बुद्धिवादाचे अर्वाचीन सेनानी : डॉ. अब्राहम टी. कोवूर

उत्तम जोगदंड - 9920128628

डॉ.कोवूर जयंती विशेष

भारतीय उपखंडाला बुद्धिवाद्यांची चार्वाकापासूनची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. याच बुद्धिवादी परंपरेची विसाव्या शतकातील तब्बल पाच दशके अत्यंत लढाऊ व संशोधक वृत्तीने धुरा वाहणारा सेनानी म्हणून निःसंशय डॉ. अब्राहम टी. कोवूर यांचे नाव घेतले जाईल. परामानसिक, अतींद्रिय व आध्यात्मिक अशा सर्वच प्रकारच्या तथाकथित अनुभूतींवर सखोल संशोधन करून त्यांची चिरफाड करणारे हे वादळी व्यक्तिमत्त्व विश्वातील समस्त आधुनिक बुद्धिवाद्यांना आपल्या गुरुस्थानी आहे. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन भारतीय उपखंडात बुध्दिवाद्यांच्या अनेक चळवळी स्थापित झाल्या व नावारुपाला आल्या. डॉ. कोवूर यांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा, लेखनाचा व मेहनतीचा मजबूत पाया लाभल्याने या चळवळींना एक वेगळा तात्त्विक व वैज्ञानिक आयाम प्राप्त झाला आहे. अशा या प्रखर बुद्धिवाद्याची जयंती 10 एप्रिल रोजी येते. यानिमित्त त्यांच्या आयुष्यावर व कार्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास या चळवळीत नव्याने सामील होणार्‍या कार्यकर्त्यांना अत्यंत उपयोगाचे होईलच; पण जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या महान कार्याचे स्मरण करता येईल.

डॉ. कोवूर यांचा जन्म 10 एप्रिल 1898 रोजी केरळमधील तिसवल्ला या गावी झाला. त्यांचे वडील कोवूर ऐपे थॉमा कथ्थनार हे मलबार येथील मार थोमा चर्चचे व्हीकार जनरल होते. यावरून त्यांच्या घरातील वातावरण किती धार्मिक असेल, याची आपण कल्पना करू शकतो. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्यांच्याच वडिलोपार्जित घरात सुरू केलेल्या ख्रिश्चन सेमिनरीमध्ये झाले. त्यांचे शिक्षण चालू असताना ही शाळा शहरातील मोक्याच्या ठिकाणी हलवली गेली, ज्यासाठी कोवूर यांच्या वडिलांनी चर्चला देणगी दिली होती. त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथे झाले. या शिक्षणासाठी ते आपले बंधू बेनहान यांच्यासोबत गेले व तेथील बंगवासी महाविद्यालयातून त्यांनी वनस्पतिशास्त्र व जीवशास्त्र या विषयात प्रावीण्य प्राप्त केले.

