श्रीपाल ललवाणी -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे गाव ‘सातारा’ येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, हे जेव्हा जाहीर झाले तेव्हाच या संमेलनात बुक स्टॉल लावण्याचे मनाशी नकी केले. दिल्लीतील साहित्य संमेलनाचा अनुभव गाठीशी होताच. योग्य वेळेत पैसे भरून बुक स्टॉलचे ऑनलाईन बुकिंग केले. या कामात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सुनीताराजे पवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्टॉल क्रमांक सोडतीच्या वेळेस मी साधना प्रकाशनाच्या शेजारीच स्टॉल घेतला. याचा पुढे खूप फायदा झाला.
सातार्यात संमेलन असल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांच्या विक्रीवर भर द्यायचे आम्ही ठरवले. सांगलीहून अं.नि.स. प्रकाशनच्या राहुल थोरात यांनी आम्ही जायच्या अगोदरच डॉ. हमीद दाभोलकर यांच्या बरोबर अं. नि. स. प्रकाशनाच्या पुस्तकांचा साठा भरपूर पाठविला. पुण्याहून आम्ही डॉ. दाभोलकरांची राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली सर्व पुस्तके घेतली. डॉ. हमीद यांचे नाव सांगितल्यावर सर्व पुस्तके उधार मिळाली. साधना प्रकाशनाचे स्वतःचे ४ स्टॉल असल्याने त्यांची पुस्तके घेण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्याकडे असलेले वार्तापत्राचे काही पूर्वीचे अंक व इतर काही पुस्तके बरोबर घेऊन आम्ही निघालो.
१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मागील संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होते. १ जानेवारीला सकाळीच आम्ही सातार्याकडे प्रस्थान केले. अनिल वेल्हाळ, भारत विठ्ठलदास, बाळकृष्ण लोंढे, नागेश कवडे आणि मी अशी दिल्लीच्या संमेलनास गेलेली अनुभवी टीम होती. अनिल तिकोनकर, राजू जाधव बरोबर होते. ८२ वर्षांचे उत्साही तरुण अरुण जाधव या वेळी आमच्याबरोबर येऊ शकले नाहीत. नंतर एक दिवस ते ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन गेले. सातार्यात गेल्यावर लगेचच संमेलन स्थळी जाऊन आम्ही स्टॉल ताब्यात घेऊन पुस्तकांची मांडणी केली. सातार्याचे कार्यकर्ते उदय चव्हाण, डॉ. दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे, खटावकर यांची खूप मदत झाली. परिवर्तन संस्थेत कार्यकर्त्यांच्या निवासाची व भोजनाची चांगली सोय करण्यात आली होती.
बुक स्टॉलचे उद्घाटन डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते करण्याचे ठरले. त्या साठी उमेश चव्हाण यांना लाल फीत आणण्यास सांगितले. ते म्हणाले, “लाल कशाला? आपण काळी फीत खोलून उद्घाटन करू.” मला ते मनोमन पटले. दुपारी ४ वाजता काळी फीत खोलून डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते बुक स्टॉलचे उद्घाटन केले. शैलाताईंचे म्हणणे होते की, एखाद्या कार्यकर्त्याच्या हस्ते उद्घाटन केले पाहिजे. परंतु तेथील वातावरण शैलाताईंना एवढे आवडले की, त्या तब्येत बरी नसतानाही दोन दिवस तीन-चार तास थांबल्या. त्यांना अनेक जुने साथी आणि मैत्रिणी भेटल्याने त्यांना फार बरे वाटले.
स्टॉल मांडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी साधना प्रकाशनाच्या कर्मचार्यांनी बहुमोल मदत केली. स्टॉल लावल्यापासूनच पुस्तक विक्रीला सुरुवात झाली. भारत विठ्ठलदास यांनी न थकता सतत चमत्कार प्रात्यक्षिकाचे प्रयोग केले. त्या ठिकाणी सर्वांत जास्त गर्दी होती. राजू जाधव व बाळकृष्ण लोंढे त्यांना मदत करत होते. सातारा असल्याने स्टॉलवर येणारा प्रत्येक जण आपण डॉ. दाभोलकरांना भेटलो होते, त्यांच्याशी कसा संवाद झाला हे आवर्जून सांगत. डॉ. हमीद दाभोलकर ही रोज भेट देत. ‘काही अडचण असली तर मला ताबडतोब फोन करा’ हे त्यांचे आश्वासक शब्द आम्हाला निश्चिंत करत.
पुस्तक विक्रीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल थोरात यांनी पाठविलेले डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांचे ८० संच संपले. बालसाहित्याचे २० संच हातोहात खपले. तीन दिवसात ४०,०००/- रु. पेक्षा जास्त विक्री झाली. (दिल्लीला झालेल्या विक्रीच्या दुप्पट.) अनिल वेल्हाळ, नागेश कवडे हे प्रत्येक व्यतीला पुस्तकांचे विशेष सांगत. सचिन सोनावले लोकांना बोलावून पुस्तके घेण्याचे आवाहन करत. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे पुस्तक विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या बरोबरच अं.नि.स.च्या कार्याची माहितीही लोकांपर्यंत पोहचली. विचारांचा प्रचार आणि प्रसार या दृष्टीने संमेलन उपयुत ठरले.
बुक स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. हेरंब कुलकर्णी, विनोद शिरसाट, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, अच्युत गोडबोले, उज्ज्वल केसकर, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवरांनी केवळ भेटच नाही दिली तर पुस्तके खरेदीही केली, आमच्या कामाचे कौतुकही केले. सातार्यात संमेलन असताना संमेलनाच्या एखाद्या दालनाला डॉ. दाभोलकरांचे नाव द्यायला हवे होते, पण त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला नाही याची रुखरुख वाटते. पण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांची विक्री करून, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करून आम्ही एक प्रकारे त्यांच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त केली!
– श्रीपाल ललवाणी, पुणे
मो. ९८२३९ ७७४७२
