अनिल चव्हाण - 9764147483

संत वीर कक्कया यांची १७ मार्च रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हा लेख..
आ चल के तुझे, मैं लेके चलू
एक ऐसी गगन के तले, जहाँ गम भी ना हो
आँसू भी ना हो, जहाँ प्यार ही प्यार पले!
शाहीर लुधियानवी यांच्या या गीतातील नायक नायिकेला एक स्वप्न दाखवतो, जिथे द्वेष, राग, लोभ, मत्सर, दुष्टपणा, लुबाडणूक, फसवाफसवी आणि त्यामुळे येणारे दुःख असणार नाही! शोक असणार नाही! असेल फक्त माया, प्रेम, बंधुभाव आणि सर्वत्र आनंद!
असेच स्वप्न बाराव्या शतकात इथल्या राबणार्या जनतेने पाहिले. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग शोधला. त्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्या शिलेदारातील एक शिलेदार म्हणजे वीर ककया.
ककयांचा जन्म माळव्याचा, मध्य प्रदेशातला. ढोर समाजातला! बाराव्या शतकातला! उद्योग – जनावराचं कातडं कमावण्याचा आणि त्यापासून वस्तू बनवण्याचा. दूधदुभतं आणि शेतीच्या कामासाठी शेतकरी जनावर पाळतो. जनावर मेल्यावरही ते माणसाच्या उपयोगी पडतं. त्याची शिंगे आणि कातडं यापासून विविध वस्तू बनवल्या जातात. चप्पल, विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी मोट, चाबूक, सापत्या, घरी पाणी भरण्यासाठी पखाल, चर्मवाद्य अशा अनेक वस्तू रोजच्या वापरातील असतात. पण त्यासाठी आधी कातडे कमवावे लागते. धुवून स्वच्छ करून त्याला चुन्याच्या पाण्यात भिजवावे लागते. केस गळून पडले की, बेहडा, हिरडा यांच्या रसात भिजवावे लागते.
आधुनिक यंत्रे आणि स्टील, प्लास्टिकचा शोध लागेपर्यंत म्हणजे पन्नास-शंभर वर्षांपूर्वीपर्यंत, या वस्तूंना मानवी जीवनात अत्यंत महत्त्व होते. पिढ्यान्पिढ्या हे काम ढोर समाजाकडे होते. काम अत्यंत कष्टाचे आणि गरजेचे! पण सनातनी वैदिक धर्माप्रमाणे, कष्ट जेवढे जास्त आणि काम मानवी जीवनासाठी आवश्यक, तेवढे ते काम नीच समजले जाते. असे काम करणारे सर्वांत तुच्छ समजले जातात. त्यांना कुणी शिवून घेत नाही. त्यांची सावली सुद्धा चालत नाही. आणि जो अजिबात कष्ट करत नाही इतरांच्या श्रमावर जगतो, इतरांना लुबाडून जगतो तो सर्वांत श्रेष्ठ समजला जातो.
बौद्धांच्या र्हासानंतर या विकृत सनातनी धर्माने समाजाचा ताबा घेतला. ताबा टिकवण्यासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला. आजही वर्णाश्रम धर्माचे समर्थन करणारे लोक दिसून येतात. मग बाराव्या शतकातल्या हालअपेष्टांची परिस्थिती काय असेल? पण या विरोधातही माणसे बंड करून उठतात. मार्ग शोधतात. पुन्हा पुन्हा समतेचे-बंधुभावाचे स्वप्न पाहतात. ककयांनीही तेच केले.
वैदिकांनी अतिशूद्रांना देवळात जाण्याचा अधिकार ठेवला नव्हता. देवळात जाण्याची तीव्र इच्छा असून सुद्धा लहानपणी ककयांना कधीच देवदर्शन झाले नाही. सतत राबणूक, अवहेलना आणि तुच्छता एवढेच त्यांच्या वाट्याला आले होते. सर्वत्र अतिशूद्रांच्या वाट्याला हेच होते. चारचौघांसारखे जीवन व्यतीत करत असतानाच कल्याण मधील अनुभव मंडपाची कीर्ती त्यांच्या कानावर आली.