भुते, चेटूक, शाप, नरक आणि देवांचा/राक्षसांचा कोप याची त्यांना लहानपणी खूप भीती वाटत असे. परंतु महाविद्यालयात शिकत असल्यापासून पद्धतशीर संशोधन व बुद्धिवादी विचारसारणी यांच्याआधारे ते अनेक धार्मिक गूढविद्या, भविष्यकथन, अमर आत्मे आणि चमत्काराचा दावा करणारे यांच्या बाबतीत शंका घेऊ लागले. तरुण वयातच मानवनिर्मित श्रद्धाळू रुढींचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी ते मुद्दाम त्याविरुद्ध वागू लागले. त्याची झलक त्यांनी कोलकाता येथे विद्यार्थीदशेत असतानाच आपल्या गावातील रहिवाशांना त्यांच्या नकळत दाखवून दिली होती. कोलकाता हे गंगा नदीच्या काठावर असल्याने त्यांच्या गावातील लोकांना त्यांचे व त्यांचे बंधू बेनहान यांचे अप्रुप वाटे. कारण एवढ्या कोवळ्या वयात या मुलांना पवित्र गंगा नदीत स्नान करायला मिळत होते. तिथून सुट्टीत गावी परत येताना गंगेचे पवित्र जल या मुलांनी आपल्यासाठी आणावे, अशी गावकर्‍यांची इच्छा असे. आपल्या बंगालमधील वास्तव्यात ते एकदा गंगा नदीत उतरले व बुडी मारून डोके पाण्याबाहेर काढत असताना त्यांच्या डोक्याला एका बुळबुळीत पांढर्‍या वस्तूचा स्पर्श झाला. त्यांनी ती वस्तू नीट पाहिली असता अत्यंत कुजलेला व माशांनी अर्धवट खाल्लेला तो एक मानवी हात होता, असे दिसून आले. त्या काळी मृतास मोक्ष मिळावा म्हणून प्रेते गंगा नदीत टाकण्याची प्रथा होती. अशाच एका प्रेताचा तो हात असावा. या घटनेनंतर शिसारी आल्याने ते दोन दिवस जेवण घेऊ शकले नाहीत. असे पाणी पवित्र मानून लोक त्यात स्नान करतात व ते पितात देखील, याची त्यांना अत्यंत किळस आली. त्या दिवशी त्यांनी गंगेत केलेले ते पाहिले आणि शेवटचे स्नान ठरले व यापुढे या अशा पाण्याचा एक थेंबही गावकर्‍यांना द्यायचा नाही, असा निश्चय त्यांनी केला. परंतु गावकरी नाराज होऊ नयेत, म्हणून ते व त्यांचे बंधू त्यांच्या स्टेशनच्या आधी येणार्‍या स्टेशनवर उतरून तिथल्या माठातील पाणी बाटल्यांमध्ये भरून घेत व ते पाणी गावकर्‍यांना पवित्र गंगाजल म्हणून देत असत. गावकरीसुद्धा ते पाणी अत्यंत भक्तिभावाने पित असत व त्या पाण्यामुळे कुणाचे काय, किती भले झाले, याच्या अनेक दंतकथा सांगितल्या जात असत.

आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी कोट्टायम येथील सी. एम. एस. कॉलेजमध्ये दोन वर्षे अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर श्रीलंकेतील जाफना सेंट्रल कॉलेजमध्ये 1928 साली रुजू झाले. त्या कॉलेजचे प्राचार्य रेव्ह. कॅश यांच्याशी उटी येथील डोंगरात वनस्पतींचे नमुने गोळा करताना त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या निमंत्रणावरून डॉ. कोवूर श्रीलंकेत गेले व तिथेच स्थायिक झाले. आपल्या चिकित्सक व संशोधक वृत्तीची झलक त्यांनी या कॉलेजमध्येही पहिल्याच वर्षी दाखवून दिली. त्यांना त्यांच्या नेहमीच्या वनस्पतिशास्त्र या विषयाव्यतिरिक्त ’पवित्र शास्त्र’ (बायबल) हा विषय शिकविण्यास सांगण्यात आले. त्यांनी बायबलचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून तो विषय एवढ्या चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवला की, त्या विद्यार्थ्यांनी ’पवित्र शास्त्र’ बायबलमध्ये प्रावीण्य मिळवले. पुढील वर्षी मात्र हा ‘पवित्र शास्त्र‘ विषय डॉ. कोवूर यांना न देता उपप्राचार्य यांना देण्यात आला. त्याचे कारण रेव्ह. कॅश यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, या विषयाचा निकाल उत्तम लागला, हे माहिती आहे; तसेच तुझे सर्व विद्यार्थी बायबल विषयात जरी पास झाले असले तरी त्या सर्वांनी धर्म मात्र सोडून दिला आहे. यावरून हे लक्षात येईल की, डॉ. कोवूर यांच्या मार्गदर्शनाखाली बायबलचा सखोल अभ्यास केल्यावर त्या विद्यार्थ्यांना बायबल एवढा कळला की त्यांना त्यांचा धर्म सोडवा, असे वाटले आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना हे नक्कीच परवडणारे नव्हते.

