ऊर्जाक्षेत्रातील छद्मविज्ञानाचा भांडाफोड

प्रा. प. रा. आर्डे - 9822679546

प्रयोगाच्या पुन:परीक्षणात जर विरोधी पुरावा मिळाला, तर सच्चे वैज्ञानिक आपला मूळ निष्कर्ष मागे घेतात आणि योग्य ती सुधारणा स्वीकारतात; पण नकली वैज्ञानिक नाना प्रकारचे फसवे युक्तिवाद करून त्यांचे दोष दाखविणार्‍यांना शिव्याशाप देत बसतात.”- मार्टिन गार्डनर

खरं तर विज्ञान हे मानवाचं सामूहिक साहस आहे. एका वैज्ञानिकाने एखाद्या प्रयोगशाळेत सिद्ध केलेले वैज्ञानिक तत्त्व किंवा तांत्रिक साधन यांची तर वैज्ञानिक जगातील विविध प्रयोगशाळांत तात्त्विक आणि प्रायोगिक चाचणी घेतात. त्यातील वैज्ञानिकता सिद्ध झाली किंवा पुन्हा-पुन्हा तेच निष्कर्ष मिळाले, तर असे संशोधन जागतिक पातळीवरच्या मासिकात प्रसिद्ध केले जाते. थोडक्यात, विज्ञानातील तत्त्वे आणि साधनं अस्सल सोन्याप्रमाणे तावून-सुलाखून घेतली जातात. अगदी कठोरपणे म्हणावयाचे झाल्यास ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल’ ही विज्ञानाची रीत असते. वैज्ञानिक क्षेत्रात अगोदरच्या संशोधनाने मान्यता पावलेला श्रेष्ठ वैज्ञानिक असो किंवा स्वतंत्रपणे आपले संशोधन प्रसिद्ध करणारा एखादा नवा वैज्ञानिक; त्यांच्या संशोधनाबाबत नकारात्मक निष्कर्ष आल्यास ते संशोधन टाकाऊ ठरते. न्यूटन हा महान वैज्ञानिक होता. प्रकाश हा कणस्वरूप आहे, असा सिद्धांत त्याने मांडला होता; परंतु दोन ‘कोहिरंट’ उगमापासून निघालेले प्रकाशकण एकमेकांवर आपटल्यास तेथे नेहमीच प्रकाशाची तीव्रता वाढली पाहिजे. कारण प्रकाशकिरणांतील कण ज्या ठिकाणी मिळणार, तेथे त्यांची दाटी होणार; पण प्रकाशक्षेत्रातील काही प्रयोगांमध्ये जेथे प्रकाशकिरण छेदतात, तेथे ‘डार्कनेस’ म्हणजेच काही प्रकाशशून्यता अनुभवायला येते. या प्रकाराला ‘इंटरफिअरन्स ऑफ लाईट’ म्हणतात. यंग नावाच्या वैज्ञानिकाने प्रकाशाच्या ‘इंटरफिअरन्स’वर केलेल्या प्रयोगात त्याला पडद्यावर ‘डार्क आणि ब्राईट बँड्स’चा पॅटर्न दिसून आला. या बँड्सचे कारण न्यूटनच्या प्रकाशाच्या कणसिद्धांतावरून देता येत नव्हते. हायगेन नावाच्या वैज्ञानिकाने मग प्रकाश हा लहरीस्वरूप असावा, असा सिद्धांत मांडला. लहरींना उंचवटे आणि खळगे असतात. दोन लहरींचे उंचवटे एकमेकांवर आले, तर उंचवटा मोठा होतो; पण उंचवटा आणि खळगा एकत्र आला, तर प्रकाशाची तीव्रता शून्य होईल. अशा तर्‍हेने लहरी सिद्धांतापासून यंगच्या प्रयोगातील प्रकाशाच्या बँड्सचे स्पष्टीकरण मिळत होते. म्हणून विज्ञानाच्या क्षेत्रात न्यूटनचा प्रकाशाचा कणसिद्धांत मागे पडला आणि प्रकाशाचे लहरीस्वरूप विज्ञानच मान्य झाले. म्हणून व्यक्तिमहात्म्याऐवजी विज्ञानात प्रायोगिक पडताळ्याला आणि तार्किक चिकित्सेला महत्त्व दिले जाते. पण विज्ञान संशोधनाची ही पद्धत डावलून आपले तथाकथित संशोधन सरळ प्रसारमाध्यमांना देऊन आपल्या संशोधनाची टिमकी वाजवणारे ‘एकला चलो रे…’ अशा वृत्तीचे एकांडे शिलेदार अधून-मधून विज्ञानाच्या क्षेत्रात भूछत्रीसारखे उगवतात. ही मंडळी बर्‍याचदा नकली विज्ञान लोकांपुढे मांडतात आणि बर्‍याचशा लोकांचे आणि समाजाचे आर्थिक नुकसानही करतात. अशा काही छद्मवैज्ञानिकांच्या नकली विज्ञानाची उदाहरणे पुढे दिली आहेत.