आजच्याप्रमाणे विचार प्रसाराची आधुनिक साधने त्या काळी उपलब्ध नव्हती, पण तरीही अनुभव मंडपाचा सुगंध भारतभर पसरत होता, तो या गावाहून त्या गावाला जाणार्या व्यापार्यांकडून, शैव पांथस्थाकडून आणि अशा अनेक अनामिक प्रवाशाकडून, हालअपेष्टा सोसून गावे फिरून, प्रसार करणार्या जंगमाकडून, शिवशरणाकडून कस्तूरीमृगाच्या बेंबीतल्या कस्तूरीचा वास सगळ्या वनात पसरतो आणि वेड्या होऊन हरिणी त्या दिशेने धावत सुटतात. तसाच काहीसा प्रकार कल्याण क्रांतीबाबत झाला होता. समतेचा सुगंध सर्वत्र पसरत असे. देशाच्या कानाकोपर्यातून शैव साधकांच्या झुंडी कल्याणला येत आणि शिवशरण बनत. काही तो सुगंध वाटायला पुन्हा उलट दिशेने जात.
ककयाही त्यात सामील झाले. घनदाट काळोखात मिणमिणत्या पणतीची अपेक्षा करावी आणि प्रत्यक्ष सूर्य हातात यावा असेच त्यांचे झाले. समाधान आणि आनंदाने त्यांनी अनुभव मंडपात प्रवेश केला. इथला प्रत्येक सदस्य उदरनिर्वाहासाठी काही ना काही कामधंदा करत असे. त्याला ‘कायक’ म्हणतात. चामड्याच्या वस्तू बनवणे हे ककयांचे कायक होते.
कायक म्हणजे पोट भरण्यासाठी आनंदाने, समाधानाने, मनापासून केलेले श्रम. त्यातून मिळणारा आनंद हा श्रेष्ठ असतो. अनुभव मंडपामध्ये अजून एक ककया होते. त्यांना ‘कंकरी ककया’ म्हणतात. ते कंकरी नावाचे वाद्य वाजवून लोकांचे मनोरंजन करत. त्यांच्या कथेमध्ये त्यांना शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी कैलासाला येण्याचे आवाहन केले. पण कंकरी ककयांनी त्यांना ‘कायकवे कैलास’ हे वचन पटवून दिले. कैलासातल्या सुखापेक्षा कायक श्रेष्ठ. श्रमाला तिथे एवढी प्रचंड प्रतिष्ठा होती. कायक करून जे मिळेल त्यापैकी आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणारे ठेवून घ्यायचे आणि उरलेले समाजातील दीन-दुबळ्यांसाठी किंवा समाज विकासासाठी खर्च करायचे; याला म्हणतात दासोह! दासोह म्हणजे देणे!
कायक आणि दासोह या दोन महत्त्वाच्या कल्पना लिंगायतांमध्ये आहेत. माणसांना जीवनामध्ये निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते. महापूर, दुष्काळ, उपासमार, रोगराई, असाध्य रोग, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्याकडून अवहेलना अशा संकटांवर शास्त्रशुद्ध उपाय सापडतोच असे नाही. अशावेळी हतबुद्ध झालेल्या माणसाला देवाला शरण जाणे हा एक मार्ग असतो. तोच आपल्याला तारेल अशी आशा वाटत असते.
वैदिकांनी मनुस्मृतीसारखे ग्रंथ लिहून सर्वसामान्यांच्या हालअपेष्टात, त्यांच्यावरील अन्यायात, दडपशाहीत मानवनिर्मित भर घातली. त्याचबरोबर त्यांना देवाला भेटण्याचा काल्पनिक मार्ग बंद करून टाकला. स्त्री, शूद्र आणि अति शूद्र यांना अपवित्र ठरवले. त्यांना यज्ञ आणि मंत्र-तंत्राचा अधिकार नाही. ज्ञानाचा अधिकार नाही. अतिशूद्रांना देवळाचे दरवाजे बंद केले.
मार्क्स म्हणतो, “धर्म म्हणजे हृदयहीन जगाचे हृदय आहे.” स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना हे काल्पनिक हृदयाचे दरवाजे वैदिकांनी बंद केले. त्यांनी गार्हाणे सांगायचे कुणाला? बसवण्णांनी त्यातून मार्ग काढला. देवाला भेटायला देवळात जाण्याची गरज नाही. तळहातावर इष्टलिंग घ्या आणि स्मरण करा. हा मार्ग जात, धर्म आणि लिंग निरपेक्ष सर्वांना उपलब्ध आहे. त्या काळचा समाज जात आणि वर्णांमध्ये विभागलेला होता. आजही विभागला आहे. तो कोणी विभागला याबद्दल मतभेद आहेत; पण त्याचे समर्थन कोणी केले, कोण करते आहे, हे स्पष्ट दिसते.
स्त्री, शूद्र, अतिशूद्रांवरील अन्यायी कायद्यांचे सुसूत्रीकरण मनुस्मृतीमध्ये आहे. त्याचे समर्थन पूर्वी आणि आजही वैदिक करतात. त्यांना ‘ब्राह्मण्यवादी’ असेही म्हटले जाते. या विषमतावादी विचारांच्या विरोधात कल्याण मध्ये समतावादी एकवटले. त्यांनी क्रांती केली, ती कल्याण क्रांती म्हणून प्रसिद्ध आहे. राबणार्यांना वैदिक जिथे अस्पृश्य म्हणून दूर लोटत होते तिथे बसवण्णांनी त्यांना पोटाशी धरले. आपल्याबरोबरचेच नव्हे, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले.
ककयांचे ‘कल्याण’मध्ये अत्यंत प्रेमाने स्वागत झाले. अनुभव मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच त्यांना शरणांनी ‘शरणार्थी’ म्हणून नमस्कार केला. ज्येष्ठ वडीलधार्या शरणांनी यावे असे म्हणून त्यांच्या स्वागतासाठी शरण सामोरे झाले. महात्मा बसवण्णांच्या प्रेमळ वाणीने ककयांच्या मनात नवचैतन्य संचारले. भेदांच्या भिंती गळून पडल्या. कनिष्ठत्वाचा भाव नष्ट होऊन समत्वाचे बीज हृदयात स्थिरावले.
महात्मा बसवेश्वरांनी ककयांना इष्टलिंग दीक्षा देऊन अनुभव मंडपाचे सदस्यत्व बहाल केले. शरण संस्कृतीनुसार, इष्टलिंग दीक्षेने ककयांची जात नष्ट झाली आणि ते लिंगायत झाले. इष्टलिंग दीक्षेमुळे त्यांच्यावर अन्याय करणारी शूद्रत्वाची भावना नष्ट झाली. गुलामगिरीच्या शृंखला तुटल्या, अस्पृश्यतेचा गळफास निसटला, अभद्र आणि अमंगल वैदिकांची सावली दूर झाली.
ककया आपला कातडी कमावण्याचा कायक अत्यंत निष्ठेने करीत होते. त्याचबरोबर त्यांनी काही काळ राजा बिज्जलाच्या सैन्यात आपली कायक मुद्रा उमटवली. भक्ती क्षेत्राप्रमाणेच ते तलवार गाजवण्यातही श्रेष्ठ ठरले. अनुभव मंडपात देशाच्या विविध भागांतून आलेल्या आणि विविध जातींतून आलेल्या शरणांना संघटित करण्याचे कौशल्य बसवण्णांनी दाखवले.
बिज्जल राजाच्या पदरी बसवेश्वर राज्यभांडारी-खजानीस अशा महत्त्वाच्या पदावर होते. जन्माने ते ब्राह्मण होते. म्हणजे समाजातील सर्वश्रेष्ठ अत्युच्च पदे त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. पण आपल्या सहकार्याबद्दल आदर दाखवताना ते म्हणतात, “उत्तम कुळात जन्मलो ह्या मोठेपणाचे ओझे लादू नको देवा, ककया शेषप्रसाद देणार नाहीत देवा.”
ज्यांचा स्पर्श सुद्धा वैदिकांना चालत नव्हता, त्यांच्या हातचा प्रसाद मिळावा म्हणून बसवण्णा तळमळत होते. ते शरणांना आप्तस्वकीय समजत. ते म्हणतात, “पिता माझे मादर चेन्नय्या, तात माझे डोहार ककया.”
वयाच्या आठव्या वर्षी बसवण्णांनी विषमतेचे प्रतीक असलेलं जानवं गळ्यात घालायला नकार दिला. मुंज करून घ्यायला नकार दिला. ब्राह्मणवादी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. त्यासाठी त्यांनी अनेक खोटी पुराणे रचली. पण बसवण्णा नम्रपणे म्हणतात, “माझ्यापेक्षा लहान कोणी नाही.”
ककय्यांनी त्यांना गुरु मानले. त्यांनीही वचने लिहिली. प्रतिक्रांतीमध्ये ब्राह्मणवाद्यांनी हजारो लाखो वचने जाळून नष्ट केली. त्यामुळे ककयांची फक्त सहा वचने उपलब्ध आहेत. एका वचनात ते म्हणतात,
“मला गुरुस्थल दाविले संगन बसवण्णानी
मला लिंगस्थल दाविले चन्न बसवण्णानी
मला जंगमस्थल दाविले सिद्ध रामेश्वरांनी”
….असे बच्चय्या, चंदय्या, बाचरस, अजगण्णा इत्यादींचे आभार मानल्यानंतर ते म्हणतात, “७७० अमर गणांच्या श्रीपादास नमन करूनी जगतो पहा, अभिनव मल्लिकार्जुना.”
अनुभव मंटपामध्ये ७७० विद्वान एकत्रित बसून समाजाच्या कल्याणाचे, मानवी कल्याणाचे विचार मांडत होते. त्यावर वैचारिक घुसळण झाल्यानंतर तावून-सुलाखून वचन बाहेर पडत असे; ते नोंदवून ठेवण्याची सोय करण्यात आली होती. आपल्या वचनातून, ककयांनी त्यांना आलेला अत्युच्च अनुभव, अनिष्ट नष्ट झाले, शांती, आनंद लाभला, आपण निराकार झालो, निर्भाव झालो अशी वर्णने केली आहेत.
अनुभव मंटपात असा स्वर्गीय अनुभव शरण घेत असताना एका बाजूला राजकीय उलथापालथी सुरू होत्या; तर दुसर्या बाजूला सनातनी वैदिक आपल्या जन्मजात हितसंबंधांना निर्माण झालेला धोका ओळखून राजाचे कान भरत होते. बिज्जल राजा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. अनुभवमंटपात सर्व जाती नष्ट झाल्या, सर्व जण समान झाले, लिंगायत झाले, याचा अनुभव रोजच्या वर्तनातून येत होता.
सनातनी वैदिकांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हते. वरिष्ठ समजल्या जाणार्या वर्णातील पुरुषाने कनिष्ठ समजल्या जाणार्या वर्णातील स्त्रीशी विवाह केल्यास त्याला ‘अनुलोम विवाह’ म्हणतात. अनुलोम विवाहाला काही प्रमाणात मान्यता आहे. त्याच्या उलट कनिष्ठ समजल्या जाणार्या वर्णातील पुरुषाने वरिष्ठ समजल्या जाणार्या वर्णातील स्त्रीशी विवाह केल्यास त्याला ‘प्रतिलोम विवाह’ म्हणतात. इतर वर्णातील स्त्रिया आपल्याला मिळाव्यात, पण आपल्या वर्णातील स्त्री इतर वर्णाला मिळू नयेत अशी भूमिका सनातनी वैदिकांची आहे. म्हणून ते प्रतिलोम विवाहाला टोकाचा विरोध करतात.
अनुभवमंटपात एकत्र येऊन समतेचा अनुभव घेणार्या ‘मधुवैया’ या पूर्वाश्रमीच्या ब्राह्मणाच्या ‘रत्ना’ नावाच्या मुलीचा विवाह ‘हरळय्या’ नामक पूर्वाश्रमीच्या चर्मकार समाजातील ‘शीलवंत’ या मुलाशी जुळवून आणण्यात बसवेश्वरांनी पुढाकार घेतला. दोघेही एकमेकांना आवडत होते. हा विवाह समारंभ आपल्या महामने समोरील भव्य मंडपात मोठ्या थाटामाटाने साजरा करण्याचे ठरवले, तेव्हा सनातनी वृत्तीचे लोक खूपच खवळले. हे कृत्य जाणून-बुजून केले जात असून, त्यामुळे सनातन धर्माची अप्रतिष्ठा केली जात असल्याची हाकाटी करण्यात आली.
प्रत्यक्षात दोघांनी वैदिक धर्म सोडल्यामुळे आणि जात विसर्जित केल्यामुळे अशा तर्हेच्या विवाहाला सनातनी वैदिकांनी विरोध करण्याचे कारण नव्हते. आजही स्वयंभू सनातनी धर्मांतर करण्याला टोकाचा विरोध करतात. धर्मांतर केले तरी आपली मते दुसर्यावर लादतात. सक्तीने जातिभेद विषमता पाळायला लावतात.
ब्राह्मणवाद्यांनी बसवेश्वरांबद्दल विषारी प्रचार केला.
‘ते वर्णव्यवस्था मानत नाहीत.
ते जातिभेद मानत नाहीत.
ते अस्पृश्यांना जवळ घेतात.
ते स्त्रियांना समान अधिकार देतात.
ते धर्म बुडवायला निघालेत.’
पण तरीही शरणांनी विवाह लावून दिला; विरोधक अधिकच चिडले. त्यांनी राजावर दबाव आणला. परिणामी, बिज्जलाने हरळय्या, मधुवरस आणि शीलवंत यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. या घटनेमुळे शरण समुदायात प्रचंड असंतोष निर्माण झाला. बसवण्णांनी कल्याण सोडले. त्यामुळे तर शरणांचे आत्मचैतन्य हरपले. याचा फायदा घेऊन सैन्याने शरणांच्या कत्तली सुरू केल्या. वचन साहित्य भंडारास आग लावण्यात आली. शरणांची पांगापांग झाली.
अशा या घोर संकट प्रसंगी वीर सेनानी ककया आणि माची देव यांनी शरणांना सावरले. शरण ककया गणाचारी दलाचे नेतृत्व करत, वचन साहित्य रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांना चन्नबसवण्णा आणि अकनागम्मांचे मार्गदर्शन होते. शरणगण गठ्ठे पाठीशी बांधून निघाले, तर ककया तलवार हाती घेऊन शरण गणाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढण्यास सिद्ध झाले. सैन्य ककयांच्या तुकडीच्या पाठीशी लागले होते. शेवटी सैन्याने कादरवळ्ळी जवळ ककयांच्या तुकडीला गाठले. वीर सेनानी ककयांनी काही मातब्बर शरणांना सोबत घेऊन बिज्जल सैन्याशी प्रखर झुंज दिली. त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले. परंतु लढण्याचा आवेश कमी झाला नव्हता. वचन साहित्य सुरक्षित असल्याची वार्ता कळताच ककयांचा देह धरेवर कोसळला. आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या तत्त्वांच्या रक्षणासाठी झुंज देणारा हा महान योद्धा निघून गेला. यापेक्षा आणखी मोठी तत्त्वनिष्ठा किंवा साहित्यनिष्ठा कोणती असू शकेल? बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ककेरी गावात ककयांचे तळे आणि ककयांची विहीर हे दोन जलाशय, आजही ककयांच्या त्यागाची साक्ष देत अखंडपणे वाहत आहेत. तेथे असलेले ककयांचे मंदिर देशभरच्या शरणांना खुणावत आहे. आजही महाशिवरात्रीच्या दिवशी ककेरी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
ककयांचा आणि शरणांचा विचार थोडक्यात सांगायचं तर, पुढीलप्रमाणे सांगता येईल .
- बंधुभाव, करुणा, समता.
- स्त्रियांना पुरुषांबरोबर अधिकार.
- सर्वांना ज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश.
- मातृभाषेतून धर्माचे शिक्षण.
- पुरोहितांच्या पिळवणुकीला चाप.
- वैदिक वर्णवर्चस्वाला विरोध.
- जाती निर्मूलन.
- श्रमाला प्रतिष्ठा.
- आंतरजातीय विवाहांना पाठिंबा.
- पुनर्विवाहाला पाठिंबा.
- देव देवळात नाही, हृदयात आहे.
- शोषणाला विरोध.
- यज्ञयाग, होम, सूतकपालन, इंद्रिय दमन नको.
- चोरी, हत्या, मानभंग करू नका.
- जगत सत्य आहे.
या शाश्वत सत्यांना दडपायचं तर सनातनी ब्राह्मणवाद्यांना हातात शस्त्र घ्यावे लागते. बाराव्या शतकात त्यांनी कल्याण क्रांती मोडून काढली, दडपली. वचन साहित्य जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण माणसे मारून विचार नष्ट करता येत नाहीत. अथक प्रयत्नांनी संशोधकांनी कल्याण क्रांतीचा इतिहास शोधून काढला. पण ही माहिती संशोधन करून सर्वांसमोर खुली केली. या रागातून त्यांनी सात वर्षांपूर्वी प्राध्यापक कलबुर्गी यांचा खून पाडला. त्यापूर्वी त्यांनी याच विचारांच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश, यांचेही खून पाडले. या खुनातले सर्व संशयित आरोपी एकाच ब्राह्मण्यवादी संघटनेचे आहेत. आजही प्रशासनावर त्यांचा एवढा प्रभाव आहे की फुटकळ खुनी आरोपी सापडले तरी, त्यांच्या मास्टरमाईंड पर्यंत पोलीस पोचू शकत नाहीत.
कल्याण क्रांतीचे विचार आज भारतीय संविधानामध्ये पहायला मिळतात. संविधानाचे संरक्षण आणि प्रचार, प्रसार ही ककयांना आदरांजली होय.
-अनिल चव्हाण
लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३