अनिल सावंत - 9869791286
9 जानेवारी 2021 रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील मध्यरात्री दोन वाजताची ही घटना. रात्रीचे तापमान 21 अंश सेल्सियस असावे. बर्याचदा जन्म होताना नवजात बालकाचे शारीरिक तापमान कमी झालेले आढळते. अशावेळी जन्मानंतर योग्य प्रमाणात शारीरिक तापमान वाढवण्यासाठी आजारी अर्भकाला ‘रेडीएन्ट हीटर’ या उपकरणात ठेवून तापमान नियंत्रित केले जाते. अशी सतरा बालके नवजीवनाच्या प्रतीक्षेत ही ऊब घेत होती. अनपेक्षितपणे नवजीवन देणारे व प्राण वाचवणारे हॉस्पिटलच बालकांचा जीव घेणारा मृत्यूचा सापळा बनले. कोवळ्या जीवांना जीव वाचवणार्या ऊबेऐवजी आगीच्या भीषण झळा मिळाल्या आणि नवजात बालकांसाठी ती काळरात्र ठरली.
ड्यूटीवर असलेल्या परिचारिकेने प्रथम नवजात अर्भक दक्षता विभागातून धूर येत असल्याचे पाहिले. तिने तसे वरिष्ठ अधिकार्यांना कळवले. अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आयसीयू, डायलिसीस व लेबर वॉर्डमधील पेशंटना इतर वॉर्डमध्ये हलवले. मात्र दहा बालके मृत्युमुखी पडली.त्यातील तीन बालके जळाली, तर सात विषारी धुरामुळे दगावली.
नागपूर विभागीय आयुक्त श्री. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, नवजात बालक वॉर्डमधील ‘बेबी वार्मर’ उपकरणाच्या कंट्रोल पॅनेलमध्ये व्होलटेज कमी-जास्त झाल्याने ठिणगी पडून प्रथम आग लागली, ‘बेबी वार्मर’मधील बिछाना आणि प्लास्टिकने पेट घेतला. अशाप्रकारे आग वॉर्डभर पसरली. वाढलेल्या आगीच्या उष्णतेने त्या ‘नवजात बालक विभागा’तील सीलिंगमधील प्राणवायू पुरवठा करणारी पाईपलाईन वितळली आणि इलेक्ट्रिक वायरिंग वितळले. एअर कंडिशनिंग सिस्टिम व एक रेडीएन्ट हीटर जळून खाक झाला.
हे हॉस्पिटल 1981 मध्ये सुरू झाल्यापासून स्थानिक प्रशासनाकडून अग्निसुरक्षेसाठीची परवानगी (एनओसी) न घेताच कार्यरत होते. तसेच 2015 मध्ये मेडिकल स्टोअर, न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर आणि आजारी नवजात बालकांसाठी नवीन विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाच्या वेळीसुद्धा ‘फायर एनओसी’ घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ओ. सी. (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) म्हणजे इमारतीत वास्तव्य करून वापर करण्याची परवानगी न घेताच सार्वजनिक विभागाकडे सुपूर्द केली. या चारमजली हॉस्पिटलमध्ये 482 बेडची व्यवस्था होती. कोविडसाठी आणखी 300 बेडची व्यवस्था केली गेली होती.
कोरोना काळात ही दुर्घटना घडली, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविड-19 कडे लक्ष केंद्रित करताना हॉस्पिटल प्रशासनाचे काही दुर्लक्ष झाले असेल, तर त्याचीही चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, यापुढे नवीन हॉस्पिटल बांधताना ‘नॅशनल बिल्डिंग कोड’च्या नियमांचे पालन करून बांधकाम करण्यात येईल. पण आज कार्यरत असलेल्या एकूण आरोग्यव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत बदल करून भंडारा जिल्हा हॉस्पिटलसारखे भीषण अपघात पुन्हा होऊ नयेत, यासाठी धोरणे आखून कृतिकार्यक्रम कोण आणि कधी अमलात आणणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय, त्याचे काय?
हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या कारणांमध्ये सर्वांत प्रमुख आहे, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट. मोठ्या प्रमाणात आग लागण्यास एअर कंडिशनर कारणीभूत होतात. अग्निशमन व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी करणे व त्रुटी आढळल्यास योग्य त्या दुरुस्त्या करून यंत्रणा कायम सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. कर्मचार्यांचे नियमित प्रशिक्षण केले पाहिजे. आजूबाजूच्या वस्तू, पदार्थ लक्षात घेऊन इलेक्ट्रिकल उपकरणे ठेवण्याच्या सुरक्षित जागा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. अतिदक्षता विभागात सतत प्राणवायू मापन करणारी उपकरणे बसवणे गरजेचे आहे. अल्कोहोल, इथर अशा ज्वलनशील रासायनांचा साठा ठेवण्याच्या जागा रुग्ण कक्षांपासून दूर असायला हव्यात.
‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ या संस्थेने वस्ती, वावर व व्यवहार लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या इमारतींसाठी बांधकाम सामग्री, इमारतीची रचना, उपलब्ध करावयाच्या सुविधा, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, मानवी जीव सुरक्षा व्यवस्था यासंबंधी मानके व नियमावली एकत्रित करून ‘नॅशनल बिल्डिंग कोड’ (एन. बी. सी.) प्रथम 1970 मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर वेळोवेळी त्यात सुधारणा करत आता 2016 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, पद्धती व मानके यांचा समावेश करून उपयुक्त अशी नियमावली बनवली आहे. एन. बी. सी. मध्ये इमारतीच्या वापरानुसार ‘ए’ ते ‘एच’ असे आठ (ग्रुप) प्रकार व उपप्रकार दिले आहेत. ‘ग्रुप सी’ मध्ये ‘सी-1’ या प्रकारात हॉस्पिटल इमारत गणली जाते. एन. बी. सी. मध्ये ‘सी – 1’ प्रकारच्या आरोग्यसेवा देणार्या इमारतीची रचना कशी असावी, वेगवेगळे विभाग, उपकरणे यासाठीची मांडणी कशी असावी, दरवाजांची उंची किती असावी, इलेक्ट्रिक वायरिंगपासून एकूण व्यवस्थेत कोणत्या दर्जाचे मटेरियल निवडले पाहिजे, आग लागू नये म्हणून कोणत्या तरतुदी केल्या पाहिजेत, चुकून आग लागलीच तर त्वरित विझवण्यासाठी अग्निशामक उपकरणे/यंत्रणा कोणत्या प्रकारची व किती असावी, आपत्तीसदृश स्थिती झालीच तर बालके, रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी सर्वांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षितरित्या सुटका करण्यासाठी बाहेर पडण्याचे मार्ग कसे असावेत, आग पसरू नये, यासाठी कंपार्टमेंटेशन कसे असावे, आगीचा धूर इमारतीत न पसरता बाहेर सुरक्षित ठिकाणी टाकण्यासाठी वायुविजनव्यवस्था कशी असावी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रीन्कलर व फायर हायड्रन्ट व्यवस्था कशी असावी, असे बहुमूल्य मार्गदर्शन असलेला हा दस्तावेज आज उपलब्ध आहे. हे कोड व त्यातील नियमावलीनुसार इमारतींचे बांधकाम केले व अग्निसुरक्षा, मानवी जीव सुरक्षा यासाठीच्या सुविधा अमलात आणल्या तर भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीसारख्या दुर्घटना टाळणे आणि जीवितहानी होऊ न देणे शक्य आहे. तसेच नियमितपणे ‘अग्नी व जीव सुरक्षा’ तज्ज्ञांकडून ‘फायर लाईफ सेफ्टी’ ऑडिट करवून घेणे, ऑडिट रिपोर्टनुसार त्रुटींवर आवश्यक कार्यवाही करणे, सर्वांना प्रशिक्षण देणे या कृती अमलात आणल्या पाहिजेत.
परंतु ‘नॅशनल बिल्डिंग कोड’नुसार इमारतीचे बांधकाम व इतर व्यवस्था करणे हे कायद्याने बंधनकारक नसून ऐच्छिक असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी असोत की खाजगी बिल्डर; (अपवाद सोडल्यास) कोणीही या नियमावलीचा बांधकामात प्रयोग करीत नाहीत, हे कटू वास्तव आहे.
शासकीय हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगींच्या 2011 पासूनच्या 19 दुर्घटनांच्या अभ्यासात खालील मुद्दे समोर आले आहेत. 18 दुर्घटना इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे झाल्या; उरलेल्या एका दुर्घटनेत बेसमेंटचा चुकीचा वापर कारणीभूत झाल्याचे आढळले. बेसमेंटचा वापर वाहने पार्क करण्यासाठी न करता एल.पी.जी. गॅस सिलिंडर्सचा साठा, फाटलेल्या गाद्या व लाकडी बॉक्स ठेवण्यासाठी केला जात होता; तसेच तिथे ज्वालाग्राही पदार्थांचा साठा व वापर असलेले फार्मसी, मध्यवर्ती स्टोअररूम व बायोमेडिकल विभाग कार्यरत होते. पाच हॉस्पिटलमध्ये आगीच्या दुर्घटना शॉर्ट सर्किट या एकाच कारणाने पुन्हा घडल्याचे आढळले. या अभ्यासानुसार, इलेक्ट्रिक पॉईंट ओव्हरलोड करणे, चुकीच्या पद्धतीचे यू. पी. एस. पॉवर सप्लाय लोड व त्यांच्या बॅटरीतील अॅसिड, थरमॉकोल लावलेले फॉल्स सीलिंग, सदोष इलेक्ट्रिक वायरिंग, ओव्हरहीटिंगमुळे वायर जळणे ही आग लागण्याची प्रमुख कारणे आढळली. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये आयसीयू विभाग, व्हेंटिलेटर विभाग, एक्सरे विभाग, नवजात बालकांसाठीचा इनक्युबेटर विभाग, बालकांसाठीचा आयसीयू विभाग, लहान मुलांचे विभाग, डायलेसीस विभाग, ऑपरेशन थिएटर, बायोमेडिकल उपकरणे ठेवण्याची खोली अशा ठिकाणची एअर कंडिशनिंग सिस्टिम जळून खाक झाल्याचे दिसले. अशा विभागांमध्ये व्हेंटिलेटरसारखी विजेचा लोड खाली-वर करणारी आणि जास्तीची वीज लागणारी उपकरणे वापरत असतात, त्यात शॉर्ट सर्किट होण्याची संभावना जास्त असते; तसेच ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन गळती झाल्यामुळे खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले तर आग लागण्यास व पसरण्यास मदतकारक ठरते. अशा ऑक्सिजन संपृक्त हवेत वर सांगितलेल्या उपकरणात पडणारी लहानशी ठिणगी सुद्धा शॉर्ट सर्किटला कारणीभूत होऊ शकते. या उपकरणाप्रमाणे बर्याच घटनांमध्ये स्प्लिट ए. सी. आगीस कारणीभूत झाल्याचे आढळते. तसेच एअर कंडिशनिंग असलेल्या इमारतीत बाहेरची हवा नैसर्गिकरित्या आत येऊन वायुविजन होत नसल्यामुळे, आगीचा धूर कोंडून कार्बन मोनॉक्साईड वायूने गुदमरल्यामुळे माणसे प्राण गमावतात. धुरामुळे आपत्तीप्रसंगी लोकांना सुरक्षित बाहेर काढणे जिकिरीचे बनते.
हॉस्पिटल सुरू करताना योजिलेला विजेचा लोड दरवर्षी 25 टक्के वाढत जातो. नवनवीन उपकरणे आणली जातात. तेवढ्या प्रमाणात लोड घेण्याची इलेक्ट्रिक यंत्रणा आधी विचारात घेऊन बसवलेली नसते. तात्पुरते रिपेअर आणि एक्स्टेन्शन घेण्याच्या प्रकारातून शॉर्ट सर्किटची शक्यता वाढते.
भंडारा जिल्हा हॉस्पिटल दुर्घटनेच्या चौकशी समितीने शिफारस केली आहे की, हॉस्पिटलमधील उपकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित इलेक्ट्रिकल व बायोमेडिकल इंजिनिअरची नियुक्ती करण्यात यावी. ही सूचना महत्त्वाची मानली तरी केवळ तेवढ्याने प्रश्न सुटू शकत नाही. एकूण यंत्रणाच सदोष असेल तर प्रशिक्षित इंजिनिअर एकटा काय करणार? त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अग्निसुरक्षा व जीवसुरक्षा यासाठी वर संगीतलेल्या सर्व गोष्टी अमलात आणून एकूण आरोग्यव्यवस्था सुधारणे तातडीचे आहे. त्यासाठी सुजाण नागरिकानी जागरूक बनून आग्रह धरला पाहिजे.
तसेच तंत्रज्ञानात झालेली प्रगती समजावून घेऊन आपत्ती टाळण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. केवळ अर्थिग व्यवस्था आहे, म्हणजे सर्व काही आलबेल असणार, ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. फायर लोडची मोजणी करून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. इलेक्ट्रिक इन्सुलेशनची रेजिस्टन्स टेस्ट, अर्थ इलेक्ट्रॉड रेजिस्टन्स टेस्ट, थर्मोग्राफी टेस्ट, पॉवर क्वालिटी अॅनालिसिस अशा आधुनिक टेस्ट व पद्धती अंगीकारून आग लागण्याची शक्यता नेमकी ओळखून वेळीच आवश्यक कार्यवाही केली पाहिजे. तरच हॉस्पिटल व इतरत्र आगी लागण्याच्या दुर्घटना टाळता येतील; अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या..’ सुरूच राहील.
तंत्रज्ञानात झालेली प्रगती समजावून घेऊन आपत्ती टाळण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. केवळ अर्थिग व्यवस्था आहे, म्हणजे सर्व काही आलबेल असणार, ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. फायर लोडची मोजणी करून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. इलेक्ट्रिक इन्सुलेशनची रेजिस्टन्स टेस्ट, अर्थ इलेक्ट्रॉड रेजिस्टन्स टेस्ट, थर्मोग्राफी टेस्ट, पॉवर क्वालिटी अॅनालिसिस अशा आधुनिक टेस्ट व पद्धती अंगीकारून आग लागण्याची शक्यता नेमकी ओळखून वेळीच आवश्यक कार्यवाही केली पाहिजे. तरच हॉस्पिटल व इतरत्र आगी लागण्याच्या दुर्घटना टाळता येतील; अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या..’ सुरूच राहील.
लेखक संपर्क ः मो. 98697 91286
