नरेंद्र लांजेवार - 9422180451
डॉक्टर…तुम्ही एकाच वेळी ‘क्लास’ आणि ‘मास’ यांना समजेल, उमजेल अशा भाषेमध्ये बोलत होता, लिहित होता. तुमचं हेच विशेष वैशिष्ट्य आम्हाला खूप भावायचं. तुमच्या लेखणीत आणि वाणीत समोरच्या समूहाला समजावण्याची जबरदस्त ताकद होती. तुमच्या वाणीतून, लेखणीतून कुणाची भावना दुखावेल, असा एक शब्द चुकूनही आला नाही; पण प्रस्थापितांचे हितसंबंध तोडण्याचे सामर्थ्य नक्कीच तुमच्या वाणीत, लेखणीत; आणि मुख्यत: तुमच्या कृतीत होते. त्यामुळे तुमची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या सनातन्यांनी करणे हे ओघानेच आले; तेही पुण्यात!
आमच्या सार्वजनिक जीवनात असा एकही दिवस गेला नाही की, डॉक्टरसाहेब तुमची आम्हाला आठवण झाली नाही… तसेही दर महिन्याच्या 20 तारखेला आम्हाला तुमची तीव्रतेने आठवण येतेच. या 20 ऑगस्टला तुमच्या आठव्या हौतात्म्य दिनी आम्ही सारे पुण्याच्या महर्षी शिंदे पुलावर पुन्हा एकदा एकत्र येऊ. तुमच्या मारेकर्यांना व तुम्हाला मारण्याचा कट रचणार्या सूत्रधाराला अटक व्हावी, म्हणून शासनाकडे आम्ही सारे पाठपुरावा करू व तसाही पाठपुरावा करीतच असतो. कटाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोेचायचेच नाही, असा जणू चंगच इथल्या तपास यंत्रणेने बांधला आहे, तरीही आम्ही सारे विवेकी कार्यकर्ते संवैधानिक चौकटीमध्ये राहून तुमच्या खुनाचा सखोलपणे तपास लागावा, यासाठी विवेकी मार्गाने आंदोलन करीत असतो.
डॉक्टर…तुम्ही एकाच वेळी ‘क्लास’ आणि ‘मास’ यांना समजेल, उमजेल अशा भाषेमध्ये बोलत होता, लिहित होता. तुमचं हेच विशेष वैशिष्ट्य आम्हाला खूप भावायचं. तुमच्या लेखणीत आणि वाणीत समोरच्या समूहाला समजावण्याची जबरदस्त ताकद होती. तुमच्या वाणीतून, लेखणीतून कुणाची भावना दुखावेल, असा एक शब्द चुकूनही आला नाही; पण प्रस्थापितांचे हितसंबंध तोडण्याचे सामर्थ्य नक्कीच तुमच्या वाणीत, लेखणीत; आणि मुख्यत: तुमच्या कृतीत होते. त्यामुळे तुमची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या सनातन्यांनी करणे हे ओघानेच आले; तेही पुण्यात!
डॉक्टर… तुम्ही ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कार्याचा गाभा आणि आवाका नेमक्या शब्दांत कार्यकर्त्यांना सांगत असत. ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त असते,’ हे तुमचे प्रसिद्ध वाक्य म्हणजे चळवळीचा मूळ गाभाघटक होय. तुम्ही प्रत्येक भाषणात सांगायचे की, ‘आपण विज्ञानाची सृष्टी घेतली; पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. विज्ञानाची करणी घेतली; पण विज्ञानाची विचारसरणी घेतलेली नाही.’ यासाठी डॉक्टरसाहेब, तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची लस समाजाला द्यायची होती. तुम्हाला हा समाज विवेकाच्या आधारे नीतीच्या पायावर उभा करावयाचा होता. महाराष्ट्रातील तमाम संतांनी आणि समाजसुधारकांनी हेच तर स्वप्न बघितलं होतं!
पण डॉक्टर… तुम्ही नुसती स्वप्नं बघितली नाहीत; ती प्रत्यक्ष आणण्यासाठी, विज्ञानाची दृष्टी जनमानसात रुजविण्यासाठी जमिनीवर संघर्ष केला, उपक्रम राबविले, कृतिशील प्रबोधन केले, विधायक कामांची उभारणी केली, त्यासाठी संघटना उभारली. बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ या आदेशाप्रमाणे प्रबोधन, संघर्ष आणि विधायकता हा आपल्या चळवळीचा गाभा बनविला.
डॉक्टर… ज्या अविवेकी तरुणांनी तुमची हत्या केली, त्यांना तुमच्या चळवळीची चतु:सूत्री माहीत असती, त्याचे आकलन झाले असते तर कदाचित त्यांनी तसे केले नसते. तुम्ही तुमच्या चळवळीची चतु:सूत्री सांगताना नेहमी सांगायचे, ‘धर्माच्या नावावर शोषण करणार्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार, प्रत्येक धर्माची विधायक, कृतिशील आणि कठोर चिकित्सा, व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणे..’ हे विचारांचे चार खांब तुम्ही मानले होते. तुमची प्रत्येक कृती ही संवैधानिक चौकटीमध्ये असे आणि ही संवैधानिक चौकट मान्य नसणार्यांनीच तुमची हत्या घडवून आणली. समाजपरिवर्तनाची लढाई इतकी क्रूर असते का हो डॉक्टर? ती विचार पेरणार्यांनाच संपवून टाकते? या अविवेकी लोकांना काय माहीत की, माणसं मारून विचार नाही मरत… पण खरं सांगू का डॉक्टर, तुमच्या हौतात्म्यानंतर तुमचे विचार संपले नाहीत…ते शतपटीने वाढले…तुमचा विचारांचा लढा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरला… अगदी देशाच्या बाहेरही तुमच्या विचारांच्या आवश्यकतेला मागणी आली.
डॉक्टर… तुम्ही चळवळीत येण्यापूर्वी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम कबड्डीपटू होता. पुढे, तुम्ही वैद्यकीय पदवीधर झाला. तुमचा उत्तम चालणारा दवाखाना तुम्ही बंद करून समाजसेवेत आलात. डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्ही जनचळवळीत आलात. देवदासी, भटके-विमुक्त, बाबा आढाव यांची ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळ.. या चळवळीत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला…नंतर ‘सामाजिक कृतज्ञता निधी’साठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचलात… यातून अनेक कार्यकर्त्यांना पाठबळ मिळाले. पुढे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी तुम्ही ठरवून संपूर्ण आयुष्यच वाहून दिले. पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रातील गाव आणि गाव तुम्ही पिंजून काढले. गावोगावी कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे केले. हजारो कार्यकर्त्यांच्या घराघरांत तुम्हाला आदराचे स्थान मिळाले. तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत, ‘आधी घरादाराला वेळ द्या…नंतर चळवळ.’ तुम्ही कधीच व्यक्तिगत स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा वापर केला नाही, ना एकाही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला. तुम्ही सातत्याने महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी चळवळींशी जोडून घेत होता व चळवळीला विविध क्षेत्रातील नवनवे कार्यकर्तेमिळवून दिले.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा म्हणून तुम्ही एकोणीस वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत राहिला. हा कायदा व्हावा म्हणून तुम्ही ज्या चिवटपणे, समतोल ढळू न देता लढत राहिला तो तुमचा संघर्ष आम्ही जवळून बघितला. तुम्ही उपाशी- तापाशी विधानसभेच्या आवारात, मंत्रालयात तासन्तास अनेकांशी चर्चा करून या कायद्याचे महत्त्व अनेकांना पटवून देत असत. कायद्याच्या समर्थनार्थ तुम्ही गावोगावी परिषदा घेतल्या, हजारो व्याख्याने दिली.. शेवटपर्यंत तुम्ही प्रबोधनाचा जागर करीत राहिले….तुमचा आवाज आणि तुमचा विचार लोकांना भावतोय, हे लक्षात येताच डॉक्टर तुम्हाला संपविण्याचा कट रचण्यात आला.
डॉक्टर… तुम्ही गेलात आणि पुन्हा एकदा ‘स्यूडो सायन्स’चा बोलबाला सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. पुन्हा फलज्योतिषाचा अभ्यासक्रमात समावेश होऊ घातला आहे. राज्यकर्ते महंतशाहीला शरण जात आहेत.. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन अंधश्रद्धा समाजात जन्माला येत आहेत…तुमचे कार्यकर्ते ‘शाहू-फुले-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’ अशा घोषणा देऊन कृतिशील चळवळ नेटाने पुढे नेत आहेत. समाजात जी-जी बाब खटकते, त्यावर ‘बुडते हे जग, न बघवे ते कारणे’ या सूत्रानुसार संतांचा सामाजिक सुधारणेचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही कार्यकर्ते करीत आहोत…
खरं सांगू का डॉक्टर… तुम्ही लिहिलेल्या ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ या शीर्षकाप्रमाणे विवेकाची पताका खांद्यावर घेऊन कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम करीत आहेत. तुम्ही आमच्यातच आहात… तुम्ही गेला नाहीत… तुमचे विचार पुस्तकरुपाने, ध्वनिमुद्रित व्याख्याने, तुमचे विविधांगी लेखन, वार्तापत्र मासिकाच्या माध्यमातून डॉक्टर… तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याजवळ जिवंत आहात…
डॉक्टर.. तुम्ही अंगीकारलेली चार्वाक, बुद्धाच्या वैज्ञानिक दृष्टीची, गांधींच्या निर्भयतेची आणि संत-समाजसुधारकांच्या नीतीची ही वाट खरंच माणसाला माणूस बनवणारी, विवेकवादी विचारांची वाट आहे… या वाटेवरील सनातन्यांना आव्हान देत तुम्ही तुमच्या बलिदानाने आमच्यासाठी आदर्श निर्माण करून ठेवला आहे…तो आम्ही कधीच विसरणार नाही…
तुमच्या विचारांचा कार्यकर्ता
नरेंद्र लांजेवार,
बुलडाणा
संपर्क नंबर 94221 80451