अविनाश पाटील - 9422790610
चार पिढ्यांची गाणी आणि भटक्यांचा संसार
‘जग बदल घालुनी घाव, गेले सांगुनी भीमराव’ अशा काळजाचा ठाव घेणार्या, हाक घालणार्या अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 1 ऑगस्ट 2019 पासून सुरू झालंय आणि त्याचा समारोप या महिन्याच्या 1 ऑगस्ट 2020 ला होत आहे. त्याचा संदर्भ काय? स्वत: भटक्या, विमुक्त, वंचित समूहामधून येऊन त्यांच्या उत्थानासाठी सर्वतोपरी झटणारे अण्णा भाऊ शतकानंतरही हवेच आहेत. कारण व्यवस्थेत अजूनही या पददलित समूहांना माणुसकीने, सन्मानाने जगण्याचा अवकाश आपण ‘आहे रे’ नी तयार करून दिलेला नाहीच ! खरं तर आता आता 2010 नंतर भटक्या-विमुक्त-वंचित समाजघटकांच्या जगण्याच्या मूलभूत प्रश्नांना सत्तेचा, लाभाचा थोडा वाटा मिळण्याच्या शक्यता निर्माण होताना दिसतात. त्यामुळे तशी त्यांच्या जीवनाची सकाळ तर आताच्या पिढ्यांना बघायला मिळते आहे. आधीच्या पिढ्या अगदी लोकशाहीर, कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंसकट सर्वांनाच आतापर्यंत त्यासाठीच ‘खत’ व्हावं लागलं आहे. आजही गावगाड्यामध्ये बारा बलुतेदार-अलुतेदारांमध्ये न मोडणारा असा जनसमूह जो राहत होता, त्याची सर्वार्थाने वंचना होताना दिसते आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामधे आणण्यात आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहोत, याचा अनुभव आम्ही अनेकानेक प्रकरणे हाताळताना घेत आहोत. निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, अगतिकता, असुरक्षितता जन्मतःच मिळालेली असल्यामुळे त्यातच खितपत न पडता त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा देणार्या सभोवतालचा अभाव आहे. त्या अभावी परिस्थितीला संधीमध्ये परावर्तित करायची जबाबदारी विकासाची डिमडिम वाजविणार्या सत्ताधारी, सत्ताकांक्षी, धोरणकर्त्या, प्रशासकीय आणि बोलक्या ‘आहे रे’ वर्गाची राहिलेली आहे. त्याबद्दल कोणी त्यांना जाब विचारायचं सोडूनच द्या; उलट त्यांच्या विविध प्रकारच्या अदृश्य दहशतीखाली जगताना दिसतो आहे. अशाही विदारक परिस्थितीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या अण्णा भाऊंसारख्यांचे कर्तृत्व आज सगळ्याच ‘नाही रे’वर्गाचे घटक असणार्या आणि त्यासाठी लढणार्या सर्वांना प्रेरणादायी आहे. आपल्या वेदनेला विधायकतेसाठीची प्रेरणा म्हणून तिचे रूपांतर वेगवेगळ्या प्रभावी विद्रोही कलाकृतींमध्ये करणारा ‘निरक्षरांचा साहित्यिक’ असे अण्णा भाऊंना म्हणावे लागेल; तर पीडित, बाधित, अन्यायग्रस्त व्यक्ती व समूहांना व्यवस्थापरिवर्तनासाठी प्रेरित करणारी, सर्वसामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नांविषयी सवाल विचारणारी गाणी तयार करणारा व आपल्या बुलंद आवाजात संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी मनाला चेतवणारा ‘क्रांतिकारी शाहीर’ अशी ओळख अण्णा भाऊंबाबत आम्हाला मिळालेली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी हाक दिली गेली असताना ‘माझी मैना गावांकडं राहिली। माझ्या जीवाची होतीया काहिली॥’ असे आर्त भावनिक आवाहन अण्णा भाऊंनीच केलेले म्हणून आपण आजही त्याचे स्मरण करतो. कष्टकर्यांच्या घामाच्या श्रमावर ही पृथ्वी तोललेली आहे, ना की शेषनागाच्या फण्यावर, हे ठणकावून सांगताना तर अण्णा भाऊंनी सर्व परलोकवादी कपोलकल्पित दावे, भ्रांती व भ्रामक, भाकड कथांना फाटा दिलेला आहे. अशा एक ना अनेक संदर्भाचा उल्लेख अण्णा भाऊंचे लिखाण व कवन कार्यकर्तृत्वाचा करता येऊ शकेल.
अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबर्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (1959) समाविष्ट आहे, जी आता 19 व्या आवृत्तीत आहे आणि इ. स. 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार ‘फकिरा’ला मिळाला आहे. साठेंच्या लघुकथांचा संग्रह 15 आहे, ज्या मोठ्या संख्येने बर्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली.
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथाशैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रुढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणार्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकार्याद्वारे अटक करून त्यांचा छळ केला जातो आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.
मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला, जे याला ‘डायस्टोपियन’ परिवाराच्या रुपात दर्शवतात. आरती वाणीने त्यांच्या दोन गाण्यांतून – मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण असे शहरातील परिस्थिती दर्शवणारे वर्णन केले आहे.
समाजवादी, कम्युनिझम ते आंबेडकरवादी वाटचाल
अण्णा भाऊ साठे पहिल्यांदा कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते. डी. एन. गवंकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लालबावटा कलापथक या तमाशा नाट्यप्रसाराचे सदस्य होते, ज्याने सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते 1940 च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्यानंतरच्या 1950 च्या दशकातील सर्वांत रोमांचकारी नाटकीय घटना होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती, ‘ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है।’ ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’मध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, जिने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषक राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.
अण्णा भाऊ साठे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. 1958 मध्ये बॉम्बेमध्ये भरविण्यात आलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले होते की, ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.’ यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य बौद्ध धर्माऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.
त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षक करण्याची जबाबदारी दलित लेखकांवर देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.
विदारक वास्तवाचे दाहक जीवन
अण्णा भाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. अण्णा भाऊ हे शाळेत शिकलेले नाहीत; केवळ दीड दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथील सवर्णाद्वारे होणार्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे, तर दुसरी जयवंता साठे या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती- मधुकर, शांता आणि शकुंतला.
अण्णा भाऊंचा अंत अत्यंत दु:खदायक परिस्थितीत झाला. आयुष्यात सर्वस्व पणाला लावून जाणार्याच्या उतरत्या काळी व आयुष्याबद्दल आपल्याकडे संवेदनशीलता, कृतज्ञता भावाने बघण्याचा समंजसपणा नसल्यामुळे असे अनेक महानुभवांच्या बाबतीत घडत आले आहे, त्याला लवकर दुरुस्त करूया!
– अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष