मागे वळून पाहताना…

कॉ. सुभाष थोरात -

कॉ. सुभाष थोरात यांना अभिवादन!
            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे लेखक, समीक्षक, कवी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते  कॉ. सुभाष थोरात यांचे २६ जून २०२५ रोजी पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या खोलवर जाणिवेतून अत्यंत प्रगल्भपणे त्यांनी सामाजिक विषयांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ‘जीवनमार्ग,’ ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र,’ ‘परिवर्तनाचा वाटसरु,’ ‘सीटू संदेश,’ ‘श्रमिक विचार,’ ‘पर्याय’ अशा पुरोगामी मासिकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर लिखाण केले. मुख्यत: त्यांनी  जाती व्यवस्था आणि जातीय अत्याचार त्यामागील धर्मकारण, राजकारण, अर्थकारण आणि जाती अंताचा लढा, धार्मिक उन्माद, अंधश्रद्धा या विषयांवर लिखाण केले. जाती संघर्ष व वर्ग संघर्ष एकत्रितपणे लढविला गेला, तरच जातिव्यवस्थेचा अंत होऊ शकतो, त्यासाठी दलित, श्रमिकांनी एकत्र येऊन या भांडवलशाहीला मूठमाती दिली पाहिजे अशी मांडणी त्यांनी आपल्या लेखातून केलेली आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या विशेषांकातून त्यांनी ‘धर्माधिष्ठित राष्ट्रवाद,’ ‘दहशतवाद आणि धर्म,’ ‘उतरंडीचे समर्थक,’ ‘खैरलांजीचा अन्वयार्थ,’ ‘भेदाभेदाचा आलेख,’ ‘माझ्या धर्मजाणिवांचा र्‍हास’ अशा लेखांबरोबरच अनेक पुस्तके, सिनेमा, नाटक यावर समीक्षणात्मक, परिचयात्मक लिखाण सर्वसामान्य कार्यकर्त्याला समजेल, मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून केले. सुभाष थोरात यांचा ‘वर्तमानाची बखर’ हा लेखसंग्रह आणि ‘मी, शहर आणि सद्यकालीन इतिहास’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. नुकताच त्यांनी घेतलेल्या मान्यवरांच्या मुलाखतीचे विचारवंतांच्या मुलाखती हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्या पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेले ‘मागे वळून पाहताना...’ हे मनोगत आम्ही येथे देत आहोत व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या मार्गदर्शक पाठीराख्यास अखेरचा लाल सलाम करत आहोत. - संपादक मंडळ

मी १९७२-७३च्या भीषण दुष्काळात मॅट्रिक पास झालो. त्या वेळी आजूबाजूला, गावाजवळ कुठे कॉलेज नव्हते. कॉलेजसाठी एक तर पुण्याला किंवा मुंबईला जावे लागे. वडील शिक्षक असले, तरी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. एक तर मोठे कुटुंब… सहा भावंडे होती… परत वडील सढळ हाताने खर्च करणारे… इतरांना मदत करणारे… त्यामुळे कायम कर्जबाजारी! प्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे मला नोकरी करण्याची निकड होतीच.

१९७४ सालापासून मी मुंबईला नातेवाइकांकडे जात-येत असे; छोटी-मोठी नोकरी शोधत असे. नववीला असताना मी कविता लिहीत होतो. त्या वेळेचे ग. ह. पाटलांसारखे कवी ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ यांसारख्या कविता लिहीत. माझ्याही सुरुवातीच्या कविता याच चालीवर असत. मी मुंबईला नायगावच्या बीडीडी चाळीत मावशीकडे राहत असे. येथून दादर नायगावचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय पाच मिनिटांच्या अंतरावर होते. पुस्तके वाचण्याची आवड असल्यामुळे मी रोज तेथे जात असे. माझी राजकीय आणि साहित्याबद्दलची जडणघडण तेथे झाली, असे म्हणता येईल. याच ठिकाणी मला अंकुश सावंत, शंकर खरात नावाचे जिवलग मित्र भेटले. माझ्या वैचारिक जडणघडणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. अंकुश मार्क्सवादी, तर शंकर आंबेडकरवादी! त्यामुळे दोन्ही विचार मला समजून घेता आले.

एक दिवस मी ग्रंथालयात पुस्तक वाचत कविता लिहीत बसलो होतो. त्या दिवशी ग्रंथसंग्रहालय हाऊसफुल्ल होते. माझ्या शेजारी एक जागा शिल्लक होती. तेथे राजा ढाले येऊन बसले. मी त्यांना ओळखत होतो. मी वहीत कविता लिहीत होतो. ते म्हणाले, “कविता लिहितोस?” मी म्हटले, “होय.” “संध्याकाळी माझ्या ऑफिसला ये” राजा ढाले म्हणाले. गोकुळदास पास्ता रोडला बुद्धभूषण प्रिंटिंगमध्ये त्यांचे ऑफिस होते. मला ते माहीत होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयापासून त्यांचे ऑफिस पाच मिनिटांच्या अंतरावर होते. मी संध्याकाळी गेलो. त्यांनी वही चाळली. मला म्हणाले, “दलित आहेस का?” मी म्हटलं, “हो.” म्हणाले, “ह्या काय कविता आहेत? या बामणांच्या कविता आहेत! तू नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, ज. वि. पवार यांच्या कविता वाच.” तेथे बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव आदरणीय भैय्यासाहेब आंबेडकर बसले होते. ते आमचे संभाषण ऐकत होते. ते मला म्हणाले, “तू कोणते शाहीर वाचले आहेस?” मला होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव यांच्या पलीकडे शाहीर माहिती नव्हते. “हे आपले शाहीर नाहीत. आपले शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक. त्यांचे पोवाडे, गाणी ऐक.” 

या दिवसापासून माझी दृष्टी पूर्णपणे बदलली आणि नामदेव ढसाळच्या प्रभावाखाली माझी कविता सुरू झाली. परंतु नामदेवची एवढी ओळख असून मी नामदेवला माझ्या कविता कधी दाखवल्या नाहीत. ‘तो काय म्हणेल’ याची मला भीती वाटायची. पण ढाले चालवत असलेल्या लिटल मॅगझीनमध्ये त्यांनी माझ्या कविता आणि माझे लेख छापायला सुरुवात केली. मला खूप प्रोत्साहन मिळाले. एकंदर साहित्याच्या संदर्भात त्यांनी पुष्कळ उपदेशवजा माहिती दिली. राजा ढाले यांचे प्रोत्साहन आणि नामदेवच्या कवितेचे अनुकरण असे स्वरूप माझ्या कवितेला आले… मध्येमध्ये मी दलित, सांस्कृतिक विषयांवर दैनिकांमध्ये लेख लिहू लागलो. 

दैनिक सकाळमध्ये पेडणेकर नावाचे पत्रकार होते. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. ‘दलित पँथर : एक विझत चाललेला वणवा’ असा लेख मी दैनिक सकाळमध्ये लिहिला होता. तो रामदास आठवलेने वाचला. एकदा आमदार निवासासमोर आमची भेट झाली. माझ्यासोबत राजीव देशपांडे होता. रामदास मला म्हणाला, “आम्ही उत्तर देऊ शकतो, पण तू आपला माणूस आहेस… मात्र आम्ही ग्रामीण भागात अवघ्या काही दिवसांत दलित पँथरच्या एवढ्या शाखा वाढवलेल्या आहेत, त्याच्याबद्दलपण तू लिही.”

खरेतर या तीन नेत्यांशी माझे फार चांगले संबंध होते. व्यक्तिगत अर्थाने मी कधी त्याचा फायदा घेतला नाही, पण राजकीय, साहित्यिक या अंगाने मला यांचा खूप उपयोग झाला. काही काळ मी राजा ढाले यांच्या मास मूव्हमेंटमध्ये काम केले. राजा ढाले यांनी मला घडवण्याचा खूप प्रयत्न केला. तो पुढील राजकीय जीवनात उपयोगी पडला.

पुढे ‘सिद्धार्थ विहार’मध्ये राहणारे आणि नायगावच्या बीडीडी चाळीत राहणार्‍या मधु मोहिते यांच्याशी माझी ओळख झाली. ते ‘युवक क्रांती दला’त काम करत. त्यांनी मला युवक क्रांती दलाची भूमिका समजावून सांगितली. ‘सामाजिक’ आणि ‘आर्थिक’ अशा दोन्ही विषमतांविरोधात लढले पाहिजे’ अशी त्यांची भूमिका होती. ती मला आवडली. त्यांनी मला हुसेन दलवाई यांची भेट घालून दिली. मला हुसेन खूप आवडला… एकंदर विनोदी, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा… आणि मला सर्वाधिक मदत त्यानेच केली! शमा दलवाई शिकवत असलेल्या मिठीबाई कॉलेजमध्ये त्याने मला प्रवेश मिळवून दिला, जेणेकरून मी शिक्षण घ्यावे. अर्थात, मी त्याचा फार उपयोग करून घेतला नाही. कारण त्या काळात माझी परिस्थिती खरंच वाईट होती… कपड्यांचे आणि जेवणाचे वांधे होते… मावशीला किती त्रास द्यायचा… तिचीपण परिस्थिती फार चांगली नव्हती.