जाफना सेंट्रल कॉलेजचे प्राचार्य रेव्ह. कॅश सेवानिवृत्त झाल्यावर डॉ. कोवूर ते कॉलेज सोडून गॅले येथील रिचमंड कॉलेजमध्ये रुजू झाले. त्यानंतर माऊंट लॅव्हीनिया येथील सेंट थॉमस कॉलेजमध्ये त्यांनी काम केले. कोलंबो येथील थर्स्टन कॉलेजमधून 1959 साली ते सेवानिवृत्त झाले, तेव्हा या कॉलेजच्या शास्त्र विभागाचे ते प्रमुख होते. अतींद्रिय मानसशास्त्र, पिशाचवाद यावरील संशोधन व लेखन प्रसिद्ध करायला व याबाबतची मते मांडायला; तसेच त्यास प्रसिद्धी द्यायला त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावरच सुरुवात केली. कारण अशा तर्‍हेच्या ज्या संस्थांमध्ये नोकरी करत, तिथे अंधश्रद्धांचा प्रचार करण्याचे काम चाले व अशा ठिकाणी पोटा-पाण्याची सोय करण्यासाठी नोकरी करणे भाग होते.

मध्यंतरी त्यांना मानसिक विज्ञानातील संशोधनाबद्दल डॉक्टरेट मिळाली. मानसिक आणि परामानसिक तत्त्वे या विषयात डॉक्टरेट मिळवणारे त्या काळातील ते एकमेव संशोधक होते. अमेरिकेतील मिनेसोटा तत्त्वज्ञान संस्थेने ही डॉक्टरेट त्यांना बहाल केली होती. प्राण्यांच्या उत्क्रांती सोपानात असणार्‍या उणिवा भरून काढण्याच्या दृष्टीने हिन्दी महासागर आणि त्याच्या किनार्‍यावरील देशांत संशोधन करण्यासाठी आखलेल्या हॅकेल एक्स्पेडिशन या संशोधन मोहिमेत भाग घेण्यासाठी अन्सर्ट एकोलोजी सेंटर या संस्थेने त्यांना आमंत्रित केले होते. हे आमंत्रण मिळवणारे ते एकमेव आशियाई शास्त्रज्ञ होते. परंतु पत्नीच्या प्रदीर्घ आजारामुळे (त्या आजारातच नंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.) त्यांना नाईलाजाने हे आमंत्रण नाकारावे लागले.

जन्म-मृत्यू या बाबतीत त्यांचे विश्लेषण अत्यंत बुद्धिवादी व तार्किक होते. आपल्या जन्माविषयी डॉ. कोवुर म्हणतात, सुमारे पाऊण शतकापूर्वी केरळच्या निसर्गरम्य भूमीमध्ये एका सीरियन ख्रिस्ती कुटुंबात एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या पोटी झालेला माझा जन्म म्हणजे माझी निवड व निमंत्रण नसणारा एक भौगोलिक व जीवशास्त्रीय अपघात होता. परंतु प्रौढ झाल्यानंतर एका तेवढ्याच निसर्गरम्य देशाचे-श्रीलंकेचे नागरिकत्व मी पत्करले आणि बुद्धिप्रामाण्यवाद ही माझी विचारप्रणाली ठरवली, ती मात्र पूर्णपणे स्वेच्छेने ठरवली. केवळ जन्म नावाच्या जीवशास्त्रीय अपघातामुळे प्राप्त होणार्‍या जात, धर्म, प्रांत या बाबींचा अभिमान, गर्व बाळगणार्‍या, त्यावर राजकारण करणार्‍या लोकांचे डोळे उघडणारे त्यांचे हे वक्तव्य आहे. त्यांच्या पत्नीचा 1974 साली मृत्यू झाला, त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या मृत्युलेखावरून (Obituary) श्रीलंकेत खळबळ माजली होती. त्यांनी मृत्युलेखात लिहिले होते, श्रीमती अक्का कोवूर, भोळसट लोकांसाठी आपले मन किंवा आत्मा मागे न ठेवता मरण पावल्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह तिरूवला, पामनकडा लेन येथून श्रीलंका विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र विभागात आज (शुक्रवारी) हलविला जाईल. कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी, अंत्यसंस्कार किंवा पुष्प-अर्पण होणार नाही. हा मृत्युलेख विविध स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्धा झाला असला, तरी श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने आपल्या मृत्युलेखांच्या (Obituary) यादीत ते घ्यायला नकार दिला. या बाबतीत श्रीलंकेच्या संसदेत सुद्धा प्रश्न विचारला गेला, तेव्हा श्रीलंकेचे तत्कालीन नभोवाणी मंत्री, जे स्वतः रोमन कॅथॉलिक होते, त्यांनी असे उत्तर दिले की, हा नकार एक रोमन कॅथॉलिक धर्मगुरू व एक बौद्ध धर्मगुरू यांच्या सल्ल्यानुसार देण्यात आला. बौद्ध तत्त्वज्ञान ‘अनात्म’ तत्त्वज्ञान मानते. अशा बौद्ध धर्मगुरूने, ‘माणसाच्या पवित्र हृदयात आत्मा निवास करतो,’ असे मानणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरूच्या मताला दुजोरा द्यावा, हे तेव्हा विचित्रच मानले गेले होते.

