-

१. सावित्री
ऐन मध्यावर पौर्णिमेचा चंद्र
अचानक गेला
तेव्हा तू ओलाचिंब केलास
काळरात्रीचा पदर.
कबूल आहे तो संपला असता हळूहळू
तर सजवली असतीस आधीच
स्वतःची चिता;
पण म्हणून काय
यमालाच वेठीला धरायचे
आणि गुंडाळायचे वडाला धागे?
सुतावरून जाता येते स्वर्गात;
पण आणता येत नाही परत पोचलेल्या प्रवाशाला
हे कळलंच कसं नाही तुला?
आणि एवढं करून शेवटी काय
तर, निघून गेलीस स्वतः
पातिव्रत्याचे धडे
अन् प्रेमाच्या कसोट्या
आमच्यावर लादून.
माझ्या बाये,
सत्यवानाने डागले असते तोंडावर
आणि जाळले असते तुला
तुझ्या बापाच्या राज्यासाठी
तर किती घातल्या असत्यास प्रदक्षिणा
वठलेल्या बुंध्याला?
तुझं बरे आहे गं
तू झालीस नायिका
पुराणकथांनी फोफावलेल्या वटवृक्षाची,
पण आमचं काय?
आम्ही पाचोळा
ह्या जुनाट वृक्षाचा,
बांधल्या जातो आहोत पुनःपुन्हा हजारो नात्यांनी
आणि रेशमी धाग्यांनी,
कुरवाळतो आहोत
त्यांच्या अहंकारी प्रेमाला
अन् जन्मोजन्मी
त्यांच्याच नावाचे टिळे मागत
शृंगारतो स्वतःला,
भोगतो वनवास
अग्निपरीक्षा दिल्यावरही,
फेडून घेतो स्वतःचीच वस्त्रं
ह्यांनी डावाला लावल्यावर.
सावित्रीबाई
पुन्हा एकदा येऊन जा.
या मतलबी सत्यवानांनी
केली आहे होळी
आमच्या आयुष्याची.
त्यांचे वाढू द्यायचे
हे अनाठायी तण
की संपवायच्या ह्या वेदना
जिवंत मरणाच्या
ते एकदा सांगून जा.
ते एकदा सांगून जा.
२. मेणबत्त्या घेऊन निघाल्या आहेत मुली

न्यायाच्या शोधात
सर्जनाचे सारे स्त्रोत
आटून जाताहेत आतल्या आत
गर्भाशयावर पडणार्या अवकाळी थापेच्या आवाजानं
कधी छिन्नविछिन्न होईल ते
या काळजीनं धास्तावलेल्या मुली
ओढून घेताहेत आपलं गर्भाशय खोल काळजात
आणि ठेवू पाहताहेत जपून स्वतःसाठी.
मुलींना आता वाटत तर नाही ना
करावीशी बंद
दारं गर्भाशयाची?
किंवा असंही वाटू शकेल त्यांना
असू नये लिंग
फाळासारखं रुतणारं जमिनीत
आपल्या आत वाढणार्या गर्भाचं
असावी निर्मिणारी योनीच केवळ.
गर्भाशय उखडून टाकणार्या हाताचं भय
वाढत गेलं मुलींच्या मनात
तर मुलीच संपवून टाकतील
निर्मितीच्या सार्या शक्यता.
मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी
पुरुषातही लपलेल्या अपार मायेविषयीच्या
स्त्री आणि पुरुषात उमलून येणार्या अलवार नात्याविषयीच्या,
त्यांच्यातील संवादाच्या.
मुलींच्या हातातल्या फडफडणार्या मेणबत्तीभोवती
आता मुलांनाच धरावा लागेल हात
प्रकाशाच्या किरणांना वाचवायचं असेल तर!
३. सांगायलाच हवं मुलींना

उंच आकाशात
कबूतरं सोडावीत
तशा सोडून दिलेल्या
मुलींच्या आयांच्या हातातली फिरकी
फिरायची थांबलीय आता.
ती उलटी फिरवून
आया खेचताहेत हातातला मांजा
आणि आणताहेत खाली
मुलींचे उंच उडणारे पतंग.
कोणी काटलेच ते आकाशात
आणि लटकल्या मुली अधांतरी तर…
या काळजीनं हबकलेल्या आया
सातच्या आत घरात असा इशारा देताहेत मुलींना.
मुली हिरमुसल्यात
तरी समजावताहेत स्वतःला.
सारं अस्तित्व उखडून टाकणारा तो क्षण टाळण्यासाठी
त्या लावतात डावाला
आख्खं आयुष्य
हवंहवंसं वाटणारं
आणि कोंडून घेतात स्वतःला
घर नावाच्या खुराड्यात.
खरं तर असे क्षण
धरून चिमटीत
फेकून द्यायचे
मना-शरीराबाहेर
हे सांगायला हवं मुलींना कुणीतरी
जमलंच तर त्यांच्या आयांनीच.
४. सावित्रीबाई

तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या अन्
रेखलास त्यावर शब्दांचा प्रवास.
विहिरीच्या कडांवर उभे होते जडावलेले जीव
ओटीत घेतलंस त्यांना
आणि प्रकाश दाखवलास या जगातला.
तसं सोपं नव्हतंच
उभं राहाणं शेणगोळ्याच्या गोवर्यासमोर
पण उभी राहिली ठाम
तुझ्यात धगधगणारी जिद्द.
कपाळावरच्या लालभडक चिरीनं
चिरलास अज्ञानाचा भूतकाळ
आणि आणून ठेवलंस बाईला
आत्मभानाच्या वर्तमानात.
या वर्तमानाच्या पडद्यावर
आता दिसताहेत
वडाभोवती रिंगा रिंगा खेळणार्या पोरी.
नाचताहेत त्या व्यवस्थेच्या तालावर
पूजताहेत पोथ्यांच्या गराड्यात घुसमटलेल्या देवीला;
उधळतात हळदी कुंकू
कुंकवाशिवाय जगणार्या बायांना फाट्यावर मारून.
तू लावलेल्या पणतीचा दिवा करून
प्रकाश आणणार्या हातांची
छाटताहेत बोटं डोक्यावर फेटा घालून.
माझ्या मैत्रिणी,
त्यांना सांगायला हवं
केवळ कुंकवाची चिरी रेखून कपाळावर
नाही होता येत
चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई.
अर्थ जाणून घ्यावा लागतो प्रतीकांचा आणि एक एक चिरा रचत
बांधाव्या लागतात भिंती नव्या घराच्या.
जे घर लावत राहातं पणती
बाईच्या आत वसतीला असलेल्या डोहातील खोल काळोखात
असं घर लाभण्यासाठी व्हावं लागतं
भविष्याला कवेत घेण्यासाठी
आभाळावर हक्क सांगणारी मुक्ता अन्
शोषणाच्या परंपरांचे चिरे उद्ध्वस्त करणारी तुझ्यासारखी सावित्री!
५. जमिनीवर उतरायलाच हवं आता

पायाखाली तुडवली जाताना
श्रद्धेची खणखणीत नाणी
उडताहेत चिळकांड्या सार्या आसमंतात
आणि आपण घालतो आहोत स्नान
आपल्यातल्याच एका कुरूप अंगाला भक्तिरसानं
ज्याला वास येत असतो सतत
जातीयतेचा, वर्गीयतेचा
आणि धर्मांधतेचाही.
पापं पाण्यावर सोडून
आपण कोणत्या पुण्याच्या शोधात निघालो आहोत थेट?
काय असते व्याख्या पुण्याची
आणि पापांचीही?
अर्थ बदलत चाललेत अलीकडे शब्दांचे
म्हणूनच आपण संभ्रमित!
घडवत राहतो स्फोट आपल्या आत आत
आणि हादरलेल्या मनानं
शोधत राहतो आधार सश्रद्ध हातांचा;
फरफटत जातो त्यांच्यामागे बोट घट्ट पकडून
आणि डोळे मिटून कायमचे.
हा आंधळा शोध स्वतःचाच
आज घेऊन आला असताना
विनाशाच्या वाटेवर, मी नाही झुलू शकणार
श्रद्धेच्या हिंदोळ्यावर.
मला जमिनीवर उतरायलाच हवं आता, उतरायलाच हवं.
६. माझ्या बायांनो…

माझ्या बायांनो,
किती सुखी सुखी असता देवघरात,
माजघरात, स्वयंपाकघरात
आपल्या आराध्य दैवताची पूजा करताना
ओसंडत असतो चेहरा
कृतार्थ
पडद्याआड.
घराच्या चार चौकटींना
असते महिरप घरंदाज
भिंतीच्या श्वासातून सुटत नाही नि:श्वास
उंबरठ्याआड असतो
वडिलोपार्जित दरारा.
पाऊल घुटमळत असलं दारात तरी,
पडत नाही ते बाहेर चुकूनही.
माझ्या बायांनो…
शंभर वर्षे उलटून गेलीत आता
तरी कशासाठी सांभाळता आहात हा
वेदनेचा घरंदाज वारसा
घुसमट भरून राहिली असेल घराच्या वाशांतच
तर, कसा सांभाळेल तो घराचा डोलारा.
उखडून टाकायला हवा आता
घराचा उंबरठा
आतलं आणि बाहेरचं असं नसतं काही
हे पटवायला हवं स्वत:लाच.
बायांनो बाहेर पसरली आहे स्वच्छ हवा
श्वास घ्या अन्
मोकळे करा पैंजणांचे घुंगरू
परसातील आडाचे खोल तळ
बुजवून टाका नव्या मातीनं
त्यावर लिहा गाणं आभाळाला हात पोचणार्या मुलीचं
बायांनो बाहेर या स्वयंपाकघरातून,
माजघरातून, देवघरातून
आणि करा पायाभरणी
आकाशाला कवेत घेणार्या
तुमच्या अस्तित्वाला ओळखणार्या
या भुईवरच्या तुमच्या घराची
७. महिला स्पेशल

