चळवळीने बुद्धिप्रामाण्यवादी विचारपद्धती दिली!

रूपाली आर्डे-कौरवार -

गेल्या सहा महिन्यांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड अंनिसमध्ये सक्रिय झाल्यापासून काही कार्यक्रम, मीटिंग्स आणि उन्हाळी सहल या निमित्ताने बर्‍याच नवीन कार्यकर्त्यांशी, लोकांशी भेटीगाठी झाल्या. प्रत्येक वेळेस ओळख करून देताना नावासोबतच प. रा. आर्डे सरांची कन्या हा उल्लेख ओघाने येतच राहिला. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी समजताच लोक एका वेगळ्याच आदराने आणि आपलेपणाने येऊन भेटत आणि बोलत होते. एकदा एका सहकार्‍याने विचारले पण की, मला सारखी सारखी सरांची मुलगी म्हणून ओळख करून दिलेली आवडते की नाही? तर मला ते नक्कीच आवडते. ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबरच मी माझी वैयक्तिक वैचारिक आणि तात्विक बैठक बनवली आहे. त्यातही अर्थातच माझ्या वडिलांचाच हातभार लागला आहे.

सातार्‍यात असताना १९८० च्या दशकादरम्यान वडिलांचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी संपर्क आला, तो वाढला आणि मग त्यांचा निरिश्वरवादाकडे आणि बुद्धिप्रामाण्याकडे प्रवास सुरू झाला. त्यातूनच आमच्या घरामध्येही बदल होऊ लागले. गणपती बसवणे बंद झाले. सण साध्या पद्धतीने साजरे होऊ लागले. आईची व्रतवैकल्ये कमी होत होत बंद झाली. मला जसे कळायला लागलेय तसे आम्ही कधी देवदेवस्थाने केल्याचे अजिबात आठवत नाही. घरात देवीदेवतांचे एक दोन फोटो होते, त्यांची छोटी पूजा आई करायची. माझ्या घराचे वेगळेपण मला दुसर्‍यांची घरे पाहिली की जास्त जाणवायचे. मी कधीकधी संध्याकाळी मनानेच अगदी हौसेनं शुभंकरोती म्हणायचे, मला वाटायचे मी किती गुड गर्ल सारखी वागतेय; पण त्याकडे वडिलांनी तर नाहीच नाही, आईने पण विशेष लक्ष दिले नाही. मग मी तो प्रकार मोडीत काढला. पाचवी-सहावीत असताना शाळेत गीताई पाठांतराची स्पर्धा होती. मी त्यातले दोन-तीन अध्याय, काहीही अर्थ न समजता, अगदी मुखोद्गत केले होते. स्पर्धेत पहिला नंबर पण मिळवला; पण घरामध्ये त्याचे पण कौतुक शून्य. पुढे जाऊन हळूहळू भान येऊ लागले. प्रश्न पडायला लागले. स्वत: विचार करून आणि गोष्टी तपासून पाहायची सवय लागली. भुतांवर कधीच विश्वास बसला नाही; त्यामुळे अंधाराची भीती वाटलीच नाही. परीक्षेत मार्क्स मिळवायचे किंवा कोणतेही यश मिळवायचे असेल, तर फक्त मन लावून दणकून अभ्यास करणे आणि प्रयत्नशील राहणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही हे मनावर पक्के ठसले गेले.

बुद्धिप्रामाण्यवादी विचारपद्धतीने आणि चळवळीने आमच्या कुटुंबाला खूप काही दिले आहे. आयुष्यात आलेल्या वादळांपुढे मोडून न पडता, विवेक आणि तर्कबुद्धी समोर ठेवून वागण्याची सवयच लागल्यासारखी झाली आहे. मग ते प्रॉब्लेम्स कौटुंबिक असोत किंवा व्यावसायिक. माझ्या एका वर्गमैत्रिणीला कौटुंबिक मानसिक त्रासाला तोंड देण्यासाठी तिच्या वडिलांनी रामदासी बैठकांमध्ये जाण्याची सवय लावली होती. माझ्या वडिलांनी मात्र मला अल्बर्ट एलिसचे ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी’चे पुस्तक पोस्टाने अगदी अमेरिकेपर्यंत पाठवले आणि ते वाचून फॉलो करायला सांगितले. तर हा बेसिक फरक आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकवलेले विज्ञान आपल्याला फक्त विज्ञानाच्या सृष्टीचे दर्शन आणि आकलन देते; पण खरे उन्नत जीवन जगण्यासाठी लागणारा वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र आपल्याला शाळेत शिकवला जात नाही. तो मला माझ्या वडिलांनी चळवळीच्या माध्यमातून शिकवला.

पण एक गोष्ट मात्र आहे की, अशा पद्धतीने जगताना मित्र-मैत्रिणी मात्र सहजगत्या बनवता येत नाहीत. असे लोक फार कमी असतात. अगदी कॉलेजच्या दिवसापासूनचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्यासारखा विचार करणारी माणसं शोधावी लागतात आणि पकडून ठेवावी लागतात. नाहीतर मग डोके आणि अक्कल बाजूला ठेवून कळपात शिरावे लागते.

वडिलांची चळवळीमध्ये सक्रियता वाढत असतानाच आमच्या नातेवाईकांमध्ये आमच्या कुटुंबाबद्दल वेगळी धारणा असायची. वडिलांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि विवेकी होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांशी औदार्याचे संबंध ठेवले. त्यामुळे त्यांचे विचार पटत नसले तरी सर्वजण त्यांच्याशी प्रेमाने व आदराने राहायचे. त्यांना डायरेक्ट कोणी विरोध केला नाही; पण आम्हाला कधी कधी टोमणे मिळायचे. मी पण बापाची लाडकी लेक म्हणून काही वेळेला मला जमेल तशा पद्धतीने वाद घातल्याचे अजूनही आठवतात. वडिलांनी सांगलीमध्ये नवीन घर बांधले. घराला नाव दिले ‘मानवता.’ त्यांना वास्तुशांती करायची नव्हती. पण तिथे सुरुवातीला आमचे नातेवाईकच राहायला येणार होते, त्यामुळे त्यांनी वास्तुशांती केलीच; अगदी आमच्या नाकावर टिच्चून.

माझ्या लग्नाच्या वेळेस मी जातीचे बंधन झुगारून दिले. जातीबाहेर लग्न केल्यामुळे माझे मामा, ज्यांची मी लाडकी भाची होते, माझ्या लग्नाला उपस्थित राहिेले नाहीत. त्यावेळची गंमत म्हणजे, काही शिकल्या सवरलेल्यांनी विरोध केला; पण त्याच वेळेस काही कमी शिक्षण असलेल्या लोकांनी मात्र समजूतदारपणा दाखवला. लोकांच्या विचारातील ही तफावत मला त्यावेळेस खूप जाणवली होती. माझे लग्न मात्र वैदिक पद्धतीने वाजतगाजत झाले. यामध्ये मला आणि माझ्या वडिलांना माझ्या नवर्‍याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या भावनांना बळी पडावे लागले.

लग्नानंतर देखील मी माझं वैयक्तिक आयुष्य विज्ञान, निर्भयता आणि नीती या त्रिसूत्रांवरच जगते आहे; परंतु तरीदेखील एक स्त्री म्हणून माझ्यावर कौटुंबिक जबाबदारीतून काही गोष्टी लादल्या गेल्याच; याचा मला खेदाने उल्लेख करावासा वाटतो. अगदी अंधश्रद्धेपायी नाही; परंतु परंपरेने आणि शब्दप्रामाण्याने लादलेल्या गोष्टी स्त्रियांना कराव्याच लागतात आणि याची मी देखील बळी ठरले. कारण कधीकधी टोकाची भूमिका घेऊन कुटुंब कुटुंब राहत नाही आणि घर घर राहत नाही. अशा काही वेळेस मला माझ्या निर्भयतेची तलवार म्यान करावी लागली आहे; पण आता चाळीशी पार केल्यावर मात्र माझी निर्भयता परिपक्व होऊन उसळी मारतेय की, काय असे वाटायला लागलेय.

एक मोठे समाधान आहे की, माझ्या दोन्ही मुली माझ्या दोन पाऊले पुढे आहेत. त्या मला फॉलो करतच मोठ्या झाल्यात तरीपण त्यांना या गोष्टींचे भान फार लवकर आलेय. आताच्या इंटरनेटच्या युगात त्यांच्या माहितीच्या आणि बुद्धिमत्तेच्या कक्षा रुंदावल्यात. त्यांना प्रश्न विचारायला आणि तर्कबुद्धीचा वापर करायला शिकवावे लागले नाही. तरीपण त्यांना अशा पद्धतीने बिघडवण्याचे श्रेय, नव्हे खापर, माझ्याच डोक्यावर फोडले जाते, हे मात्र नक्की.

Nature विरुद्ध Nurture च्या लढाईमध्ये मला नेहमी Nurture लाच जास्त महत्व द्यावेसे वाटलेय. कारण अगदी जातिवंत रोपटेसुद्धा पाणी आणि चांगली निगा याच्या कमतरतेने कोमेजून जाऊ शकते. माझ्या बाबतीत माझ्या आई -वडिलांनी मला जे वैचारिक खतपाणी दिले, त्याच्या जोरावर माझे जीवन छान बहरले आहे. मी चळवळीच्या माध्यमातून अशा बर्‍याच जणांना भेटले आहे. जे खूप वेगळ्या विचारधारा असणार्‍या कुटुंबातून येऊन सुद्धा स्वतः शिक्षणातून आणि विचार करून चळवळीमध्ये आले आहेत. त्यांना घरी किती प्रश्नांना तोंड द्यावे लागत असेल. अश्यामध्ये मुलगी असणे तर फारच अवघड. मला अशा सर्वांचे प्रचंड कौतुक वाटते आणि समाधानही, कारण त्यांच्या विचारप्रवर्तनामुळे त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य मात्र सर्व बाजूंनी बहरेल.

(रुपाली आर्डेकौरवार या अमेरिकेत आयटी प्रोफेशनल होत्या. तसेच त्या सद्या पुणे येथे फॅसिलेटर टीचर आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]