प्रेमवीरांचे आंतरधर्मीय सत्यशोधकी लग्न करून दिले ‘महाराष्ट्र अंनिस’ने

गजेंद्र सुरकार -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात व धर्म ही पूर्णत: अंधश्रद्धा मानते. कारण ती मानवनिर्मित असून शेती व शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या उद्योगावर आधारित आहे, असे स्पष्ट मत समितीचे आहे. त्यामुळे जात व धर्माला सारून स्त्री व पुरुष या संविधानाने मान्य केलेल्या जातीलाच व भारतीय हा धर्म मानून लग्नाचा निर्णय घेतलेल्या स्वप्निल अनिल वर्‍हाडे (रा. नांदोरा, सेवाग्राम, जि. वर्धा) व प्रांजली रमेश कुमरे (रा. सेवाग्राम, जि. वर्धा) यांचे महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधकी विवाहाप्रमाणे नुकताच वर्धा वर्धन हॉल सभागृह, वर्धा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने व जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल यांच्या सहकार्याने उपस्थितांच्या, मान्यवरांच्या साक्षीने सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला.

यावेळी मंचावर राजू गागोसेकर, राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, तालुकाध्यक्ष अरुण कडू, गुड्डू देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. कामातून ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व लग्नाचा निर्णय घेताना; पण भिन्न जात, धर्म यांचे अडथळे, कुटुंबाच्या अडचणी समोर आल्या. गुड्डू देशमुख यांचा अनिलशी संपर्क होता. त्याने अडचण सांगितली, त्यांनी लगेच गजेंद्र सुरकार यांना फोन करून सर्व हकिकत कथन केली. लागलीच मान्यता देऊन दिवस पक्का केला. सर्व कायदेशीर पूर्तता करूनच सप्तपदी भरत कोकावार, विजय पचारे यांनी वदवून घेतल्या. सूत्रसंचालन सुनील ढाले, तर प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. महात्मा फुलेंचा अभंग संजय भगत यांनी म्हटला. सर्वांना पेढे वाटून विवाह उत्साहात पार पडला. सेवाग्राम परिसरातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.