रामण पिल्लाईचे वनस्पतीपासून पेट्रोल

वनस्पतीपासून पेट्रोल तयार करता येते, असे रामण पिल्लाई नावाच्या तरुणाने घोषित केले. याबाबतचे प्रयोगही त्याने विज्ञानक्षेत्रातील मंडळींना; तसेच मीडियाला आणि काही राजकारण्यांनाही दाखविले. त्याच्या प्रयोगाने प्रभावित होऊन भारतातील इंधनाची समस्या दूर करणारा एक क्रांतिकारी संशोधक म्हणून रामण पिल्लाई याच्यावर स्तुतीचा वर्षाव मीडियामध्ये होऊ लागला. वनस्पतिशास्त्रातील काही तथाकथित विशेषज्ञांनी मग वनस्पतीतील कोणते घटक पेट्रोलनिर्मितीला कारण ठरतात, याबाबतचे संशोधन वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करायला सुरुवात केली; पण रामण पिल्लाईने विज्ञान संशोधनाबाबतचा संकेत धुडकावला होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. इतर चिकित्सक वैज्ञानिक याबाबतची पडताळणी करत असताना रामण पिल्लाईचे बिंग बाहेर पडले.

विज्ञानाच्या क्षेत्रात बनवाबनवीचा प्रकारही चालताना दिसतो. अशीच बनवाबनवी रमण पिल्लाईनं केली होती. त्याच्या प्रयोगात एका काचेच्या नळीला खालून मेण लावून त्यात पेट्रोल ठेवले होते. दुसर्‍या भांड्यात पेट्रोल देणारी वनस्पती पाण्यामध्ये उकळली जाई. या वनस्पतीपासून निघणारे रसायन पाण्याचे पेट्रोल करते, असा त्याचा दावा होता. त्यात पेट्रोल भरलेली नलिका उभी धरली जाई. पाणी तापल्यामुळे मेण वितळे व नळीतील पेट्रोल पाण्यात येई. त्या पाण्याला साहजिकच पेट्रोलचा वास येत असे. एखाद्या जादूगाराप्रमाणे हे नाटक रामण पिल्लाई करून दाखवी. जादूगाराच्या टोपीतून ससा कसा निघतो, हे आपणाला कळत नाही. तसाच हा प्रकार. याला काही लोक फसले; पण नंतर हा प्रकार उघडकीस आला. आपल्या बनावट पेट्रोलचा प्रयोग मोटार वाहनांसाठी करता येईल, अशी जाहिरात करून रामणने हजारो लोकांना गंडविले. स्वत:चे पेट्रोलनिर्मितीचे केंद्र सुरू केल्याचे सांगून लोकांकडून डिपॉझिट आणि इंधनाची किंमत म्हणून जवळपास सव्वादोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. या फसवेगिरीत त्याच्याबरोबर आणखी तिघांचाही समावेश होता. रामण आणि या तिघांनाही प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंड करून कोर्टाने प्रत्येकाला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिली.

विज्ञानातील बनवाबनवी म्हणजे जादूगिरीच असते, जी भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. ही बनवाबनवी जादूगारांना अधिक कळते. म्हणूनच यूरी गिलर नावाच्या भोंदूला वैज्ञानिक जरी फसले तरी जेम्स रँडी या प्रख्यात जादूगाराने त्याचे पितळ उघडे पाडले.

