मित्र म्हणून तू थोर होतास टी. बी.; पण त्याही पलिकडे बराच काही होतास!

डॉ. प्रदीप पाटील - 9890844468

“जेव्हा आपण सर्वार्थाने वाढत असतो, तेव्हा बौद्धिक भुकेचं काय करायचं, हा प्रश्न असतो आणि तो प्रश्न तू माझ्यापुरता तरी सोडवलास.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांचं स्थान निर्माण करण्याचं श्रेय तुझंच आहे. कारण जेव्हा कधी भूत, भानामती, चेटूक, करणी, देव-देवी अंगात येणे आणि बुवाबाजी असे विषय येत, तेव्हा त्यामागचं विज्ञान आणि त्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतो, हे अक्षरशः खणून काढण्याचं काम तू करायचास; आणि तेही जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा..!

सारी भिस्त ही मासिकांवर असायची; आणि ती सुद्धा वैज्ञानिक निकषांवर घासून-पुसून सिद्ध होणारी मासिकं. मला आठवतंय..तू वैज्ञानिक असल्यानं ‘सायंटिफिक अमेरिकन’ या मासिकाचा चाहता होतास. एवढेच नव्हे, तर विज्ञानाची वैश्विक मासिकं तुझ्या लायब्ररीत सतत असायची. ‘नेचर’, ‘लॅन्सेट’ ‘स्केप्टिकल एन्क्वायरर’ ‘जामा जर्नल’ या मासिकांचे संदर्भ घेऊनच तुझी विषयांची चिरफाड चालू असायची. विषय कोणताही असो; पण त्यावरील उलट आणि सुलट दोन्ही मतांच्या माहितीचं आगर तुझ्या डोक्यात भरलेलं असायचं!

तत्त्वज्ञान, विवेकवाद, सायकॉलॉजी, फिजिक्स, जीवशास्त्र, संस्कृती, कायदा, कुठलाही विषय असो.. सार्‍यांच्या नोट्स तुझ्याकडे तयार असायच्या. मांसाहार विरुद्ध शाकाहार या वादात तुझं म्हणणं ठाम असायचं की, माणूस हा मिश्राहारी प्राणी आहे. सामाजिक समस्यांचे मूळ चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आहे, हे तू ठासून मांडायचास. ब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण यांच्याबद्दल तुझ्या मनात स्पष्टता होती आणि म्हणूनच आरक्षणविरोधी असलेली सर्व मते खोडून काढण्यासाठी तू पुस्तक काढलंस. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा मी संपादक आणि तू सहसंपादक असताना प्रत्येक लेख मी तुला पाठवायचो. त्या लेखांमधील अवैज्ञानिक कथा आणि अविवेक खोदून तू खोडून काढायचास आणि लेख दुरुस्त करण्याचं काम अविरतपणे वर्षानुवर्षेतू केलेलं आहेस; अगदी व्याकरणाचा बाज सांभाळत!

कित्येक वैज्ञानिक आणि रॅशनल लेखकांची ओळख तुझ्यामुळे झाली… कार्ल सेगन, रिचर्ड फेनमन, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स, स्टीफन हॉकिंग असे कितीतरी विवेकवादी लेखक आणि त्यांचं साहित्य माझ्यासमोर खुलं केलंस. ते ऋण मी विसरू शकत नाहीये..

तुझ्यात आणि माझ्यात एक गोष्ट समान होती. साध्यातली साधी गोष्टसुद्धा जर असेल तर ती वैज्ञानिक निकषांवर टिकते की नाही, हे पाहायचं आणि मग स्वीकारायचं. याचं उदाहरण म्हणजे आपण बोलता-बोलता सहजपणे अनेक शब्द बोलतो. उदाहरणार्थ नशीब किंवा नाव सांगण्यापूर्वी लावण्यात येणारा ‘श्री’ हा शब्द. मला आठवतंय, अशा शब्दांची चिकित्सा करणारी एक मालिका अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात मी लिहावी, असा आग्रह धरला होतास. त्यामुळे मी ती लिहू शकलो; पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी लागणारे संदर्भ हे संस्कृतिकोष, विश्वकोष आणि मराठी शब्दकोष यातून तू मला उपलब्ध करून दिलेस.

‘आजचा सुधारक’ हे मासिक म्हणजे बौद्धिक खाद्य असायचे. त्या मासिकातले माझे लेख आणि त्यावरील तुझ्या प्रतिक्रिया आजही मला लख्खपणे आठवत आहेत. मेंदूत धार्मिक जाणिवांची केंद्रे असावीत, अशा आशयाचा एक लेख मी लिहिला होता. त्यावर तू अक्षरशः हल्ला चढवून म्हटलं होतंस की, अशा प्रकारे धर्मांधांच्या हातात एक प्रकारे कोलीतच मिळेल.

माणसांची मतं आणि मनं बदलतील की नाहीत, याविषयी तू फार असा उत्साह दाखवत नव्हतास. होमिओपॅथी अवैज्ञानिक कशी आहे, हे सांगणारा पहिला लेख महाराष्ट्रात तू 20 वर्षांपूर्वी धाडसाने मांडलास आणि ‘सोशल नेटवर्किंग’अभावी लिखित विरोधाचा सामना आपणास करावा लागला होता. आयुर्वेद, अ‍ॅक्युपंक्चर, युनानी अशांसारख्या अनेक पॅथींमधील अवैज्ञानिकता मांडत राहिलास. डीन ऑर्निश यांच्या ‘रिव्हरसिंग हार्ट डिसीज’ म्हणजे हृदयविकार हा आहार व मेडिटेशनने, डीन ऑर्निश प्रोग्रामद्वारे पूर्ण बरा करा, असे सांगणार्‍या फॅडवर सडकून टीका तू केली होतीस. आजही अशी अनेक फॅड मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब बरे करतो, असे सांगून समाजात बोकाळली आहेत. योगा मेडिटेशन, शिवांबू- म्हणजे स्व-मूत्र प्राशन, गोमूत्र आणि नॅचरल औषध असे काही-बाही सांगून आजही सर्वत्र ‘दुकानदारी’ चालू आहे.

धर्मांध संस्था आणि संघटना या उद्या आपल्या डोक्यावर बसतील आणि आपणास तेव्हा ते खूप जड जाईल, असे तू पंचवीस वर्षांपूर्वी बोलून गेला होतास, ते आज खरे ठरले आहे.

मार्क्सवाद, समाजवाद, लोकशाही, हुकूमशाही अशा अनेक विषयांवर संपादक मंडळात घनघोर चर्चा व्हायच्या आणि कोणत्याही तत्त्वात वैज्ञानिकता नसेल आणि ते सिद्ध झालं नसेल तर त्यावर वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे तू म्हणत राहायचास. त्यामुळेच की काय, राजकारणातलं आपल्याला काही पटत नाही, असे म्हणत राहायचास. तुझं जाणं हा विवेकवादाच्या समाज उभारणीसाठी म्हणून अत्यंत घातक ठरलं आहे. आपले विचार काटेकोर, स्पष्ट आणि विवेकी व्हावेत, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, अशा लोकांसाठीचा तू एक मोठा आधार होतास. पण…

तो आधार आता निखळला…. तुझं जाणं अविश्वसनीय आहे… म्हणूनच तू माझ्या आजूबाजूस अजूनही अस्तित्व दाखवून आणि टिकवून आहेस…

भयाण सुन्नता असली; तरीही..!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]