करणी काढणार्‍या कारंदवाडीच्या प्रकाश मामाचा भांडाफोड

राहुल थोरात -

अंनिस आणि आष्टा पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन

राहुल थोरात

मृत सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणार्‍या कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे-पाटील उर्फ मामा यांचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली आणि आष्टा पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे केला. प्रकाश पाटील उर्फ मामावर आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या कलम ३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

त्याबाबत सविस्तर हकिकत अशी की, कारंदवाडी येथे प्रकाश विष्णू शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याचे राहते घरी दर गुरुवार, रविवार व अमावस्येच्या दिवशी दरबार भरवून लोकांच्या समस्यावर दैवी, अघोरी व जादूटोणा करून उपाय सुचवून अंधश्रद्धा पसरवितो अशी एक निनावी तक्रार सुमारे एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे आली होती. त्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा आणि डॉ. सविता अकोळे यांना डमी भक्त म्हणून दि. २६.११.२०२३ रोजी रविवारी सकाळी नऊच्या सुमारास कारंदवाडी येथे प्रकाश पाटील मामा याचे दरबारात पाठवले. तेव्हा त्यांचे घरी दरबार सुरु होता. दरबारामध्ये प्रकाश पाटील मामा यांनी ‘काय त्रास आहे’ म्हणून विचारले तेव्हा त्यास आशा धनाले यांनी सांगितले की, “माझी मयत सवत माझ्या स्वप्नामध्ये येते व मला त्रास देते व माझ्या अंगात प्रचंड वेदना होतात” असे खोटे सांगितले. यावर पाटील मामा यांनी भंडार्‍याचे रिंगण काढून, धनाले यांच्या कपाळावर भंडारा लावून सुमारे तासभर रिंगणामध्ये बसविले. त्यादरम्यान भंडारा घातलेले एक ग्लास पाणी पिण्यास दिले. ‘तुम्हाला पाच रविवार माझेकडे दरबारात यावे लागेल, मग तुम्हाला बरे वाटेल’, असे सांगितले.

त्यानंतर पाटील मामा हा अंधश्रद्धा पसरवित असल्याबाबत अंनिसची खात्री झाल्याने आष्टा पोलीस ठाणेस माहिती देऊन तक्रार देण्याचे ठरले.

त्याप्रमाणे दि.३.१२.२०२३ रोजी सकाळी दहाच्या सुमारास आष्टा पोलीस ठाण्यात अंनिसचे कार्यकर्ते गेले. प्रकाश विष्णू शेंबडे-पाटील ऊर्फ मामा हा भंडार्‍याचे रिंगणात बसवून भंडार्‍याचे पाणी पिण्यास देऊन, मंतरलेला ताईत देऊन अंधश्रद्धा पसरवितो अशी पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी पोलिसांनी अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत साध्या वेशातील पोलीस दिला. साध्या वेशातील पोलिसांना घेऊन अंनिस कार्यकर्ते प्रकाशमामा याचे कारंदवाडीच्या दरबारात पोहोचले. कार्यकर्त्यांचा नंबर आल्यानंतर प्रकाश पाटील मामा यांना अंनिस कार्यकर्ते आशा धनाले यांनी ‘माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे’ असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी परत भंडार्‍याचे रिंगणात बसवून कपाळावर भंडारा लावून, जिभेवर भंडारा टाकून आता तुम्हाला बरे वाटेल असे सांंगितले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला व डॉक्टरांची औषधं घेऊ नका म्हणून सांगितले. इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, साहाय्यक पोलीस फौजदार दीपक भोसले, पोलीस नाईक दीपक पाटील, महिला पोलीस उज्ज्वला पाटील, पोलीस हवालदार प्रवीण ढेपने आणि अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात, शशिकांत बामणे हे मामाच्या दरबारात दाखल झाले. त्या वेळी प्रकाश मामा लोकांवर अघोरी दैवी उपाय करत होता. दैवी अघोरी उपायासाठी वापरले जाणारे ताईत, गंडेदोरे, भंडारा, लिंबू अशा वस्तू पोलिसांनी सदर ठिकाणचा सविस्तर पंचनामा करुन संबंधित वस्तू जप्त केल्या. पोलीस प्रकाश मामाला ताब्यात घेऊन आष्टा पोलीस स्टेशनला घेऊन आले.

दरबारात बसून आपल्या दैवी शक्तीने कोणी करणी केली आहे हे सांगणारा प्रकाश मामा, आपल्या दरबारात अंनिस कार्यकर्ते आणि पोलीस हे डमी भक्त म्हणून आले आहेत हे सत्य दैवी शक्तीने ओळखू शकला नाही. त्यामुळे तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

अशा प्रकारे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणार्‍या बुवा-बाबांपासून जनतेने सावध राहावे आणि त्यांच्याविषयी काही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.

प्रकाश विष्णू शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याचे देव्हार्‍यात ओटी असून ती आपोआप आलेली आहे असे म्हणून चमत्काराची अंधश्रद्धाही पसरवित होता.

प्रकाश मामा हा आपल्याजवळ असलेल्या दैवी उपचाराने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात असा दावा करून, भक्तांना भंडार्‍याचे पाणी पिण्यास देऊन तसेच जिभेवर भंडारा टाकून, गळ्यात ताईत बांधण्यास देऊन अनिष्ट व अघोरी उपचार करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची खात्री झाली तेव्हा प्रकाश विष्णू शेंबडे पाटील ऊर्फ मामा यांचेवर आष्टा पोलिसांनी अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांच्या फिर्यादीवरून जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]