गूढ विद्या, भूत, भानामती, चेटूक, करणी, जादूटोणा, चमत्कार, ज्योतिष, हस्तसामुद्रिक, संख्याशास्त्र, अध्यात्मशास्त्र, आत्म्यांशी संवाद अशा त्या काळात प्रचलित असलेल्या सर्वच अतींद्रिय, परामानसिक बाबींवर त्यांनी संशोधन केले व अशा शक्तींचा दावा करणार्‍या ढोंगी, लबाड लोकांकडून सामान्य लोकांची लुबाडणूक होऊ नये, म्हणून ते कायम अभ्यासपूर्ण लढा देत राहिले. जिथे-जिथे अशा प्रकारच्या शक्तीचा दावा कोणी करत असतील, तिथे ते गेले व सूक्ष्म निरीक्षणातून अशा बाबींचे विश्लेषण करून ते दावे त्यांनी पुराव्यांसह खोडून काढले. चमत्कारी बाबा जे काही चमत्कार करीत ते चमत्कार डॉ. कोवूर स्वतः करून दाखवीत. भुतांचा शोध घेण्यासाठी ते रात्री-बेरात्री स्मशानात जात. भुतांनी झपाटलेल्या घरात ते स्वतः जाऊन राहायचे. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी ते अशुभ मुहुर्तावर जाणूनबुजून करीत असत. आपल्या अंगात चमत्कार करण्याची शक्ती असल्याचा दावा करणारे सर्व लोक लबाड तरी असतात किंवा त्यांच्यात मानसिक विकृती असते, असे ते म्हणत. अज्ञ लोकांची खात्री पटावी म्हणून लबाड, ढोंगी लोकांना त्यांनी खुले आव्हान दिले होते. देवभक्त, संत, योगी, सिद्ध, गुरू, स्वामी आणि अध्यात्मिक अथवा दैवी आशीर्वादाने चमत्कार करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली आहे, असा दावा करणार्‍या, कोणालाही त्यांनी ‘चमत्कार’ करून दाखविण्याचे व चमत्कार सिद्ध झाल्यास एक लाख रुपये (श्रीलंकेचे) जिंकण्याचे आव्हान दिले होते. यात त्यांनी प्रचलित असलेल्या 21 चमत्कारांची यादी जोडली होती. असेच आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा दिले आहे व चमत्कार करून दाखविणार्‍याला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. डॉ. कोवूर यांच्या जीवनकाळात हे आव्हान स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. ‘महाराष्ट्र अंनिस’चे आव्हान सुद्धा आजतागायत कोणीही स्वीकारलेले नाही.

