राहुल विद्या माने -
18 ऑगस्ट, 2021
20 ऑगस्ट, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन. हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद (ऑनलाईन) आयोजित करण्यात आलेला होता. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात विज्ञानवादी संघटनांची भूमिका’ हा या परिसंवादाचा विषय होता. डॉ. विवेक मॉन्टेरो (अध्यक्ष, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क) हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात ओ. एम. एस. शंकरन (अध्यक्ष, केरळ साहित्य शास्त्र परिषद , केरळ), जसवंत मोहाली, (सहसंपादक, पंजाबी मासिक), डॉ. काशिनाथ चटर्जी, झारखंड (सेक्रेटरी, भारत ज्ञान विज्ञान समुदाय) हे वक्ते होते.
अलिकडच्या काळात भारतात तर्कनिष्ठ चळवळी ‘अंनिस’पासून प्रेरणा कशा घेत आहेत, याबद्दल जसवंत मोहाली यांनी मांडणी केली. ते म्हणाले, “ते खर्या अर्थाने तर्कनिष्ठ होते. संविधानातून मिळालेल्या तर्कनिष्ठ अशा वारशाचा त्यांनी अभिमान बाळगला. डॉ. दाभोलकर यांनी स्वतःच्या जीवाला धोका असून सुद्धा सुरक्षा घ्यायला नकार दिला. त्याचबरोबर ते असं म्हणायचे की, मी फक्त एकटाच हे काम करत नाही, तर महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्तेसुद्धा हे काम कोणत्याही सुरक्षेविना करतात, म्हणून फक्त मी सुरक्षा घेणार नाही. संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करणे, हे काम अवघड होण्यासाठी अनेक आव्हाने समोर आली आहेत. आधुनिक काळातील छद्मविज्ञानाची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. ज्या दैनंदिन समस्या आहेत, त्या न सुटल्यामुळे आणि जे भयात जगतात ते लोक अंधश्रद्धांना कसे बळी पडतात, याबद्दल त्यांनी सांगितलं. शेवटी, त्यांनी सध्या देशभर आणि विशेषत: दिल्ली परिसरात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात तर्कशील सोसायटी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य शेतकर्यांमध्ये वाटत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर्कशील सोसायटीचे काम हे किताब, कला, शिक्षण या माध्यमातून सध्या चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तर्कशील सोसायटीचे विविध पातळ्यांवर काम कसे चालते, याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली. विविध पुस्तके, कलाप्रकार आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून ते जनजागृतीचे काम कसे चालले आहे, याबद्दलचा प्रवास सुध्दा त्यांनी सांगितला. शेवटी ते म्हणाले, आमच्याकडे काम करण्यासारखं बरंच काही आहे. अंधश्रद्धेचे काम आपोआप होते; पण वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचे काम करताना मेहनत घ्यावी लागते.”
डॉ. काशिनाथ चटर्जी यांनी ‘भारत ज्ञान-विज्ञान समुदाय’ ही स्वयंस्फूर्तीने काम कसे करते, याबद्दल माहिती दिली. झारखंड आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये चालत आलेल्या डायन कुप्रथेबद्दल त्यांनी अनुभव सांगितले. तिथल्या एका रेल्वे स्टेशनबद्दल भुताने झपाटल्याच्या अफवेचा व अंधश्रद्धेचा कसा यशस्वी मुकाबला केला, याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आमचा अनुभव असा आहे की, अंधश्रद्धांचे एक मार्केट आहे. ही लढाई खूप कठीण आहे. कारण यामध्ये गरीब-श्रीमंत, अशिक्षित-शिक्षित यांसह सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. आज आमच्या संस्थेने एक लाख लोकांना समाजात जागृती करण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. झारखंड विद्यापीठात सुरू झालेल्या ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाचा आम्ही जोरदार विरोध केला होता.” यावेळी त्यांनी ऑगस्टमध्ये त्यांच्या संस्थेमार्फत ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ याचा प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. शेवटी ते म्हणाले, हिंदी परिसरात बुवाबाजीला रोखण्याचे काम आमच्या संस्थेने केले आहे. आम्ही याबद्दल संवादाचे काम चालू ठेवू.
ओ. एम. एस. शंकरन यांनी केरळ शास्त्र साहित्य परिषद (केएसएसपी) कसे काम करते, याबद्दल विस्ताराने माहिती दिली. ते म्हणाले, “वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी आम्ही नियमितपणे विविध कार्यक्रम आयोजित करतो. ‘केएसएसपी’ यावर्षी 60 वर्षांची झाली आहे. अंधश्रद्धा आणि पारंपरिक गैरसमजुती दूर करण्यासाठी आम्ही काम करतोच. त्याचबरोबर यातून एक आशावाद निर्माण करून, अन्याय दूर करणे, व्यक्तीचा सन्मान जपण्यासाठी वैज्ञानिक जाणीव विकसित करणे हे ‘केएसएसपी’चे प्रमुख काम आहे. विज्ञानाची माहिती आणि विविध शोध-संशोधनाबद्दल माहिती ‘केएसएसपी’ लोकांना देते. विद्यार्थी, युवक आणि वरिष्ठ नागरिकांच्या पातळीवर ‘केएसएसपी’ काम करते. आम्ही प्रस्थापित गोष्टींना पर्याय सुचवतो. तर्कनिष्ठ विचारसरणी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावी, याबद्दल ‘केएसएसपी’चे काम चालू आहे.”
ओ. एम. एस. शंकरन पुढे म्हणाले, खप ींहश लेारिपू ेष र्ेीी ेुप उहळश्रवीशप हे ‘केएसएसपी’चे अभियान सध्या चालू आहे. लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि याद्वारे कल्पक प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. दुसर्या एका अभियानात डलळशपलश ळप वरळश्रू ङळषश याद्वारे दैनंदिन जीवनातील विज्ञान समजावून सांगितले जाते. स्वयंपाकासाठी सुधारित चूल, विहिरींचे पुनर्भरण, जैवकचर्याचे व्यवस्थापन आणि इतर प्रयोगांबद्दल माहिती दिली जाते. छद्म विज्ञानाच्या विरोधात आम्ही काम करतो. राशीभविष्याच्या थोतांडाबद्दल आम्ही जागरुकता वाढवतो. वैज्ञानिक साक्षरता आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी जागरुकता वाढवण्यावर आम्ही भर दिला आहे. लोकशाहीचे विकेंद्रीकरणाबाबत आम्ही आग्रही आहोत. ‘पर्यावरण’ या विषयावर सुद्धा आम्ही सक्रिय आहोत आणि ‘सायलेंट व्हॅली’ जतन करण्याबाबतचे आम्ही केलेले आंदोलन याबाबतीत क्रांतिकारी ठरले आहे. विविध गाण्यांतून सामाजिक जाणीव, संविधान बांधिलकी, वैज्ञानिक जाणीव, लिंगसमानता, पर्यावरणसंवर्धन मूल्य हे सर्व रुजवायला मदत होते. यातून समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा ‘केएसएसपी’चा मानस आहे.”
डॉ. विवेक मोन्टेरो यांनी 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करण्यामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, डॉ. दाभोलकर यांनी फलज्योतिषाचा भांडाफोड करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. दाभोलकरांनी प्रयोग करूनच एखाद्या दाव्यावर विश्वास ठेवण्याबद्दलची सामूहिक जाणीव विकसित केली. डॉ. दाभोलकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वसामान्यांपर्यंत नेण्याबाबतची कामगिरी बजावली. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करण्यातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन आम्ही देशभरातील संस्थांनी 20 ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करायचं ठरवलं आणि 2018 पासून आम्ही हे करत आहोत. यावर्षी आम्ही ‘खगोलशास्त्र विरुद्ध फलज्योतिष’ ही मोहीम आणि ‘कोविड-19 विरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोना’ची मोहीम हे राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त आयोजित अभियानाचे विषय आहेत.
डॉ.मोन्टेरो पुढे म्हणाले, डॉ.दाभोलकरांनी नेहमी अनुभवसिद्ध ज्ञानाचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणारे हे सर्वात मोठे व्यक्तिमत्त्व वाटते. आजकाल वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे हे फक्त संवैधानिक कर्तव्यच नाही परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनयुक्त चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे हा सुद्धा मूलभूत हक्क आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विज्ञान शिक्षण हे मूलभूत हक्क असलेच पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे हे धोक्यात आलेले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण यावर नवीन शैक्षणिक धोरणात भर दिलेला दिसून येत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे चैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात आहे.”
डॉ. मोन्टेरो शेवटी म्हणाले, “वैज्ञानिक पद्धती ही शिक्षणात महत्त्वाची आहे. प्रश्न विचारणे हे महत्त्वाचे आहे. सामाजिक धोरणे जर तर्कनिष्ठ पद्धतीने राबवायची असतील, तर वैज्ञानिक पध्दतीने जमवलेली माहिती आवश्यक आहे. कोविडशी लढताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायलाच हवा. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धार्मिक मूलतत्त्ववाद यांचा थेट लढा आहे. पण ही लढाई विज्ञान आणि धर्म यांच्यातील नाही. लोकशाही परंपरा न मानणार्या शक्ती; विशेषत: सामाजिक विषमता आणि सामाजिक तेढ पसरवणार्या शक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अशी ही लढाई आहे.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा कडलासकर, ‘अंनिस’ सांस्कृतिक विभाग यांनी एक सुंदर गीत सादर केले. डॉ अशोक कदम (बार्शी) यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी देशभर विविध राज्यांत तर्कनिष्ठ विचारसरणीला चालना देण्यासाठी काम करणार्या संस्थांचा आढावा घेतला. प्रकाश घादगिने (लातूर) यांनी आभार मानले.
कार्यक्रमात अण्णा कडलासकर यांनी 2019मध्ये लिहिलेले गीत सादर केले. या सुंदर गीताच्या काही ओळी खालीलप्रमाणे–
अंधेरे से चल देंगे हम, उजाले के दम पर …
बदल देंगे दुनिया ये भरोसा हैं हम पर
कोशिशे जमाने की, मशाले बुझानेकी,
ताले जडाकर सारी रोशनी छुपानेकी…
उन्हे ना पता हैं सूरज, फिदा हैं हमी पर,
‘सत्य मेव जयते’ नारा जिता है हमेशा
धोकेबाज चाहे जितना करेंगे तमाशा
बदल देगे दुनिया ये, भरोसा हैं हम पर…
(शब्दांकन : राहुल विद्या माने, पुणे)