भरगच्च हिंदकळणारा बायकांचा डबा.
श्वासात मिसळताना अनेक श्वास
ऐकू येतात एकमेकींच्या काळजाची स्पंदनं
त्या समजू शकतात एखादीचं हिंस्र होणं
चढताना धक्का लागला तर,
किंवा दुसरीचं निमूट बसणं युगानुयुगं
स्फोटक परिस्थितीतही.
तयार करतात इथंच त्यांचं छोटंसं कुटुंब
पुरुषाशिवायचं;
वाटून घेतात तिखट गोड क्षण.
खिदळतात उधळतात
दावं सुटलेल्या गाईसारख्या.
गात राहतात बेसूर;
पण स्वतःला हवं त्या तालासुरात.
त्या शोधत राहतात स्वतःला,
उभारताना आपलं एकटीचं जग
जे माहीत नसतं त्यांच्या पुरुषांना.
ह्या जगातही भयाकुल
करत राहतात पारायणं पोथ्यांची;
गुंतवत राहतात स्वतःला
उलट सुलट टाक्यांमध्ये विणकामाच्या.
प्रचंड बोलत राहतात बायका
स्वतःचाही आवाज ऐकू येऊ नये इतक्या मोठ्यानं
तर काही एकट्याच
पेलत भकास आयुष्य
पाहत राहतात मिटीमिटी
हसणार्या बायकांकडे आश्चर्यचकित.
काही झोपतात
जन्मभराचं जागरण झाल्यासारख्या
आपलं स्टेशन येईपर्यंत.
आपल्या स्टेशनवर उतरताना
गलबलून येतं त्यांना.
दुसर्या दिवशीची स्वप्नं डोळ्यांत साठवत
बायका उतरतात गच्च भरलेल्या डब्यातून
शेवटच्या स्टेशनावर तर संपून जातो
त्यांचा इवलासा संसार.
आपल्या हातानं बंद करून दार
ह्या हव्याहव्याशा घराचं
त्या प्रवेशतात त्यांच्या पुरुषाच्या घरात
तेव्हा त्यांच्या चेहर्यावर रेंगाळणार्या हास्याचा
अर्थ लागत नाही त्यांच्या पुरुषांना
आणि बायकांनाही नाही सांगावंसं वाटत काहीच
ह्या दुसर्या घरोब्याविषयी.
८. तिचं बाई होत जाणं

तशी उंबरठा ओलांडून
केव्हाच बाहेर पडली आहे ती.
फिरवूनही आणलं आहे तिला
अज्ञाताच्या प्रदेशातून
तिच्या इवल्याशा बोटाला धरून.
चेहरा नसलेल्या बायकांच्या इतिहासाचा
रंगहीन तुकडा
तिच्या हातावर ठेवताना
ठरवून सांगितले पराक्रम एकादोघींचे.
तेव्हा खरं तर तिला जाणून घ्यायचं होतं
जगणं रंगहीन चेहर्यांचं.
एखादी बाई देशाची पंतप्रधान होण्यानं
नेमका काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात?
यासारखे प्रश्नही पडत होते तिला.
स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला
असं म्हणताना,
तिच्या पायात बांधलेला अदृश्य धागा
तिला जाणवत राहतो सतत.
मग धुमसत राहते ती आतल्या आत
त्या पाल्याचा ताण सहन करत
तेव्हा वाटतं
सोडून द्यावं तिला मोकळं
या अरण्यात.
ओळखू दे तिलाच
मुखवट्यांच्या जंगलात दडलेल्या श्वापदांना
होऊ दे ओळख स्वतःची आणि जगाचीही;
पण उगीचच आठवत राहतो
योनिशुचितेच्या कल्पनांनी भरलेला
बाईचा भग्न भूतकाळ.
शेवटी मुलगी आहे
असंही येत राहतं मनात राहून राहून.
आई आणि बाई असण्यातला हा फरक
जाणवत राहतो तीव्रतेनं.
आई का असते पारंपरिक
आणि बाई स्वैर मोकळी
आकाशाला गवसणी वगैरे घालण्याची भाषा बोलणारी?
तिचं हळूहळू बाई होत जाणं
माझ्यातल्या आईपणाला ओलांडून
आता जाणून घ्यायला हवं मला,
कदाचित माझी मलाच ओळख होईल नव्यानं
– नीरजा, मुंबई
चित्रे – विजय नांगरे