अमेरिकी भांडवलशाहीमधून जगभर पसरलेल्या चंगळवादाला उर्जेची मोठी गरज निर्माण झाली. हजारो प्रकारच्या उपभोगाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी बेसुमार औद्योगिक वाढ झाली. जगभर चंगळवादाने आपले हात-पाय पसरले; पण यासाठी आता उर्जेचा तुटवडा भासू लागला, हे हेरून काही लबाडांनी ऊर्जानिर्मितीचे नकली विज्ञान समाजाच्या गळी मारण्याचा प्रयत्न केला. रामण पिल्ले हा त्यातलाच एक. भारताबरोबरच अमेरिकेत शून्यापासून ऊर्जा निर्माण करणारा न्यूटन आणि ‘कोल फ्यूजन’द्वारे अमर्याद ऊर्जा मिळविण्याचा दावा करणारे पॉन्स आणि फ्लिशमन यांचे किस्सेही मनोरंजक आहेत.

भौतिक विज्ञानाचा एक कधीही खोटा न ठरलेला सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार शून्यातून उर्जेची निर्मिती करता येत नाही. एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी दुसर्‍या प्रकारची ऊर्जा खर्च करावी लागते. पदार्थामध्ये गती निर्माण करण्यासाठी दुसर्‍या प्रकारची ऊर्जा खर्च करावी लागते. पदार्थामध्ये गती निर्माण करण्यासाठी खनिज इंधन किंवा विद्युत ऊर्जा किंवा इतर प्रकारची रासायनिक ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणून उर्जेशिवाय आपोआप कायम चालू राहणारे मशीन तयार करता येणे शक्य नाही. उर्जेशिवाय गती निर्माण करणार्‍या यंत्राला ‘पर्पेच्युअल मोशन मशीन’ असे नाव आहे. अशा मशीनला संक्षेपाने आपण ‘पीएमएम’ म्हणूया. विज्ञानपूर्व काळापासून ते अगदी आजपर्यंतही असे मशीन तयार करण्याची स्वप्ने बाळगणारे आणि त्याद्वारे स्वत:ची आणि इतरांचीही फसवणूक करणारे वेडेपीर जगात सर्वत्र आढळतात. अमेरिकेतील न्यूमन हा त्यातलाच एक.

ज्यो न्यूमनचे ऊर्जायंत्र

न्यूमनने ‘संपूर्ण मानवजातीची दु:खातून सुटका करण्यासाठी मला देवाने साक्षात्कार दिला,’ असे सांगायला सुरुवात केली. ऊर्जा निर्माण करणारे यंत्र आपण बनवले आहे. त्या यंत्राला दुसरी कुठलीही ऊर्जा पुरविली जात नाही, असा त्याचा दावा होता. नेहमीप्रमाणेच आपल्या यंत्राची इतरांना चिकित्सा करू न देता त्याने या तथाकथित यंत्राच्या बातम्या रेडिओ व दूरचित्रवाहिनीवर झळकावल्या. गंमत अशी की, न्यूमनच्या संशोधनाचे समर्थन करणार्‍या मुलाखतीपण दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध झाल्या. रॉजर हेस्टीन हा पीएच. डी.धारक भौतिक शास्त्रज्ञ सांगत होता, “न्यूमनच्या सिद्धांताने समाजात क्रांती घडेल.” मिल्स एव्हरेट हा इंजिनिअर सांगत होता, “न्यूमन हा मूलगामी विचारवंत आहे, तो क्रमिक पुस्तकांच्या बाहेर जाऊन विचार करतो.” पुढे तर कमालच झाली. जॉन रूथर हा टी. व्ही.वर न्यूमनचं कौतुक करत होता. त्याचे निवेदन एक कोटी घरांतून पोचले होते. हजारो लोकांनी न्यूमनच्या या संशोधनाला दाद दिली. खोट्या गोष्टींना प्रसारमाध्यमे कशी उत्तेजन देतात, त्याचा हा नमुना.

