नरेंद्र लांजेवार - 9422180451
“सर्वप्रथम माझ्या माय मराठीला ज्ञानभाषेचा सन्मान मिळवून देणार्या लोकोत्तर सर्वज्ञ स्वामी चक्रधरा… तुझ्या कार्यकर्तृत्वाला दंडवत… प्रणाम! संतांनी वाळीत टाकलेल्या हे संतश्रेष्ठा, चक्रधरा… तुझ्या अवतरण दिनाला 800 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून आज तुझ्याशी संवाद साधतो आहे….
आज विकासाचे मॉडेल म्हणून मिरवणार्या गुजरातच्या भडोचमध्ये इ. स. 1221 मध्ये तुम्ही अवतरलात. तुमची मातृभाषा गुजराती, तरी तुम्ही महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून येथील मराठी लोकबोलीभाषेत सर्वप्रथम धार्मिक तत्त्वज्ञान समजून सांगितले. वैदिक संस्कृती परंपरेला छेद देत मराठी भाषेत अध्यात्म सांगणारे तुम्ही पहिले लोकसंत ठरलात. तुमच्या नंतर ज्ञानेश्वरांनी मराठीत ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली.
सर्वज्ञ चक्रधरा …आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण प्रचंड विचित्र होती. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार येथील समाजव्यवस्थेने केला होता. सर्वत्र संस्कृत भाषेचा बोलबाला होता. सर्वत्र धर्ममार्तंडांच्या मनमानीने कळस गाठला होता. समाजात स्पृश्य-अस्पृश्य, त्यांची सामाजिक उतरंड मोठ्या प्रमाणावर होती. अंधश्रद्धांना ऊत आला होता. बंधुभावाचा अभाव, स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक, देव-धर्माच्या नावाने शिव आणि वैष्णवांच्या मध्ये मतभेद होते. संस्कृत हीच अध्यात्माची आणि मोक्षाच्या तत्त्वज्ञानाची भाषा होती. अध्यात्म व मोक्षप्राप्तीचा इतरांना; तसेच महिलांना अधिकार नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत चक्रधर स्वामी, महाराष्ट्राच्या भूमीत आठशे वर्षांपूर्वी तुमचे आगमन झाले. सर्वज्ञ चक्रधर, तुम्ही सर्वप्रथम स्थानिक लोकभाषेत जनतेशी संवाद सुरू केला. अध्यात्माला लोकभाषेची जोड दिली. वैदिक संस्कृतीतील जवळपास सर्व देवदेवता तुम्ही नाकारल्या. एकेश्वरवादाचा स्वीकार केला. श्रीकृष्णाशिवाय सर्वच देव अपूर्ण म्हणून तुम्ही सर्वच मूर्तिपूजेला विरोध केला. मूर्तिपूजेला विरोध केल्यामुळे कोणतेही मंदिर किंवा मठातील मूर्तिपूजा तुमच्यासाठी निषेधार्हच होती.
चक्रधर स्वामी, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता, जात-पात, शिवाशिव, खाण्या-पिण्याचे निर्बंध, सोवळे-ओवळे यापैकी काहीएक मान्य नव्हते. तुम्हाला चातुर्वर्ण्य मान्यच नव्हता. तुमच्या प्रबोधनाच्या चर्चेत समाजातील सर्व कनिष्ठ जाती-जमातींचे स्त्री-पुरुष सहभागी होत असत. त्यामुळे प्रस्थापित धार्मिक-सामाजिक कल्पनांना आणि नीतिनियमांना भयंकर धक्का देणारे तुमचे कृत्य समजले जाऊ लागले. जन्म, मुंज, विवाह, मृत्यू, श्राद्ध इत्यादी धार्मिक विधीत भिक्षुकांच्या दलालीचे अवडंबर तुम्हाला मान्य नव्हते. तुम्ही जाहीरच करून टाकले होते की, जात्रे क्षेत्रे न वचावे। तीर्थक्षेत्री व्रत, दान इत्यादी वर्ज्य समजावे। सर्व लहान-मोठ्या देवदेवतांचे पूजन तुम्ही निषिद्ध ठरविले. वैष्णव-शिव, गणपत्य, शाक्त सर्व प्रकारच्या देवी, वन्य जाती-जमातींचे दैवत सुद्धा सारखेच निषिद्ध असल्याचे तुम्ही जाहीर केले. तुम्ही हिंसेच्या कालखंडात अहिंसा धर्म सांगितला. स्वामी चक्रधरा, तुम्ही स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना संन्यासधर्म खुला केला. पूर्वी संन्यास घेण्याचा अधिकार हा फक्त विशिष्ट जाती किंवा धर्मातील लोकांनाच होता. ज्या-ज्या गावात तुमचे अनुयायी जातील, तेथे सर्वप्रथम हातात खराटा घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा हा वसाच तुम्ही लोकांना दिला. खराटा हाच तुमच्या समाजसेवेचा व धर्माचरणाच्या व्रताचा महत्त्वपूर्ण भाग होता. डोक्यावर खराटा हाणूनच ‘महानुभाव’ पंथाची दीक्षा दिली जायची. ‘खराटा’ हेच तुमचे धार्मिक बोधचिन्ह होते. तुमच्या दृष्टीने माणूस हा एकच वर्ण होता, एकच जात होती. माणुसकी हाच एकमेव धर्म होता. माणसामाणसांमध्ये समानतेची, मोकळेपणाची सहज वागणूक हीच तुमच्या दृष्टीने योग्य होती. तुमच्या दृष्टीने उच्च-नीच, वरिष्ठ-कनिष्ठ असा वर्गभेद, जातिभेद नव्हता. तुम्ही स्त्री आणि पुरुषांना समानतेची वागणूक दिली. तुमचे चारित्र्यहननाचे अनेक प्रकार झालेत. तुम्ही वैदिक परंपरा, त्यांचे तत्त्वज्ञान नाकारल्याने तुमची निंदा-नालस्ती करण्यात आली. तुम्ही मराठी लोकभाषेत सर्वप्रथम अध्यात्माचे धडे दिले, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, जनमानसात नवचैतन्याचे वारे संचारले. तुम्ही याच भूमीत न थांबता उत्तर प्रदेश, पंजाब, काबूल-कंदहारपर्यंत मराठी भाषेचीच ध्वजपताका घेऊन गेलात.
चमत्कार करण्याचे सामर्थ्य म्हणजेच संतपद, अशी आपल्याकडे अनेकांची दृढ धारणा आहे. पण चमत्कार न करणारा आणि चमत्कारांना मान्यता न देणारा संत म्हणून तुमच्याकडे बघितले जाते. मराठी बोलीभाषेचे सामर्थ्य ओळखून तुम्ही बोलीभाषेतच लिहिण्याचा आदेश दिला. तुमच्या अमानुष अंतानंतर तुमच्या अनुयायांनी मराठी भाषेत ग्रंथनिर्मिती केली. म्हाइंभटाने ‘लीळाचरित्र’ हा आद्यमराठी ग्रंथ (इ. स. 1275) आम्हाला दिला. ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य चरित्रकोशही आहे. ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ आध्यात्मिक तर आहेच; पण लौकिक जीवनाचे दर्शन घडविणाराही आहे. या ग्रंथामुळे प्राचीन मराठी गद्याची शब्दसंपत्ती, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ आज तरी उपलब्ध नाही. या ग्रंथात निरनिराळे खेळ, व्यवसाय, शेती, शेतीची अवजारे, फळे, भाज्या, घरे, त्यांची मांडणी, तत्कालीन पाककृती अशी विविधांगी माहिती ‘लीळाचरित्रा’तून मिळते. मराठी भाषेत ‘लीळाचरित्र’, ‘सूत्रपाठ’, ‘रुक्मिणीस्वयंवर’, ‘शिशुपालवध’, ‘ऋध्दिपूर वर्णन,’ ‘सह्याद्रीवर्णन’ ‘वच्छाहरण’ या सात ग्रंथांना ‘महानुभाव’ वाङ्मयात मानाचे स्थान आहे. पुढे मुस्लिम व हिंदू राजसत्तेने ‘महानुभाव’ विचारसाहित्य व त्यांच्या हस्तलिखितांची मोठ्या प्रमाणावर हानी केली. तुमच्या अनुयायांनी सांकेतिक लिपीत अनेक ग्रंथ लिहून ठेवले. त्यामुळे आज मराठीत साहित्याची मोठी परंपराच ‘महानुभाव’ साहित्याने जतन केली आहे. हे अहिंसेच्या दीपस्तंभा, सत्यकथन केल्याबद्दल यहुदी धर्ममार्तंडांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविले. तसेच वैदिक परांपरा नाकारल्याने चक्रधरा, तुम्हाला सुद्धा देवगिरीच्या यादव राज्यकर्त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा केली व तुमचा प्रत्यक्ष शिरच्छेद झाला. या मताला दुजोरा देणारेही विचारवंत महाराष्ट्रात आजही आहेत.
स्वामी चक्रधरा… तुला खरोखरच तत्कालीन संतांनी सुद्धा वाळीत टाकले.. तुझ्या मानवतावादी, समतावादी, बंधुभावाच्या, अहिंसेच्या, बुद्धिवादी विचारांची त्यांनी हेटाळणी केली. वैदिक धर्म नाकारला म्हणून तुझी हत्या झाली. पुढे, जे वैदिक धर्माच्या विरोधात गेले, त्यांची याच भूमीत संत तुकारामांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरेंपर्यंत माणसं मारण्याची परंपरा सुरू आहे… माणूस मारून विचार मरत नाहीत, हे सत्य समजून आपण आपले कार्य करीत राहावे… हेच खरे आहे!
एका ऐश्वर्यसंपन्न राजघराण्यात जन्म घेऊन सुद्धा चक्रधरा, तू येथील मातीत, सर्वसामान्य माणसांसारखा वावरलास. राज्य- ऐश्वर्य, धन-दौलतीचा त्याग केलास, गोरगरिबांचे अश्रू पुसले, त्यांच्यात आत्मबळ निर्माण केले, स्वत्वाची जाणीव निर्माण केली. भेदाभेद अमंगळ आहेत, हेच शिकविले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धांनी मरगळलेल्या बुद्धीवर विवेकाचे, प्रबोधनाचे शिंपण केले. महाराष्ट्राच्या भूमीत पुरोगामी विचारांचे सर्वप्रथम बीजारोपण केले. पुढे नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांनी हीच महाराष्ट्राची पुरोगामी परंपरासमृद्ध केली. आज अनेक संदर्भ बदलले आहेत. चक्रधरा, तुझ्याही विचारांचे गतिचक्र मंदावले. तुमच्याही काही मठ आणि मठाधिपतींमध्ये वर्चस्वाची अहमहमिका लागली आहे. अनेक मठांमध्ये वैदिक परंपरेचा पगडा जाणवू लागला आहे. सामाजिक कार्यापेक्षा मोक्षप्राप्तीसाठी पूजा-अर्चा आणि स्थानमहात्म्यांना महत्त्व आले आहे. हे जरी खरे असले तरी अजूनही तुझे ‘डोळस’ तत्त्वज्ञान ठिकठिकाणी सांगितले जाते. त्यामुळे संतपरंपरेतील तुमचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार आम्ही आमच्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत, तुम्ही आमच्या विचारांचे खरे दीपस्तंभ आहात, तरी एक खंत मनात सलत असते, तुझ्या अवतारकार्याच्या, समाजपरिवर्तनाच्या अष्ठशताब्दी वर्षात तुझ्या नावाने मराठी भाषेचे विद्यापीठ महाराष्ट्र भूमीत साकार व्हावे. ‘मराठी भाषा विद्यापीठ’ हीच तुझ्या कार्याला खरी आदरांजली ठरणार आहे…कारण मराठीला ज्ञानभाषेचा सन्मान करणारा तू पहिला विवेकी संत आहेस व तुझा ‘महानुभाव’ पंथ मराठी साहित्याचे उगमस्थान आहे, म्हणून तुझ्या कार्यकर्तृत्वाला मनापासून त्रिवार दंडवत…
तुझ्या विचारांचा चाहता…”
– नरेंद्र लांजेवार
संपर्क 9422180451