जन्मपत्रिका : दोष, भ्रम आणि वास्तव

डॉ. दीपक माने - 9860768869

भविष्याची चिंता, स्पर्धेचे युग, विवेकाचा अभाव, परंपरेचा प्रभाव यामुळे अनेक लोक ज्योतिषाकडे जातात . ज्योतिषी पत्रिका मांडून भाष्य करतात. पत्रिका दोष ,योग यांची जंत्री मांडून हा हजारो वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित सल्ला देतात. याची चिकित्सा करण्यास पत्रिकाकर्ते तयार नसतात. पत्रिका जुळविताना हमखास सांगण्यात येणारे योग व पत्रिका दोष पुढीलप्रमाणे आहेत.१) शनीची साडेसाती २) कडक मंगळ ३) गुरु दोष ४) कालसर्प योग ५) मृत्यूषडाष्टक योग ६) वैर वर्ग ७) मूळनक्षत्र (मुळावर जन्म होणे).

पत्रिका म्हणजे जन्म वेळेवर बनवलेला ढोबळ १२ रकान्यांचा आराखडा होय. ग्रह, नक्षत्र, राशींच्या आकड्यांचा खेळ मांडलेला असतो.

शनीची साडेसाती

शनि हा सूर्यमालेतील सहावा डोळ्यांनी दिसणारा, सर्वात दूरचा ग्रह आहे. तो वायूंचा गोळा आहे. त्या भोवती कडी दिसतात, ती पाणी व धूलकणांनी बनलेली आहेत. सूर्यापासून १४३ कोटी कि.मी. वर असणारा, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास तीस वर्षे लागतात. तो एका तारका समूहाजवळ (राशी जवळ )अडीच वर्षे दिसतो. तो ज्या राशी जवळ दिसतो त्या राशीच्या व्यक्तींना त्या वर्षी अडचणींना सामोरे जावे लागते म्हणतात. म्हणजेच त्याची वक्रदृष्टी पडते असे सांगतात. मग त्याला साडेसाती ऐवजी अडीचकी म्हणणे योग्य झाले असते. पण त्या राशींचे पूर्वीची रास व पुढची रास धरून तीन अडचं,= साडेसात असा हा खेळ आहे. मागील व पुढील रास का घ्यावी? याचे उत्तर नाही.

उदा. व्यक्तीची रास वृश्चिक आहे व त्या राशीत शनी आहे तो तिथे (३०/१२ =) अडीच वर्ष राहणार आहे. पण त्यापूर्वीची तूळ रास व पुढची धनु रास जोडून त्याला साडेसात वर्ष त्रास सांगतात कारण त्यामुळे पंचवीस टक्के लोकसंख्या भीतीच्या छायेत येते. पूर्वी शनी ग्रहाचा अभ्यास नव्हता त्यावेळची गृहीतके ग्राह्य धरतात. पण त्यानंतर शनि ग्रहावर पायोनियर ११, व्हायेजर १, व्हायेजर २ या यानांनी व कासिनी उपग्रहाने खूप वास्तववादी माहिती मिळवली त्यामध्ये पूर्वीची गृहीतके नाकारली आहेत. त्यामुळे ग्रह कोणत्याही राशी जवळून जात असेल तरी त्याचा पृथ्वीवरील मानवावर काहीही परिणाम होत नाही हे विज्ञान सांगते.

कडक मंगळ

जन्म कुंडलीत एक, चार, सात, आठ, बारा यापैकी एका स्थानात मंगळ असेल तर त्याला कडक मंगळ आहे असे पत्रिकाकर्ते सांगतात. त्यामुळे अनंत अडचणी आयुष्यात येणार, भयंकर स्थिती येणार असे गृहीतक मांडतात. एकूण बारा रकान्यांपैकी पाच रकान्यांमध्ये मंगळ येणे हे ४५% फक्त भारतातच बाधित होणार, हे शिक्षित लोकच आहेत कारण वनवासी, आदिवासी भागातील लोकांना पत्रिका म्हणजे काय हे अद्याप माहीत नाही.

आता कडक मंगळाचे वास्तव पाहू. मंगळ ग्रह सूर्यापासून २२.५ कोटी कि.मी. अंतरावर, सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्यावरील आयर्न ऑक्साईड वायूमुळे तो तांबूस दिसतो. एका राशीत फक्त दीड महिना असतो. चंद्रासारखे त्याचे दोन उपग्रह आहेत. या ग्रहावर खूप संशोधन केले आहे. मंगळावर मार्स लँडर, स्पिरीट, फिनिक्स, अपॉर्च्युनिटी या मोहिमांनी अनेक पुरावे/ माहिती गोळा केली आहे. सन २०२२ मध्ये तर इंजिन्युटी हेलिकॉप्टर मंगळावर सोडले आहे. त्याने ४२ हून जास्त उड्डाणे करून माहिती संकलन केले आहे. वधूचे किंवा वराचे पत्रिकेत कडक मंगळ म्हणजे वरील ५ स्थानापैकी एकात मंगळ शक्य अशक्यता सिद्धांताने येत असेल तर त्याचा अर्थ मानवाचे वाईट वा चांगलं होण्याशी जोडणे हा भ्रम आहे.प्राचीन माहिती पडताळून अयोग्य ती नाकारण्यातच मानवाचे हित आहे.