या प्रसिद्धीमुळे न्यूमनने एक भव्य असा सुपरडोम भाड्याने घेतला. प्रत्येकी एक डॉलर तिकीट काढून हजारो अमेरिकन लोकांनी त्याच्या ऊर्जा यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यास गर्दी केली. न्यूमनचे यंत्र एका कारला जोडले होते. ती कार दर तासाला चार मैल या वेगाने जात असे. न्यूमन सांगत होता, ही गाडी फक्त एका दीड व्होल्ट सेलवर चालत आहे.

प्रसारमाध्यमे आणि नागरिक यांनी भलावण केली, तरी सत्य ते सत्यच. न्यूमनच्या यंत्राची जेव्हा कसून चौकशी झाली, तेव्हा त्याची बनवेगिरी उजेडात आली. या भामट्याने डोमच्या तळघरात एक जनरेटर ठेवलेला होता. तो यंत्राशी जोडून हा बनाव करत होता. जेव्हा हे सिद्ध झाले, तेव्हा न्यूमनचं हे ‘क्रांतिकारी’ संशोधनाचे पितळ उघडे पडले.

कोल फ्युजनची बनवेगिरी

रामण पिल्लई हा युवक विज्ञान क्षेत्रातील जाणकार नव्हता. तो आणि त्याचे मित्र हे ‘चलाख’ लुच्चे होते, तर ज्यो न्युमन हा एक साधा मेकॅनिक होता, ज्याला विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत माहीत नव्हते; पण विज्ञानाच्या उच्च संशोधनात हयात घालवलेल्या दोघा वैज्ञानिकांनी अख्ख्या जगाला फसविण्याचा प्रयत्न केला. याला काय म्हणावे? ‘कोल फ्यूजन’च्या नावाखाली अमर्याद ऊर्जानिर्मितीचा दावा करणार्‍या पॉन्स आणि फ्लिशमन यांची लबाडी स्तीमित करणारी आहे.

फ्लिशमन हा इंग्लंडमधील एका विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्रचारक होता, तर पॉन्स हा अमेरिकेतील युरा विद्यापीठात समाजशास्त्रातील संशोधक होता. दोघांनीही आपल्या पूर्वायुष्यात रसायनशास्त्रात संशोधन केले होते; पण प्रसिद्धीच्या हव्यासापायी आणि कदाचित आर्थिक फायद्यासाठी या दोघांनी आपल्या प्रामाणिकपणाला तिलांजली देऊन नकली विज्ञान पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यात ते अखेर बदनामही झाले. एक चूक झाकण्यासाठी दुसरी चूक, ती झाकण्यासाठी तिसरी चूक, असे प्रयास करीत ते अखेरीस लबाडपणे वागू लागले. मूर्खपणातून लबाडीकडे (From Foolishness to Fraud) असा त्यांचा प्रवास स्तीमित करणारा आहे.

‘कोल फ्यूजन’पासून अमर्याद ऊर्जा निर्माण करण्याच्या त्यांच्या साधनाला ‘इलेक्ट्रॉलिटिक फ्यूजन सेल’ असे नाव आहे. त्यांच्या या नकली प्रयोगाची माहिती घेण्यापूर्वी फ्यूजन म्हणजे काय, हे पाहावे लागेल.