त्यांनी अनेक बाबा, बुवांचा भांडफोड केला असला, तरी सामाजिक, राजकीय, धार्मिकदृष्ट्या अत्यंत वजनदार अशा एका बाबांना ते भिडले व त्या बाबाचे चमत्काराचे दावे फोल ठरवले होते, याचा उल्लेख करावाच लागेल. त्या बाबांचे नाव सत्यसाईबाबा. डोक्यावर पिंजारलेले कुरळ्या केसांचे जंगल; तसेच पायघोळ कफनी अंगावर घातलेल्या या बाबांनी अनेक वरिष्ठ राजकीय नेते, सिनेकलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ इत्यादींवर गारुड केले होते व त्यांना आपले भक्त बनवले होते. हवेत हात फिरवून सोन्याची साखळी, अंगठी (श्रीमंत भक्तांसाठी) किंवा उदी (गरीब भक्तांसाठी) काढायचा चमत्कार ते करत असत. त्यांच्यावर ‘सत्यसाईबाबा देवाचे अवतार की भोंदू साधू?’ या विषयावर एका प्रसिद्ध भारतीय साप्ताहिकाने परिसंवाद आयोजित केला होता. त्यासाठी डॉ. कोवूर यांचा लेख पहिल्या भागात छापण्यासाठी मागविला गेला होता. हा लेख तीन अंकांत प्रसिद्ध झाला होता व सत्यसाईबाबा यांचा चांगलाच समाचार डॉ. कोवूर यांनी त्यात घेतला होता. त्यांच्या लेखाला डॉ. भगवंतम नावाच्या एका शास्त्रज्ञांनी उत्तर दिले होते. हे शास्त्रज्ञ आधी ‘बुद्धिवादी’ होते. परंतु सत्यसाईबाबा यांचे अनेक चमत्कार पाहून ते त्यांचे भक्त झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यातील एक चमत्कार सीको (Seiko) घड्याळाच्या बाबतीत होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सीको कंपनीचा भारत दौर्‍यावर असलेला उत्पादक सत्यसाईबाबा यांना भेटला, तेव्हा सत्यासाईबाबा यांनी त्यांना त्याच्याच कंपनीचे एक नवीन मॉडेलचे घड्याळ भेट दिले, जे घड्याळ त्या कारखानदाराने आपल्या तिजोरीत ठेवले होते. तो कारखानदार थक्क होऊन जपानला परत गेला व चौकशी केली असता एका पिंजारलेल्या केसाच्या अजब माणसाने ते घड्याळ तिजोरीतून काढून नेल्याचे त्यांच्या सहाय्यिकेने त्यांना संगितले, अशी हकिकत डॉ. भगवंतम यांनी सांगितली. डॉ. कोवूर यांनी याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डॉ. भगवंतम यांच्याकडून काही माहिती मागविली. ती त्यांनी बराच काळ दिली नाही. मग त्यांनी सरळ त्या सीको कंपनीलाच पत्र लिहून सर्व माहिती कळविली व यावर त्यांचे स्पष्टीकरण मागितले. त्या कंपनीने वरील प्रकार अजिबात घडला नसल्याचे व ते सत्यसाईबाबा यांना ओळखतही नसल्याचे कळवले. ही माहिती डॉ. भगवंतम यांना कळवली असता त्यांनी कधीही त्याचे उत्तर दिले नाही. एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी कसे जावे, त्याचा पाठपुरावा कसा करावा, हे डॉ. कोवूर यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

त्यांनी विपुल लेखनही केले आहे. इंग्रजी भाषेत त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या पैकी Begone Godmen आणि Gods, Demons and Spirits ही पुस्तके बुद्धिवाद्यांचे प्रमाणग्रंथ मानले जातात. याशिवाय हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ, पंजाबी व सिंहली भाषेत सुद्धा त्यांचे लिखाण उपलब्ध आहे. त्यांच्या केस डायरीवर आधारित पुनर्जन्म (मल्याळम), मारू पिरवी (तामिळ), निंथकांठा (तेलुगू) हे चित्रपट आलेले आहेत. पीके या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील आमीर खानची भूमिका डॉ. कोवूर यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बेतलेली आहे.

सुमारे अर्धे शतक घोंघावणारे, पाखंड, ढोंग, चमत्कार, भूत, जादूटोणा आदी सर्वच बाबींना मुळापासून हादरवून टाकणारे हे डॉ. अब्राहम कोवूर नावाचे बुद्धिवादाचे वादळ 18 सप्टेंबर 1978 रोजी शमले. परंतु शमण्याच्या आधी देशभरात व देशाबाहेर विवेकाची, प्रकाशाची बीजे पेरून व रुजवून गेले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर विविध राज्यात आपली पाळेमुळे पसरवणारी व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर सुद्धा जोमाने कार्य करणारी संघटना हे अशाच एका प्रकाशबीजाचे विशाल वृक्षात झालेले रूपांतर आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त डॉ. अब्राहम कोवूर यांना विनम्र अभिवादन!


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]