गुरु दोष

सूर्यमालेतील आकार व वस्तुमानाने सर्वात मोठा ग्रह, सूर्यापासून ७८ कोटी कि.मी.अंतरावर, ९५ पेक्षा जास्त उपग्रह असणारा त्यातील ४- ५ उपग्रह दुर्बिणीतून सहज दिसतात. आपल्या संस्कृतीत गुरूला महत्त्व असल्यामुळे पत्रिकाकर्ते आठवा गुरु म्हणजे यंदा कर्तव्य नाही असे मांडतात. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास बारा वर्ष लागतात. म्हणजेच एका राशीत एक वर्ष असतो.

गुरु दोष म्हणजे गुरु ज्या राशीत दिसतो त्या राशीपर्यंत मुलाचे राशीस एक क्रमांक देऊ क्रमाने पुढील राशी मोजणे तो जो नंबर येईल तो मुलाचा गुरू. जर १० आले तर दहावा गुरू.उदा. जर गुरु सिंह राशीत आहे आणि मुलाची वृश्चिक रास तर मुलाला १०वा गुरु. अंकाचा खेळ आहे त्यावर दोष अवलंबून आहे. जसे की,२,५,७,९,११ शुभ, ४, ८, १२ अत्यंत घातक, १, ३, ६ सौम्य. हा घातकपणा गुरूच्या सोन्याच्या प्रतिमा पूजन व दान केल्याने तात्काळ ७८ कोटी कि.मी. अंतरावरील ग्रह शांत होतो. शुभ होतो. असे पत्रिकाकर्ते मानतात. आहे की नाही गंमत. सुवर्ण प्रतिमा दानाची किमया, गुरू ग्रहाची बदले दुनिया!

कालसर्प योग

योग म्हणजे सूर्य,चंद्र रेखांशांचे २७ भागात विभाजन करून येणारा भाग. त्याची पत्रिकाकर्ते प्रीती, ऐद्रा, इ.नावे सांगतात. या योगाचे कालसर्प नावातच काल म्हणजे मृत्यू व सर्प म्हणजे पुन्हा मृत्यू अशी भीती स्पष्ट होते. यात पत्रिकेतील सर्व ग्रह पत्रिकेच्या एकाच बाजूस येतात त्याला सर्पाकृती मानतात. राहू सापाचे तोंड व केतू हे शेपूट. आपण जाणतोच की राहू व केतू हे दोन्ही चंद्र आणि पृथ्वी यांचे भ्रमण कक्षेतील काल्पनिक छेदन बिंदू आहेत. हा काल्पनिक साप बाधीताला वेटोळे घालून बसतो आणि अत्यंत छळ करतो अशी भीती घातली जाते. या भयानकतेतून सुटका करण्यासाठी पत्रिकाकर्ते नारायण नागबळी नावाचा एक शांतीसाठीचा विधी सुचवतात. याकरिता कुटुंबातील रक्ताचे नात्यातील जवळचे सर्व सदस्य घेऊन त्र्यंबकेश्वर/नरसिंहवाडी या क्षेत्री जाऊन दोन-तीन दिवस थांबून जप, तप, विधी, पूजा करून नागाची सोन्याची मूर्ती दान केली जाते.

सुवर्णमूर्ती दान होताच आकाशातील सर्व ग्रह त्यांची जागा बदलून बाधिताच्या पत्रिकेत सुरळीत होतात अशी धारणा आहे. प्रत्येकाच्या पत्रिकेत कधी ना कधी अशी स्थिती येणारच म्हणजे १००% लोकसंख्या बाधित होणार व सुवर्णमूर्ती दान करणार. या विधीचा खर्च काही लाखात येतो असे लोक सांगतात. परंपरेचा पगडा व अज्ञाताची भीती यातून हे सर्व घडत असते.

