डॉ. नागनाथ कोत्तापल्ले -

कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा सर्वच भूमिकांतून मराठी साहित्यात आपला ठसा उमटवलेले ज्येष्ठ साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, चिपळूण येथील 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलुगुरू.
आपल्या जडणघडणीत डॉ. आंबेडकरांच्या विचाराशी आपला प्रथम परिचय केव्हा झाला?
लेखकाची जडणघडण सतत चालूच असते. अगदी मरेपर्यंत तो घडतच असतो. कारण त्याचे डोळे उघडे असतात आणि मन संवेदनशील असते. म्हणून बालपणापासून तो जे पाहतो, ऐकतो, वाचतो यातून त्याची घडण सुरू होते. त्याच्याभोवतीची माणसे आणि परिसरही त्याच्या घडणीस कारण होत असतो. आपल्या देशात जात ही पुष्कळदा घडणीस कारण ठरत जाते. अशा सगळ्या प्रक्रियांमधून लेखक घडत जातो. परंतु कधी तरी त्याचा महापुरुषांच्या विचारांशी परिचय होतो आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीला एक दिशा मिळण्याची शक्यता असते. थोडे अलंकारिक भाषेत सांगायचे, तर हिर्याला पैलू पाडण्यासारखे हे काम असते… त्यातून लेखकाचा मूळचा पिंड अधिक उजळून निघतो… पुष्कळदा एकाच वेळी अनेक महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर पडू शकतो. जसे की, माझ्यासारख्या लेखकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे जवळचे वाटतात, तसे कार्ल मार्क्सही जवळचेच वाटतात. त्यात विरोध आहे, असे मी मानत नाही. दोघेही मानवी शोषणाबद्दलच बोलतात. दोघेही शोषणमुक्तीवरच बोलतात. अगदी थोडक्यात सांगायचे, तर जे-जे सारे मला माझे वाटतात. त्या-त्या सार्यांचा प्रभाव माझ्यावर असतो, असू शकतो. (काही लेखक असेही असतात की, ते आपल्यावर कुणाचा प्रभाव नाही, हे सांगण्यात आनंद मानतात. बिच्चारे! त्यांचा विकासच झालेला नसतो, हेच त्यांना कळत नसते.)
आता लेखकावरील प्रभाव म्हणजे काय, ते नीट समजून घेतले पाहिजे. ते समजून घेताना असे लक्षात येते की, प्रत्येक लेखक एका विशिष्ट प्रकारचेच अनुभव साकार करतो; तसेच जीवनाकडे पाहण्याचा त्या-त्या लेखकाचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो; तसेच आपल्या लेखनातून तो कोणाच्या तरी बाजूने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या उभे राहतो, म्हणजे शोषकांच्या बाजूने तरी उभा राहतो किंवा शोषितांच्या बाजूने तरी. जर लेखक पूर्वपुण्याई, कर्मसिद्धांत, दैव, पुनर्जन्म अशा भोवर्यात सापडला की, तो आपोआपच शोषकांच्या बाजूने उभा आहे, असे दिसायला लागतो. पुष्कळदा या लोकांची ती योग्यताच असते, म्हणून त्यांच्या वाट्याला दु:ख येते, अशी भूमिका घेतो, तेव्हाही तो व्यवस्थेच्या बाजूनेच उभा असतो. काही लेखक मात्र फार चतुर असतात. आपण व्यवस्थाविरोधी आहोत, अशी वरकरणी आपली प्रतिमा निर्माण करतात; पण आतून मात्र व्यवस्था समर्थक असतात. अतिशय चातुर्याने ते जातिव्यवस्थेचे समर्थन करू लागतात, तेव्हा त्यांचे ढोंग उघडे पडते.
मी स्वत:ला शोषितांच्या बाजूने उभा असणारा लेखक मानतो, म्हणून माझ्या साहित्यातून सर्वप्रकारचे शोषित समाजघटक व स्त्रियांच्या शोषणाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चित्रण येते. त्याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारविश्वाशी मी परिचित झालो, हे होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारविश्वाची आणि माझी ओळख मात्र खूपच उशिरा झाली. अजूनही ती ओळख परिपूर्ण झाली, असे मी मानत नाही. (तशी ती कुठल्याही विचारविश्वाबद्दल, असेच म्हणता येईल.)
