जीवनाची वाताहत करणार्‍या व्यसनांपासून तरुण पिढीने दूर राहावे

-

तरच तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गांधींच्या स्वप्नातला समाज प्रत्यक्षात येईल – समाजप्रबोधक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचा कीर्तनातून संदेश

भारत सुजलाम्, सुफलाम् व्हावा, यासाठी गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासारख्यांनी अथक प्रयत्न केले; पण आजचा तरुण दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट यांसारख्या व्यसनांच्या विळख्यात सापडत बरबाद होताना दिसत आहे. मी जेव्हा खेड्यापाड्यांतून फिरतो, तेव्हा व्यसनापायी कर्ता पुरुष मेल्यामुळे बरबाद झालेल्या कुटुंबातील लेकुरवाळ्या बाईची स्थिती पाहावत नाही; आणि तरीही सरकार दारूपासून उत्पन्न वाढते, म्हणून दारूची विक्री किराणा दुकानातूनही करण्याच्या घोषणा करते, तेव्हा म्हणावेसे वाटते, “चोर्‍या, दरोड्यापासूनही उत्पन्न आहे; मग ते करायलाही परवानगी द्या.” असे जळजळीत उद्गार संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे विदर्भातील सप्तखंजिरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी काढले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या जानेवारीच्या विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन करताना बोलत होते. प्रकाशनानंतर अतिशय प्रभावीपणे केलेल्या कीर्तनात त्यांनी व्यसनामुळे होणार्‍या वाताहतीचे वर्णन करत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या अभंगांचे निरुपण करीत आजच्या तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.

प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ, व्यसनविरोधी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रास्ताविकात, “अंधश्रद्धा या ज्याप्रमाणे माणसाच्या विवेकी विचारांतील अडथळा आहेत, त्याचप्रमाणे व्यसनही माणसाला विवेकी विचार करण्यापासून थांबविण्याचे साधन आहे, म्हणूनच बुवाबाजी आणि व्यसन एकमेकांच्या हातात हात घालून काम करताना दिसतात. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती व्यसनविरोधी लढा हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा महत्त्वाचा भाग मानते,” असे प्रतिपादन करून ते पुढे म्हणाले, “कोरोनाच्या साथीत आजवर पाच लाख लोक मेले आहेत. त्या धोक्याचे गांभीर्य ओळखून शासनाने अनेक उपाय योजले, बंधने घातली. ते योग्यही आहे पण दरवर्षी 15 लाख बळी घेणार्‍या व्यसनांच्या विरोधात कडक उपाय योजण्याच्या बाबतीत मात्र सरकार आणि समाज दोघेही गंभीर नाहीत, हे मॉलमध्ये वाईन विकायला परवानगी देत शासन सिद्ध करत आहे. म्हणूनच यावर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वर्षअखेरीला ‘नो वाईन, राहा फाईन’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर चालविली व त्या मोहिमेला प्रत्येक जिल्ह्यातून प्रचंड पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक उदय चव्हाण यांच्या व्यसनविरोधी गीतगायनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केले. आभार ‘अंनिवा’चे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी मानले. ‘अंनिवा’चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]