‘न्यूक्लिअर फिजिक्स’मध्ये ‘फ्यूजन’ आणि ‘फिशन’ या दोन भौतिक क्रिया आहेत. ‘फिशन’मध्ये ‘रेडिओअ‍ॅक्टिव्ह’ अणुंचे न्यूट्रॉनच्या मार्‍याने भंजन होते. या क्रियेत प्रचंड ऊर्जा मुक्त होते. अणुभंजनाची ही क्रिया अणुबाँबमध्ये वापरली जाते. हिरोशिमा आणि नागासकीवर टाकलेले अणुबाँब अणुभंजन म्हणजे फिशन प्रकारचे होते. फ्यूजनमध्ये मात्र याच्या उलट क्रिया घडते. दोन अणु प्रचंड तापमानाच्या मदतीने एकमेकांवर धडकावून त्यांना संमीलित म्हणजे एकत्र बांधले जाते, ज्यातून नवीन अणुंची निर्मिती होते. या क्रियेतही प्रचंड ऊर्जा मुक्त होते. या उर्जेला ‘फ्यूजन ऊर्जा’ असे नाव आहे. ‘फ्यूजन’ क्रियेसाठी जड पाणी या पदार्थाचा उपयोग केला जातो. साधे पाणी हे हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणु यांच्या संयोगातून बनलेले असते; पण हेवी वॉटर किंवा जड पाणी हे हेवी हायड्रोजनचे दोन अणु आणि ऑक्सिजनचा एक अणु यांच्या संयोगातून बनलेले असते. हेवी हायड्रोजनमध्ये अणुकेंद्रकाप्रमाणे प्रोटॉनबरोबर एक न्यूट्रॉनही असतो. हा हायड्रोजनचा ‘आयसोटोप’ आहे. याला ‘ड्युटेरियम’ असे नाव आहे. साध्या हायड्रोजनमध्ये अणुकेंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो. ‘फ्यूजन’ प्रक्रियेमध्ये हेवी हायड्रोजनची केंद्रके फ्यूज होतात आणि हेलियम तयार होतो. या ‘फ्यूजन’ क्रियेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते, त्याबरोबरच न्यूट्रॉन्सही मुक्त होतात आणि गॅमा किरणही उत्सर्जित होतात.

हायड्रोजनच्या ‘फ्यूजन’ क्रियेबाबत जगभरच्या प्रयोगशाळेत प्रयोग चालू आहेत. समुद्राच्या पाण्यात फ्यूजन क्रियेसाठी लागणारा हेवी हायड्रोजन सहज उपलब्ध आहे. ‘फ्यूजन’ जर शक्य झाले तर जगातील उर्जेचा प्रश्न कायमचा सुटेल; पण व्यवहारात ‘फ्यूजन’ क्रिया अतिशय कठीण आहे. कारण दोन अणुकेंद्रके वेगाने टक्कर घेण्यासाठी त्यांचे तापमान प्रचंड वाढवावे लागते. त्यासाठी अशा अणुकेंद्रकांना जणू काही एखाद्या बाटलीत भरून तिचे तापमान वाढवावे लागते; पण साध्या बाटलीत हे शक्य नाही. कारण उच्च तापमानाला अशी बाटली टिकाव धरू शकणार नाही. मग वैज्ञानिक चुंबकीय बाटलीचा यासाठी उपयोग करतात. चुंबक क्षेत्रात प्लाझ्मा स्वरूप अणुकेंद्रकांना गरगर फिरवून त्यांचा वेग वाढवला जातो; पण इथेही लिकेजचा प्रश्न निर्माण होतोच; परिणामी प्रयोग चालू असले, तरी ‘फ्यूजन’ क्रियेतून व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी ऊर्जा अजून तरी उपलब्ध होऊ शकत नाही; पण भविष्यात कदाचित हे शक्य होईल.

या पार्श्वभूमीवर पॉल्स आणि फ्लिशमन यांनी युटा विद्यापीठातून ‘कोल फ्युजन’चा प्रयोग जाहीर केला आणि वैज्ञानिक जगतात सर्वत्र खळबळ माजली. जड पाण्यामधील हेवी हायड्रोजनच्या ‘फ्यूजन’साठी उच्च तापमानाची आवश्यकता नाही. इलेक्ट्रॉलिसिस (विद्युत पृथ:करण) क्रियेने हेवी हायड्रोजनचे (ड्युटेरियम) ‘फ्यूजन’ नेहमीच्या रूम तापमानाला शक्य आहे, असा या जोडगोळीचा दावा होता.

पॉन्स आणि फ्लिशमन यांनी युरा विद्यापीठात पत्रकार परिषद घेऊन आपल्या संशोधनाला प्रसिद्धी दिली आणि इथेच ते फसले. आपण शास्त्रीय जगताला बनवत आहोत, हे दोघांनाही माहीत असणार; पण आपल्या वैज्ञानिक युक्तिवादाच्या जोरावर त्यांनी जगाच्या पाठीवरील वैज्ञानिकांना झुलवत ठेवले. एवढेच नाही, तर ‘फ्यूजन’ प्रकल्पाला ग्रँट मिळावी, यासाठी बुश सरकारला सुद्धा फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रकल्पासाठी अडीचशे दशलक्ष डॉलर्सची मंजुरी त्यांनी मिळवून आणलीही होती; पण सर्वांनाच सर्वकाळ फसविता यत नाही. अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ रॉबर्ट पार्क आणि भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील इतर वैज्ञानिक यांनी ‘युटा फ्यूजन’चे पितळ उघडे पाडले आणि अमेरिकन सरकारची; तसेच विज्ञान जगताची फसवणूक टळली.

पॉन्स आणि फ्लिशमन यांच्या ‘फ्यूजन’चा प्रयोग कसा नकली होता, याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. ‘फ्यूजन’ क्रियेत ऊर्जानिर्मितीबरोबरच गॅमा किरणांचे उत्सर्जन होते. त्याचबरोबर या क्रियेत न्यूट्रॉन्स बाहेर फेकले जातात. पॉन्स आणि फ्लिशमनच्या प्रयोगात या तिन्ही गोष्टी सिद्ध झाल्या, तर ‘कोल फ्यूजन’ सिद्ध होणार होते. पॉन्स फ्लिशमन यांच्या ‘फ्यूजन सेल’मध्ये एका भांड्यात हेवी वॉटर भरलेले होते. त्यातून ‘इलेक्ट्रॉलिसिस’ होण्यासाठी विद्युतप्रवाह पाठविला जात होता. कॅथोड म्हणून ‘पॅलेडियम’ धातु वापरला होता. ‘इलेक्ट्रॉलिसिस’मुळे हेवी वॉटरमधील ‘ड्युटेरियमम आयन ‘पॅलेडियमम कॅथोडकडे आकर्षित होऊन तेथे त्यांची दाटी होणार; परिणामी तेथे दाब वाहून ‘ड्युटेरियम’चे फ्यूजन होणार, असा पॉन्स-फ्लिशमनचा युक्तिवाद होता; पण हे सगळे सिद्ध होण्यासाठी इतर वैज्ञानिकांकडून पुन्हा-पुन्हा चाचणी व्हायला हवी. या चाचणीचे निष्कर्ष अनुकूल यायला हवेत. ऊर्जानिर्मितीचा एक क्रांतिकारक प्रयोग म्हणून या प्रयोगाची मीडियात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली होती. म्हणून जगभरच्या वैज्ञानिकांना या प्रयोगाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. विविध प्रयोगशाळांत ‘कोल फ्यूजन’चे पडताळा घेण्याचे प्रयोग सुरू झाले. वैज्ञानिकांचा निष्कर्ष असा – ‘या प्रयोगात गॅमा किरण उत्सर्जित होण्याबाबत पुरावा मिळत नाही. तसेच न्यूट्रॉन सुद्धा डिटेक्ट होत नाहीत. बाल्टीमोर येथे भरलेल्या भौतिक वैज्ञानिकांच्या परिषदेत हे नकारात्मक निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले. ज्या-ज्या वेळी एखाद्या प्रयोगशाळेत ‘कोल फ्यूजन’च्या विरोधात पुरावा मिळे, त्या-त्या वेळी पॉन्स-फ्लिशमन नवनवी कारणे पुढे करीत; पण अखेरीस त्यांचा ढोंगीपणा वैज्ञानिक जगतात उघडा पडलाच. बाल्टीमोर परिषदेत शिक्कामोर्तब झालेल्या नकारात्मक निष्कर्षाचे रिपोर्ट्स बुश प्रशासनाच्या कानी घालण्यात आले. प्रशासनाने ‘कोल फ्यूजन’ला अधिक संशोधनासाठी प्रचंड रक्कम देण्याचा निर्णय रद्द केला आणि सरकारची; तसेच विज्ञान जगताची फसवणूक टाळली गेली. पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मोहापायी पॉन्स-फ्लिशमन या वैज्ञानिकांनी आपला विवेक गमावला आणि नकली वैज्ञानिक म्हणून आपली बेअब्रू करून घेतली.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]