पण मी मार्क्सवादाचे वाचन चालू ठेवले होते आणि हळूहळू तिकडे झुकत होतो… फुले, आंबेडकर वाचून झाले होते… मी मध्येमध्ये त्यांनाही वाचत होतो. भारतीय संदर्भात समग्र दृष्टिकोन येण्यासाठी हे गरजेचे आहे. सवर्ण समाजातून आलेले कम्युनिस्ट फुले, आंबेडकर वाचत नाहीत आणि आंबेडकरवादी मार्क्स वाचत नाहीत. त्यामुळे समग्र दृष्टिकोनापासून ते वंचित राहतात.

अशा वेळी माझी गाठ पडली, सुशील महाडेश्वर यांच्याबरोबर. सुशील महाडेश्वर युवक क्रांती दलात काम करायचा; पण एकदा हुसेन दलवाई यांनी त्याला रजनी देसाई यांच्याबरोबर कोकणामध्ये सर्वे करण्यासाठी पाठवले. तो तिकडून आला, तो मार्क्सवादी बनूनच! रजनी देसाई डाव्या विचारांच्या होत्या आणि ईपीडब्ल्यूमध्ये काम करत होत्या. एकदा सुशील मला ट्रेनमध्ये भेटला. पूर्वी तो चांगलाच गांधीवादी होता. मी नेहमी टीका करायचो; पण त्या दिवशी वेगळेच घडले… म्हणाला, “गांधीबद्दल काही बोलू नको; आपण मार्क्सबद्दल बोलू.” तो त्या वेळी लोकशाही हक्क संघटनेत काम करायचा. त्यातील काही लोकांची त्याने मला ओळख करून दिली. त्यांतील एक होता, माधव कुलकर्णी. तो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. करत होता. त्या वेळी मी समाजवाद्यांबरोबर होतो. गोरेगावला राहणार्‍या आणि मृणाल गोरेंबरोबर काम करणार्‍या मोहनसेठ तिरोडकरांकडे हुसेनने मला नोकरीसाठी पाठवले. त्यांचे दोन छोटे कारखाने होते. तिरोडकरांनी माझ्याशी चर्चा केली. मला म्हणाले, “तू राजकीय पातळीवर इतका हुशार आहेस, तू कामगार म्हणून कशाला काम करतोस? राजकीय चळवळीतच काम कर! मी तुला सगळी मदत करतो”… आणि खरोखरच त्यांनी अखेरपर्यंत खूप मदत केली. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काम करू लागलो, तरी त्यांनी माझ्याशी मैत्री तोडली नाही. त्यांच्याइतका सज्जन आणि माणूसप्रिय माणूस मी अजून पाहिला नाही!

तर मी सांगत होतो, माझे समाजवादी लोकांशी सबंध कायम होते. जनता पक्ष फुटल्यानंतर मधू लिमये यांनी चरण सिंग यांच्या पक्षात प्रवेश केला. त्याचे एक ऑफिस फोर्टमध्ये अ‍ॅडव्होकेट रणजीत भानू यांच्या ऑफिसमध्ये होते. रेखा ठाकूर यांचे वडील आप्पा नाईक त्याचे प्रमुख होते. ते संध्याकाळी येत. मला म्हणाले, “सुभाष, तुला काही काम नाही, तर ऑफिसमध्ये बसतोस का?” मी ‘हो’ म्हटले. एक तर आप्पा नाईक मला खूप आवडायचे. ते मला थोडेफार पैसे देणार होते. मी दहानंतर ऑफिसमध्ये जायचो; आप्पा नाईक येईपर्यंत थांबायचो. या वेळी माधव कुलकर्णी मला भेटायला यायचा… मार्क्सवादाचे अनेक बारकावे मला समजावू सांगायचा. त्याचा चांगलाच अभ्यास होता. त्यामुळे मला मार्क्सवाद समजून घेण्यास खूप उपयोग झाला. आज तो हयात नाही, असे ऐकतो.

१९८१ साली मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातच आहे. मास मूव्हमेंट, युवक क्रांती दल अशा संघटनांमध्ये काही काळ काम करत मार्क्सवादाच्या प्रभावानंतर मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. अर्थात, वरील संघटनांचे माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान राहिले आहे. ते मी नाकारत नाही. पुढे पुढे मार्क्सवादाचे वाचन वाढल्यानंतर हळूहळू राजकीय लेख लिहिण्यास सुरुवात केली. ‘जीवनमार्ग’ हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र. या मुखपत्रातून लिहिण्यास सुरुवात केली. जातिव्यवस्थेच्या संदर्भात साहित्याबद्दल, सांस्कृतिक प्रश्नांबद्दल मी लेख लिहू लागलो… आजही लिहितो. या वेळी मला तीन लोकांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले… कॉम्रेड पी. बी. रांगणेकर, कृष्णा खोपकर आणि प्रभाकर संझगिरी.

माझे शुद्धलेखन अतिशय वाईट! रांगणेकर शुद्धलेखनाच्या बाबतीत काटेकोर. माझ्या लिहिलेल्या लेखावर अनंत लाल रेषा असत. ते अगदी न कंटाळता माझे लेखन तपासून, मला समोर बसूवन त्याबद्दल सांगत असत… “इतके चांगले लिहितोस, पण शुद्धलेखनामुळे लोकांना वाचताना जरा अवघड जाते… माझ्याकडे रोज येऊन बस… तुला शुद्धलेखन शिकवतो.” पण अर्थात मी ते कधी ऐकले नाही आणि शुद्धलेखनाबद्दल माझी काही मते होती. ती मी काही त्यांना बोललो नाही. ‘शुद्ध असे  काही नसते’ असे माझे मत होते; आजही आहे. त्यांनी मला शिकवण्याच्या दाखवलेल्या तयारीने मी खूपच प्रभावित झालो.

कृष्णा खोपकर माझ्या प्रत्येक लेखावर चर्चा करीत आणि “या ठिकाणी हा मुद्दा यायला हवा होता” असे समजावून सांगत. प्रभाकर संझगिरी यांची गोष्ट वेगळीच होती! ते तात्त्विक दृष्टीने पाहत आणि माझ्या लेखातील तात्त्विक भूमिकेबद्दल चर्चा करत. माझा मार्क्सवादी तात्त्विक दृष्टीकोन समृद्ध होण्यासाठी त्यांच्या या चर्चेचा खूप उपयोग झाला. ते मला सतत प्रोत्साहन देत. अशा पद्धतीने मी सातत्याने ‘जीवनमार्ग’मध्ये लिहीत राहिलो. जीवनमार्गच्या बरोबरीनेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, पर्याय, परिवर्तनाचा वाटसरू अशा पुरोगामी चळवळींतील मासिकांमध्ये, तसेच  वर्तमानपत्रांत एखादा-दुसरा लेख लिहीत राहिलो.

त्या काळात विक्रोळीवरून प्रसिद्ध होणार्‍या ‘आम्रपाली’ नावाच्या साप्ताहिकामध्ये एकदा मी कॉ. शरद पाटलांनी मार्क्सवाद, फुले, आंबेडकर (माफुआ) यांच्या अनुषंगाने मांडलेल्या नव्या तत्त्वज्ञानावर टीकात्मक लेख लिहिला होता. ‘ब्रिटिशपूर्व काळात भारतामध्ये वर्ग नव्हते; जाती होत्या’ ही त्यांची मांडणी खोडून काढण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखामध्ये केला होता; पण या लेखाला कॉ. शरद पाटलांनी ‘आम्रपाली’तूनच उत्तर दिले. मला खूप आश्चर्य वाटले. माझ्यासारख्या एका नवख्या लेखकाला त्यांनी उत्तर द्यावे, दखल घ्यावी याचे आश्चर्य वाटले; आणि शरद पाटलांबद्दल मला अभिमानही वाटला. यामुळे ‘आपण बर्‍यापैकी लिहू शकतो’ असा आत्मविश्वास आला. या आत्मविश्वासातूनच पुढे मटाचे संपादक गोविंद तळवलकर, तसेच कुमार केतकर, माधव गडकरी यांनी कम्युनिस्टांबद्दल लिहिलेल्या टीकात्मक अग्रलेखांवर मी ‘जीवनमार्ग’मधून सडकून टीका करत असे.

यादरम्यान जीवनमार्गच्या विशेष अंकासाठी एखादा विषय ठरवून त्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जात असत. त्यासाठी संबंधित विषयाच्या संदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींची नावे ठरवली जात. त्यांतील काही मुलाखतींची जबाबदारी मी घेत असे. त्यांपैकी काही मुलाखती मी राजीव देशपांडे, दीपक बोरगावे, सुबोध मोरे यांच्याबरोबर जाऊन घेतलेल्या आहेत. या सर्व मुलाखती पुरोगामी विचारवंतांच्या आहेत. हे विचारवंत आपल्या कर्तृत्वाने सर्व जनतेला माहीत आहेत. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या भारतात घडलेले हे विचारवंत राजकीय नेते आहेत. यांतील कोणीही काँग्रेसचे नाहीत. ‘स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा… त्यासाठी काय करायला हवे’ हे या विचारवंतांनी आपल्या विचारांतून आणि कृतींतून दाखवून दिले आहे. पुरोगामी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, जाति-वर्ग-विहीन समाज-निर्मितीचे या प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी आपली लेखणी चालवली आहे आणि कृतिकार्यक्रम घेतले आहेत… कामगार संघटना चालवल्या आहेत. या सगळ्यांनी कामगार संघटनांमधून पुरोगामी विचार पसरवण्याचे काम केले आहे. ‘मागे वळून पाहताना’ या मुलाखती म्हणजे या विचारवंतांना दिलेली मानवंदनाच आहे, असे वाटते. बाबा आढाव, यशवंत मनोहर आणि मेहबूब सय्यद सोडले, तर आज त्यांपैकी कोणीही हयात नाहीत. काळाच्या प्रतलावर आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून ते निघून गेले आहेत. येणार्‍या पिढीने आणि समाजाने त्यांनी प्रकाशमान केलेल्या वाटेने जावे, म्हणून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूनेच आम्ही या मुलाखती एकत्र करून पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचे ठरवले. तोच आमचा हेतू आहे. कारण आम्ही या वाटेचेच प्रवासी आहोत. आम्ही आमचे आयुष्य याच वाटेने चालत आलेलो आहोत. त्याचा आम्हाला जसा अभिमान आहे, तसाच आमच्या आदर्श विचारवंतांचा, प्रतिभावंतांचा आम्हाला अभिमान आहे. तेच आमचे सगेसोयरे आहेत. आजच्या प्रतिगामी फॅसिस्ट काळात विचारांची लढाई विचारांनी करायची असेल, तर ते आपले मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपल्याला दिलेले विचारधन आणखी प्रखर करून आपल्याला लढत राहिले पाहिजे.

मराठीतील पुरोगामी विचारविश्वातील, आजच्या काळातील नवीन पिढी पुढे येणे गरजेचे आहे. कारण आज सर्वच पातळ्यांवर प्रतिगामी शक्तींकडून इतिहासाची, विचारांची मोडतोड सुरू आहे. अशा काळात नव्या, तरुण पिढीचे हे पुरोगामी विचारविश्व पुढे जाण्याची गरज आहे. याच उद्देशाने आम्ही सदर मुलाखतींचे पुस्तक करण्याचे ठरविले.

प्राध्यापक डॉक्टर गोपाळ गुरू हे माझे मित्रही आहेत आणि गुरूही आहेत. एक मार्क्सवादी विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत. विविध स्वरूपाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी वेळोवेळी केलेल्या वैचारिक मांडणीचा, त्यांच्या चिंतनशीलतेचा माझ्या वैचारिक जडणघडणीत मोठा वाटा आहे. देशातील सुप्रसिद्ध विचारवंत असूनही ते इतके साधे, निगर्वी आहेत, त्याबद्दल मला त्यांचा अभिमानच वाटतो. सदर मुलाखतींचे पुस्तक करायचे ठरवल्यानंतर प्रस्तावनेसाठी माझ्या डोळ्यासमोर पहिले नाव आले, ते गोपाळ गुरू यांचे! ‘ते कायम लिखाणात व्यग्र असल्यामुळे वेळ काढतील का, प्रस्तावना देतील का’ असे प्रश्न मनात होते, पण त्यांना त्या विषयी सुचवल्यानंतर त्यांनी चटकन, आढेवेढे न घेता ‘लिहून देतो’ असे सांगितले. सर्व मुलाखती वाचून त्यांनी छान वैचारिक मांडणी केली आहे. एकंदरच ही मांडणी या पुस्तकाचे महत्त्व आणि उंची वाढवणारी आहे.

– कॉ. सुभाष थोरात


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]