चिकित्सकवृत्ती व विवेकवाद यावर ब्राह्मण्यवादी विचारांचा हल्ला

सूरज एंगडे -

विवेकीविचारांची मुळे आपल्या भूमीत पहिल्यापासूनच आहेत. जो कोणी विज्ञान आणि ज्ञानाकडे झुकला तो पारंपरिक कल्पनांना आव्हान देऊ लागला. एकदा का हे विवेकी विचार जनआंदोलनात परिवर्तित झाले की, या समाजाला भोळसट आणि अध्यात्मिक विचारांच्या प्रभावाखाली ठेवणार्‍यांच्या समोर जनआंदोलन मोठे आव्हान निर्माण करू लागले.

महाराष्ट्रात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही संघटना बुवा-बाबा, तांत्रिक-मांत्रिक, योगी-गुरू, छद्मविज्ञानावर आधारलेले धार्मिक संघ-संस्था इत्यादीबद्दलच्या मिथक कथांचे खंडन करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सनातन धर्माचे तथाकथित ठेकेदार गरीब आणि अशिक्षित (व काही वेळा साक्षर असूनसुद्धा अशिक्षित असलेल्या) लोकांना फसवतात, हे महाराष्ट्रातील सुजाण, पुरोगाम्यांना माहीत झाले. त्यामुळे तेही अंनिसच्या मार्गावर चालू लागले आणि समितीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला. वैद्यकशास्त्राचे पदवीधर व निष्णात कबड्डीपटू असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर समाजाला पुरोगामी विचारांच्या दिशेने घेऊन जाऊ लागले.

धर्म आणि श्रद्धेच्या भोवती विणलेल्या कर्मकांडातील वेडेपणाला कंटाळलेल्या जनसामान्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी अंनिसची स्थापना केली. जनसामान्यांना नेहमीच सोपा आणि लवकर सुटका करून घेण्यासाठी श्रद्धेचा आधार हवा असतो. परंतु जनसामान्यांना मूर्ख बनवत त्याचाच फायदा धार्मिक उच्चभ्रू घेत होते.

या धर्म संस्था व बाबा-बुवा काहीबाही भाकड कथा सांगत आणि जनसामान्यांच्या भावनांना हात घालत आणि त्यातून क्षणिक मानसिक दिलासा देत पीडितांची फसवणूक करत होत्या. जे मानसिक आधार देतात त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर पीडित शेवटी मानसिकरित्या अवलंबून राहतात. तथापि हे दीर्घकाळ टिकणार नाही हे कळल्यावर ते आणखी तणावग्रस्त होतात व त्यांच्या स्वत:च्या कर्माला दोष देतात. त्यांना या मानसिक छळातून बाहेर काढण्यासाठी दाभोलकरांनी हळुवार हात पुढे करून लोकांना आधार दिला आणि अंधश्रद्धेच्या तावडीतून त्यांना बाहेर काढू लागले.

विवेकीविचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अंनिसची सुरुवात केली. भारतातील महान पुरोगामी महात्मा फुले आणि पेरियार यांच्याप्रमाणे, अंनिसने भूत-प्रेत- चमत्काराचे

अस्तित्व सिद्ध करणार्‍यासाठी रोख बक्षिसे जाहीर केली. फुले आणि पेरियार यांनी देव-देवतांचे अस्तित्व नाकारत देव-देवतांची मूर्तीपूजा नाकारली. त्यामुळे जनतेची दिशाभूलही झाली. हा पुरोहित अभिजात वर्गाच्या दडपशाहीला-किंवा पेरियार ज्याला ब्राह्मणशाही म्हणतात त्या पुरोहितशाहीला-दिलेली ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

परंतु पुरोगाम्यांच्या या प्रतिक्रिया परंपरावादी व दहशतवादी शक्तींना मंजूर नव्हत्या. डॉ. दाभोलकरांचा सौम्य विरोधही त्यांना सहन होण्यासारखा नव्हता. कारण त्यांच्या मते डॉ. दाभोलकरांच्या मागे लोकशक्ती उभी होती व ते जनसामान्यांसाठी आकर्षक व्यक्तिमत्व बनले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्याची वेळीच दखल घेणे प्राप्त झाले होते. त्यांचा सांस्कृतिक व राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, असे त्यांना वाटू लागले. त्यांचे प्रत्येक उपक्रम या फुकट्यांना (फ्रीलोडर्संना), फसवणूक, दगाबाजी करून शोषण करणार्‍यांना त्रासदायक ठरू लागले. ही विवेकी संस्कृती राजकीय वर्गात पसरू देणे हितावह ठरणार नाही, असे त्यांना वाटू लागले. वेळीच त्याचा अटकाव करणे त्यांना गरजेचे वाटले.