माझे शालेय शिक्षण मराठवाड्यातील अशा खेड्यामधून झाले आहे की, जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच काय, कुठल्याही महापुरुषाच्या विचारांचा परिचय होण्याची शक्यताच नव्हती. क्वचित कधी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची नावे कानावर पडायची, एवढेच… पण पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी देगलूर (जि. नांदेड) येथे गेलो. तेथे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असलेले हेमचंद्र धर्माधिकारी प्राचार्य होते. त्यांच्याकडून खूप-खूप ऐकायला-शिकायला मिळाले. राजकीय तत्त्वज्ञानाचा परिचय होत गेला, तरीही मी एम. ए. करण्यासाठी औरंगाबादला गेलो आणि खर्या अर्थाने डॉ. आंबेडकरांच्या विचारविश्वाचा परिचय होत गेला. डॉ. रावसाहेब कसबे एक वर्ष माझ्यापुढे शिकायला होते. त्यांच्याबरोबर काही वेळा मी प्राचार्य म. भि. चिटणीस यांच्याकडे गेलो होतो, ते आठवते. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे ‘अस्मितादर्श’ नुकतेच सुरू झाले होते. त्यांच्याकडे तर नित्य जाणे-येणे होतेच. त्याकाळी मी ‘अस्मितादर्श’मध्ये लिहितही असे. ‘मिलिंद’ परिसर मला माझा वाटत होता. माझे अनेक मित्र मिलिंद महाविद्यालयात होते. विशेषत: आज ज्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ते प्रा. अविनाश डोळस. हा फार अफलातून माणूस होता. थेट आंबेडकराईट. पण त्याने त्याची चाकोरी कधी होऊ दिली नाही… अशा सगळ्या माहौलमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विचारविश्वाशी मी कधी एकरूप झालो, ते माझे मलाच कळले नाही.
आंबेडकर यांचे विचार आणि भोवतालची परिस्थिती यामध्ये सुसंगती कशी साधली?
भोवतीची परिस्थिती तर आपल्या देशात नेहमीच विरोधी असते. ज्या ठिकाणी जातिव्यवस्थेचा तीव्र पहारा सर्वत्र असतो, तेथे मोकळेपणी श्वास घेणेही अवघड असते. 2014 पासून तर परिस्थिती अधिकच बिघडली आहे. पण आपली विचारांवर निष्ठा असेल, तर परिस्थितीवर मात करता येते. माझ्याबद्दल म्हणाल, तर मी अनेक अर्थांनी ‘डी-कास्ट’ झालो आहे. जेथे संधी मिळेल, तेथे शोषितांच्या बाजूने उभे राहिलो आहे. जेथे प्रागतिक पावले पडत असतील, तेथे त्या पावलांना साथ दिली आहे.
इच्छाशक्ती असली की, भोवतीच्या परिस्थितीवर मात करता येतेच; फक्त त्यासाठी मी तडजोड करणार नाही, हे मात्र ठरविता आले पाहिजे. त्यावर ठाम राहिले पाहिजे. अशा वर्तनामुळे आपले वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता असते.
आपल्या साहित्यकृतीत हे विचार आपण कसे साकारत नेले?
फार विस्तार न करता माझ्या काही कलाकृतींचा तेवढा निर्देश करतो. ‘मध्यरात्र’ या माझ्या कादंबरीत दलितांवर बहिष्कार टाकण्याचा अनुभव मी साकार केला आहे. एकीकडे, दुष्काळाची तीव्रता आणि दुसरीकडे बहिष्कारात होरपळणारे दलित या कादंबरीतून चित्रित झाले आहेत. 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या, तरी या कादंबरीची चर्चा मात्र झाली नाही, याचे वाईट वाटते. कारण दलितांवर घातल्या जाणार्या बहिष्काराचे चित्रण करणारी ही मराठीतील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे. याशिवाय अनेक कथांमधून जातीय ताणतणाव व शोषणाच्या विविध परी मी प्रकट केल्या आहेत. ‘दाद’, ‘पराभव एका लेखकाचा’ या कथा सहज आठवतात.
सती जाण्यासाठी कसे उद्युक्त केले जाते, त्याला दैवी रूप कसे दिले जाते, हे साकारणारी माझी ‘सावित्रीचा निर्णय’ ही एकमेव कथा आहे. असे मोजकेच; पण शोषणाची विविध रुपं व त्यामागील हितसंबंध मी प्रकट केले आहेत, असे मला वाटते.
विरोधकांना डॉ. आंबेडकर समजून देण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न केलेत का?
याबद्दल खूप सांगता येईल; परंतु केवळ एकच प्रसंग सांगतो. 2005 ते 2010 या कालखंडात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू होतो. मराठवाडा विद्यापीठाचा 1994 मध्ये नामविस्तार करण्यात येऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला. तेव्हापासून विद्यापीठ परिसरात डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी होत होती; परंतु कुठल्या ना कुठल्या कारणांनी या मागणीला विरोध होत होता. मी कुलगुरू झाल्यानंतरही ही मागणी पुन्हा-पुन्हा होत होती. शेवटी 2009 मध्ये विद्यापीठ कार्यकारिणी, सिनेट व विद्वतसभेच्या सदस्यांशी संवाद साधून विद्यापीठात पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करून घेतला. विद्यापीठातील मध्यवर्ती जागेची निवड करून मोठा चबुतरा उभा केला. पुतळाही तयार होऊन विद्यापीठ परिसरात आला; परंतु दु:खाची गोष्ट अशी की, तोपर्यंत म्हणजे (5 जून 2010) माझी मुदत संपली व त्यानंतर पुतळा बसविला गेला. वाईट वाटले; पण आपण आपले कर्तव्य केल्याचे समाधानही आहेच.
आपले लेखन, अभिव्यक्ती यामध्ये आंबेडकरी विचार (संवैधानिक) आपण कशा पद्धतीने मांडत आहात?
आंबेडकरी विचार अगर संवैधानिक विचार याची माझी फार सोपी व्याख्या आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि धर्मनितता ही जगन्मान्य अशी श्रेष्ठतम मानवी मूल्ये आहेत. त्यातल्या त्यात आज धर्माधित होण्याची निदान भारताला तर मोठी गरज आहे.
“लेखक याचा अर्थच श्रेष्ठतम मूल्यांची आराधना करणारा माणूस” अशी मी लेखकाची व्याख्या करतो. या मूल्यांच्या विरोधात लेखन करणार्यांना पुष्कळदा पदे व पदव्या मिळतील, सत्ताही मिळेल; परंतु असे लेखक मात्र लेखकपणास कलंक असतील, असे मला वाटते.
आज कलावंत, लेखकांनी आंबेडकरी विचारांची पेरणी केली पाहिजे, याची आवश्यकता वाटते का?
आज तर ती अधिकच वाटत आहे; विशेषत: 2014 पासून आर.एस.एस. प्रणित भाजप सरकार केंद्रात आले आहे, तेव्हापासून, तर ती अधिकच गरजेची वाटत आहे.
भारत हा आधीच हजारो तुकड्यांमध्ये विभागलेला देश आहे. त्यामुळे तर तो सतत गुलाम राहिला. आता कुठे समाजातील विविध घटक जवळ येऊ लागले होते, धर्माची टोके थोडी बोथट होत होती. शोषितांना थोडा न्याय मिळत होता. अशा वेळी “उष:काल होता होता काळरात्र झाली” आणि भारतीय राज्यघटनाच शिल्लक राहणार नाही, याची लक्षणे दिसत आहेत. खोट्या राष्ट्रवादाची नशा पाजवून गरिबांना नागवले जात आहे आणि भांडवलदारांच्या घशात देश घातला जातो आहे, अशा वेळी श्रेष्ठतर मूल्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे.
पुढील नवे संकल्प?
सध्या मी एक मोठी हजार पृष्ठांची कादंबरी लिहितो आहे. “मुधोळची बखर अर्थात काळकळा” असे तिचे नाव आहे. साधारणत: मागील 300 वर्षांच्या काळाचे चित्रण त्यात आहे; म्हणजे मध्ययुगीन राजेशाहीतून आधुनिक काळात आणि लोकशाहीत आपण कसे आलो, ते सांगणारी ही कादंबरी आहे. ती लवकरच प्रकाशित होईल. या शिवाय ‘जात’ व ‘संस्कृती’ या दोन विषयांवर लिहायचे आहे. असे पुष्कळ संकल्प आहेत; पण तूर्त एवढेच.
लेखक संपर्क : 8208437929