. त्यामुळे श्रमप्रतिष्ठेच्या पोकळ गप्पा मारत असल्यास अशा कामांना चिकटलेली अप्रतिष्ठा इतक्या सहजासहजी नष्ट होणार नाही, असे लेखकाला वाटते.

कौटुंबिक आयुष्यातील काही अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व सामाजिक व राजकीय बाबीकडे निर्विकारपणे बघण्याची सवय समाजाला जडली आहे, असे लेखकाचे स्पष्ट मत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासारख्या अनेक जनहितकारक प्रश्नांत धड विरोध नाही, धड पाठिंबा नाही, अशीच सर्वसाधारण जनतेची भूमिका असते. राजकीय घटना तर बहुरंगी तमाशा झाल्या आहेत. राजकीय घडामोडींवरील चर्चेच्या कार्यक्रमांकडे दैनंदिन करमणुकीचे कार्यक्रम म्हणून बघितले जात आहे. चर्चेतून काही निष्पन्न होत नाही. चर्चेतून समोर येणार्‍या कोणत्याही प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न प्रेक्षकाच्या मनाला शिवत नाही. मुळात अशा चर्चेत बुद्धिजीवींची यथेच्छ टिंगल-टवाळी केली जाते. ‘हस्तिदंती मनोर्‍यातील बुद्धिनिष्ठ’ म्हणून हिणवले जाते. परंतु मनोर्‍याबाहेरील सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न तरी चर्चिले जातात काय, असा प्रश्न लेखक उपस्थित करतात. नवीन विचार, नवे आचार समजून-उमजून घेण्याबाबतीतील औदासिन्य मनाला वीट आणणारे आहे.

मुळात कुठल्याही गोष्टीबद्दलचे साधक-बाधक अभिप्राय, मत किंवा विचार करण्याची कुवत नाही व असली तरी विरोधी विचारांना स्वीकारण्याची खिलाडू वृत्ती नाही, हे सर्व क्षेत्रात जाणवत आहे, असे लेखकांचे मत आहे. कुठल्याही प्रश्नासंबंधी गप्प बसण्याचं तंत्र सोपं असल्याने तेच मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे, असे निरीक्षण लेखक नोंदवतात. या गप्प बसण्यामुळे भोवतालचे लोक त्यांच्या बोलण्याला मूक संमती आहे, असे गृहित धरतात. मनातील विरोधी विचार मनातच मारले जातात. स्पष्टपणे विचार उघडे केल्यास पूर्ण समाजाचा रोष पत्करावा लागेल, ही भीती कायमचीच मनात ठाण मांडून बसलेली असते. या भीतीमुळे तोंडच उघडले जात नाही. दरवेळी दिलगिरीपूर्वक भाषेतच (‘माफ करा, स्पष्ट बोलतो,’ असे म्हणतच!) आपला विरोध प्रकट करावा लागतो, याची खंत लेखक व्यक्त करतात. घरातील कौटुंबिक वातावरणातसुद्धा स्वतःचे विचार व भावना लपवत वावरावे लागत आहे. कुणाच्या भावना केव्हा व कसे दुखतील, याचा नेम नसतो, म्हणून ही तयारी असते. तेथे एका अदृश्य भीतीचे दडपण असते. अगदी भावाभावांत, पालक व अपत्यांत, नवरा-बायकोतसुद्धा मोकळेपणा नसतो. बोलताना वापरायच्या शब्दांबाबत सावधगिरी बाळगावी लागते.

अजून एका लेखात आपण माणूस आहोत, याचेच विस्मरण होत आहे की काय, याबद्दल लेखक आश्चर्य व्यक्त करतात. त्यांच्या मते कटु स्मृती, फजितीचे प्रसंग, लढाईतील पराभव, तरुण वयातील विश्वासघात वा अपमानाचे प्रसंग, प्रियजनांचा वियोग इत्यादींचे विस्मरण होण्यात काही गैर नाही. परंतु धर्म आणि जातीय द्वेषावर आधारलेल्या इतिहासातल्या दंगली, अत्याचार, धर्मातील कालबाह्य संकल्पना, पुराणातील चमत्कार, समाजविघातक पाशवी परंपरा इत्यादी गोष्टी मात्र विस्मरणात जात नाहीत. इतिहास विसरलो तरी वर्तमान विसरता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे आपण माणूस आहोत, याचे कधीही विस्मरण होऊ नये, असे लेखक आवर्जून सांगत आहेत.

(मराठी) माणसातील आंतरिक संघर्षाविषयी लिहिताना ‘सर्वसामान्य मराठी माणसाचं मानसिक द्वंद्व संपत नाही. त्याला शहरी सुविधा हव्या आहेत आणि खेड्याचा नयनरम्य निसर्गही घराभोवती हवा आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला गगनचुंबी इमारतीतल्या एकोणिसाव्या मजल्यावर टेरेस फ्लॅट हवा आहे आणि मुला-नातवंडांना विहीर, रहाट, नदी, गायी-म्हशी, बैलगाडी दाखविण्यासाठी खेड्यामधले घर कौलारूदेखील हवं आहे. एकीकडे, आत्मीक समाधानासाठी त्याला परंपरा जतन कराविशी वाटते आणि दुसरीकडे, व्यावहारिक सुखोपभोगासाठी आधुनिक जीवनशैली आत्मसात कराविशी वाटते आहे. या आंतरिक संघर्षानं तो भांबावून गेला आहे,’ अशी टिप्पणी लेखक करतात. स्मरणरंजनातच मनोरंजन शोधणार्‍या मराठी माणसाला ते नेमके ओळखून काढतात.

अशा प्रकारे लेखक अनेक विषयांवर विवेकी चिंतन करत (व थोडेसे चिमटे काढत) आपल्यासमोर आरसा धरत आहेत. हा आरसा आपले गुण-दोष उघडे करतो. आपण त्या गुण-दोषांचे विश्लेषण करून सुधारणा घडवून आणावी, असे लेखकाला वाटते व ही जबाबदारी ते सूज्ञ वाचकांवर सोपवितात.

दैनंदिन व्यवहारातील अनेक प्रश्न व समस्यांवर विवेकी तोडगा सुचविणारे हे एक आगळे-वेगळे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव : उभ्या पिकातलं ढोर

लेखक : अवधूत परळकर

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई

किंमत : 200 रु, पृ. सं. 184


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]