दहा वर्षापूर्वी भरदिवसा डॉ. दाभोलकरांचा खून करण्यात आला. त्यावरील खून-खटला आता सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाच्या तपासात सापडलेल्या मारेकर्‍यांचा ब्राह्मण्यवादी सनातनी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यातील बहुतेक मारेकरी बहुजन समाजातील आहेत. ते सर्व एका विशिष्ट धार्मिक वर्चस्ववादी गटाशी संबंधित असल्याचे तपासात उघड होत आहे. त्यांचा अजेंडा भारताला ब्राह्मणशासित हिंदू राष्ट्र म्हणून स्थापित करण्याचा आहे. त्यासाठी शस्त्रास्त्रे आणि लढाईचे प्रशिक्षण घेतलेला निमलष्करी दल आता विविध भागात कार्यरत आहे. त्यांची ही कृष्णकृत्ये त्यांच्याच उजव्या विचारांच्या इतर संघटनांनासुद्धा मान्य नाहीत.

जनआंदोलनाची धुरा संभाळणार्‍या प्रमुखांच्या मृत्यूने तपास यंत्रणांवरसुद्धा संशय निर्माण होत आहे. जर या तपास यंत्रणा अशा अनपेक्षित परिस्थितींचा अंदाज घेऊ शकत नसतील आणि टाळू शकत नसतील तर त्याच्याकडे संशयाने बघितले जाणे अनिवार्य ठरू शकते. विवेकवादी विचारांबद्दलची घृणा दोन्ही सभागृहातील काँग्रेस आणि भाजपातील हिंदूंच्यात दिसून येते. काँग्रेसमधील हिंदू इतर पक्षांपेक्षा जास्त सक्रिय आहेत तर उजव्या विचारसरणीच्या पक्षातील इतर धर्मातील मुस्लीम किंवा ख्रिश्चन सभासदसुद्धा आपापल्या धर्मश्रद्धांना गौण ठरवत उजव्या विचारांच्या पक्षांना साथ देत आहेत.

या पार्श्वभूमीवर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्यासमवेत दाभोलकरांची हत्या ब्राह्मण्यवादी शक्ती कुठला संदेश देऊ इच्छितात हे समोर आणते. या चार पुरोगामी विचारवंतांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार एकाच बनावटीचे — एवढेच नव्हे तर एकाच हत्याराने खून केलेले- होते असे कोर्टात सादर करण्यात आलेल्या तपास अहवालात नमूद केले आहे.

लोकहिताच्या अजेंडांचे मार्गदर्शन करणार्‍या आणि घटनात्मक मूल्यांना चालना देणार्‍या या पुरोगाम्यांची हत्या हा देश कोणत्या दिशेने जात आहे याबद्दल बरेच काही सांगून जाते. दरम्यान, अंनिस कार्यकर्त्यांनी भीती झुगारून विवेकाचा लढा सुरू ठेवला आहे. एक मात्र खरे की ज्या ज्या वेळी विवेकवाद हा वैज्ञानिक कल्पनांना जन्म देतो त्या त्या वेळी सनातनी शक्तींकडून त्या कल्पना मारल्या जातात. विवेकवाद्यांच्या राखेवर मशागत केलेली ही भूमी आहे. प्रारंभीचे भारतीय भौतिकवादी चार्वाकांना कुठल्याही क्षणी मानेवर कुर्‍हाड कोसळेल अशा भीतीच्या वातावरणात जगावे लागले. बौद्ध आणि जैन धर्मोपदेशकांनी अंधश्रद्धा आणि सत्तेच्या धोक्यापेक्षा तर्क आणि अनुभवांना प्राधान्य दिले.

ही पुन्हा तीच भूमी आहे जी पुरोगामी स्वातंत्र्याची प्रेरणा देत राहते आणि इतर कुठल्याही मार्गापेक्षा चिकित्सा आणि विवेकनिष्ठतेला प्राधान्य देत सर्वांना आमंत्रित करते.

(सूरज एंगडे कास्ट मॅटर्स या आंबेडकरवादावरील पुस्तकाचे लेखक असून ऑक्सफर्ड येथे स्थायिक आहेत.)

स्वैर अनुवाद : प्रभाकर नानावटी

साभार : इंडियन एक्सप्रेस


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ]