दाभोलकरांच्यामुळे मी बदललो..!

दीपक गिरमे -

मी जवळपास तीस वर्षांपूर्वी अंनिसचा कार्यकर्ता झालो. माझा जन्म एका सधन कुटुंबात झाला. फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण केल्यानंतर वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. जसे सर्वांवर होतात तसे माझ्यावरही देवा-धर्माचे संस्कार झाले होते. अडीअडचणी सोडवण्यासाठी, मानसिक समाधानासाठी मी मठांमध्ये, बाबा-बुवांकडे जात असे. मी कित्येक वर्षे तिकडे जात राहिलो. हळूहळू त्यात काहीतरी फोलपणा असावा, असा संशय माझ्या मनात निर्माण झाला. मग मी एक या विचारांविरुद्ध दुसरा विचार मांडणारे कोणी काम करतं का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणार्‍या श्रीमती सोमण यांचा नंबर मिळाला. त्या म्हणाल्या, “मी सध्या अंनिसचे काम करत नाही, पण आपटे प्रशालेत अंनिसची साप्ताहिक बैठक होते.” मग बोरकरांना फोन करून मी अंनिसच्या बैठकीला गेलो. तिथे कार्यकर्ते देव-धर्म, शोषण, अंधश्रद्धा यावर चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करत असत. मला त्या चर्चा आवडू लागल्या. मी न चुकता साप्ताहिक बैठकीला जाऊ लागलो. त्या मिटींगमध्येच माझी डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत पहिली भेट झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, माझे बाबा-बुवांकडे जाणं बंद होऊन, मी पुरोगामी विचारांचा झालो.

डॉ. दाभोलकर आठवड्यातून एकदा पुण्यात येत तेव्हा माझ्या कारमधून त्यांना व कार्यकर्त्यांना घेऊन पत्रकार, संपादक, विचारवंतांना भेटायला जात असू. विचारवंतांमध्ये त्यांना मोठा मान होता. तोपर्यंत ते सा. साधनाचे संपादक झाले नव्हते. आम्ही ‘आयुका’मध्ये डॉ. जयंत नारळीकरांना भेटायला अनेकदा जायचो. साधनेच्या कचेरीत डॉ. दाभोलकरांना भेटायला अनेक विद्वान मंडळी यायची, त्यांच्या चर्चा मी ऐकायचो.

२००२ साली डॉ. दाभोलकरांनी अंनिसच्या ट्रस्टचा तुम्ही विश्वस्त व्हावे असा माझ्यासमोर प्रस्ताव मांडला. मी दाभोलकरांना म्हणालो, “या कामाचा मला अनुभव नाही.” ते म्हणाले, “तुम्ही विश्वस्त व्हा, काही अडचण आली तर मी आहेच सांभाळून घ्यायला.” अंनिसच्या बैठकींना सातत्याने जात असल्याने यापूर्वीच मला पुणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष केलं होतं. दाभोलकर असेपर्यंत ट्रस्टच्या कामाची फार जबाबदारी नव्हती, मात्र ते गेल्यानंतर जबाबदारी वाढली.

याच साली माझी थोरली मुलगी पौलमीचं लग्न करायचं ठरवलं. मला धार्मिक पद्धतीनं तिचं लग्न लावायचं नव्हतं आणि रजिस्टर पद्धतीतील कोरडेपणाही नको होता. आपल्या विचारांना साजेशा म. फुलेंच्या सत्यशोधक विवाह पद्धतीनं लग्न लावायचं ठरवलं. त्या दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांचं मन सत्यशोधक विवाह पद्धतीकडे वळवलं. सत्यशोधक विवाह पद्धतीवर छोटी पुस्तिका लिहिली. तिचा मराठी, हिंदी अनुवाद करून घेतला. आज माझ्या घरच्यांचा कर्मकांडावरचा विश्वास नाहीसा झाला आहे.

दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा मी ऑस्ट्रेलियातून नुकताच पुण्यात आलो होतो. हत्या झाली हे सांगणारा फोन आला तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसेना. इतक्या भल्या माणसाचा खून कसा काय होऊ शकतो? पण ती बातमी खरी होती. हादरवणारी होती. त्यानंतर मी फार अस्वस्थ झालो. आजारी पडलो.

आज डॉ. दाभोलकर जाऊन दहा वर्षे झाली आहेत. मागचं सर्व जेव्हा आठवतं, तेव्हा माझ्यासारख्या अंधश्रद्धाळू व्यक्तीत झालेलं परिवर्तन, दाभोलकरांसोबत घालवलेली वीस वर्षे, त्यांनी विश्वास ठेवून अंनिसचा विश्वस्त बनवलं याचं समाधान वाटतं. मात्र, त्यांच्या हत्येचं दुःखही आहेच. ही न भरून येणारी जखम आहे. दाभोलकर पृथ्वीमोलाचा माणूस होते.

– दीपक गिरमे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]