मृत्युषडाष्टकं योग

नावाच्या सुरुवातीसच जीवन अंत (मृत्यू) असल्यामुळे मानवाच्या मनात सर्वात जास्त ज्याची भीती ज्याची तोच मृत्यू हा योग (शक्यता) . मृत्यूपासून सुटकेचा मार्ग शोधावा हीच नावामध्ये अपेक्षा दिसते. धोका सांगणारेच सुटकेचा मार्ग सांगतात हे विशेष आहे. प्रत्येक माणसाची एक जन्मरास असते त्याचे क्रमांकावर आधारित अंकांचा खेळ आहे. वधूची रास वराचे राशीपासून ६ व्या किंवा ८ व्या क्रमांकावर आल्यास त्याला मृत्यूषडाष्टक योग म्हणतात. उदा. मुलगी तूळ व मुलगा वृषभचा असेल तर तूळ एक क्रमांक देऊन सलगक्रमाने मोजत गेलेस वृषभ आठव्या क्रमांकावर येते पुन्हा पुढे मोजत गेल्यास मुलीची रास सहाव्या क्रमांकावर येते. यात कोणतेही कोडे नाही. सरळ गणिती नियम आहे. रुढी पालनामुळे त्याची भीती दाखवून कार्यभाग साधला जातो. वधू किंवा वर सहा महिन्यांमध्ये मरणार असा दावा पत्रिकाकर्ते करतात. त्यावर उपायही तेच सांगतात. काही वर्षांपूर्वी एका सिने कलाकाराचे पत्रिकेत असा योग होता त्याचे लग्न एका पिंपळाचे झाडा बरोबर लावले त्यानंतर वधु बरोबर सदक्षिणा लावले.. तो पिंपळ अद्याप जिवंत असल्याचे दिसते. कार्यकारण भावाचा अभाव व मानसिक गुलामगिरीचा प्रभाव यामुळेच हे घडत असते.

वैर वर्ग

या दोषांमध्ये नावात काय आहे? म्हणणार्‍यांना जणू चकित केले आहे. व्यक्तीची नावे बदलू शकतात या वास्तवाला छेद देत वधू-वरांचे व्यावहारिक नावाची सुरुवात ज्या अक्षराने होते त्या अक्षरांना गरुड,कुत्रा, सर्प, सिंह या तात्कालीन ज्ञात प्राण्यांची नावे देऊन आठ वर्गामध्ये (भागात) मुळाक्षरे विभागलेली आहेत. उदा. त, थ, द, ध, न सर्प वर्ग, तर श, स, ह हरीण असे वर्गीकरण. निष्कर्षात मांडणी अशी की, वधू व वर एकाच वर्गात असले तर प्रेम, एकापासून दुसरे पाचव्या वर्गात असेल तर वैर, इतर असल्यास समता.आपल्या लाडक्या मुलांना कुत्रा, साप संबोधणार्‍या व्यवस्थेवर पालक का विश्वास ठेवतात हा खरा प्रश्न आहे. नावाचे अक्षरावरून राशी काढतात तसेच हे काहीशी अवैज्ञानिक पातळीवरचे ज्ञान वाटते.

मूळ नक्षत्र

पत्रिकाकर्ते प्रत्येकाचे जन्माचे दिवशीचे नक्षत्र ते त्याचे जन्म नक्षत्र मानतात यामध्ये महिलांसाठी खास व्यवस्था केल्याचे दिसते. यात मूळ नक्षत्रावर जन्मलेली मुलगी सासर्‍यास वाईट, ज्येष्ठावरची दिरास वाईट, आश्लेषाची सासूस वाईट पण मुलगा यापैकी कोणत्याही नक्षत्रावर जन्माला तरी हरकत नाही ही धारणा मातृसंस्कृतीस मारक आहे. फक्त मुलीवर परिणाम ही अशक्य गोष्ट वास्तवाशी विसंगत आहे.

नक्षत्र म्हणजे दूरवर असणार्‍या तार्‍यांचा समूह, त्याच्याजवळ पृथ्वीवरून ग्रह, चंद्र दिसतात त्यावरून कालमापन केले होते. पण पूर्वी पृथ्वीच्या परिवलन भ्रमणगतीचा म्हणजे भवार्‍यासारखी अक्षाभोवती २३ अशांनी डगमगणे गती माहीत नव्हती. या गतीमुळे २६०० वर्षांनी पृथ्वी मूळ स्थानी येते. अर्थात त्यामुळे २००० वर्षांपूर्वी ज्या राशीत तारका असेल तो आता पुढच्या राशीत असेल.त्यामुळे सर्व कोष्टक बदलते त्यामुळे पत्रिका दोष हे चिकित्सेमध्ये विज्ञानाचे कसोटीवर टिकत नाहीत. आपले मन, मनगट, मेंदू यावर विश्वास ठेवून विवेकी विचार करत जगणे हेच खरे तर फसवणुकीतून वाचवू शकते.

डॉ. दीपक माने

लेखक संपर्क : ९८६०७६८८७१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ]