सत्यशोधकी चैतन्यप्रवाह : एन. डी. सर

डॉ. नरेंद्र दाभोलकर -

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक स्पंदनासोबत संपर्क असल्याने एन. डी. पाटील हे नाव मला अपरिचित नव्हते. सातारा जिल्ह्यात राखीव जागांचे समर्थन करणार्‍या समितीत काम करताना वकिलांच्या बैठकीसमोर आणि नंतर गांधी मैदानावरील जाहीर सभेत राखीव जागांच्या बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे तर्कशुद्ध, प्रभावी युक्तिवाद पोटतिडकीने करताना मी एन. डीं. ना पाहिले होते; परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात त्यांचा संपर्क आला तो काहीसा अनपेक्षितपणे. झाले ते असे की, आम्ही 1990 साली पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद घेतली. त्या परिषदेत शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत एक महाराष्ट्रव्यापी चर्चासत्र घेण्याचा निर्णय झाला. यासाठी सहकार्य मागण्यासाठी मी रयत शिक्षण संस्थेचे त्यावेळचे सचिव सुभाषचंद्र भोसले यांना भेटावयास गेलो होतो. एन. डी. सर त्यावेळी चेअरमन नव्हते. परंतु माझ्या या भेटीच्यावेळी योगायोगाने तेथे होते. अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनाम्याची एक पुस्तिका आम्ही काढली होती आणि त्याच्या मुखपृष्ठावर रस्ता ओलांडणारे मांजर दाखवले होते. ती पुस्तिका पाहून एन. डी. म्हणाले, “दाभोलकर, तुम्हाला माहीत आहे का? मांजर आडवे गेले की, फक्त माणूसच असे म्हणत नाही, की आता काम होणार नाही, तर मांजरही मनातल्या मनात म्हणते, ‘अरे बापरे, माणूस आडवा गेला, आता आज काही उंदीर मिळणार नाही आणि उपवास घडणार.” या प्रतिपादनावर सारेचजण खळाळून हसले. मग बराचवेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय चर्चेत राहिला. त्याचवेळी मला जाणवले की, सरांचे चळवळीशी नाते जुळले, तर बहार येईल. 1991 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पूर्ण कार्यकारिणीची निर्मिती प्रथमच झाली. स्थायी स्वरूप लाभले. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी एकमुखाने एन. डी. सरांचे नाव सुचवले. आधीच असंख्य जबाबदार्‍या खांद्यावर असतानाही चळवळीच्या प्रेमापोटी त्यांनी होकार दिला. त्यानंतर आता गेली 13 वर्षेते महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी राज्य कार्यकारिणी एकमताने त्यांचीच फेरनिवड करते; दुसरे नाव देखील चर्चेला येत नाही. एन. डी.ही संघटनेच्या प्रेमापोटी होकार देतात.

एन. डी. समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीचा एक भाग म्हणून सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील इच्छुक प्राध्यापकांचे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण शिबीर घेतले. सर्व शिबिरार्थी सातारा शहरातीलच असल्याने रोज संध्याकाळी एक ते दीड तास व्याख्यान व अर्धा तास प्रश्नोत्तरे असा 15 दिवसांचा कार्यक्रम होता. उद्घाटनाचे पहिले भाषण अर्थातच, एन. डीं.चे झाले. या विषयावरील त्यांची मांडणी तोपर्यंत मी कधी ऐकलेली नव्हती. त्यावेळी माझ्या हे लक्षात आले की, मार्क्सवादाचे अध्ययन आणि महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांची व चळवळीची सखोल जाणीव यामुळे एन. डीं.च्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील मांडणीला स्वाभाविकच एक औरस-चौरस भरभक्कम व्यापकत्व प्राप्त होते – ‘माणूस हा त्याच्या बुद्धीने श्रेष्ठ ठरला; परंतु उत्क्रांतीमध्ये त्याला लाभलेली ही विकसित बुद्धी ही काही देवाची कृपा नाही. माणसाने पहिल्यांदा स्वत:च्या दहा बोटांचा हत्यारासारखा वापर करायला सुरुवात केली. उत्क्रांतीच्या या टप्प्यावर हाताची बोटे सुटी झाल्याने आणि अंगठा अधिक प्रमाणात वळवता येऊ लागल्याने त्याला हे शक्य झाले. यानंतर त्याने दगडाचा वापर हत्यार म्हणून करावयास सुरुवात केली. पुढे त्या दगडाला धार लावून अणकुचीदार केले. नंतर धार लावलेल्या दगडाला झाडाची फांदी तोडून जोडली आणि ओबडधोबड कुर्‍हाड तयार केली. यानंतर धातूंचे शोध लागले आणि हत्यारे विकसित होत गेली. विकसित हत्यारांच्या आधारे आजूबाजूच्या निसर्गावर विविध स्वरुपाच्या प्रक्रिया म्हणून घडवलेला माणूस सर्वश्रेष्ठ ठरला.’ एन. डीं.च्या मांडणीतील हा एक भाग. मला जाणवलेली दुसरी गोष्ट अशी की, युरोपमधल्या प्रबोधनाच्या कालखंडाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि मुक्तीचे पास विकणार्‍या पोपसारख्यांच्या ढोंगीपणाबद्दल संतापही आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधकी समाजसुधारकांची परंपरा हा तर त्यांच्या केवळ अभ्यासाचाच नव्हे, तर जिव्हाळ्याचा विषय आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या सारख्या उपेक्षा पदरी आलेल्या समाजसुधारकांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अपार आदर आहे. (त्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेत स्वतंत्र न्यासाची निर्मितीही केली आहे.) एन. डीं. च्या प्रभावाने चालू झालेले हे शिबीर उत्तम संपन्न झाले. त्यानंतर आम्ही असे ठरवले की, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत संस्थेच्या कामासाठी एन. डी. फिरतात, तेथे त्या जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापकांशी खुला संवाद साधायचा. कोल्हापूर, पुणे अशा काही जिल्ह्यांत असे प्राध्यापक-शिक्षक यांचे मेळावे झाले; परंतु मला असे लक्षात आले की, दोन-तीन तासांच्या अपुर्‍या वेळेत शिक्षक-प्राध्यापकांच्या डोक्यांतील सर्व गोंधळ नष्ट तर होत नाहीच, उलट काही वेळेला वाढतो, काही प्रसंगी अकारण विरोधी मानसही तयार होतो. देव, धर्म, पूजापाठ, कर्मकांडे याबद्दल राजकारणात राहूनही सर रोखठोक भूमिका घेतात; परंतु समोर असलेल्या बहुतेक प्राध्यापक, शिक्षकांना तो विचार झेपत नाही. मग आचार तर दूरच राहिला. यामुळे अशा बैठकांतून कामाला कृतिशील कार्यकर्तेमिळतील, हे साध्य होऊ शकले नाही. यानंतर आम्ही ‘सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प’ सुरू केला. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्यशोधकी जाणिवा यांचा एक छोटा; पण आखीव-रेखीव अभ्यासक्रम चालू केला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक; तसेच प्राध्यापक यांच्यासाठी अभ्यासक्रमाचा स्तर थोडा वेगवेगळा ठेवला. या घटकांची दोन अथवा तीन दिवसांची अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिरे घेण्यास सुरुवात केली. या शिक्षक/प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवावा आणि नंतर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र द्यावे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. महाराष्ट्रात हा उपक्रम खूप लोकप्रिय झाला. गेल्या दहा वर्षांत सुमारे 16-17 हजार शिक्षकांची शिबिरे झाली आणि तीन ते चार लाख विद्यार्थी परीक्षांना बसले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आज महाराष्ट्रात काही प्रमाणात सर्वदूर पोचल्याचे जाणवते. याचे महत्त्वाचे कारण सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प हे आहे. याची सुरुवात झाली एन. डी.ंनी ‘रयत’च्या शिक्षक-प्राध्यापकांच्या घेतलेल्या शिबिरापासून.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे मुख्य कार्य आहे शोषण करणार्‍या, फसवणूक, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे. चमत्कार, बुवाबाजीचे शोषणाचे प्रकार, भानामतीच्या गूढ घटना, करणीची दहशत, चेटूक, मूठ मारणे अशा स्वरुपाच्या अंधश्रद्धांच्या असंख्य घटना आजूबाजूला घडत असतात व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता कोणत्याही कायद्याच्या मदतीशिवाय त्याविरोधी झुंजत असतो. या लढ्यात सहभागी होणे एन. डीं. ना शक्य नव्हते व मुळात तशी अपेक्षाही नव्हती. अपेक्षा होती ती ही की, या स्वरुपाच्या उघड-उघड शोषण करणार्‍या अंधश्रद्धांच्या विरोधात एका स्वतंत्र कायद्याची निर्मिती शासनाने करावी याची. इ. स. 2000 साली महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्या लोकशाही आघाडी सरकारने किमान समान कार्यक्रमासाठी एन. डीं.च्या अध्यक्षतेखालीच एक समिती नेमली. या समान किमान कार्यक्रमात एन. डीं.नी आवर्जून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याच्या कलमाचा समावेश केला. अर्थात, शासन अशा गोष्टींना भीक घालणारे नाही, हे या अध्यक्षांनाच माहीत होते. यामुळे एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच हा लढा आम्ही लढलो. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना एक महाराष्ट्रव्यापी धरणे आझाद मैदानावर धरले होते; परंतु सरकारच्या लेखी अशा गोष्टींची किंमत ती किती असणार? यामुळे विधिमंडळात जाऊनच मंत्र्यांना हलवण्याची गरज होती. हे जमू शकले ते केवळ एन. डीं.च्यामुळे. एका बाजूला संसदीय कामकाजमंत्री, गृहमंत्री, सभापती, मुख्यमंत्री यांना आम्ही भेटला; तर दुसरीकडे सभागृहात या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी विधानसभा व विधानपरिषदेत एक सक्षम फळी सरांनी तयार केली. त्यामुळेच भारतात प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती झाली. याबाबत शासन आपल्या दिलेल्या शब्दाला जागले नाही. कायद्याचा हा मसुदा अवलोकनासाठी दिल्लीच्या गृहखात्याकडे पाठवणे आवश्यक होते. एका महिन्यात हे करून हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचे आश्वासन एन. डी. पाटील यांना व मला अतिशय स्पष्ट शब्दांत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. प्रत्यक्षात नऊ महिने कायद्याचा मसुदा दिल्लीला पाठविला देखील गेला नाही. मग तो दिल्लीहून येऊन विधिमंडळासमोर मांडणे दूरच राहिले, याबद्दल देखील सरांनी सरकारला धारेवर धरले. खास माणूस पाठवून दिल्लीला हा मसूदा पोचवावा. मा. शिवाजीराव पाटील-चाकूरकर यांच्याशी मी व्यक्तिगत बोलून लवकरात लवकर तो तेथून परत येईल, हे पाहतो आणि राज्यपालांनी वटहुकूम काढून असा प्रस्ताव हा लेख लिहित असताना एन. डीं.नी राज्य शासनासमोर ठेवला आहे.

विधायक कृतिशील धर्मचिकित्सा हे समितीचे आणखी एक महत्त्वाचे काम आहे. रुढी, कर्मकांडे, परंपरा यामुळे माणसाच्या प्रतिष्ठेचे जे अवमूल्यन होते, त्याला विरोध करणे महाराष्ट्र जवळजवळ विसरत चालला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आवश्यक; पण अप्रिय काम मोठ्या चिकाटीने व सातत्याने करत असते आणि एन. डी. त्याला ताकदीने पाठिंबा देत असतात. उच्च मराठा कुळातील आमच्या एका कार्यकर्त्याने चळवळीच्या विचारांच्या प्रभावाने मराठा समाजात आजही निषिद्ध मानलेला विधवा विवाह; तोही अपत्य असणार्‍या विधवेशी आवर्जून केला. या कार्यकर्त्याचा सत्कार एन. डीं.नी ‘रयत’मध्ये घडवून आणला आणि त्याप्रसंगी 19 व्या शतकात जी प्रथा संपूर्ण जावयास पाहिजे होती, तिच्याविरोधी कृती केल्याबद्दल 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सत्कार करावा लागतो, याबद्दल खंत व्यक्त केली होती. शनिशिंगणापूर (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाही, या विरोधात समितीने सत्याग्रह जाहीर केला. ‘बायकांना शनिदेवाकडे घेऊन जाणारा म्हणजेच परिवर्तनाच्या चळवळीची पीछेहाट करणारा असा हा कार्यक्रम आहे,’ असे टीकाकारांचे मत होते. समितीची भूमिका अशी होती की, हा प्रश्न प्रामुख्याने समतेचा आहे. ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे, त्या ठिकाणी धर्म आणि रुढीच्या नावाने बाईला प्रवेश नाकारणे हे विषमतावादी आहे. पुरुष जाऊ शकतात, त्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर जावयाचे की नाही, हा सर्वस्वी त्या बाईच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि ती दूर व्हावयासच हवी. एन. डीं.चा या भूमिकेला पाठिंबा होता. सातत्याने पाच वर्षे प्रबोधन मोहीम चालविल्यानंतर समितीने महाराष्ट्रव्यापी सत्याग्रह नगर येथे केला. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आणि माझे सहकारी उपोषणाला बसलो होतो. त्याप्रसंगी एन. डी. पूर्णवेळ आमच्यासमवेत होते. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याशी सतत चर्चा चालू होती. उपोषण ठरल्या वेळेआधी 12 तास बंद करावे, असा मोठा दबाव कलेक्टरांनी आणला नाही, तर ताबडतोब अटक करण्याचा इशाराही दिला. या चर्चेला मी, डॉ. लागू, एन. डी. पाटील उपस्थित होतो. विचार करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ मी मागितला. शेजारच्या खोलीत गेलो. माझा विचार साधा-सरळ होता. तो असा की, ‘उपोषण थांबविण्याचा काहीएक अधिकार जिल्हधिकार्‍यांना नाही. त्यामुळे त्यांना सांगावयाचे खुशाल अटक करा.’ लढाऊ असलेले एन. डी. पाटील सर हाच निर्णय घेतील, असे मला वाटत होते; पण माझा अंदाज चुकला. एन. डीं. नी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे चळवळीत अनुभवलेले होते. त्यांनी असे सांगितले, “कलेक्टर अगदी चिडीलाच आल्याचे मला दिसते. तो आपल्याला नक्कीच अटक करेल; परंतु त्यामुळे आपला मूळ उद्देशच असफल होण्याचा धोका आहे. तो उद्देश आहे, उद्या शनिशिंगणापूर सत्याग्रह करण्याचा. आज अटक झाल्यानंतर लढा शासकीय हस्तक्षेपाने मध्येच खंडित झाला, असे एका बाजूला होईल. दुसरीकडे, आपले महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते आज निघून उद्या नगरला पोचणार आहेत. शासनाने आडमुठी भूमिका घेऊन त्यांना जिल्हाबंदी केली, तर सर्वत्र सत्याग्रह कोसळेल. त्यापेक्षा आपण जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण थांबवूया. आतापर्यंत त्यांनी याबाबत दिलेले सहकार्य उद्यापर्यंत चालू राहण्याची शक्यता त्यामुळे वाढेल.” एन. डीं.चा हा निर्णय अचूक होता, हे पुढे घडलेल्या घटनांनी सिद्ध केले. दुसर्‍या दिवशीचा सत्याग्रह अतिशय शिस्तबद्धपणे पार पडला. पहिल्या तुकडीत एन. डी., डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव, व्यंकटअण्णा रणधीर आदी मान्यवर होते. दोन दिवस नगरच्या जेलमध्ये होतो. सर्वजण एकाच बराकीत होतो. मला गार पाण्याच्या आंघोळीची सवय आहे. सकाळी उठून बराकीसमोर असलेल्या हौदावर आंघोळीसाठी गेलो, तर माझ्या बाजूला एन. डी. सर हजरच होते. आंघोळ झाल्यावर त्यांनी ‘सराईतपणे’ स्वत:चे कपडे धुतले. ‘सराईतपणे’ हा शब्द यासाठी की, आयुष्यभर स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचे व्रत ते कोणताही गाजावाजा न करता अत्यंत सहजपणे सांभाळत आले आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची ‘वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद’ आमच्या समितीने घेतली. त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांत ‘विवेकवाहिनी’ निर्माण करण्याचा निर्णय झाला. या संघटनेसाठी मी महाराष्ट्रभर महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या बैठका घेत फिरलो. आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही एन. डी. पाटील सरांनी ‘विवेकवाहिनी’साठी भरपूर वेळ दिला. मुंबईत ज्या दिवशी ‘विवेकवाहिनी’साठी प्राध्यापकांची बैठक झाली, त्यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. अवघे पाच प्राध्यापक आले होते. तरीही तेवढ्यांच्यासमोर सर नेहमीच्याच तळमळीने बोलले. तयारी करून पुन्हा आणखी एक बैठक घेतली. त्याही बैठकीला पाच-सहा कॉलेजचेच प्राध्यापक आले. त्यावेळी अर्थातच, हे स्पष्ट झाले की, प्राध्यापक न येण्याचे कारण पाऊस नाही, तर अनास्था आहे. याही बैठकीला एन. डी. होतेच आणि इतक्या कमी संख्येबद्दल कोणतीही तक्रार न करता, नाउमेद न होता त्यांनी नेहमीच्याच पोटतिडकीने ‘विवेकवाहिनी’ची गरज पटवली. ‘विवेकवाहिनी’ व विवेकाधिष्ठित विचार व आचाराच्या आधारे आपला विकास आपल्या हाती या सूत्राने काम करणारी संघटना आहे. या विचाराला एन. डीं.नी एक चांगला मुद्दा पुरवला. ते विद्यार्थांना सांगत, “आज महाराष्ट्रात 18 ते 23 या कॉलेज वयोगटात जाण्यायोग्य वयाचे जे विद्यार्थी आहेत, त्यापैकी फक्त 6 टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळते. या अर्थाने तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. कारण उद्याच्या समाजातील शास्त्रज्ञ, कलेक्टर, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर हे फक्त तुमच्यातूनच तयार होणार आहेत. मात्र तुमच्याच वयोगटातील फार मोठ्या समुदायाला हे भाग्य लाभलेले नाही, तुम्ही याची जाणीव ठेवावयास हवी.”

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही व्यापक समाजपरिवर्तनाशी आपली बांधिलकी मानते. समाजात व्यापक परिवर्तन होऊन शोषणरहित समताधिष्ठित समाजाची निर्मिती झाल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा यशस्वी होणार नाही, याचे पक्के भान समिती बाळगून आहे. या दृष्टीने एन. डीं.चे मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील व्यापक जनलढ्यांचे एन. डी. आज अग्रेसर असलेले सर्वमान्य नेते आहेत. प्राथमिक शिक्षणाची परवड स्पष्ट करणारी ‘हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’ ही मोहीम मोठ्या निर्धाराने त्यांनी चालवली. प्रकाश देण्याच्या नावाने महाराष्ट्रास कर्जबाजाराच्या अंधारात लोटणार्‍या ‘एन्रॉन’चा जमिनीत गाडला गेलेला लढा मोठ्या हिमतीने व हिकमतीने पुन्हा उभा केला. शेतजमिनीचा प्रश्न असो वा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा; एन. डीं. चे नेतृत्व सर्वांना हवे असते. कारण ते अभ्यासू व ठाम असते. हे सारे प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दैनंदिन चळवळीच्या कार्यकक्षेबाहेरचे आहेत; परंतु समितीचे अध्यक्षच व्यापक लढ्याचे धुरिणत्व करत असल्याने स्वाभाविकच चळवळीतील कार्यकर्त्यांनाही आपण आपल्या कार्याच्या परिघाबाहेर व्यापक लढ्याशी जोडलेले राहावे, अशी प्रेरणा मिळते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षांनी समितीच्या दैनंदिन कामासाठी वेळ द्यावा, अशी अपेक्षा नाही व तशी सवडही एन. डीं.ना असणे अशक्यच; परंतु चळवळीला ज्या-ज्या वेळी गरज असते, त्या-त्या वेळेला अग्रहक्काने सर कार्यकर्त्यांच्या अडचणीला धावून येतात. चळवळीतील दोन कार्यकर्त्यांना मुंबईच्या पोलिसांनी एकदा रात्री केवळ सूडापोटी अटक केली. मध्यरात्री एन. डीं.नी पोलीस आयुक्तांना त्याबाबत फोन केला; एवढेच नव्हे, तर स्वत:च्या हस्ताक्षरांत गृहमंत्र्यांना खडसावणारे पत्रही लिहिले. नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी समितीच्या दोन कार्यकर्त्यांचे अपहरण करून मारहाण केली. तेव्हा ताबडतोब दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची भेट घेऊन एन. डीं.नी कडक कारवाईची मागणी केली.

या सार्‍यांबरोबरच सरांचा सर्वांत अनुकरणीय गुण म्हणजे त्यांचे ‘बोले तैसा चाले’ हे आचरण. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी अशा खंबीर नेत्याच्या आचरणाचीच गरज असते. राजकारणात प्रदीर्घ काळ वावरणार्‍या व्यक्तीला असे परखड मतप्रदर्शन व कणखर आचरण परवडणारे नसते. सरांचे याबाबतचे वागणे आदर्श आहे. सत्यनारायणाला त्यांनी आयुष्यात कधी हात जोडले नाहीत. त्यामुळे ‘विज्ञानाचा पदवीधर सत्यनारायण घालत असेल व मी कुलगुरू झालो, तर त्याची विज्ञानाची पदवी आपोआप रद्द करण्याचा आग्रह धरेन,’ असे ते नेहमी सांगत असतात. कोल्हापूर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर होळीला नारळ देण्याचे आणि अंबाबाईचे दर्शन घेण्याचे नाकारले. असे नेतृत्व विरळेच! फारच आग्रह झाल्यावर पाहिजे तर माझा राजीनामा घ्या; परंतु माझ्या सत्यशोधकी गुरूने जे चूक आहे, असे मला शिकविले, त्यांच्याविरोधी आचरण कधीच करणार नाही. असा तेजस्वी निर्धार असणारे नेते आता कुठे आढळतात? याचाच दुसरा पैलू म्हणजे राजकारणात असूनही सत्तेबद्दलची त्यांची निरिच्छ वृत्ती. काँग्रेसच्या राजवटीत त्यांना प्राथमिक शिक्षणावरील समितीचे अध्यक्षपद देऊ केले होते. त्याचा दर्जा कॅबिनेट मंत्रिपदाचं होता. मात्र ते त्यांनी नाकारले. अगदी अलिकडेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या शासकीय समितीचे अध्यक्षपद त्यांना लाभले. तेही मंत्रिपदाच्या दर्जाचे होते. हे अध्यक्षपद स्वीकारण्याची त्यांची पूर्वअटच होती, मंत्रिपदाला नकार देण्याची. सत्यशोधकी विचार, उच्चार व आचार यांचा असा खळाळता प्रवाह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लाभावा, ही आमची फार मोठी उपलब्धी आहे, दिलासा व उमेद देणारी गोष्ट आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]